Loksabha 2019 : शिवसैनिक; नव्हे सोशल मीडिया सोल्जर्स!

Shivsena
Shivsena

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे असलेले आव्हान हे भारतीय जनता पक्षाशी अखेर ‘भूतो न भवति’ अशा वादंगानंतर झालेल्या ‘युती’नंतरही कायम आहे. त्याचे कारण या निवडणुकीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासार्हतेवरच मोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.

शिवसेनेने आपली पहिली-वहिली लोकसभा निवडणूक कधी लढवली, हा आता इतिहास झाला असला; तरी प्रचाराचे तंत्र कसे बदलले ते जाणून घेण्यासाठी त्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकणे महत्त्वाचे ठरते. १९७१ मध्ये, म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या पाचच वर्षांत शिवसेनेने ‘मध्य मुंबई’ मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. या परिसरातून शिवसेना उमेदवारी कोणास देणार, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. उमेदवार होते अर्थातच मनोहर जोशी! त्यांनी संपूर्ण दादर परिसरामध्ये ‘मनोहर जोशी विजयी’ असे मोठमोठे फलक लावले होते आणि त्या ठळक अक्षरांतील मथळ्याखाली बारीक अक्षरांत लिहिलेले होते : ही बातमी वाचायची असेल, तर मनोहर जोशी यांनाच मतदान करा!

जनतेला काही ही बातमी वाचायला मिळाली नाही. पण, शिवसेनेच्या प्रचाराचे तंत्र नेहमीच कसे आगळे-वेगळे असते, ते दाखवणारी ही झलक आहे. काळाच्या ओघात बरेच पाणी वाहून गेले. शिवसेनेच्या प्रचाराचे तंत्रही त्यानुरूप बदलले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे असलेले आव्हान हे भारतीय जनता पक्षाशी अखेर ‘भूतो न भवति’ अशा वादंगानंतर झालेल्या ‘युती’नंतरही कायम आहे. त्याचे कारण या निवडणुकीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासार्हतेवरच मोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. गेली चार वर्षे महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी होऊनही शिवसेना प्रत्यक्षात विरोधी पक्षाच्याच भूमिकेत होती. त्यामुळे आता मतदार अचानक ‘सत्ताधारी’ झालेल्या शिवसेनेवर विश्‍वास ठेवणार की नाही, हाच लाखमोलाचा प्रश्‍न आहे. त्यामुळे मतदारांच्या मनातील हा संभ्रम दूर करण्यासाठी शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या सभा आणि आदित्य ठाकरे यांचे ‘रोड शो’ याबरोबरच ‘सोशल मीडिया’वर लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेचे वैशिष्ट्य हे, की या ‘सोशल मीडिया’ची सारी जबाबदारी शिवसैनिकांवरच आहे. भाजपसारख्या अन्य पक्षांप्रमाणे हे काम शिवसेनेने ‘आऊटसोर्स’ केलेले नाही. सोशल मीडिया म्हणजेच व्हॉट्‌सॲप, फेसबुक आणि ट्विटर ही माध्यमे हाताळणाऱ्या शिवसैनिकांना ‘सोशल मीडिया सोल्जर्स’ असा किताब बहाल करण्यात आला आहे आणि त्यांचा समन्वय हर्षल प्रधान करत आहेत.

उद्धव यांच्या मावळ असो की मेळघाट आणि चंद्रपूर असो की गडहिंग्लज येथे झालेल्या सभा असोत की आदित्य यांचे ‘रोड शोज’ असोत; ते फेसबुकवरून थेट दाखवले तर जातातच; शिवाय त्यांची भाषणे प्रधान तत्काळ आपल्या खास ‘मीडियासैनिकां’च्या ग्रुपवर पाठवतात. ‘व्हॉट्‌सॲप’च्या एका ग्रुपमध्ये २५६ सदस्य असतात. त्यामुळे ते २५ गुणिले २५६ लोकांपर्यंत पोचतात आणि हे सोल्जर्स तो संदेश व्हायरल करत जातात.

अर्थात, हा प्रचाराचा भाग झाला. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेपुढे आणखी मोठे आव्हान आहे आणि ते म्हणजे शिवसेनेचे झालेले प्रतिमाहरण! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना त्यांची एकाच वेळी ‘हिंदुत्वरक्षक’ आणि ‘विकासपुरुष’ असलेली प्रतिमा देशाच्या पातळीवर उदय झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी हिरावून घेतली आहे. त्यामुळे केवळ ‘प्रादेशिक अस्मिते’च्या म्हणजेच ‘पॅरॉकियल’ अजेंड्याच्या जोरावर तसेच देशाच्या पातळीवर चालतील अशी धोरणे नसताना लोकसभा निवडणुका जिंकण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. या केवळ ‘करिष्म्या’च्या पातळीवर निवडणुका लढविण्याच्या धोरणामुळेच शिवसेनेची मते लोकसभेत कमी कमी होत चालली आहेत, हे आतातरी उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हवे.

बखर पक्षाची 
    १९ जून १९६६ रोजी पक्षाची स्थापना. पहिला दसरा मेळावा ३० ऑक्‍टोबर १९६६ रोजी
    पहिली लोकसभा निवडणूक १९७१. एकमेव उमेदवार मनोहर जोशी पराभूत
    १९८९ मध्ये भाजपबरोबर युती. लोकसभेच्या दोन जागा जिंकल्या. मात्र, लगेचच १९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५२ आमदार विधानसभेत
    १९९५ मध्ये विधानसभेत सर्वाधिक जागा ७३ (१६.४ टक्‍के मते). भाजपबरोबर ‘युती’चे सरकार. मनोहर जोशी मुख्यमंत्री
    सर्वाधिक मते २००४ च्या विधानसभा निवडणुकीत, २०.४ टक्‍के
    २०१४ विधानसभा ‘युती’ तुटल्यावर स्वबळावर लढून ६३ जागा (१९.८० टक्‍के मते)
    बाळासाहेब ठाकरे यांचा ‘करिष्मा’ आणि हिंदुत्व तसेच मराठी बाणा, यापलीकडे कोणताही अजेंडा नाही
    गेल्या पाच वर्षांत मात्र शेतकरी आणि अन्य प्रश्‍न हाताळले. येत्या निवडणुकीत मुख्य आव्हान विश्‍वासार्हता टिकविण्याचे
(उद्याच्या अंकात - वंचित बहुजन आघाडी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com