द लास्ट लीफ! (माधव केळकर)

माधव केळकर
रविवार, 19 ऑगस्ट 2018

लहानपणापासूनच मी या भूमीपासून, माणसांपासून दूर गेलेलो होतो. आता आपलेपणा अचानक कुठून पैदा करू? बरं, मला वाचन, अध्यात्म वगैरे आवडी जोपासता आल्याच नव्हत्या, म्हणजे, त्या गोष्टींची आवड होती; पण कामाच्या व्यापामुळं सवड मात्र मिळाली नव्हती. मग आता कुठून अचानकपणे त्या बाबी माझ्या मदतीला येतील?

लहानपणापासूनच मी या भूमीपासून, माणसांपासून दूर गेलेलो होतो. आता आपलेपणा अचानक कुठून पैदा करू? बरं, मला वाचन, अध्यात्म वगैरे आवडी जोपासता आल्याच नव्हत्या, म्हणजे, त्या गोष्टींची आवड होती; पण कामाच्या व्यापामुळं सवड मात्र मिळाली नव्हती. मग आता कुठून अचानकपणे त्या बाबी माझ्या मदतीला येतील?

आम्हाला शाळेत एक धडा होता The Last Leaf (अखेरचं पान) या नावाचा.
ती गोष्ट काहीशी अशी होती ः शाळेत शिकणारी एक मुलगी होती. ती होस्टेलमध्ये राहायची. एकदा ती काहीशी आजारी असते. बरं नसल्यानं ती सतत कॉटवर पडून असायची आणि पडल्या पडल्या आसपासचं निरीक्षण करत राहायची. तो पानगळीचा हंगाम होता. तिच्या खोलीच्या खिडकीबाहेर एक मोठं झाड होतं. त्याची एक फांदी खिडकीतून जवळजवळ आतच शिरायची राहिली होती. आता तिची बरीच पानं गळून गेली होती. काही गळण्याच्या बेतात होती. "या झाडाचं शेवटचं पान ज्या दिवशी गळून पडेल, तो माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल,' असा एक चमत्कारिक विचार त्या मुलीच्या मनात आला आणि मनाचा तसाच ग्रह तिनं करून घेतला. आता तिच्या या वाटण्याला खरं तर तसं काही सयुक्तिक कारण नव्हतं. बरं, तिची प्रकृतीही विकोपाला गेली होती, असंही नव्हतं; पण म्हणतात ना Empty mind is devils workshop! तसंच तिचं झालं होतं. आता तर ती झोपेत बडबडूही लागली होती. "चाळीस उरले... पंचवीस उरले...' तिला भेटायला येणाऱ्या मित्र-मैत्रिणींना तिच्या खालावत चाललेल्या प्रकृतीची काळजी वाटत होतीच. त्यात आता तिची ही "उलटगणती'ची बडबड. त्यांनाही काय करावं सुचेना. डॉक्‍टरांचे उपचार सुरू होतेच; पण आजाराला उतार काही पडत नव्हता. मित्र-मैत्रिणींपैकी एका मुलानं तिची बडबड व तिचं झाडाकडं पाहणं नीट निरखलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की तिच्या बडबडीचा आणि झाडाची पानं गळण्याचा काहीतरी संबंध आहे! मग त्यानं तिच्या नकळत एक कृत्रिम पान झाडाच्या फांदीला चिकटवलं व तिच्या मनावर बिंबवलं की ते शेवटचं पान झडत नाहीय, म्हणजेच तिचं आयुष्यही संपणार नाही.
न गळणाऱ्या त्या पानामुळं त्या मुलीची मानसिकता बदलते व ती उपचारांना योग्य तो प्रतिसाद देऊन खणखणीत बरी होते!
***
पुष्कळदा मलाही असंच वाटू लागतं. वास्तविक ती मुलगी - जी मुळातच काल्पनिक आहे - व मी यांत तसूभरही साम्य नाही. ती शाळकरी मुलगी, तर मी सत्तरीला पोचलेला, जरठ माणूस. तिच्यापुढं तिचं भावी आयुष्य अजून उपभोगायचं आहे, तर मी मात्र सर्व सुख-दुःखं उपभोगून आयुष्याच्या अखेरीकडं वाटचाल करत आहे. ती एकटी नव्हती, तिला मित्र-मैत्रिणी होत्या. मी मात्र या खोलीत एकटाच कॉटवर पडलेला आहे. रुग्णालयाचे कर्मचारी वेळेनुसार सलाईन लावणं, अंग पुसणं इत्यादी कामं अगदी घड्याळानुसार करत असतात. डॉक्‍टर राउंडला येऊन जातात. चार्टवर काही खुणा करतात. नर्सला काही सूचना देतात व निघून जातात. एका "ब्रेनडेड रुग्णा'ची आणखी किती काळजी घ्यायची असते?

पण माझा मुद्दा वेगळाच आहे. ब्रेन डेड झाला म्हणजे रुग्णाची विचारशक्ती संपली हे यांना कुणी सांगितलं? खरं म्हणजे ब्रेनडेड हाच माझा वादाचा मुद्दा आहे. मी कुठलीच हालचाल करू शकत नाही, माझी वाचा गेली आहे, दृष्टीही नाहीशी झाली आहे, संवेदनासुद्धा जवळजवळ नाहीतच...ही सगळी लक्षणं माझ्या बाबतीत लागू पडतात; पण म्हणून मी "मृतमेंदू' म्हणजेच ब्रेनडेड आहे, हे यांना कुणी सांगितलं? केवळ रुग्णालयाच्या बिलाची पुढच्या तीन-चार वर्षांची तजवीज केली गेली आहे म्हणून त्यांना बिलाची काळजी नाही आणि ब्रेनडेड रुग्ण असल्यानं दैनंदिन वेळेबरहुकूम परीक्षण व उपचार सुरू ठेवण्यात त्यांना काहीच कष्ट पडत नाहीत. मात्र, माझ्या त्रासाची, मानसिक उलघालीची काळजी कोण करणार?
***
मी अमुकतमुक (नावात काय आहे!). वयाच्या विसाव्या वर्षी आफ्रिकेत गेलो. एका ओळखीच्या माणसाबरोबर. त्यानं मला तिथं माझ्या नशिबावर एकटंच सोडून दिलं. खूप हलाखीत दिवस काढले मी तिथं. परत येण्यासाठीही माझ्याकडं पैसे नव्हते. मग असाच लपून-छपून राहत होतो अनेक वर्षं. मात्र, नंतर नशिबानंच साथ दिली. काळ्या सोन्याच्या अर्थात हिऱ्यांच्या व्यापारात गुंतलो. खूप पैसा कमावला. 31 व्या वर्षी भारतात सन्मानपूर्वक आलो. इकडच्या रीतीप्रमाणे विवाह केला व कुटुंबाला इथंच ठेवून परत आफ्रिकेत गेलो. आता आयुष्याला एक दिशा सापडली होती. आधी पैसे कमावतच होतो; पण आता कुणासाठी तरी काम करत होतो. एका वर्षाआड परत येऊन सगळ्यांना भेटत होतो.

गंमत म्हणजे, आता खिशात पैसे खुळखुळत होते. मग पत्नीसह सगळा भारत फिरलो. कधी कधी तर ट्रिप करून मी परस्पर आफ्रिकेला उड्डाण करायचो व पत्नी दुसऱ्या विमानानं घरी परतायची. मायदेशाची माझी ट्रिप एवढी भरगच्च असायची की कुणाही नातलगाला (तसे काही फार नव्हतेच म्हणा; पण जे काही होते त्यांना) भेटायलाही मला वेळ नसायचा; पण पत्नीनं ती आघाडी व्यवस्थित संभाळली होती. मी आफ्रिकेला परतल्यावर फोनवर सगळा किस्सा ऐकायला मिळायचा ः "तुम्ही तिकडून आणलेली अमकी साडी तमक्‍या वन्संना दिली...बांगड्या ताईंना दिल्या...सूट अमक्‍या भावजींना दिला...' वगैरे वगैरे. "तुम्ही पाठवलेल्या वस्तू सगळ्यांना खूप खूप आवडल्या; पण तुमची भेट झाली नाही म्हणून सगळ्यांना हळहळ वाटली,' अशी पुस्ती जोडायलाही पत्नी विसरायची नाही.

वयाच्या 55 व्या वर्षी आफ्रिकेतला सगळा बाडबिस्तरा गुंडाळून मी मायदेशी परतलो. इकडं आल्यावरही भारतदर्शन सुरूच होतं. माझ्या पत्नीनं तिच्या एकोणसाठाव्या वर्षी जगाचा अचानक निरोप घेतला. मी त्या वेळी 65 वर्षांचा होतो. वार्धक्‍यात मी पूर्णतः एकटा पडलो. आपल्याला अपत्य नाही, याची जाणीव तेव्हा मला प्रकर्षानं झाली. तसे "जोवरी पैसा, तोवरी बैसा' असं करणारे खूप नातेवाईक भेटले. पत्नीच्या निधनानंतर तिची बहीणही सहकुटुंब राहायला आली होती पंधरा दिवस.
मी तिला म्हणालो ः ""हिच्या काही साड्या, कपडे दागिने वगैरे तू घेऊन जा आणि वापर. मला आता त्या वस्तूंचा काहीच उपयोग नाही.''
त्यावर ती म्हणाली ः ""माणसासारखं माणूस सोडून गेलं; मग त्याच्या वस्तू सारखी त्याची आठवण करून देणार; पण तुमच्या आग्रहाखातर घेऊन जाते. वापरीन की नाही, ते माहीत नाही.'' एक लांबचा आतेभाऊही तेव्हा माझ्याकडं राहायला आला होता. त्यालाही मी पाच लाख रुपयांचा चेक दिला. त्याला निरोप देताना सांगितलं ः ""परत इथं येऊ नकोस. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा, की आता मी "एकटा जीव सदाशिव', घरी भेटेन वा बाहेर गेलेला असेन...उगाच तुला चक्कर नको. माझं काही काम असल्यास मी तुला बोलावून घेईनच.''
आम्ही पती-पत्नीनं यापूर्वी भेट दिलेल्या सगळ्या पर्यटनस्थळी जाऊन मी पूर्वस्मृती उजळायचा प्रयत्न पहिले काही दिवस एकट्यानंच केला. त्यानं पत्नीच्या आठवणी जाग्या झाल्या; पण उदासपणा काही कमी झाला नाही. एकदा आफ्रिकेलाही जाऊन आलो. विचार केला, भारतातही आपण एकटेच; आफ्रिकेतही एकटेच...फरक एवढाच की, आफ्रिकेत कामात मन रमू शकेल. मात्र, मी आफ्रिका सोडतानाची परिस्थिती व आताची परिस्थिती यात खूपच बदल असल्याचं मला आढळून आलं. लोकांची मूल्यं बदललेली दिसली, राजकीय स्थितीही तेवढी आशादायक वाटली नाही म्हणून परत मायदेशी आलो. आता एकटेपणा आणखीच जाणवायला लागला; पण त्याला काहीच इलाज नव्हता. लहानपणापासूनच मी या भूमीपासून, माणसांपासून दूर गेलेलो होतो. आता आपलेपणा अचानक कुठून पैदा करू? बरं, मला वाचन, अध्यात्म वगैरे आवडी जोपासता आल्याच नव्हत्या, म्हणजे, त्या गोष्टींची आवड होती; पण कामाच्या व्यापामुळं सवड मात्र मिळाली नव्हती. मग आता कुठून अचानकपणे त्या बाबी माझ्या मदतीला येतील? शेवटी खूप कंटाळलो. अगदी वृद्धाश्रमातही जाऊन राहिलो; पण मन तिथंही रमलं नाही. उलट आताच्या तरुण पिढीचं आपल्या आई-वडिलांशी असणारं-दिसणारं नातं, वागणूक पाहून मन अधिकच उद्विग्न झालं.
एकदा डॉक्‍टरांना भेटून मर्सी किलिंग अर्थात दयामृत्यूबद्दलही विचारणा केली; पण आपल्या देशातले कायदे तशी परवानगी देत नाहीत व असे अनेक अर्ज न्यायालयात प्रलंबित आहेत असं कळलं.

शेवटी देवालाच माझी दया आली असावी म्हणून हा असा दुर्धर आजार त्यानं मला "बहाल' केला! म्हणजे मरणही नाही आणि जगणंही नाही अशी त्रिशंकू अवस्था केली माझी त्यानं...
***
आता मला ती The Last Leaf या धड्यातली मुलगी आठवते. दोघांतला मुख्य फरक जाणवतो. ती शेवटचं पान कधीच गळू नये अशी आकांक्षा धरून असते. कारण, तिला जीवनाबद्दल आसक्ती असते; पण मी मात्र ते अखेरचं पान लवकरात लवकर गळावं, अशी देवाकडं प्रार्थना करतोय...!

Web Title: madhav kelkar write article in saptarang