मुलाला होणारा त्रास हीच बाबांच्या वेदनांची खरी व्यथा!

मधु निमकर
शनिवार, 27 मे 2017

रात्री साडे अकराची वेळ. दिवसभराच्या कामातून वाचन, चिंतन करायची माझी हक्काची वेळ सुरु झालेली. एवढ्यात फोनची रिंग ऐकायला आली. रात्री समीरचा फोन येणं हे फार काही नवल नव्हतं. आम्ही त्याला गमतीत निशाचरच म्हणायचो. तरीही दीर्घकाळ संपर्कात नसलेला समीर अचानक फोन करणं जरा चिंताजनक वाटलं!

रात्री साडे अकराची वेळ. दिवसभराच्या कामातून वाचन, चिंतन करायची माझी हक्काची वेळ सुरु झालेली. एवढ्यात फोनची रिंग ऐकायला आली. रात्री समीरचा फोन येणं हे फार काही नवल नव्हतं. आम्ही त्याला गमतीत निशाचरच म्हणायचो. तरीही दीर्घकाळ संपर्कात नसलेला समीर अचानक फोन करणं जरा चिंताजनक वाटलं!

हळूच, काही बरं वाईट नसेल ना या चिंतेत फोन उचलून मी कानाला लावला. काहीशा अस्पष्ट, क्षीण आवाजात तो बोलायला लागला. "मधु' "अरे कसा आहेस? काय झालं रडायला?', पटकन माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले. काहीतरी झालंय हे माझ्या चटकन लक्षात आलं. "आज माझ्याच वयाचा मुलगा ट्रेन मधून येताना बाबांच्या मांडीवर झोपून आला.'"काय? अरे काय बोललास, पुन्हा बोल?' गोंधळून काय बोलायचं मला सुचेना.....!

"तू रागावलेली नाहीस ना माझ्यावर?'"नाही रे. तू काय सांगत होतास ते पुन्हा एकदा सांग.'"आज ट्रेनमध्ये माझ्या वयाचा मुलगा बाबांच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपून आला. म्हणून तुला फोन केला. तुम्हा चौघींना फोन करून हे सांगतोय.' "अरे, बाबा आहेत. ते आहेत आपल्या बरोबर. मी ते गेले असं समजतच नाही.' समीरला अनावर झालेलं. "अरे, मी काढते बाबांची आठवण रोज, तुझ्यापण आणि माझ्यापण आपल्या आठवणीत ते कायम राहतील. आपण त्यांच्या नावाने काहीतरी नक्की सामाजिक कार्य सुरु करू या. मी देवाजवळ प्रार्थना करेन त्यांना जिथे असतील तिथे सुखी ठेव अशी...!'"म ी तुला घरी गेल्यावर मेसेज करतो.' एवढं बोलून जडपणे त्याने फोन खाली ठेवला.

अतिशय हळव्या मनाचा, संवेदनशील असा समीर लाडकं व्यक्तिमत्व म्हणून मित्रांमध्ये प्रसिद्ध आहे. मित्र जोडून त्यांना सामाजिक कार्य करायला शिकवणारा आणि करून घेणारा म्हणून त्याची एक वेगळीच ओळख त्याने अलिकडे प्रस्थापित केली. त्याने जोडलेली प्रत्येक माणसं म्हणजे अगदी रत्नपारख्याने जाणून, पारखून तयार केलेला नवलख्खा हारच जणू! त्याच्यामुळे बऱ्याच चांगल्या मित्रमैत्रीणी एकमेकांशी जोडल्या गेल्या!! उत्तम नेतृत्व गुण असण्याबरोबरच प्रत्येक गोष्टीत समतोल साधण्याची कला त्याला अवगत आहे. आपल्या समुदायाचा सढळपणे ताबा तो आम्हा मोजक्‍या दोन-तीन जणांना देऊन कधी कधी म्हणायचा या लोकांना मी 4-5 दिवस नाही आहे तोपर्यंत सांभाळून ठेवा! शाळेच्या वर्गात किलबिलाट असावा असा आमच्या ग्रुपचा सदा सर्वकाळ माहौल! कधी गोंधळात एखादा गटांगळ्या खात, तर कधी मुद्दाम ग्रुप बाहेर पडायचा. मग लगेच पुन्हा येऊन जॉईन व्हायचा. सकाळ झाली की ताज्या-ताज्या चारोळ्यांची सवय देखील ह्याच ग्रुपमुळे लागलेली.... दिवस मात्र एकमेकांचे फोटो, उलाढाली, उद्योग समजून घेण्यात, स्वतःचे पोस्ट करण्यात पार पडायचा आणि एखाद्या रात्री मेहफील रंगली की उर्दू शायरीचे खजिने रिते व्हायचे....ग्रुप अचानक एका क्षणाला शांत झाला म्हणजे समजायचं सर्व झोपी गेले...अंथरुणात पडता क्षणी सर्व वाचून कधी छान झोप लागायची ते मला देखील समजायचं नाही...

काहीशी भाबडी, अवखळ, अल्लड मैत्री त्याने सगळ्यांशी केलेली. त्याला समजून घेणं जितकं सोपं तितकंच कधी कठीणही होऊन जायचं. अभ्यासाच्या व्यस्ततेमुळे मी काहीकाळ या माझ्या मित्र-मैत्रिणींना वेळ देऊ शकले नव्हते. वर्षभर संपर्कात नसतांनाही प्रत्येक वेळी फोन करून बोलवायला तो आजही विसरत नाही. घरी पोहोचल्यावर समीरने मेसेज केला. "आज बाबांना जाऊन बरोबर दोन वर्ष, दोन महिने आणि दोन दिवस झाले.' दिवस किती पटापट जातात. तीन वर्ष झाली आमच्या ह्या मित्र-परिवाराला. काळ किती पटापट पुढे गेला. आजही मला समीरच्या बाबांना पहिल्यांदा भेटायला गेले तो क्षण त्यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर आठवतो.

एक दिवस अचानक समीरचा ग्रुपवर मेसेज आलेला. "माझ्या वडीलांना हृदयविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. काकांना हा हृदयविकाराचा दुसरा झटका आला होता. एवढीच माहिती मी वाचली आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघवणार नाही. बाबांच्या (माझे वडील) हळव्या आठवणी पुन्हा जाग्या होतील. भीतीने मी न जायचं पक्कं केलं. दुसऱ्या दिवशी सर्वांनी बाबांना हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचं ठरलं. समीरने मला फोन करून बाबांना भेटायला ये. मी अनघा, मंजू आणि सुवर्णाला सुद्धा सांगितलं आहे, असं त्यानं सांगितलं. ग्रुप मधले जवळपासचे सर्वच भेटायला जाणार होते. बाबांना भेटलं पाहिजे. देखील स्वतःला समजावलं!

संध्याकाळी साडेचार-पाचच्या दरम्यान सर्वांनी एकत्र भेटायला जायचं ठरलं होतं. मला पोहोचायला बराच उशीर झाल्याने सर्व भेटून निघून गेले होते. के.ई.एम. मधल्या प्रशस्त रुग्ण विभागात साधारण एका टोकाला मी त्यांना शोधत येऊन पोहोचले. बाबा रुग्णांच्या खाटेवर पडून होते. बाजूला आई बसलेल्या. काही क्षणातच समीरची बायको त्यांच्या सात वर्षाच्या मुलाबरोबर तिथे आली. गोऱ्यापान रंगाचे, टवटवीत आणि प्रसन्न चेहऱ्याचे बाबा मला बघून चटकन उठून बसले. त्यांचे डोळे चमकदार करड्या रंगाचे होते. एक जगण्याची मोठी उमेद आणि विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मागे समीर उभा असलेला दिसला. त्याचा चेहरा धावपळीने थकून काळा ठिक्कर पडलेला. किती दिवस हॉस्पिटल मध्ये बाबांना ठेवणार आहेत? प्रांजळपणे समीरला प्रश्न केला. अगं, मी दीड महिन्याची सुट्टी टाकली आहे. आणखी काही टेस्टस डॉक्‍टरांनी सांगितल्या आहेत. त्यांचे रिपोर्टस आल्यावर समजेल. डायालिसीसची सुविधा मागच्या हॉस्पिटलमध्ये नव्हती, म्हणून डॉक्‍टरांच्या सल्याने इथे बाबांना हलवलंय.

बाबांनी चटकन उठून मला खाटेवर बसायला जागा दिली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही बोलायचं आहे असं सांगत होता. रुग्णाच्या खाटेवर बसून त्यांच्या आरामात व्यत्यय आणणे मला पटत नव्हते. परंतु बाबांच्या प्रसन्न बोलक्‍या चेहऱ्याकडे आणि उत्साहाकडे बघत कधी गप्पांमध्ये आम्ही रंगून गेलो ते समजलेच नाही. बाजूला समीरचा लहान मुलगा कधी त्यांच्याशी, कधी हातातल्या मोबाईलशी तर कधी खाटेच्या ह्या बाजूतून त्याबाजूला सेकंदा-सेकंदाला उड्या मारून आमचे लक्ष वेधून घेत होता. त्याला बघून मी हसत समीरला म्हटलं. "आधी माकड होतं हे ज्याला पटत नसेल त्याने आता इथे येऊन खात्री करून घ्यावी. किती मस्ती करतोय बघ हा.' बोलता बोलता पटकन तो बेडच्या फटीतून चटकन वर यायचा आणि बाबांच्या अंगावर जाऊन पडायचा आणि ते आणखीन खूष व्हायचे. मध्येच समीरने बाबांना विचारलं, "पोटात दुखतंय ना तुमच्या?' आपण प्रकृती स्थिर झाली की हर्नियाचं ऑपरेशन करणार आहोत. मग बरं वाटेल तुम्हाला. त्यादिवशी बाबांशी बऱ्याच काही गप्पा मारता आल्या. त्यांच्या व्यवसायाविषयी देखील त्यांनी भरभरून सांगितले. भेटायची वेळ संपत आली तशी, आम्ही देखील आता निघतोय, तुला टॅक्‍सीने वाटेत सोडतो. असं म्हणून समीर, त्याची बायको, मुलगा आणि मी आई-बाबांचा निरोप घेऊन निघालो.

हॉस्पिटलच्या बाहेर पडल्यावर, "चहा पिऊन जा' असं म्हणून समीर समोरच्या हॉटेलमध्ये शिरला. आपल्या वर्धापनदिनाचे मासिक काढतोय. तू पण मदतीला हवी आहेस. आमच्या गप्पा चालू होत्या. मध्येच मुलाने पाण्याचा ग्लास खेळता खेळता टेबलावर सांडला. "मस्ती करणं आवश्‍यकच आहे. मला आवडतात ऍक्‍टिव्ह मुलं', मी चटकन बोलले. पाणी यायची वेळ झाली. मितभाषी समीरची बायको संधी मिळताच बोलली. जास्त काही बोलावं अशी ती वेळही नव्हती. घरी पोहोचते न पोहोचते तोच इत्यंभूत बातमी समीरने ग्रुपवर टाकून आमच्या चौघींचे खास आभार मानले. आम्हाला भेटल्यावर बाबा खूप खूष होते. खरं तर "बाबांना काहीही झालं नाही आहे' इतक्‍या मतावर मी त्या भेटीनंतर येऊन पोहोचले होते. "हे रिपोर्टस वगैरे सर्व झूठ आहे', असंच माझं मन विश्वासाने सांगत होतं. कधी वाटायचं मनाने खुष असेल माणूस तर प्रत्येक आजारावर मात करू शकतो. बाबा खरं तर काम करून थकलेले. त्यांना आज खरी विश्रांतीची गरज होती! त्यानंतर वेळ मिळेल तसा बाबांना आम्ही आळीपाळीने फोन करायचो. गप्पा, कधी जोक्‍स, चारोळ्या असं बरंच चालू असायचं. बाबांच्या मुली झालेलो आम्ही.

बाबांना दुसरा हृदयविकाराचा झटका येणं ही एकमेव चिंतेची बाब नव्हती. त्यांच्या प्रकृतीच्या अनेक तक्रारींचा गुंता डॉक्‍टरांसमोर एक अवघड आव्हान बनून उभा होता. त्यांच्या हार्टला शंभर टक्के ब्लॉकेजेस होते. बायपासशिवाय पर्याय नव्हता. परंतु त्यासाठी त्यांचा रक्तदाब स्थिर होणं गरजेचं होतं. त्यांच्या हर्नियाचं देखील ऑपरेशन करणे आवश्‍यक होते. त्यात भर म्हणून कि काय, किडनीचा त्रास सुद्धा सुरु झालेला आढळला. नव्या रिपोर्टसचा अभ्यास करून आता डायलिसीस करणे आवश्‍यक आहे असं डॉक्‍टर्सनी सुचवलेलं. एकट्याने धावपळ करून समीरची प्रकृती देखील आता कमी-जास्त व्हायला लागली. त्यात मानसिकतेचा वाटा देखील तितकाच मोठा होता. आठवडा-दहा दिवसांनी समीरचा पुन्हा फोन आला. "सर्व टेस्ट्‌स आणि हॉस्पिटलचं वातावरण बघून बाबा घाबरलेत', खूप निराश झालेत! तुम्हाला चौघींना बघून त्यांना बरं वाटलेलं. एकदा पुन्हा येऊन त्यांना भेटून जा.

दुसऱ्या दिवशी मी लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. बाबा कुशीवर खाली मान घालून अवघडल्यागत पडून होते. एखाद्या माणसाला अपराध करून त्याचा पश्‍चाताप व्हावा असे काहीसे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. मी आलेली समजल्यावर त्यांनी मान वर करून माझ्याकडे बघितलं. त्यांचा चेहरा काळा पडलेला, डोळ्यातलं तेज हरवलेलं, बारीकही झालेले वाटले. काहीसा निष्प्राण झालेल्या देहाला आदेश द्यावा अश्‍याप्रकारे ते उठायला सरसावले. आणि काय झालं कोण जाणे, उठून बसल्यावर अचानक ते आनंदाने हसायला लागले. सुमारे पंधरा मिनिटं बोलल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यातही मोठा बदल झालेला दिसला. पुन्हा चेहऱ्याला तेज चढले, रंग उजळला, डोळे चमकताहेत असं भासू लागले. मला हसावं का रडावं आता तेच सुचत नव्हतं!

आपल्यामुळे मुलाला एवढा त्रास सहन करावा लागतो आहे हीच बाबांच्या वेदनांची खरी व्यथा होती आणि समीर सारखा म्हणत होता, "बाबा इज माय बेस्ट फ्रेंड!' दोघांचा जीव एकमेकांमध्ये एवढा गुंतलेला. समीर बाबांना वाचवायचे प्रत्येक प्रयत्न करून एक-एक क्षण त्यांना वाचवत होता आणि बाबा त्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत एखाद्या सराईत खेळाडूप्रमाणे मृत्यूला चुकवून पुढे जात होते. चार-एक दिवसात समीरचा निरोप आला. "बाबा आपल्याला सोडून गेले!' बाबांच्या अंत्यदर्शनाला जाऊन आम्ही त्यांचे शेवटचे आशीर्वाद घेतले.

त्या दिवशी पुन्हा पोरकं झाल्याची जाणीव मनाला रुखरुख लावून गेली ती कायमचीच. आजही समीरला बाबा कुठल्या ना कुठल्या रूपाने वेळोवेळी दिसत असतात. कधी चालतांना समोर दिसतात, कधी स्वप्नात येतात, तर कधी समोर बोलत असल्याचा भास होतो. आम्ही चौघी कुठेही असलो, भांडलो, रागावलो तरीही आवाज ऐकून त्याला प्रतिसाद देणार याची त्याला खात्री असते. रात्री झोपताना समीरचा आलेला मॅसेज मी उघडून बघितला. बाबांच्या मांडीवर झोपलेल्या त्या मुलाचा फोटो समीरने मला पाठवला होता!!

Web Title: Madhu Nimkar relationship father love esakal blog openspace