...आती है उर्दू जबाँ आते आते! (मधुकर धर्मापुरीकर)

मधुकर धर्मापुरीकर madhukardharmapurikar@gmail.com
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

उर्दू शेरोशायरीचं आकर्षण काव्यरसिकांना असतंच. ऐकणाऱ्याला शेरातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळतोच असं नाही; पण ‘क्‍या बात है’ची दाद मात्र मनापासून आलेली असते. ही दाद असते भावार्थाला! नऊ नोव्हेंबर हा ‘जागतिक उर्दू दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त उर्दू शायरीतल्या काही ‘गफलतीं’बद्दलचा हा विशेष लेख...

उर्दू शेरोशायरी हा अनेकांना आकर्षित करणारा काव्यप्रकार. केवळ दोनच ओळी... त्यातून कागदी फूल उलगडत जावं, तसा उमटत जाणारा अर्थ आणि समजत जाणारा आशय. शिवाय, ती भाषा अन्‌ त्या शब्दांच्या उच्चारातून प्रतिध्वनित होणारा गूढ असा अनुभव...वा !

उर्दू शेरोशायरीचं आकर्षण काव्यरसिकांना असतंच. ऐकणाऱ्याला शेरातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळतोच असं नाही; पण ‘क्‍या बात है’ची दाद मात्र मनापासून आलेली असते. ही दाद असते भावार्थाला! नऊ नोव्हेंबर हा ‘जागतिक उर्दू दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त उर्दू शायरीतल्या काही ‘गफलतीं’बद्दलचा हा विशेष लेख...

उर्दू शेरोशायरी हा अनेकांना आकर्षित करणारा काव्यप्रकार. केवळ दोनच ओळी... त्यातून कागदी फूल उलगडत जावं, तसा उमटत जाणारा अर्थ आणि समजत जाणारा आशय. शिवाय, ती भाषा अन्‌ त्या शब्दांच्या उच्चारातून प्रतिध्वनित होणारा गूढ असा अनुभव...वा !

हा छंद असणाऱ्याला शेरोशायरीची परिपूर्ण माहिती असेल तर किंवा तसा जाणकार कुणी भेटला, तर त्या शायरीची नक्षीदार वेलबुट्टी होते; अन्यथा वेलीच्या गुंतवळ्यात अडकून पडल्यासारखं होतं! शेराचा मोह तर सुटत नाहीत आणि शब्दांचे अर्थही लागत नाहीत. कधी शब्द असतो वेगळा, उच्चारला जातो वेगळा अन्‌ त्याचा अर्थही लावला जातो कुठला तरी भलताच! ‘शाब्दिक चमकदारपणा’मुळं शेराचा प्रभाव पडावा आणि प्रभाव ओसरल्यावर तोच शेर ‘फिजूल’ वाटावा असंही होतं. एकदा असाच एक स्नेही बोलता बोलता म्हणाला ः ‘अरे, वो लफ्जों की गफलत कर रहा था!’

तर ही अशी ‘लफ्जों की गफलत’ अनेकांची होत असते. एखादा शेर सकृद्दर्शनी खूपच आवडलेला असतो; मात्र त्याच्या आकलनात अनेक घोटाळे होत असतात. शेरातले शब्द, शब्दसमूह, शब्दरचना चुकीची असते; पण ‘उत्साही शेरोशायरीप्रेमी’ ती तशीच पुढं रेटत राहतात. त्यांना मूळ रचनेची काही माहितीच नसते. खरं काय आहे ते जाणून घेण्याची जिज्ञासाही नसते.

अलीकडं तर व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून नामवंत कवींच्या (उदाहरणार्थ ः गालिब) नावावर कसलेही सटरफटर ‘शेर’ खपवले जातात!  
***
डॉक्‍टर जिया उल्‌ हसन हे माझे स्नेही आणि उर्दू शेरोशायरीचे अभ्यासक. त्यांच्याशी शेरोशायरीबद्दल बोलताना ‘खूब गुजरेगी जो मिल बैठेंगे दीवाने दो’ अशी आम्हा दोघांचीही अवस्था होते. एकदा त्यांनी उर्दू शब्दांच्या गफलतीचा किस्सा सांगितला.
हैदराबादमधले प्रसिद्ध उपरोधकथालेखक मुज्तबा हुसैन यांनी अशाच एका घटनेवर आधारित लिहिलेल्या लेखातला हा किस्सा आहे. ‘मसाइल’ आणि ‘मिसायल्‌’ या शब्दांच्या गफलतीमुळं संबंधितांना किती भयंकर अनुभवाला सामोरं जावं लागलं, त्यावरचा हा लेख. एका सार्वजनिक ठिकाणी दोन उर्दूभाषक मित्रांच्या गप्पा सुरू असताना एक जण सांगत असतो ः ‘हमारे पास बहोत मसाइल हैं’ (मसाइल म्हणजे समस्या-प्रश्‍न. गालिब यांचा तो एक शेर आहे ना... ः ये मसाइले-तसव्वुफ, ये तेरा बयान गालिब...) आणि या दोघांच्या आसपास वावरणाऱ्या; पण उर्दूशी संबंध नसलेल्या व्यक्तीला तो शब्द ‘मिसाइल’ असा वाटला आणि एका वेगळ्याच चौकशीला मग या दोन मित्रांना सामोरं जावं लागलं!  मुज्तबांच्या या लेखाचं शीर्षक होतं ः ‘फसीह (शुद्ध) उर्दू बोलिए और हवालात की हवा खाइए’ !

अर्थात, प्रत्यक्ष अनुभवाला येणारी ही अवचित-क्वचित बाब असली, तरी शेरोशायरीच्या संदर्भात असे अनुभव अनेक वेळा येत असतात. एकदा कुठं तरी एक शेर वाचनात आला ः

नशेमन-बर-नशेमन इस तरह तामीर करता जा
के बिजली भी गिरते गिरते बेजार हो जाए ।

उर्दू शेरोशायरीच्या लोकप्रियतेची महत्त्वाची कारणं म्हणजे ही शेरोशायरी मनाला उभारी देणारी असते आणि रोमॅंटिक मूडचीही असते. वर उल्लेखिलेला शेर मनाला उभारी देणाऱ्या प्रकारातला आहे. मात्र, या शेरात काही तरी गफलत असावी, असं मला वाटू लागलं. कुठं तरी शब्दांची कमतरता आणि ‘नशेमन-बर-नशेमन’ या शब्दसमूहाबद्दल काहीतरी गोंधळ आहे, असं मला वाटत राहिलं... सायकल पंक्‍चर असल्याची शंका मनात आली तरीही ती चालवतच राहावी, तसं या शेराबद्दल मला वाटू लागलं! या शेराचं वृत्त (मीटर) बरोबर नसावं किंवा शेराच्या उच्चारानंतर ‘सिक्वेन्स लागावी’ असं का बरं वाटत नव्हतं मला...?

‘बागेवर वीज पडून ती नष्ट होते (संकटं आली की माणूसही कोसळतो), तरीसुद्धा बागेच्या निर्मितीचं काम सतत करतच राहा... एवढं सातत्य त्यात असू दे, की वीज पडून पडून तीच थकून जावी; पण तू थकायचं नाहीस,’ असा या शेराचा अर्थ. (एखादा शेर आवडायचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, तो आपल्याला समजलेला असतो, हे!)

या शेराच्या रचनेत मात्र गल्लत आहे; त्यामुळं तो थोडा विरूप झाला आहे, असं वाटू लागलं. अर्थात, शेर चांगला आहे, हे लक्षात आलं होतंच. कोणत्याही छंदाची जादूच अशी असते, की एखादी बाब आवडली तर लगेच तशीच आणखी एखादी गोष्ट आठवते! हा शेर वाचला आणि मला (बहुतेक इक्‍बाल यांचा?) एक शेर आठवला ः

रख बुलंद अपने इरादे, काम करता जा सदा
हाथ कब आई गिजा, शाहीन को आसानी के साथ?

(गिजा=अन्न, शाहीन=ससाणा पक्षी)
कष्ट आणि कौशल्य यांची सांगड यश आणि अपयश यांच्याशी घालणं हे कधीकधी गल्लत निर्माण करणारं असतं. (‘निराश होऊ नका’, ‘नेहमी यशस्वी व्हा’, असं सांगणारं साहित्य काही वेळा वैताग आणतं ते यामुळंच!). शाहीन पक्षाची भरारी, त्याची तीक्ष्ण नजर हे सगळं जे असतं, ते म्हणजे त्याची उपजीविका भागवण्यासाठीचा अत्यावश्‍यक असा भाग असतो. जगण्यासाठीची ती एक गरज असते. तिथं ‘यश-अपयश’ असं काही नसतं. त्या हिशेबानं, ‘सतत कार्यरत असावं,’ हे इथं सांगितलं आहे.
***
माझे दुसरे एक मित्र अख्तर अली. ते विज्ञानाचे शिक्षक आणि उर्दू काव्याचे अभ्यासक-रसिक आहेत. त्यांना मी या ‘नशेमन-बर-नशेमन’ या शेराबद्दल विचारलं आणि एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला. त्यांच्या माहितीनुसार, या शेरामध्ये शब्दांच्या किरकोळ गफलती आहेत आणि हा शेर म्हणजे बंगळूरचं प्रख्यात उर्दू साप्ताहिक ‘नशेमन’चं ब्रीदवाक्‍य होतं. हा शेर त्या साप्ताहिकाच्या शीर्षकाच्या जवळच छापला जायचा. ‘नशेमन’ हे पन्नासेक वर्षं देशातलं महत्त्वाचं साप्ताहिक होतं. चार वर्षांपूर्वी ते बंद झालं. अली यांनी हा शेर मला योग्य त्या स्वरूपात सांगितला. तो असा ः

नशेमन-पर-नशेमन इस कदर तामीर करता जा
के बिजली गिरते गिरते आप खुद बेजार हो जाए।

म्हणजे ‘नशेमन-बर-नशेमन’ अशी गफलत झाली होतीच; शिवाय ‘दर-नशेमन’, ‘बर-नशेमन’, ‘पर-नशेमन’
अशा अव्ययांनुसार शेराची प्रकृती भिन्न होत जाते, ही बाब निराळीच. अर्थात अली सर म्हणाले होते ः ‘‘हा शेर मला जसा आठवत आहे, तसा मी सांगितला आहे. ‘नशेमन’चं कात्रण सापडलं तर पाहतो.’’

दरम्यानच्या काळात मी इंटरनेटवर या साप्ताहिकाचा शोध घेतला आणि ती इमेज मला सापडली! शिवाय रेख्ता डॉट ऑर्गवरही (rekhta.org) तो शेर सापडला. अली सरांनी जसा सांगितला होता, अगदी तसाच! मग मी त्यांना विचारलं ः ‘‘हा शेर इक्‍बाल यांचा आहे काय?’’ तर ते पटकन म्हणाले ः ‘‘नाही, नाही. हा शेर विनाकारणच इक्‍बाल यांचा असल्याचं सांगितलं जातं. या शेराचा खरा कवी वेगळाच आहे.’’ (ही शायरीतली खास खोड! वर उल्लेखिल्याप्रमाणे ट्रकच्या मागं शोभतील असेही शेर चक्क ‘गालिबने कहा है’ अशी सुरवात करून व्हॉट्‌सॲपवरून फॉरवर्ड केले जातात. गप्पांच्या मैफलीत ऐकवले जातात, हे दुर्दैव)
आता गंमत अशी, की जो मूळ शेर माझ्या वाचनात आलेला होता, त्यातले चुकीचे शब्द, चुकीची रचना लक्षात घेऊनही मला जो अर्थ लागला होता, त्यात मात्र गफलत झालेली नव्हती! अर्थ-आशय तोच होता, प्रभावही तोच होता. अर्थात, ही जादू उर्दू शेरोशायरीची! चुकीच्याही शब्दांचा मोह पडला होता मला. त्या चुकीच्या शब्दांनी मला चकवा दिला होता, ‘धोका’ दिला होता. अशा ‘धोक्‍यां’चे धक्के उर्दू शेरोशायरीच्या, उर्दू भाषेच्या प्रेमात पडल्यावर हमखास बसतात! कधी चुकीचे शब्द, कधी चुकीनं लावला गेलेला अर्थ...अशा गफलतींच्या शक्‍यता असतातच.
***
आणखी एका गफलतीचा असाच एक अनुभव ः कॉलेजच्या काळात एक शेर ऐकण्यात आला होता-
बहुत शोर सुनते थे पहलू में दिल का
जो चीरा, तो इक कतरा-ए-खून निकला !

कॉलेजचे दिवस होते ते! प्रेमापेक्षा प्रेमभंगाचाच मोह पडायचा, तो या अशा शेरोशायरीमुळं! ‘प्रमाणाबाहेर धडधडणारं हृदय चिरून काढलं (बाप रे !) तर काय? थेंबभर रक्त निघालं! स्वाभाविक वाटला होता हा अर्थ त्या वेळी. हा शेर तसा प्रसिद्ध आहे आणि साहजिकच मलाही त्याची भूल पडली होती. मात्र, या शेरासंदर्भात माझी जी गफलत झालेली होती, ती मला कळली ती चाळिशी ओलांडल्यावर. एका संग्रहात हा शेर व्यवस्थित दिलेला होता. ‘आतिश’ या गझलकाराचा हा शेर मूळचा असा आहे ः

बहुत शोर सुनते थे पहलू में दिल का
जो चीरा, तो इक कतरा-ए-खूं न निकला।

म्हणजे, उर्दू शायरी ऐकावीशी वाटते...ऐकलेला शेर मनात नोंदवला-गोंदवला जातो. मात्र, कालांतरानं सुयोग्य शेर वाचनात आला, की मग आपल्या झालेल्या गफलतीचीही मोठी मजा वाटते!
‘नशेमन-पर-नशेमन’ या शेरामुळं अशा अनेक गफलती माझ्या ध्यानात आल्या आणि आता त्याअनुषंगानंच त्याला साजेसा शेर मला आठवला, अख्तर होशियारपुरी यांचा ः
चमन के रंगो-बूने इस कदर धोका दिया मुझे
के मैंने शौक-ए-गुलबोसी में काँटों पर जुबां रख दी ।
...बागेतल्या रंग-सुगंधानं आणि सौंदर्यानं मला असा चकवा दिला, धोका दिला, की फुलांच्या (फाजील!) प्रेमापोटी मी काट्यांवरसुद्धा ओठ टेकवले!

Web Title: madhukar dharmapurikar's article

फोटो गॅलरी