टेकडी (मधुमंजिरी कुलकर्णी)

madhumanjiri kulkarni
madhumanjiri kulkarni

पश्‍चिमेकडच्या संपूर्ण भिंतीवर पौराणिक काळातला देखावा काढलेला होता. हॉलच्या उत्तरेकडच्या कोपऱ्यात निशिगंधाच्या फुलांनी छानपैकी सजवलेली एक फुलदाणी होती. दक्षिणेकडं आत जाण्याचा दरवाजा होता. त्या दरवाज्यावरही एक चित्र होतं. उडणाऱ्या बगळ्यांचं. दरवाजाशेजारच्या भिंतीवर कुत्र्याचा फोटो लावलेला होता. आकर्षक, काळ्याभोर डोळ्यांचं ते कुत्रं आपल्याकडंच पाहतंय, असं वाटत होतं.

घरून शाळेकडं जाताना वाटेत दिसणाऱ्या एका घराचं तिला खूपच कुतूहल वाटायचं. "कमल' बंगला! घराभोवती भिंतीचं उंच कुंपण असलं तरी सायकलवरून जाताना किंवा बसमधून जाताना घराच्या आवारातली हिरवीगार टेकडी ती नेहमी पाहायची. घराच्या बागेत ती टेकडी कशी बरं बनवली असेल? कुंपणाच्या आतून घराचा परिसर कसा बरं दिसत असेल आणि आत काय काय वेगळं असेल? एखाद्या सिनेमात दाखवतात तसा आत एखादा कृत्रिम तलाव असेल का आणि घराच्या गच्चीवरून ते थेट तलावापर्यंत पोचणारी घसरगुंडी असेल का तिथं? तिथं कोणकोणती झाडं लावलेली असतील? सिनेमात दाखवतात तसा वेलींचा आपोआप तयार झालेला एखादा झुला असेल का तिथं? असे अनेक कुतूहलाचे प्रश्‍न तिला पडायचे आणि त्या घराविषयीचं तिचं आकर्षण वाढतच राहायचं.

कालांतरानं शाळा संपून तिनं कॉलेजही पूर्ण केलं; परंतु येता-जाता त्या घराकडं ती नेहमी पाहत राही. आता नोकरीच्या जाहिरातींसाठी वर्तमानपत्रं पाहणं, अर्ज करणं असं सुरू झालं होतं. नोकरीसाठी काही ठिकाणी ती मुलाखतीही देऊन आली आणि एका मोठ्या कंपनीत लेखापालपदी तिची निवड झाली. नोकरी व्यवस्थित सुरू झाली आणि एक दिवस मॅनेजरसाहेबांनी तिला बोलावलं. म्हणाले ः ""तुमच्याकडं एक छोटंसं काम आहे. काही कागदपत्रांवर साहेबांच्या आईंच्या सह्या आणायच्या आहेत. त्यांचं घर तुमच्या घराजवळच आहे. उद्या ऑफिसला येताना त्यांच्या घरी जाऊन सह्या घेऊन या.''

ती म्हणाली ः ""साहेब तर गावात राहतात ना?''
- मॅनेजर म्हणाले ः ""हो; पण त्यांच्या आई जुन्याच घरी असतात. साहेबांनी त्यांच्या आवडीनुसार नवीन घर बांधलं; पण आईंना मात्र जुनंच घर आवडतं. त्या तिथंच असतात. एक जोडपं घरातली कामं करायला व तिथं त्यांच्या सोबतीला असतं.''
ती म्हणाली ः ""ठीक आहे. घराचं नाव काय? आणि नक्की कुठं आहे ते?''
मॅनेजर म्हणाले ः "" "कमल' बंगला.''
बंगल्याचं नाव ऐकताच तिला आश्‍चर्याचा आणि आनंदाचा धक्काच बसला.
कधी एकदा दुसरा दिवस उजाडतोय आणि आपण साहेबांच्या आईंच्या सह्या घ्यायला त्यांच्या घरी जातोय असं तिला झालं. दुसऱ्या दिवशी ती नेहमीपेक्षा बरीच लवकर तयार झाली. तिला बघून तिची आई म्हणाली ः ""आज लवकर तयार झालीस गं? काय मीटिंग वगैरे आहे काय ऑफिसमध्ये?''
ती म्हणाली ः ""नाही गं, काल तुला नाही का सांगितलं साहेबांच्या आईंना भेटायला "कमल' बंगल्यात जायचंय म्हणून. चल, मी निघते आता.''
***

"कमल' बंगल्यासमोर तिनं गाडी थांबवली आणि तिची छाती उगाचच धडधडू लागली. तिनं गेटवरची बेल वाजवली. वॉचमननं गेट उघडलं. "एका कामासाठी ऑफिसमधून आले आहे,' असं तिनं त्याला सांगितलं.
वॉचमन म्हणाला ः ""तिथं हॉलमध्ये जाऊन बसा. मॅडम येतील.''
ती हॉलमध्ये जाऊन बसली, तर लगेचच एक बाई आल्या. त्यांनी विचारलं ः ""काय घेणार? चहा की कॉफी?''
ती म्हणाली ः ""काहीही चालेल.''
साहेबांच्या आईंची वाट बघता बघता ती सहजच हॉल न्याहाळू लागली. हॉलमध्ये मोजकंच फर्निचर होतं; परंतु सर्वच्या सर्व नक्षीदार व लाकडी. हॉलच्या पूर्वेकडच्या भिंतीला एक शोकेस होती. वेगवेगळ्या संस्थांकडून मिळालेले पुरस्कार, काही भेटवस्तू शोकेसमध्ये होत्या. त्यांत सरस्वतीची एक आणि कृष्णाची एक मूर्ती होती. पश्‍चिमेकडच्या संपूर्ण भिंतीवर पौराणिक काळातला देखावा काढलेला होता. चित्रकार रविवर्मा याच्या शैलीचा प्रभाव त्या चित्रावर जाणवत होता. हॉलच्या उत्तरेकडच्या कोपऱ्यात निशिगंधाच्या फुलांनी छानपैकी सजवलेली एक फुलदाणी होती. दक्षिणेकडं आत जाण्याचा दरवाजा होता. त्या दरवाज्यावरही एक चित्र होतं. उडणाऱ्या बगळ्यांचं. दरवाजाशेजारच्या भिंतीवर कुत्र्याचा फोटो लावलेला होता. आकर्षक, काळ्याभोर डोळ्यांचं ते कुत्रं आपल्याकडंच पाहतंय, असं वाटत होतं. चांगलं उंचंपुरं व पांढरंशुभ्र होतं ते. हॉलमध्ये बारीक नक्षीचा गालिचा अंथरलेला होता. टीपॉयवर बरीच वर्तमानपत्रं आणि नियतकालिकं दिसत होती. सहज वाचायला म्हणून तिनं एक वर्तमानपत्र उचललं तेवढ्यात साहेबांच्या
आई आल्या. ती लगबगीनं उठली आणि म्हणाली ः ""गुड मॉर्निंग, मॅडम.''
साहेबांच्या आईही प्रसन्न हसून म्हणाल्या ः ""गुड मॉर्निंग.''
ती म्हणाली ः ""मॅनेजरसाहेबांनी ही काही कागदपत्रं तुमच्या सहीसाठी पाठवली आहेत.''
साहेबांच्या आई म्हणाल्या ः ""बस बस. बघू ती कागदपत्रं.''
तेवढ्यात, मघाशी आलेल्या बाई कॉफी घेऊन आल्या. कॉफी घेता घेता आईंनी कागदपत्रं पाहायला सुरवात केली.

साहेबांच्या आई साधारणतः सत्तरीच्या असतील. एकदम गोऱ्यापान, उंच व सडसडीत बांध्याच्या. सोनटक्‍क्‍याची दोन फुलं त्यांनी केसात माळली होती. याही वयात किती लांबसडक होती त्यांची वेणी. चेहऱ्यावर हुशारीचं तेज दिसत होतं. साहेबांच्या आई-वडिलांनी मिळून स्वतःचा व्यवसाय उभारला होता. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा व सून सर्व व्यवसाय सांभाळत होते. साहेबांच्या आईंनी सह्या केल्या व कागदपत्रं तिच्याकडं दिली. तिनं कागदपत्रं ताब्यात घेतली आणि ती जरा थांबली, तेव्हा साहेबांच्या आई म्हणाल्या ः ""आणखी काही काम आहे का?''
जरा अडखळतच ती म्हणाली ः ""मला तुमच्या घराचा परिसर, म्हणजे ती बागेतली टेकडी व इतर परिसर जरा पाहायचा आहे...म्हणजे तुमची परवानगी असेल तर!''
यावर त्या हसतच म्हणाल्या ः ""अगं, त्यात काय! चल की, मीच दाखवते तुला.''
परिसर दाखवता दाखवता साहेबांच्या आई सांगू लागल्या ः ""मला बागेत फुलझाडं लावणं मनापासून आवडतं. वेळ छान जातो.''

ती म्हणाली ः ""बाग छानच आहे; पण या जागेचं आर्किटेक्‍चर कुणाचं? व ही टेकडी अशी मध्येच कशी? घरावरून जाताना मी लहानपणापासून ही टेकडी पाहत आलेय बाहेरून. मलाही निसर्ग आवडतो, त्यामुळे उत्सुकता म्हणून विचारतेय. तशी ही टेकडी बागेच्या सौंदर्यात भरच घालतेय. टेकडीपासून निघणारा वळणावळणाचा रस्ता आंब्याच्या झाडापर्यंत जातोय आणि झाडाला बांधलेला हा झुला शाळेतल्या एका कवितेची आठवण करून देतोय. कवितेचे शब्द आता नेमके आठवत नाहीत; पण कवितेशेजारी जे चित्र छापलेलं होतं ते डोळ्यांपुढं जसंच्या तसं आहे. झुळूझुळू वाहणारा झरा...काठावर आंब्याचं झाड...असाच झुला बांधलेला व एक गुराखी पावा वाजवत बसलेला. खूपच छान आहे सगळं.''

त्यावर त्या म्हणाल्या ः ""माझ्याकडं एक कुत्री होती. मी तिचं नाव ठेवलं होतं, राणी. खूप लाड करायची मी तिचे. मी घरी असले की तीही माझ्या अवतीभवती फिरायची. तिला कधीच बांधलं नाही आम्ही. ती मरण पावल्यावर आम्ही तिला बागेत पुरलं व तिची आठवण म्हणून ही छोटीशी टेकडी उभारली. टेकडीवर गवत लावलं. मी इथल्या लॉनवर असले की राणी माझ्या आसपासच आहे असं मला वाटत राहतं''
तिनं सहजच विचारलं ः ""हॉलमध्ये जो कुत्र्याचा फोटो आहे तो या राणीचाच का?''
त्या म्हणाल्या ः ""हो.''

बोलत बोलत त्या आंब्याच्या झाडापासून थोडं पुढं गेल्या तर तिथं गुलाबाच्या झाडांचे ताटवे केलेले होते. त्यापलीकडं निशिगंधाच्या फुलांच्याही सरी होत्या. "शो'ची इतरही काही फुलझाडं लावलेली होती. तेवढ्यात पक्ष्यांचा नाजूक चिवचिवाट कानावर आला, तर तिथं पेरूच्या एका मोठ्या झाडाखाली पक्ष्यांचा पिंजरा करण्यात आलेला होता; पण तो बराच मोठा, चौकोनी होता. निरनिराळ्या रंगांचे आत छोटे छोटे बरेच पक्षी होते.
साहेबांच्या आई सांगू लागल्या ः ""हे गुलाबी पेरूचं झाड आहे. मी पक्ष्यांसाठी पूर्वीपासून दाणे टाकते व पाण्याचे छोटे टब भरून ठेवते. पक्षांच्या विष्ठेतून बी पडून हे झाड आपोआप आलेलं आहे.''
गप्पा मारता मारता संपूर्ण बंगल्याला फेरी मारून आम्ही बंगल्यासमोर आलो. बंगल्यासमोरचं तुळशीवृंदावनही छोटंसं; पण छानच होतं. एक बाई डोक्‍यावर कलशात तुळस घेऊन उभी आहे, अशा स्वरूपाचं ते दगडी वृंदावन होतं.
***

घड्याळाकडं तिचं लक्ष गेलं तर साडेनऊ होत आले होते.
ती साहेबांच्या आईंना म्हणाली ः ""मी निघू का?''
टेकडीकडं बघतच त्यांनी तिला निरोप दिला.
म्हणाल्या ः ""कधी आठवण आली लहानपणातल्या गोष्टींची, कवितांची...तर येत जा जरूर. बसत जाऊ या दोघी टेकडीवर गप्पा मारत.''
""नक्की'' म्हणत तिनं त्यांचा हसून निरोप घेतला.
मात्र, तिच्या मनात अजूनही साहेबांच्या आईंचे, त्यांच्या आवडत्या कुत्रीचे विचार येत होते. आता या कलियुगात माणसं माणसांशी असलेली नाती जिथं जपत नाहीत तिथं एका पाळीव प्राण्यावरसुद्धा काही जण किती प्रेम करतात...तिच्या मनात विचार येऊन गेला.
घराचा परिसर लगेचच दाखवायला साहेबांच्या आई "नाही'च म्हणाल्या असत्या तर किंवा "ऑफिसमध्ये कागदपत्रं वेळेवर पोचली पाहिजेत, तेव्हा परत कधीतरी निवांत ये' असं म्हणाल्या असत्या तर आपल्याला अजूनही त्या टेकडीबद्दल काहीच कळलं नसतं...तसं झालं असतं तर मग आपल्या मनात कुठंतरी घर करून राहिलेल्या, आपल्याला आवडलेल्या काही गोष्टी प्रत्यक्षात बघण्याचा आनंदही आपल्याला मिळाला नसता...पण उलट साहेबांच्या आईंनी स्वतः सगळा परिसर दाखवला. किती मोकळेपणानं गप्पा मारल्या व "परत ये' असंही म्हणाल्या...अशा विचारांत असतानाच ती ऑफिसात येऊन पोचली.
***

तिला बघताच मॅनेजरसाहेबांनी लगेचच विचारणा केली ः ""आणलीत का कागदपत्रं सह्या करून?''
ती "हो' म्हणाली व तिनं कागदपत्रं त्यांच्या ताब्यात दिली. कागदपत्रं घेऊन मॅनेजर लगेच बाहेर पडलेसुद्धा. आता तीही आपल्या जागेवर जाऊन बसली व आता कामाला सुरवात करावी म्हणून तिनं कॉम्प्युटर सुरू केला, तर सहजच तिचं लक्ष कॉम्प्युटरवरच्या वॉलपेपरवर गेलं. आजपर्यंत तिनं स्क्रीनवर एका हिरव्यागार टेकडीचं चित्र ठेवलेलं होतं. कदाचित मनात त्या टेकडीबद्दल वाटणाऱ्या कुतूहलामुळंच हे तिच्या हातून अभावितपणे घडलं असेल! आता मात्र ती उगीचच इतर चित्रं पाहू लागली आणि एरवी कुत्री-मांजरं असे कोणतेच प्राणी न आवडणाऱ्या तिला बास्केटमध्ये बसलेल्या मांजराच्या पिलांचं चित्र आवडलं. तिनं तेच चित्र आता वॉलपेपर म्हणून ठेवलं व स्वतःशीच हसत ती कामाला लागली...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com