रंगसंवाद  : चित्रांकित नृत्यानंद! 

 रंगसंवाद  : चित्रांकित नृत्यानंद! 

लॉकडाउनचे चार टप्पे दोन महिन्यांत उलटून गेले. आता पाचव्या टप्प्यात लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उघडणार आहे. या कालावधीत कलावंतांनी वेगवेगळे प्रयोग केलेत. साऱ्यांचीच दखल घेता आली नसली तरी, हे कलावंत त्या साऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. जगात काहीही होत असले, तरी आपला संवाद कधी संपत नसतो. आपण व्यक्त होत राहतो. वेगवेगळ्या माध्यमांतून. लॉकडाउनच्या काळात तर प्रत्येकाने घरात बसून सुसंवादी होणे गरजेचे होते. त्यात प्रत्येकच आपापल्या परीने बोलत राहिले. कुणी कुटुंबीयांशी, कुणी स्वत:शी तर कुणी त्यांच्या-त्यांच्या कलाकृतींशी. पुण्यातील कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या घोरपडी व्हिलेज हायस्कूलमध्ये कलाध्यापन करणाऱ्या अंजली पुरंदरे यांनीही या काळात शास्त्रीय नृत्याविष्काराची असंख्य चित्रे रेखाटून नृत्यानंद मिळवला आणि त्यातून संवाद साधला कलारसिकांशी. 

अंजली पुरंदरे या कलाव्यवहारात स्वत:ला गुंतवून घेणाऱ्या रंगलेखिका आहेत. कलाशिक्षकांच्या वार्षिक कलाप्रदर्शनातील सहभागासह पुस्तके, मासिके, दिवाळी अंकांतील कथा-कविता आणि ललित लेखांसाठी समर्पक चित्र काढण्याचा त्यांना व्यासंग आहे. कला अध्यापक म्हटले की, वेगवेगळे उपक्रम आलेच. त्यातही गुंतून राहण्यात त्या आनंद मिळवतात, पण लॉकडाउनने स्वत:बरोबर संवाद साधण्याचा वेळ दिला आणि अंजली यांना लहानपणापासून असणारे रंग, रेषा, आकाराबरोबरचे नाते अधिक मुक्तपणे विणावेसे वाटले. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात एटीडी, जीडी आर्टचे शिक्षण घेऊन कलाध्यापनाचे व्रत स्वीकारणाऱ्या अंजली पुरंदरे यांनी लॉकडाउनच्या काळात नृत्याविष्कारांवर केलेले रंगलेखन अनेकार्थाने रसिकांना गुंतवणारे आहे. 

कोरोनाच्या संकटाने भीतीचे, तणावाचे वातावरण प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या माध्यमांतून पोचत होते. त्यातून बाहेर पडून आपले शारीरिक आरोग्यासोबतच मनाचेही संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येकावर होती. आजही आहे. त्यासाठी आपल्या विचारांना, मनाला योग्य वळण लावणाऱ्या शास्त्रीय कलांची अभिव्यक्ती आपल्याला आनंद देईल, हा विश्‍वास अंजली यांच्या मनात आला. शास्त्रीय नृत्यकलेतील एकाग्रता, आश्‍वासकता, नादमयता, लयबद्धता, भक्‍ती, प्रेम, शांती अशा अनेक गुणांचा खजिना त्यांना खुणावू लागला. 

भरतनाट्यम्‌मधील शारीरिक हालचाली चित्रबद्ध करताना आपले कौशल्य पणाला लागते. यामध्ये प्रमाणबद्धता, हालचालीतील अचूकपणा, नेमकेपणाने दाखवणे हे एक आव्हान असते. प्रत्येक हालचाल चित्रात दाखवताना नृत्यांगनेची वेशभूषा, दागिने, हस्तमुद्रेच्या रंगसंगतीचे सुसंगत संतुलन राखताना कमालीची एकाग्रता असावी लागते. त्यात अंतर्मुख व्हावे लागते. ती मिळते त्या कलावंताच्या समृद्ध अनुभवातून. अंजली पुरंदरे यांनी चित्रकलेचा सराव करताना अनेकदा शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम पाहिले. ते पाहताना त्यांची नजर फोटोग्राफीचे काम करत राहिले आणि नजरेच्या कॅमेऱ्यात ते नृत्यानंदाचे क्षण साठवून ठेवले. कधीतरी पाहिलेले तेच यादगार नृत्याविष्कार आज कलर पेन्सिलच्या रूपाने कागदावर उमटले आहेत. 

प्रत्येकालाच ही अवघड नृत्यकला शिकता येणार नाही; पण या चित्रमाध्यमातून त्यातील आनंदाची ऊर्जा मिळवता येईल, हाच अनुभव चित्र काढताना रंगलेखिकेने घेतला. ज्या काळात सर्व जग लॉकडाउन होते, तेव्हा अशाप्रकारे रंगांशी संवाद साधत तणावमुक्तीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी या चित्रनिर्मितीसाठी रंगसाधना केली. ती चित्ररसिकांना आनंद देणारी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com