esakal | रंगसंवाद : रंगछटांचे भावविश्‍व
sakal

बोलून बातमी शोधा

रंगसंवाद : रंगछटांचे भावविश्‍व

कलावंत ज्या परिसरात राहतो, त्या शहराशी त्याचे एक भावनिक नाते असते. त्या परिसराचे बदलणे त्यांना त्यांच्या कलाकृतीत मांडण्यासाठी खुणावणारे ठरत असते. ओंकार क्षीरसागर यांचेही तसेच आहे.

रंगसंवाद : रंगछटांचे भावविश्‍व

sakal_logo
By
महेंद्र सुके

कलावंत ज्या परिसरात राहतो, त्या शहराशी त्याचे एक भावनिक नाते असते. त्या परिसराचे बदलणे त्यांना त्यांच्या कलाकृतीत मांडण्यासाठी खुणावणारे ठरत असते. ओंकार क्षीरसागर यांचेही तसेच आहे.

मुंबईसारख्या महानगरामध्ये लहानाचे मोठे झाले. त्यामुळे या शहराविषयीची निरीक्षणे ते त्यांच्या कलाकृतीत मांडत असतात. मुंबई शहर आणि उपनगरांसारख्या परिसरात कोरोनाचे संकट मोठे होते. या संकटाचे मानवी मनावर झालेले ओरखडे ओंकार यांच्या ‘प्रकृती’, ‘द नाइट’, ‘द डे’, ‘माय मून’, ‘माय अर्थ’ अशा अनेक कलाकृतींत उमटले आहे.  
लॉकडाउनमुळे आलेली निराशा आणि जगभरात कोरोनाचा चाललेला प्रसार, यामुळे निराशावस्थेत त्यांनी ‘प्रकृती’ ही कलाकृती साकारली. यात काळा रंग हा व्हाइट बॅकग्राउंडवर आहे. त्यामुळे तो एक तटस्थ भावना दाखवतो. दुसरे चित्र ‘द नाइट’. लॉकडाउनमध्ये सगळीकडे अंधाराचे सावट असल्याचा भास व्हायचा. ते वातावरण आणि येणाऱ्या बातम्या या अंधाराकडे घेऊन जात होत्या. त्यावरचे ‘द नाइट.’ तिसरी कलाकृती ‘द डे.’  रात्रीनंतर दिवस येतो, त्याप्रमाणे कोरोनाच्या या भयाण रात्रीनंतर काही आशेचा किरण येईल, असे काही वाटत होते. तो दिवस होता. पांढरा. त्यात रंग नव्हता, उत्साह नव्हता. ‘माय मून’ अर्थात चंद्रावर प्रेरित होऊन केलेले हे काम. पांढरी रांगोळी लालसर गेरूवर शोभून दिसते; पण ती काळ्या बॅकग्राऊंडवर एक खिन्नपणा घेऊन येते. चंद्राकडे रोमॅंटिक सिम्बॉल म्हणून पाहिले जाते; पण लॉकडाउनच्या काळात ओंकार यांना तो उदास वाटला. याच काळात साकारलेली कलाकृती ‘माय अर्थ.’ ही कलाकृती लॉकडाउन शिथिल होत असतानाच्या काळातली. माणसे बाहेर पडू लागली होती, कोरोनावरील लस येणार, अशी चर्चा होती. कुठेतरी पॉझिटिव्ह वाटणे सुरू होते. तेव्हा लाल रंगात समरस झालेली ‘पृथ्वी’ आविष्कृत झाली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मानवी मनाचा वेध घेऊन साकारलेली कलाकृती ही जनजीवनाशी नाते सांगणारी असते. ओंकार क्षीरसागर यांच्या कलाकृतीतील रंगछटा लॉकडाउनच्या टप्प्याटप्प्यांवर बदलत गेल्या, तसेच मानवी मनांचेही झाले आहे. त्यामुळे या कलाकृती आपल्या जगण्यावर नकळत भाष्य करणाऱ्या ठरतात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ओंकार यांनी कला शिक्षण मुंबईतील रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून पूर्ण केले आहे. त्यांच्या कलाकृती बेस्ट पोट्रेट अॅवॉर्ड, पोर्टफोलिओ अॅवॉर्ड आणि ड्राइंग अँड स्केचेससाठी मेरिट सर्टिफिकेट अॅवॉर्डने सन्मानित आहेत. त्यांच्या कलाकृतींचे अनेक प्रदर्शनांत रसिकांनी कौतुक केले आहे. या तरुण चित्रकाराने लॉकडाउनच्या काळात साकारलेल्या कलाकृतींतील रंगछटांचे भावविश्‍व त्यांच्या चित्रविचारांची वेगळी श्रीमंती अधोरेखित करणारे आहे.

loading image
go to top