‘रायगड’ला वाऱ्यावर सोडू नका! 

महेंद्र सुके
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मुंबईच्या बेटांवर माणसांची गर्दी दिवसेंदिवस वाढतेच आहे. अवतीभवतीचा परिसरही मुंबईशी नाते सांगतो आहे. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरारने केव्हाच मुंबई परिसर म्हणून ओळख कमावली आहे. त्यातही रायगड जिल्हा वेगवेगळ्या कारणांसाठी मुंबईकरांसाठी घरअंगण ठरतो आहे. 

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईत माणसांचे इनकमिंग वर्षागणिक वाढते आहे. या बेटांवरची जमीन टोलेजंग इमारतींनी व्यापली आहे. त्यामुळे आता पाय पसरायला जागा नाही. इमारती आता आकाशाकडे झेपावत आहेत. मुंबईत येणाऱ्यांना त्या इमारतींमध्ये सहजासहजी घर मिळत नाही. मिळत असले तरी ते परवडत नाही. त्यामुळे नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने येणाऱ्यांना निवाऱ्यासाठी मुंबईबाहेरून ये-जा करण्याशिवाय पर्याय नाही. दैनंदिन कामाच्या सोयीनुसार ते मुंबईच्या अवती-भवतीची शहरे निवडताहेत. तास-दीड तासाचा प्रवासानंतर कामावर येतात आणि तेवढ्याच वेळात पुन्हा घरी जातात. ही इथली दैनंदिनी झाली आहे.  

ज्याप्रमाणे माणसे मुंबईबाहेर फेकली गेली, तसे काही उद्योगधंदेही मुंबईबाहेर थाटले गेलेत. वेगवेगळी कार्यालये, प्रतिष्ठाने, मॉल्स, दळवळणाच्या सोयी, सेवा केंद्रे अशा साऱ्यांचा विस्तार झालाय. एवढेच नव्हे; तर आता ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा’चे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. नावात जरी ‘नवी मुंबई’ असा उल्लेख असला, तरी हे विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे त्याची घोषणा होताच पनवेल, उरण भागाच्या विकासाला गती मिळाली. पनवेलच्या पुढच्या छोट्या छोट्या गावांत मोठ्या प्रमाणात इमारती बांधण्याची विकसकांमध्ये शर्यत सुरू झाली आहे. नेरूळ-उलवे, बेलापूर-उलवे या लोकल रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन प्रवास सुरू झालाय. काल छोटी वाटणारी गावे उद्या शहरांत परिवर्तीत होणार आहेत. पनवेलच्या पुढच्या रेल्वे वाहतुकीला गती मिळणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे विस्तारीकरण सुरू आहे. सात-आठ वर्षांपूर्वी विमानतळ होणार हे जाहीर होताच पनवेलच्या अवतीभवती पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यास सुरुवात झाली. शिवडी-उरण सी लिंकचे काम सुरू आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) एकूण २३ शहरे वसवण्यात येणार आहेत. त्यातील १८ शहरे रायगड जिल्ह्यात असणार आहेत. असा या परिसराचा विकास युद्ध पातळीवर होत असतानाच इथे राहणाऱ्या माणसांच्या मनातही भरारी घेण्याची स्वप्ने गर्दी करू लागली आहेत.

मात्र, हरवले गावपण!
विमानतळात जी गावे गेली, ती रिकामी केली आहेत. काही रिकामी होत आहेत. डोंगर पोखरून त्याचे सपाटीकरण सुरू आहे. यातील प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे, घरदाराचे पैसे मिळाले, त्यामुळे ते स्थलांतरित होत आहेत. त्यांचा पारंपरिक रोजगार गेलाय. त्यांच्या शेतीवाडीवरून विमान उड्डाण भरणार आहे. या प्रकल्पग्रस्तांना पैसे मिळाले, पर्यायी घर देण्यात आले असले, तरी त्यांच्या गावाचे गावपण हरवले आहे. रोजगार बुडाला आहे. आपल्या तरुण मुलांना रोजगार मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पात त्यांच्यासाठी रोजगाराची तरतूद केली तरी तरुण मुलांचे आयुष्य सुखावह होणार आहे. त्यासाठी काही प्रकल्पग्रस्तांना लढावे लागते, ही शोकांतिका  म्हणावी लागेल.

रायगडचे मुंबईशी नैसर्गिक नाते आहे. देशभरातून मुंबईत आलेला कुठलाही माणूस असो, त्याला सुटीचा एक दिवस निसर्गरम्य ठिकाणी घालवून ताणतणाव दूर करण्याची गरज असते. त्यासाठी उत्तम पर्याय मुंबईनजीकचा रायगड जिल्हा आहे. या जिल्ह्यातच असणाऱ्या रायगडसह सह्याद्री रांगांसोबत असणारे अनेक गडकिल्ले, मुंबईकरांची गरज ओळखून तयार करण्यात आलेले रिसोर्टस्‌, अलिबागचा समुद्रकिनारा, मुरूड-जंजिरा, एलिफंटा लेणी, असे एक-दोन नव्हे, आवडी-निवडीनुसार अनेक पर्याय आहेत. त्यातील काही पर्यटनस्थळांचा विकास झाला असला, तरी पर्यटकांना खुणावणाऱ्या सोयी-सुविधांपासून अनेक स्थळे अद्यापही दूरच आहेत. त्यांचा विकास केला, तर जिल्ह्यातील त्या त्या ठिकाणच्या स्थानिकांना पर्यटनाच्या उद्योगातून रोजगार मिळू शकणार आहे. सह्याद्री रांगांमध्ये अशा छोट्या-मोठ्या पर्यटनस्थळांची निर्मिती केली, तर एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. प्रत्येक वीकेंडला फक्त अलिबागचा समुद्रकिनाराच गर्दीने फुलून जाण्याऐवजी रानावनातील निसर्गाचा आस्वाद रायगडकर पर्यटकांना देऊ शकतील. निवडणुकीचे वारे वाहू लागताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य कारभाराची राजधानी असलेल्या रायगडावर कूच करून राजकारणी जी पोकळ आश्‍वासने देतात ती स्थानिकांना नको आहेत. आश्‍वासनपूर्ततेसाठी रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासाचा कार्यक्रम वास्तवात उतरवण्याची  गरज आहे.

स्थानिकांचा विकास व्हावा
मुंबईचा विकास होतोय, मुंबई विस्तारते म्हणून परिसरात माणसंही पसरत चालली आहेत. या परिसराचा विकास होतोय, पण स्थानिकांना, प्रकल्पग्रस्तांना केवळ पैसे देऊन चालणार नाही. त्यांच्या हाताला पर्यायी कामदेखील दिले पाहिजे. त्या कामांकरता त्यांच्या नव्या पिढीची शैक्षणिक उन्नती कशी होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्यात गरजेनुसार कौशल्यांचा विकास होण्यावर भर दिला पाहिजे. अर्थात, हा सगळीकडे आढळणारा प्रश्‍न आहे की, विकासासाठी ज्यांच्या जमिनी जातात त्यांच्याच मुलांना रोजगार देणे टाळले जाते. त्यासाठी त्यांच्यात कौशल्याच्या अभावाकडे बोट दाखवले जाते. परिणामी, स्थानिकांच्या काही पिढ्या परिस्थितीशी झगडत जगत राहतात. हे टाळले तरच मुंबईकरांना रायगडच्या अंगणात आनंद लुटण्याची संधी सर्वार्थाने सुखदायी ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahendra suke article on Raigad Local development