बद्ध मी....मुक्त मी! 

बद्ध मी....मुक्त मी! 

‘मिशन बिगीन अगेन’च्या प्रक्रियेमध्ये आपण आता रुळत चाललो असलो तरी लॉकडाउनचा अनुभवलेला काळ कायमचा कोरला गेला. कायम गर्दीने वाहणारे रस्ते, बस नाटकातल्या सेट सारखे दिसायला लागले, ज्यावर अजून पात्राने एंट्री घेणे बाकी आहे. मनात सारखं यायचं, अरे! आपल्याला रोजच्या कामाच्या घाईगर्दीत चित्र काढायला मनसोक्त वेळच मिळत नव्हता तो आता आहे. परंतु अनुत्साह आणि एका वेगळ्याच उदासीचा अनुभव काही काळ येतच राहिला. कालांतराने आतून धक्का बसला आणि या उदासीतूनच उत्साहाचा झरा झुळझुळू लागला. नीलिमा कढे यांच्याबाबतचा हा अनुभव आहे. भरतनाट्यम आणि चित्रकला या दोन्ही कलाप्रकारात लिलया संचार असलेल्या कढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या अभ्यास मंडळाच्या सदस्या आणि प्राध्यापिका आहेत. नृत्य आणि चित्र दोन्ही कलांची सोबत देऊन निसर्गाने आपल्याला किती समृद्ध केलं आहे ते जाणवत लॉकडाउन काळात त्यांच्या मनात कृतज्ञता उभी राहिली. दिवसातून आवर्जून व्यायाम-नृत्य साधना आणि चित्रासाठीही वेळ काढता येऊ लागला. पोट्रेट पेंटिंग आणि ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग दोन्ही त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. लॉकडाउनमध्ये घरी चित्रसाहित्य नव्हतं. कॉलेज मध्येच राहिलं होतं. छोट्याशा कागदी तुकड्यांवर त्यांनी कृष्णधवल खेळ सुरू केला. ‘अमूर्त चित्रांना आंतरिक ऊर्जा व्यक्त करायला आवडतं. तेही रंगांच्या माध्यमातून’ असे त्या आवर्जून नमुद करतात. यथावकाश रंगही हाती आले आणि तोही खेळ रंगला. त्याच्या जोडीने दोन्ही कलांसंबंधी वाचन चिंतन सुरू राहिलं. त्यातील काही मुद्दे ऑनलाइन व्याख्यान प्रात्यक्षिकातून रसिकांपर्यंत त्यांनी पोचविले आणि ही अखंड आनंदयात्रा सुरूच आहे. 

आपण समोरचे दृश्य पाहून कधी चित्र काढतो किंवा मनातल्या कल्पनांवर. या अमूर्त कल्पना व्यक्त करण्यासाठी दृश्य प्रतिमांचा आधार घेतो. ओळखीचा आकार आधारासाठी न घेता त्यांना चित्र काढणे जास्त आवडते. या संपूर्ण सृष्टीमध्ये अदृश्य अशा चैतन्य शक्तीचा वावर जाणवतो. आधुनिक भौतिकशास्त्र सांगते अचेतन अशा दगडांमध्येही अणू रेणूची हालचाल होत असते. त्या मूळ चैतन्याचा अंश आपल्यातही आहे आणि चराचरांतही व्यापून आहे. ही ऊर्जा माझ्या चित्रातून व्यक्त व्हावी असा माझा प्रयत्न असतो. शास्त्रीय नृत्याचा उद्देशही ऊर्जायुक्त हालचालींमधून चैतन्याचा प्रत्यय यावा असाच असतो. मला या दोन्ही कलांमध्ये खूप समान धागे जाणवतात, असे त्या सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com