
‘नेटफ्लिक्स’ व ‘ॲमेझॉन प्राईम’सारख्या अनेक प्लॅटफॉर्मनी कमाईचे उच्चांकही मोडले आहेत. प्रश्न आहे, सिनेमागृहात चित्रपट पाहण्याचं समाधान टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईच्या स्क्रीनवर मिळतं का?
महाराष्ट्रात १३ मार्चला कोरोनाच्या शिरकावामुळं चित्रपटांचं सिनेमागृहांतलं शेवटचं प्रदर्शन झालं आणि त्यानंतर गेल्या चार महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रेक्षक मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यापासून वंचित आहेत. त्याला पर्याय म्हणून काही चित्रपट ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत व त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. ‘नेटफ्लिक्स’ व ‘ॲमेझॉन प्राईम’सारख्या अनेक प्लॅटफॉर्मनी कमाईचे उच्चांकही मोडले आहेत. प्रश्न आहे, सिनेमागृहात चित्रपट पाहण्याचं समाधान टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईच्या स्क्रीनवर मिळतं का?
मागील अनेक पिढ्या मोठ्या पडद्यावर सिनेमे पाहण्यावर पोसल्या गेल्या आहेत. साधारण ७० व ८०च्या दशकात जन्मलेल्यांना एक पडदा चित्रपटगृहं, तेथील रांगा लावून खरेदी केलेली तिकिटं, प्रसंगी ब्लॅकनं घेतलेली तिकिटं अशा अनेक गोष्टी आठवत असणार. काहीही करून ‘फर्स्ट डे फर्स्ट’ शो चित्रपट पाहण्याची अहमहमिका या काळातील तरुणाईनं जोपासली. मोठ्या पडद्यावर ‘लार्जर दॅन लाइफ’ दिसणारी पात्रं, डॉल्बीपासून स्टेरिओफोनिकपर्यंत व आधुनिक काळात त्याही अनेक योजना पुढं गेलेले साउंड या गोष्टींचा आनंद टीव्ही आणि मोबाईलच्या छोट्याशा स्क्रिनवर कधीच घेता येत नाही. (‘शोले’ प्रदर्शित झाल्यावर धर्मेंदनं हवेत फेकलेलं नाणं जमिनीवर पडल्यावर येणारा आवाज ऐकण्यासाठीच काही लोक पुन्हा चित्रपट पाहात असल्याचे किस्से आजही रंगवून सांगितले जातात.) मात्र, त्या पुढील काळात जन्मलेल्या पिढीनं छोट्या पडद्याशी जुळवून घेतल्याचं दिसतं. आपल्याला हव्या त्याच गोष्टी आणि हव्या त्या वेळेतच पाहण्याचं सुख ‘ओटीटी’वर मिळतं आणि याच वैशिष्ट्यासाठी तरुणाई त्याकडं आकर्षित झालेली दिसते. मात्र, हिंदी व मराठीसह हॉलिवूडचे असे शेकडो सिनेमे आहेत, जे प्रेक्षक पर्याय दिल्यास केवळ सिनेमागृहातच पाहणं पसंत करतील. ‘ओटीटी’ हे ‘न्यू नॉर्मल’ होण्याची शक्यता आहे आणि तसं झाल्यास मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहण्याचं सुख काय असतं, हे नवी पिढी दुर्दैवानं विसरण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वतःसाठी असलेल्या तुमच्या छोट्या पडद्याचा हवा तसा व हवा तेव्हा वापर तुम्ही नक्कीच करू शकता, मात्र सिनेमागृहात, समूह मानसिकतेत चित्रपट पाहण्याची गंमत काही औरच. सिनेमागृहात तुम्ही सिनेमा अगदी एकाग्रचित्तानं, प्रत्येक संवाद कानात व प्रसंग डोळ्यात साठवत पाहता. स्वतःच्या स्क्रीनवर असं घडत नाही व अगदीच एखादा प्रसंग नीट न समजल्यास तो मागं जाऊन पुन्हा पाहता.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
‘बिंज वॉचिंग’ हा शब्द आताशा रुढ होताना दिसतो आहे. आपल्या आवडत्या मालिकेचे भाग किंवा चित्रपट एका बैठकीत पाहून संपवणं, हा तरुणाईचा फंडा. मात्र, सुरवातीला उल्लेख केलेल्या पिढीतील लोक सिनेमागृहात ‘बिंज वॉचिंग’ केल्याचे दाखले देतात! एकाच दिवशीचे सगळे खेळ लागोपाठची तिकिटं काढून पाहिलेले काही कमी नाहीत. चित्रपट महोत्सवाला हजेरी लावणारे तर एकाच दिवशी चार ते पाच सिनेमे सहज पाहतात, त्याला ‘बिंज वॉचिंग’ या व्याख्येत न बसवता! मात्र, मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचं सुख या वर्षात पुन्हा मिळण्याची शक्यता खूपच कमी दिसते आहे आणि त्यामुळं निर्मात्यांकडं ‘ओटीटी’शिवाय पर्यायही नाही. अमिताभ-आयुष्यमानचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट अनेकांनी ‘ओटीटी’वर पाहिला. आता अक्षयकुमारचा ‘लक्ष्मी बॉंब’, अनुराग बसू दिग्दर्शित ‘ल्युडो’, कारगिल युद्धावर आधारित ‘गुंजन सक्सेना’ व विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हे चित्रपट लवकरच ‘ओटीटी’वर प्रदर्शित होणार आहेत. नव्या व जुन्या पिढीतील अनेक सिनेरसिक या ‘न्यू नॉर्मल’चा स्वीकार करून ते पाहतीलही. मात्र, सिनेमागृहात चित्रपट पाहण्याचा अनोखा अनुभव घेण्यासाठी थोडी वाट पाहवीच लागणार....