विचारप्रवृत्त करणाऱ्या गझला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

book diwan-e-meena

गझल हा काव्यप्रकार मराठीत तुलनेत कमी हाताळला गेला आहे. माधव ज्युलियन, सुरेश भट, भीमराव पांचाळे असे काही अपवाद सोडले, तर मराठीत सातत्याने गझलकाव्य रचणारे कवी दुर्मीळच.

विचारप्रवृत्त करणाऱ्या गझला!

- महिमा ठोंबरे

गझल हा काव्यप्रकार मराठीत तुलनेत कमी हाताळला गेला आहे. माधव ज्युलियन, सुरेश भट, भीमराव पांचाळे असे काही अपवाद सोडले, तर मराठीत सातत्याने गझलकाव्य रचणारे कवी दुर्मीळच. अलीकडे वैभव जोशींसारखे काही कवी त्यादृष्टीने जरूर प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमध्ये मीना शिंदे यांचा नुकताच प्रकाशित झालेला ‘दीवान-ए-मीना’ हा काव्यसंग्रह म्हणूनच आवर्जून दखल घेण्यासारखा.

शिंदे यांचा हा दुसरा गझलसंग्रह आणि तिसरा काव्यसंग्रह. दीवान प्रकारातील हा काव्यसंग्रह आहे. ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार यांच्याकडूनच गझलेचं तंत्र शिकल्यामुळे शिंदे यांची गझल तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असल्याचं या काव्यसंग्रहात पदोपदी जाणवतं. काही प्रचलित, तसंच काही अप्रचलित वृत्तांमधील रचना या काव्यसंग्रहात दिसून येतात.

तंत्राच्या जोडीला भावोत्कटतेच्या निकषांवरही कवयित्री खऱ्या उतरल्या आहेत. प्रेमापासून विरहापर्यंत अनेक भावना या गझलांमधून डोकावतातच. मात्र, समाजमनाचं प्रतिबिंबही त्यांच्या गझलांमधून उमटतं. त्यामुळे समाजव्यवस्था, त्यातील त्रुटी, कुटुंबव्यवस्था अशा वैविध्यपूर्ण कंगोऱ्यांना शिंदे यांची गझल हळुवार स्पर्श करते. प्रस्तावनेत ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे म्हणतात त्याप्रमाणे, गझल ही जीवनाची मीमांसा असते. या काव्यसंग्रहातील अनेक गझल या विचाराच्या जवळपास जातात. केवळ रसनिष्पत्ती न करता वाचकाला विचारप्रवण होण्यात त्या भाग पाडतात.

संग्रहातील काही गझला आणि शेर मनात रेंगाळत राहतात.

‘तुझिया फुलाचा होतीस परिमळ, होतीस हिरवळ तू भोवताली, इथला हरवला ओला जिव्हाळा, गेलीस मजला सोडून आई’ हा शेर असो किंवा ‘ या कौलारू घरात आता थारा मजला मुळीच नाही,

पदराखाली तुझ्या हुंदका दडवायाला आले आई’ हा शेर असो. अचूक शब्दरचनांनी नेमके भाव टिपण्यात आणि नेमक्या वृत्तात बांधण्यात कवयित्री यशस्वी झाल्या आहेत.

‘ माणसाचा जन्म माझा जात मी का पांघरू?

जन्मतः लावाल जे ते जातीचे लक्तर नको,’

यांसारख्या शेरांमधून कवयित्री जातिव्यवस्थेवर आसूड ओढतात.

‘श्रीराम नाम जपण्या झाला उशीर मजला,

आत्माच राम आहे सांगे कबीर मजला’

अशा शेरांमधून भक्तिरसाचाही उत्कट आविष्कार करतात. गझलेचा स्थायिभाव असलेल्या प्रीतिरसाची पखरणही अनेक ठिकाणी कवयित्रीने केली आहे. गझल या काव्यप्रकाराची आवड असलेल्या, त्याविषयी अधिकाधिक वाचण्याची इच्छा असलेल्या रसिकांनी आवर्जून वाचावा, असा हा काव्यसंग्रह आहे.

पुस्तकाचं नाव : दीवान-ए-मीना

प्रकाशक : गझलपुष्प, पिंपरी-चिंचवड

कवयित्री : मीना शिंदे

पृष्ठं : १९६

मूल्य : २२५ रुपये

Web Title: Mahima Thombare Writes Book Diwan E Meena Gazal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Booksaptarang
go to top