कहाणी न दिलेल्या करंडकाची... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Purushottam karandak

पुण्यातल्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या निकालाने राज्यातलं अवघं नाट्यविश्व, कलाविश्व ढवळून निघालं.

कहाणी न दिलेल्या करंडकाची...

पुण्यातल्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या निकालाने राज्यातलं अवघं नाट्यविश्व, कलाविश्व ढवळून निघालं. पुरुषोत्तम करंडक देण्यासाठी एकही एकांकिका पात्र न आढळल्याने परीक्षकांनी करंडक कोणालाही न देण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निकाल लागल्याने सगळीकडेच त्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेचा सूर प्रामुख्याने टीकात्मक होता. यंदाची स्पर्धा न पाहिलेल्यांनी, परीक्षकांची नावंही माहिती नसलेल्यांनी परीक्षकांच्या क्षमतेवरच प्रश्न उपस्थित करण्यासह आयोजक, परीक्षकांचा हा अहंकार आहे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं सोडून असले निर्णय का घेता, असे अनेक आक्षेप घेतले. समाजमाध्यमांवर तर स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचीही मागणी काहींनी केली.

करंडकावरील मतमतांतराच्या गदारोळात ही चर्चा भरकटली आणि निर्णयामागील कारणांचा ऊहापोह झालाच नाही. वास्तविक, स्पर्धा पाहून त्यातील डावं-उजवं ठरवून पारितोषिकं देण्याचा सोपा पर्याय परीक्षकांपुढे होताच. शिवाय, स्पर्धेच्या इतिहासात कधीच न लागलेला निकाल जाहीर करताना अनेकांचा रोष ओढवून घेण्याचा धोकाही त्यांच्यासमोर होता. असं असताना तीनही सुज्ञ परीक्षकांनी सोपा पर्याय न निवडता हा धोका पत्करला, यामागे नक्कीच वैध कारणं आहेत.

नियम काय सांगतो?

महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेतर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. या स्पर्धेची सुरुवात होतानाच स्पर्धेमागील उद्दिष्टं आयोजकांनी स्पष्ट केली होती. स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांची प्रायोगिक रंगभूमीकडे वाटचाल व्हावी, हा हेतू असल्याने स्पर्धेची त्याप्रकारे रचना करण्यात आली, त्यामुळेच स्पर्धेत तांत्रिक बाबींसाठी गुणदान केलं जात नाही, तर केवळ संहिता, दिग्दर्शन आणि अभिनय यांवरच सहभागींचं परीक्षण केलं जातं, त्यामुळे आयोजकांनी निकष स्पष्ट करावेत, अशी मागणी अनाठायी आहे. तसंच, करंडकास एकही एकांकिका पात्र न आढळल्यास तो राखून ठेवण्याची तरतूदही नियमावलीत प्रारंभीच करण्यात आली होती. ती पात्रता ठरवण्याचा अधिकारही साहजिकच परीक्षकांना देण्यात आला. स्पर्धेत सहभाग घेताना परीक्षकांचा हा अधिकार मान्य केला, की नंतर त्यावर आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे करंडकासाठीची पात्रता ठरवणारे परीक्षक कोण, हा प्रश्नही तर्कहीन ठरतो. परिणामी, यंदाचा निकाल नियमबाह्य नाही, हे स्पष्ट आहे.

करंडक न देणाऱ्या परीक्षकांची पात्रता काय, असा सवाल अनेकांनी विचारला. पण, स्पर्धेतील एकही एकांकिका न पाहता किंवा ज्यांनी स्पर्धा पाहिली आहे त्यांच्याशी चर्चा न करताच, निकालावर मत ठोकून देणारे आपण कोण, असा प्रश्न यांतील एकासही पडला नाही. हे जाणीवपूर्वक नमूद करण्याचं कारण म्हणजे, स्पर्धा पाहिलेल्या बहुतांश व्यक्तींनी परीक्षकांच्या निकालाला सहमती दर्शवली. परीक्षकांनीही निकालावर अगदी सहज एकमत झालं, असं सांगितलं. असं का झालं, याचं उत्तर यंदाच्या एकांकिकांमध्ये सापडतं.

पुरुषोत्तममध्ये तांत्रिक बाबींवर गुणदान होत नाही, हे अनेकवेळा स्पष्ट होऊनही विद्यार्थी वारंवार त्याकडेच बहुतांश लक्ष देत असल्याचं दिसून आलं आहे. यंदा तसंच चित्र होतं आणि दुर्दैव म्हणजे, त्यामुळे संहितेकडे आणि अभिनयाकडे दुर्लक्ष झाल्याचं जाणवलं. अनेक एकांकिकांच्या संकल्पना चांगल्या होत्या, मात्र त्यावर पुरेसं काम न झाल्याने सशक्त संहिता हाती लागल्या नाहीत. ग्रामीण मराठी बोली किंवा प्रादेशिक लहेजा एकांकिकांमध्ये वापरण्याचा प्रयत्न यंदा सर्वाधिक झाला; पण ओढूनताणून केलेल्या या प्रयत्नाचा कच्चेपणा वारंवार उघड झाला. सध्या चलतीत असणाऱ्या मालिका, चित्रपट यांचाही प्रभाव या एकांकिकांवर जाणवला.

हा निर्णय गरजेचाच होता का?

यंदाच्या एकांकिकांमध्ये या आणि इतरही काही त्रुटी जाणवल्या; पण अशा आशयाच्या त्रुटी गेल्या काही वर्षांत जाणवतच आहेत. गेल्या काही वर्षांत स्पर्धेचा दर्जा घसरतो आहे, असं निरीक्षण स्पर्धा पाहणारे (आमच्या वेळची सर नाही आता, असा विनाकारण नकारात्मक सूर आळवणारे वगळून इतर व्यक्ती) नोंदवतच आहेत. असं असताना यंदाच्याच एकांकिकांना कठोर न्याय का, असा प्रश्न उपस्थित होणं रास्त आहे. पण यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे, गेल्या काही वर्षांतल्या परीक्षकांना इतका कठोर निर्णय घ्यावासा वाटला नाही, यंदाच्या परीक्षकांना घ्यावासा वाटला, हा साधा तर्क. दुसरं कारण म्हणजे, जर दर्जा खाली घसरतच असेल, तर कुठेतरी ही घसरण थांबवणं परीक्षकांना आवश्यक वाटलं असेल. पुरुषोत्तम हा एक मापदंड आहे. पुरुषोत्तम करंडक विजेती एकांकिका म्हणजे चांगलीच असणार, ही खात्री असते. याचं कारण म्हणजे, पुरुषोत्तमच्या मांडवाखालून तावूनसुलाखून बाहेर आलेलं सोनं अस्सलच असणार, हा विश्वास असतो. यंदा त्या दर्जाला साजेशी एकांकिका आढळली नाही, म्हणून परीक्षकांनी असा निर्णय घेतला. असा कठोर निकाल देण्यापेक्षा करंडक देत बक्षीस समारंभात स्पर्धकांचे कान टोचण्याचा पर्याय परीक्षकांपुढे होता. मात्र, एकदा करंडक मिळाल्यानंतर परीक्षकांची टीका फारशी गांभीर्याने घेतली जात नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे.

दर्जाचा दुराग्रह नव्हे, आग्रहच!

आयोजकांचा दर्जाचा हा आग्रह खरंतर दुराग्रह असल्याचाही मतप्रवाह आहे. दर्जेदार असं काही नसतं, जे असतं त्यातून सर्वोत्तम निवडायचं असतं, असा युक्तिवाद यासाठी काहींनी केला. पण गंमत म्हणजे, त्याचवेळी मालिका-चित्रपट-नाटक अशा सगळ्याच क्षेत्रांत आजघडीला अधोगती सुरू आहे, असा सूर हीच मंडळी आळवत असतात, जे काही प्रमाणात सत्यही आहे. अशावेळी जर कोणी दर्जाचा आग्रह धरू पाहत असेल, तर त्याचं स्वागत करायला हवं. त्याउलट त्यांचा आग्रह दुराग्रह असल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे सुमारपणाला आपण खतपाणीच घालत आहोत. परीक्षक म्हणून तुम्हाला काही कमअस्सल आढळलं तरी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून नाकारू नका, असा आग्रह धरायचा असेल, तर आपल्याला इतर कशातीलच सुमारपणाविषयी तक्रार करण्याचा नैतिक अधिकार उरणार नाही.

विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?

आता याहून कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे, या निकालाचा ज्यांच्यावर थेट परिणाम होणार आहे, तो घटक म्हणजे विद्यार्थी; स्पर्धेत सहभागी असलेले ५१ संघांतील सुमारे ८१६ विद्यार्थी. नाटकाविषयी कोणाला आस्था उरली नाही, रंगभूमीवर काम करण्याची कोणाला तळमळ नाही, असं वाटण्याच्या काळात ही ८१६ तरुण मुलं झपाटल्यागत नाटकासाठी काम करत आहेत, करू इच्छित आहेत. त्यांच्यात काही उणिवा नक्कीच आहेत, पण आत्ताच्या घडीला कलाविश्वाची ती सर्वांत मौल्यवान संपत्ती (ॲसेट) आहे. यंदाच्या निकालाचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होईल का? त्यांचं खच्चीकरण होईल का? याचं उत्तर ७० टक्के ‘नाही’ असं आहे. याचं कारण म्हणजे, सहभागी विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी निकाल मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एका विद्यार्थ्याने दिलेली प्रतिक्रिया तर फार बोलकी होती. ‘‘आम्हाला रोख रकमेचं पारितोषिक देत आहेत; पण आम्ही करंडकासाठी स्पर्धेत उतरलो होतो. रक्कम नाही, करंडक महत्त्वाचा आहे, त्यामुळे करंडक न मिळाल्याचं मनापासून वाईट वाटलं,’ असं या विद्यार्थ्याने सांगितलं. त्यामुळे या विद्यार्थ्यांची मानसिकता योग्य मार्गावर आहे, हे नक्की.

भवितव्य निकालाचं?

वरील प्रश्नांचं उत्तर ७० टक्के नाही असं असलं, तरी उर्वरित ३० टक्के उत्तर येणारा काळच देणार आहे. विद्यार्थ्यांनी निकाल स्वीकारला आहे, त्यांना करंडक न मिळाल्याचं वाईट वाटलं आहे; पण यातून ते निराश होऊन अथवा त्राग्यातून स्पर्धेकडे पाठ फिरवण्याचा टोकाचा निर्णय घेऊ शकतात. आत्मपरीक्षणाऐवजी परीक्षकांनाच मूर्ख ठरवून सुधारणांचा रस्ता बंद करू शकतात. निकालाभोवती फिरणारं राजकारण या वागणुकीला खतपाणी देणारं ठरू शकतं. त्यामुळे सुज्ञांनी हे राजकारण बाजूला ठेवण्याची गरज आहे. त्यासोबतच गरज आहे, विद्यार्थ्यांच्या नाराजीला योग्य दिशा देण्याची. आपल्या विद्यार्थिदशेत पुरुषोत्तम गाजवलेला आणि आता व्यावसायिक दिग्दर्शक-अभिनेता म्हणून यशस्वीपणे काम करत असलेल्या निपुण धर्माधिकारीने या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्याची घोषणा केली आहे, इतरही काही जणांनी आपापल्यापरीने विद्यार्थ्यांना मदत करण्याची तयारी दाखवली आहे. विद्यार्थ्यांच्या नाराजीचं विधायक सर्जनशीलतेत परिवर्तन करण्यासाठी या पुढाकाराचा नक्कीच उपयोग होईल.

नकार पचवणं निश्चितच अवघड असतं; पण तो नकार पचवून पुन्हा जिद्दीने काही करू पाहणाऱ्याचं कर्तृत्व झळाळून निघतं, याला इतिहास साक्षी आहे. त्यामुळे पुरुषोत्तमच्या निकालाचा हा नकार पचवून काही विद्यार्थी नक्कीच झेप घेतील. यानिमित्ताने झालेल्या घुसळणीतून त्यांच्यातला रंगकर्मी अधिक जोमाने उभा राहील आणि एका न दिलेल्या करंडकाच्या या कहाणीचा सुखान्त करेल, हे निश्चित.

‘पुरुषोत्तम’चा इतिहास

महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेच्यावतीनं १९६३ पासून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. राजाभाऊ नातू यांनी महाविद्यालयीन तरुणांना नाटक करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावं, या उद्देशानं ही स्पर्धा सुरू केली. संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य या बाबींशिवाय देखील नाटक होऊ शकते, मात्र दर्जेदार लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाला पर्याय नाही, हा राजाभाऊ नातू यांचा विचार होता. त्यामुळे ‘पुरुषोत्तम’मध्ये कधीही तांत्रिक बाबींसाठी गुण दिले जात नाहीत. तर, फक्त लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाच्या आधारावरच एकांकिकेचे परीक्षण केले जाते. करड्या शिस्तीसाठी आणि नेटक्या आयोजनासाठी ही स्पर्धा ओळखली जाते. गेली ५७ वर्षे सातत्याने याच पद्धतीने आयोजन होत असलेल्या या स्पर्धेने अनेक दिग्गज रंगकर्मी घडवले आहेत. या स्पर्धेतून कलाविश्वात पदार्पण केलेल्या अनेकांनी पुढे नाटक, चित्रपट, मालिका आदींमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे.

समाजमाध्यमांवर उमटले पडसाद

या निकालाबाबत समाजमाध्यमांवर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ‘यंदा परीक्षकांनी कोडं घातलं आहे. हा निकाल म्हणजे मला अबोल शिक्षा वाटते आहे. पण त्यामुळे होणारं मंथन ही कदाचित काळाची गरज होती’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अभिनेते किरण माने म्हणाले, ‘कलाक्षेत्रात गटबाजी आणि ‘मिडीया हाईप’ करणाऱ्या थिल्लरांनी थयथयाट माजवलेल्या आजच्या काळात पुरुषोत्तम स्पर्धेचा निकाल अत्यंत स्तुत्य आहे.’ दिग्दर्शक विजू माने यांनी मात्र या निकालाचा निषेध नोंदवला. अभिनेता सुव्रत जोशी याने ‘यशापयश हा कलाव्यवहाराचा अविभाज्य भाग आहे’, असे सांगत विद्यार्थी मित्रांना परीक्षकांशी संवाद साधून आपली कला अधिक सशक्त करण्याचा सल्ला दिला.

परीक्षकांची निरीक्षणं

स्पर्धेच्या निकालामागची कारणे परीक्षकांनी त्यांच्या निरीक्षणांसह स्पष्ट केली. ‘यंदा खरंतर केवळ उत्तेजनार्थ पारितोषिके द्यावीत, असाच आमचा आग्रह होता, कारण ‘विजेते’ या संज्ञेस पात्र लोक आमच्यापुढे नव्हते. मात्र स्पर्धेच्या नियमांनुसार आम्ही निकाल दिला’, असे परीक्षकांनी सांगितले. यामागची कारणे सांगताना ते म्हणाले, ‘यंदा सगळ्याच एकांकिकांच्या संहिता फसव्या, अर्धकच्च्या आणि प्रतिक्रियावादी वाटल्या. अलंकारणाचा प्रचंड सोस, कृतक भाषिक व्यवहार करणारी-कार्डबोर्डच्या कटआउटसारखी माणसं, आश्चर्यकारक अमानवी मतपरिवर्तनं, सामाजिक प्रश्न-समस्या यांचा अन्वय न लावता त्यांच्या धक्कादायक भागाकडे असणारा अतिरेकी झुकाव, हे दोष सगळ्याच संहितांमध्ये होते. सगळ्याच एकांकिकांमध्ये कलाकारांचा ‘अभिनयाचा अभिनय’ बघायला मिळाला. बहुतांश दिग्दर्शनही खटकेबाज, चमत्कृतीप्रधान, कृतक होतं. त्यांना केवळ प्रेक्षकांना अचंबित-प्रभावित-चकित करायचं होतं.’