नाम नमक निशान

नाम नमक निशान

भारतीय सशस्त्र सेनेचा एकमात्र उद्देश म्हणजे आपल्या देशाची सर्वतोपरी सुरक्षा करणे. यासाठी सर्व जवान व अधिकारी यांना आपले कर्तव्य व लोकशाहीतील आदर्शांशी वचनबद्ध राहणे गरजेचे आहे. शस्त्रसामग्री कितीही आधुनिक असली, तरी त्यामागचा सैनिकही तितकाच सक्षम पाहिजे आणि सैनिक सक्षम पाहिजे असेल, तर त्याचे मनोधैर्य, त्याच्यातील प्रेरणा व त्याची लढाऊ वृत्तीदेखील तितकीच प्रबळ पाहिजे. या तिन्ही गुणधर्मांची पातळी उच्च स्तरावर कायम राखून ठेवण्यामागे भारतीय सेनेतील काही गौरवशाली परंपरा कारणीभूत आहेत.

भारतीय सेनेच्या अशाच परंपरांमधील एक म्हणजे युद्धगर्जना. सेनेच्या वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत. पंजाब रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट,  बिहार रेजिमेंट, डोग्रा रेजिमेंट, मराठा लाइट इन्फंट्री, महार रेजिमेंट अशी त्यांतील काहींची नावे सांगता येतील. सगळ्याच जन्मजात पराक्रमी. त्यांच्या सर्वांच्या युद्धगर्जना (Battle cry ) किंवा  (War cry) अतिशय सुंदर आणि आत्मीक शक्‍ती जागृत करणाऱ्या आहेत. पंजाब रेजिमेंटची युद्धगर्जना ‘जो बोले सो निहाल’ अशी आहे. नागा रेजिमेंटची  युद्धगर्जना ‘जय दुर्गा नागा’  अशी आहे. जाट  रेजिमेंटची युद्धगर्जना ‘जाट बलवान, जय भगवान!’  आहे. डोग्रा रेजिमेंटची युद्धगर्जना ‘ज्वाला माता की जय’ अशी आहे; तर बिहार  रेजिमेंटची युद्धगर्जना, जय बजरंगबली! अशी आहे. सगळ्या युद्धगर्जना त्यांच्या त्यांच्या देवांच्या नावाने आहेत. तर मराठा लाइट इन्फंट्रीची युद्धगर्जना,  ‘बोला,  श्रीछत्रपती शिवाजी महाराज की जय !’  अशी जबरदस्त आहे. ही एकमेव युद्धगर्जना, जी देवाच्या नावाने नसून एका राजाच्या, एका महापुरुषाच्या नावाने आहे. 

मराठा लाइट इन्फंट्रीची युद्धगर्जना कधीपासून दिली जाऊ लागली, हे पाहणेही रंजक ठरेल. सन १९४१ चा काळ. दुसरे महायुद्ध सुरू होते. आफ्रिकेत आताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्या काळच्या ॲबेसिनियाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता. त्याचं नाव इरेट्रिया. तेथे केरेन नावाचा प्रांत आहे. त्या भागात उंचच उंच अशा डोंगररांगा आहेत. त्या डोंगररांगांवरील एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता. त्याचं नाव डोलोगोरो डाँक. हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंट लढत होती. बराच प्रयत्न करूनही हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता. मराठा रेजिमेंटमध्ये ‘श्रीरंग लावंड’ नावाचे एक सुभेदार होते. त्यांनी  ब्रिटिशांना सांगितलं, की आम्हांला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची परवानगी द्या, आम्ही हा किल्ला तुम्हाला जिंकून दाखवतो; पण ब्रिटिश ही परवानगी देण्यासाठी घाबरत होते. कारण महाराजांचं नाव घेऊन यांनी बंदुका आपल्यावरच रोखल्या तर? पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब असल्यामुळे त्यांच्या स्वार्थापोटी नाइलाजाने त्यांनी ही परवानगी दिली. नंतर आपल्या लोकांनी, ‘बोला, श्रीछत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणत एका रात्रीत किल्ला सर केला आणि त्यानंतर मराठा लाइट इन्फ्रंट्रीने ही ‘‘Battle Cry’ म्हणजे युद्धगर्जना अधिकृत केली. या युद्धगर्जनेमुळे अख्ख्या जगाच्या पाठीवर कोठेही प्रेरणा मिळाल्याशिवाय राहत नाही.

उच्च दर्जाच्या प्रशिक्षणामुळे आपल्या सैन्यातील प्रत्येकामध्ये तीन गोष्टींसाठी करणार किंवा मरणार अशी भावना निर्माण होते. त्या तीन गोष्टी म्हणजे- नाम (आपल्या रेजिमेंटचे व देशाचे नाव ), नमक (मीठ-म्हणजेच देशाप्रतिची इमानदारी) व निशान (रेजिमेंटचा व देशाचा झेंडा जो नेहमी आकाशामध्ये फडकत राहिला पाहिजे) या नाम-नमक-निशानपायी आपल्या सेनेतील कितीतरी वीर मृत्यूला हसत हसत सामोरे गेलेत. देशाच्या प्रतिष्ठेसाठी मृत्यूला आलिंगन देणाऱ्या अशा काही वीरांची वाक्‍ये किती अभिमानास्पद आहेत, ते पाहा  ः

मी तिरंगा फडकवून परत येईन किंवा तिरंग्यात गुंडाळून परत येईन; पण मी परत येईन.- कॅप्टन विक्रम बत्रा (परमवीर चक्र.)

 जर माझे शौर्य सिद्ध करण्याआधी मला मरण आले, तर मी शपथ घेतो, की मी मृत्यूला ठार मारीन. - कॅप्टन मनोज कुमार पांडे (परमवीर चक्र.)

जर कुणी म्हणत असेल, की तो मृत्यूला घाबरत नाही, तर एकतरी तो खोटे बोलत असेल किंवा मग तो भारतीय सेनेतला असावा. -  फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ.

आतंकवाद्यांना माफ करणे देवाचे काम आहे; पण त्यांची देवाशी भेट घडवणे आमचे काम आहे. - भारतीय सेना.

मला एकाच गोष्टीचे वाईट वाटते आणि ते म्हणजे या देशाला अर्पण करण्यासाठी माझ्याकडे एकच जीव आहे. 
- अधिकारी प्रेम रामचंदानी

हवा चालू आहे म्हणून आपला तिरंगा फडकत नाही. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या प्रत्येक जवानाच्या शेवटच्या श्‍वासाने तो फडकतो. - भारतीय सेना.

देव आमच्या शत्रूवर दया करो, कारण आम्ही ती करणार नाही. - भारतीय सेना.
 युद्धामध्ये मरण पावलेल्या सैनिकांसाठी अश्रू ढाळू नका. जे युद्धात मरतात, त्यांचा मोठा सन्मान स्वर्गामध्ये होतो. - भारतीय सेना.

सैन्यातील परंपरा इतक्‍या खोलवर रुजलेल्या आहेत, की त्यांच्यामुळे एक ठराविक आचारसंहिता प्रत्येकासाठी लागू झालेली असते. ज्येष्ठ व कनिष्ठांबद्दल आदर (ड्यूटीवर नसतानादेखील), स्त्रियांच्या प्रति आदर, १०० टक्के प्रामाणिकपणा, नीडर, नैतिक आणि शारीरिक धैर्य असे कित्येक गुण प्रत्येकाच्या अंगी या सैनिकी परंपरांमुळे भिनलेले असतात. काही परंपरा विचित्र वाटतात; पण त्यामागे काही ऐतिहासिक कारणे आहेत. ५ गोरखा राईफल्स्‌चे जवान त्यांच्या बेल्टचे बकल्स सेंटर हूकपासून चार इंच लांब ठेवतात. ही परंपरा एकोणीसाव्या शतकात अफगाणिस्तानातील वझीरिस्तानामध्ये सुरू झाली. तेव्हा या बटालियनचे जवान बंदुकीच्या पाच गोळ्या असलेली क्‍लिप बेल्टच्या सेंटर हूकजवळ खोचून ठेवायचे. तिसऱ्या अँग्लो -अफगाण युद्धामध्ये या बटालियनचे गोळाबारूद शेवटी शेवटी संपुष्टात आले. तेव्हा प्रत्येक जवानाला या क्‍लिपमधील गोळ्या या आणीबाणीच्या प्रसंगी वापरता आल्या, ज्यामुळे ही बटालियन त्या युद्धामघ्ये सरतेशेवटी विजयी झाली.

प्रजासत्ताक दिनादिवशी रेजिमेंटमधील सर्व ‘जेसीओ’ज्‌ना (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स) म्हणजे सुभेदार मेजर, सुभेदार व नायब सुभेदारपदाचे अधिकारी) ऑफिसर्स मेसमध्ये मेजवानीसाठी आमंत्रित केले जाते. अशा वेळी रेजिमेंटचे अधिकारी व निमंत्रित जेसीओज्‌मध्ये अनौपचारिक व मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होते व सर्वजण रेजिमेंटच्या कल्याणांसबंधी सर्व तऱ्हांच्या गप्पा दिलखुलासपणे मारतात. या पार्टीच्या उत्तरादाखल स्वातंत्र्यदिनी सर्व जेसीओज्‌ रेजिमेंटच्या अधिकांऱ्यांना जेसीओज्‌ मेसमध्ये मेजवानीसाठी आमंत्रित करतात. ही परंपरा ब्रिटिशकालीन आहे. जिच्यामुळे अधिकारीवर्ग व जेसीओज्‌ आणि जवान यांच्यातील दरी कमी होऊन त्यांच्यातील एकत्रितपणा व मैत्रीभाव चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होतो.

परंपरा हा भारतीय सेनेचा आत्मा आहे. या परंपरा ब्रिटिशकालीन नसून, शेकडो वर्षांच्या युद्धामधून विकसित झाल्या आहेत. या परंपरा सैन्याच्या शौर्य, नेतृत्व, शिस्त  व टीम स्पिरीट या गुणांशी निगडित आहेत. भारतीय सेनेतील जवानांनी शौर्याचे असंख्य विक्रम केले आहेत. बलवान गोरखे, अदम्य जाटस्‌, मजबूत पंजाबीज्‌, क्रूर नागाज्‌ ,चपळ मराठाज्‌, शूर राजपूतस्‌, निर्भय डोगराज्‌ व स्थिर गढवालीज्‌ या सर्वांनी त्यांच्या शौर्य व धैर्याच्या अनेक गाथा आजवर रचल्या आहेत.

भारतीय सेनेची पाळेमुळे इतिहासामध्ये फार खोलवर रुजलेली आहेत आणि आपला जवान त्याची प्रेरणा आपल्या कैक युगपुरुषांकडून घेतो. डावपेचाची अंतर्दृष्टी कृष्णाची, अर्जुन, भीम, राम व लक्ष्मणाचे शौर्य, चंद्रगुप्त व समुद्रगुप्ताचे लष्करी कौशल्य, छत्रपती शिवाजी महाराजांची अलौकिक बुद्धिमत्ता व हैदर अलीची रणनीतिक खेळीमधील तल्लखता या सर्व गुणांची योग्य सांगड घालून आपल्या सेनेचे वीर त्यांचे कर्तव्य मृत्यूला न घाबरता पार पाडतात. म्हणूनच की काय, आपल्या प्रत्येक सैनिकाचे स्वप्न खालील चार ओळींमध्ये व्यक्‍त होते  ः

काश मेरी जिंदगी में सरहद की कोई श्‍याम आये,
काश मेरी जिंदगी मेरे वतन के काम आये,
न खौफ हैं मौत का न आरजू हैं जन्नत की,
मगर जब कभी जिक्र हो शहिदों का काश मेरा भी नाम आये.
 जय हिंद और जय हिंद की सेना।

मेजर संजय शिंदे 
(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी असून, सध्या उद्योजक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com