मेकिंग ऑफ ऑलिंपियन्स...

मेकिंग ऑफ ऑलिंपियन्स...

भारतासारखा खंडप्राय देश ऑलिंपिकच्या संदर्भात ‘तिसऱ्या जगात’ही समाविष्ट नाही, हे चित्र आता हळूहळू बदलतंय. ऑलिंपिकगणिक पात्र भारतीय स्पर्धकांची संख्या वाढतेय. हा बदल पदकतक्‍त्यात रूपांतरित होण्याचा चमत्कार एका रात्रीत घडणार नाही. कारण, चॅंपियन एका रात्रीत घडत नसतात. मग ऑलिंपियन बनण्याचा मार्ग किती खडतर असेल? ही वाटचाल केलेल्या काही भारतीयांच्या कथा. पुढच्या महिन्यात (५ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धेंच्या पार्श्र्वभूमीवर...

रातोरात ‘स्टार’च नव्हे; तर ‘सुपरस्टार’ बनता येतं, अशी उदाहरणं रुपेरी पडद्यावर दिसतात. बॉक्‍स ऑफिसमुळं तसे चमत्कार (!) घडतात. आपल्या देशात तर असे कितीतरी हीरो दाखवून देता येतील. मात्र, खेळात एका रात्रीत असं ‘चॅंपियन’ होता येत नसतं. हे सूत्र सांघिकच नव्हे तर वैयक्तिक खेळांनाही लागू आहे. थोडं पुढं जाऊन असं म्हणता येईल, की एका रात्रीत ऑलिंपियनही घडत नाहीत. कारण ऑलिंपिकला पात्र ठरण्यासाठी एकदा नव्हे, तर बऱ्याच वेळा ‘चॅंपियन’ बनावं लागतं. ऑलिंपिकमध्ये नुसता सहभाग म्हणजे धन्यता, असं म्हणणं आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलेल्यांसाठी अन्यायकारक ठरेल. ‘पृथ्वीतलावरचा सर्वोच्च क्रीडामहोत्सव’ असलेल्या ऑलिंपिकसाठी यंदा विक्रमी संख्येनं भारतीय स्पर्धक पात्र ठरले आहेत. त्यातल्या काही जणांची कौटुंबिक, सामाजिक पार्श्‍वभूमी पाहिल्यास विलक्षण कथा साकारल्याचं दिसून येतं. कोण आहेत हे खेळाडू, कोणते खेळ ते खेळतात, त्यांनी ऑलिंपिकपर्यंत कशी मजल मारली, याची ही काही उदाहरणं.
***

रेसिंगप्रेमीचा ‘यू टर्न’ नेमबाजी रेंजकडं
प्रकाश नांजप्पा बंगळूरचा रहिवासी. बंगळूर हे मोटरस्पोर्टचं माहेरघर. साहजिकच नांजप्पाला रेसिंगची आवड होती. तो बाईक रॅलींमध्ये सहभागी व्हायचा. त्याला साहसी खेळांचीही आवड होती. त्याचे वडील पी. एन. पापण्णा राष्ट्रीय पातळीवरचे नेमबाज आहेत. वडील जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धेच्या सरावाची तयारी करत होते, ‘स्टान्स’चा अचूक अंदाज घेत होते, तेव्हा नांजप्पा महाविद्यालयीन युवक होता. एके दिवशी वडिलांची अशीच गंमत करावीशी त्याला वाटली. ‘नेमबाजीत असा काय कस लागतो, किती सोपा आहे हा खेळ...’ अशा आशयाची शेरेबाजी त्यानं केली. त्यावर वडिलांनी त्याला ‘ओपन चॅलेंज’ दिलं. ‘माझा खेळ इतका सोपा वाटतो, तर रेंजवर येऊन हातात बंदूक घे अन्‌ नेम धरणं हा काय गेम आहे हे आजमावून पाहा...’ असं हे चॅलेंज होतं. नांजप्पाच्या कारकीर्दीनं रेसिंगच्या ट्रॅकवरून रेंजकडं यू टर्न घेण्यास हे निमित्त ठरलं. त्याला बघता बघता नेमबाजीची गोडी लागली. दरम्यान, सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊन तो कॅनडात नोकरीसाठी गेला. त्यामुळं नेमबाजी मागं पडली. अशा वेळी वडिलांनीच त्याला प्रेरणादायी पत्र लिहून नेमबाजीची आराधना करण्याचा मंत्र त्यांनी दिला. नांजप्पानं कॅनडातल्या स्पर्धेत भाग घेऊन राष्ट्रीय विक्रम नोंदवला. तेव्हा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणाऱ्या नांजप्पानं ठरवलं असतं तर बॉक्‍सर-कुस्तीपटूंप्रमाणं तो कॅनडात स्थायिक होऊन कारकीर्द साकारू शकला असता; पण त्यानं सॉफ्टवेअरमधल्या नोकरीसह कॅनडा सोडून मायदेशात येऊन नेमबाजीचा सराव सुरू केला. कारकीर्द भरारी घेत असताना वेगळंच संकट त्याच्यावर आलं. त्याला चेहऱ्याच्या अर्धांगवायूचा झटका आला. नेमबाजासाठी डोळा तर सगळ्यात महत्त्वाचा. त्याचा डोळा कोरडा पडायचा. नांजप्पाला हा मोठा धक्का होता; पण त्यानं या विकाराविषयी माहिती घेतली. त्यातून सहा महिन्यांत बरं होता येतं, असं त्याला कळलं आणि दीड-दोन महिन्यांतच तो जिद्दीनं चुस्त-तंदुरुस्त झाला. या विकारामुळं तयारीवर परिणाम होऊ नये म्हणून त्यानं दुप्पट सराव केला. सुरवातीला त्याला काही आय-ड्रॉप टाकावे लागायचे; पण तरीही त्यानं सरावात खंड पडू दिला नाही. ऑलिंपिकमध्ये राजवर्धनसिंह राठोड, अभिनव बिंद्रा, गगन नारंग यांची परंपरा नांजप्पा वृद्धिंगत करणार का, याची उत्सुकता आहे. नांजप्पा या मातब्बर देशबांधवांच्या सतत संपर्कात असतो. नेमबाजीचे प्रकार वेगळे असले, तरी प्रत्येकातला चांगला गुण आत्मसात करण्याची त्याची वृत्ती आहे. हा दृष्टिकोन हेच त्याचं खरं अस्त्र आहे.
***

माझी यांची लक्ष्मीराणीनामक सुकन्या
पश्‍चिम बंगालच्या लक्ष्मीराणी माझीची स्टोरी अशीच गमतीदार आहे. तिचे वडील कोळशाच्या खाणीत कामाला होते. लक्ष्मी ही बागूला गावातल्या सरकारी शाळेत शिकायची. प्रशिक्षक धर्मेंद्र तिवारी यांनी ‘कॅच देम यंग’ मोहिमेंतर्गत या शाळेला भेट दिली. लक्ष्मीच्या वर्गात येऊन ‘तिरंदाजी शिकण्यात-करण्यात कुणाला स्वारस्य आहे का?’ असा प्रश्‍न त्यांनी विचारला. वर्गातल्या एकाच मुलीनं हात वर केला आणि ती होती लक्ष्मी! तेव्हा लक्ष्मीला धनुष्यबाण ठाऊक होता; पण तिरंदाजीचा खेळ अनभिज्ञ होता. यानंतरही तिनं पुढाकार घेण्याचं कारण म्हणजे असं वेगळं काहीतरी केलं तर आपल्या वडिलांना धोकादायक खाणीत काम करावं लागणार नाही...आपण खेळात काही नाव कमावलं तर पैसा अन्‌ प्रसिद्धी चालून येईलं अन्‌ वडिलांना निवृत्त होता येईल, असा थोरांनाही चकित करेल असा तिचा उद्देश होता. लक्ष्मीनं तिरंदाजीचा श्रीगणेशा टाटा स्पोर्टस ॲकॅडमीत केला. आता दीपिकाकुमारी आणि बोम्बायला देवी यांच्या जोडीला तिनं रिओ ऑलिंपिकची पात्रता गाठून कमाल केली आहे. लक्ष्मीचं वैशिष्ट्य म्हणजे ती दडपण घेत नाही. ‘खेळाचा आनंद लुटायचा’, असं वरकरणी सोपं वाटणारं; पण स्पर्धात्मक वातावरणात प्रत्यक्ष अमलात आणण्यास अवघड असलेलं घोषवाक्‍य ती उद्‌धृत करते. लक्ष्मीच्या तिरंदाजीतल्या प्रगतीमुळं तिच्या वडिलांना प्रमोशन मिळालं आहे. आता त्यांना खाणीत आत आणि खोलवर जाऊन काम करावं लागत नाही. लक्ष्मी नावाच्या सुकन्येचा पिता म्हणून ते कृतकृत्य झाले आहेत. आज हीच लक्ष्मी ‘युनिसेफ’ची राजदूत बनली आहे. ‘पालकांनी मुलींना शिक्षण द्यावं,’ असा संदेश ती देते. लक्ष्मी म्हणते ः ‘मी लहान असताना गावातल्या बहुसंख्य मुलींना त्यांचे आई-वडील शाळेत पाठवायचे नाहीत. माझ्या आई-वडिलांनी मात्र ‘मुलगी शाळेत गेलीच पाहिजे,’ असा आग्रह धरला आणि पोटाला चिमटा काढून मला शाळेत पाठवलं. शाळेत गेल्यामुळंच मला तिरंदाजीचा मार्ग मिळाला.’ आपल्या देशात बॅडमिंटन-टेनिसमध्ये दिग्गज खेळाडूंची परंपरा असली तरी सानिया-साईना यांच्यानंतरच या दोन खेळांना मिळणारा प्रतिसाद कमालीचा वाढला. तिरंदाजीत डोला बॅनर्जी, दीपिकाकुमारी यांच्यानंतर लक्ष्मीराणी हिचा उदय म्हणूनच सुखद ठरतो. इथं आणखी एक मुद्दा मांडण्याची गरज आहे. आपल्या देशात बऱ्याच भागात स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण चिंताजनक आहे, तर अनेक ठिकाणी मुलगी जन्माला येताच ‘नकुशी’ असं नामकरण केलं जातं. हे विदारक चित्र स्त्री-पुरुष संख्येतल्या वाढत जाणाऱ्या तफावतीपर्यंत टोक गाठतं. अशा वेळी माझी यांची लक्ष्मीराणीनामक सुकन्या आणि तिचे आई-वडीलसुद्धा ऑलिंपिकपूर्वीच सुवर्णपदकाचे मानकरी ठरतात!

***
पोर उचापती! करी ज्यूदोच्या करामती!
पंजाबमधल्या गुरुदासपूरजवळच्या कोथेघुराला खेड्यातला अवतार सिंग ज्यूदोच्या मॅटवर कसा अवतरला याची कहाणी थक्क करणारी आहे. हा पोर मुळातच फार उचापती. तो प्रचंड खोड्या काढायचा. त्याच्याकडं विलक्षण ऊर्जा होती आणि तिला योग्य ती वाट मिळत नव्हती. म्हणून आई-वडिलांनी (सुखविंदर कौर-शिंगारा सिंग) अवतारला ज्यूदोच्या क्‍लासमध्ये घातलं! पोरगा ज्यूदोत रमंल, म्हणजे दमलंच, असा त्यांचा होरा; पण या पोरानं तो चुकीचा ठरवला. अवतार न दमता रमला! तो स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदकं जिंकू लागला. पंजाब शासनाच्या आरोग्य खात्यात काम करणाऱ्या वडिलांनी काटकसर करून जमवलेले पैसे खर्च करून त्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी पाठवायला सुरवात केली. त्याच्या गुणवत्तेला ‘जेएसडब्ल्यू स्पोर्टस’च पाठबळ लाभलं. त्यामुळं याच अवतारच्या रूपानं ज्यूदोसारख्या वेगळ्या खेळात ऑलिंपिकला दीर्घ काळानंतर भारतीय स्पर्धक पात्र ठरला. अवतारची परदेशातली एकही स्पर्धा आत्तापर्यंत पाहू न शकलेले सुखविंदर कौर-शिंगारा यांना रिओला जाण्यासाठी एक कंपनी प्रायोजक म्हणून पुढं आली आहे! हीसुद्धा ‘उचापती’ अवतारची करामतच म्हणायची!
***

‘मॅरेथॉन का राही, देस का सिपाही’
भारताच्या क्रीडाक्षेत्रातल्या वाटचालीत आणि प्रगतीत लष्करानं बहुमोल योगदान दिलं आहे. लष्करात भरती झाल्यानंतर खेळाडूचा मूळ प्रांत, त्याची शारीरिक ठेवण, जमेच्या बाजू, उपजत कौशल्य आदी निकषांवर त्याला योग्य खेळाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. सीमेवर देशाच्या रक्षणासाठी रक्त सांडण्याची पर्वा न करणारे जवान मैदानावरही सर्वस्व पणास लावून घाम गाळतात. अनेक अडथळ्यांचा ते सामना करतात. रिओ ऑलिंपिकमध्ये असाच एक ‘देस का सिपाही’ तिरंगा झळकवण्यासाठी सुसज्ज-सुसंघटित झालाय. सर्वाधिक खडतर क्रीडाप्रकार मानल्या जाणाऱ्या मॅरेथॉनमध्ये तो सहभागी होईल. त्याचं नाव आहे नितेंदरसिंह रावत. नितेंदर मूळचा अन्ना या खेड्यातला. गढवालच्या पहाडी भागात गारूर या शहराजवळ हे खेडं आहे. समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंचीवरच्या या ठिकाणी त्याला घरापासून शाळेत जाण्यासाठी रोज जाता-येता चार-पाच किलोमीटर ट्रेकिंग करावं लागायचं.

हाच नितेंदर लष्करात भरती झाला. कुमाऊँ रेजिमेंटमध्ये तो इन्फन्ट्री हवालदार म्हणून रुजू झाला. लष्करात खेळाची जोपासना केली जाते. नितेंदर त्याच्या उपजत क्षमतेमुळं क्रॉसकंट्री धावपटू बनला. नंतर त्याचं जम्मूत नियंत्रणरेषेजवळच्या पूँछ येथे पोस्टिंग झालं. त्या वेळी त्याच्या नडगीला दुखापत झाली. त्यामुळं त्याचं धावणं थांबलं. ड्यूटी मात्र चुकली नाही. कारण, त्याचं संवेदनशील भागात पोस्टिंग होतं. अर्थात नितेंदरनं नेटानं ड्यूटी केली आणि दुखापत बरी होण्यासाठी ‘रिहॅबिलिटेशन’ही पूर्ण केलं. तीन महिन्यांत त्याची दुखापत बरी झाली. नंतर सिकंदराबादमधल्या आर्मी प्लेसमेंट नोड आणि त्यानंतर पुण्यातल्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये त्यानं सराव केला. नितेंदरला रोड रेसपेक्षा मॅरेथॉन खुणावत होती. याचं कारण, पहाडी भागात बालपणापासून त्यानं दमसास, तंदुरुस्तीची जोपासना केली होती. प्रशिक्षक सुरिंदरसिंग यांच्याकडं त्यानं मॅरेथॉनची इच्छा व्यक्त केली. आधी त्यांनी ३२ किलोमीटर अंतर धावायला सांगितलं. ते पूर्ण केल्यानंतर नितेंदरनं तंदुरुस्तीच्या अनुषंगानं चांगलाच तग धरला होता. प्रशिक्षकांना त्याची क्षमता तेव्हाच लक्षात आली. मग नितेंदरनं दक्षिण कोरियातल्या म्युंगयिआँग इथल्या जागतिक लष्करी स्पर्धेत ऑलिंपिकसाठीची पात्रता सिद्ध केली. नितेंदरला आपल्या गावाचा फार अभिमान आहे. तो राष्ट्रीय पातळीवर गेलेला तिथला पहिला क्रीडापटू आहे. तिथपासून त्यानं ऑलिंपिकपर्यंत मजल मारली आहे. ‘रिओला केवळ सहभागी होण्यासाठी जायचं नाही, तर लक्षात राहील अशी कामगिरी करून दाखवायची,’ असा त्याचा निर्धार आहे.
***
मनिकाचा मंत्रा ः मनापासून टेबल टेनिसची मात्रा
क्रीडाक्षेत्रात युरोप-अमेरिकेनं सातत्यानं शास्त्रीय प्रगतीची जोड देत वर्चस्व राखलं. याला चीननं शह दिला. रॅकेट स्पोर्टसमध्ये चीनसह आशियाच्या वर्चस्वाला हादरे देण्यात युरोप-अमेरिकेला अद्याप १०० टक्के यश आलेलं नाही. चीन आणि आशियाचा उल्लेख करताना भारताचं अस्तित्व मात्र नजरेत भरण्यासारखं नव्हतं. टेनिसमध्ये सानिया मिर्झा, बॅडमिंटनमध्ये साईना नेहवाल यांचा उदय झाला आणि त्यांचं भरीव यश अभिमानास्पद ठरलं. रॅकेट स्पोर्टसमध्येच गणल्या जाणाऱ्या टेबल टेनिसमध्ये मनिका बात्रा हिनं चुणूक दाखवली आहे. द्वितीय श्रेणी जागतिक सांघिक स्पर्धेत तिनं सोनेरी यश संपादन केलं. तिची कौटुंबिक पार्श्‍वभूमी हृदयद्रावक आहे. तिच्या वडिलांना दीर्घ काळापासून मानसिक विकार जडलेला आहे. अशा वेळी आई सुषमा यांनी दुहेरी पालकत्वाची जबाबदारी पेलली. मोठी बहीण आंचल दिल्लीतल्या हंसराज मॉडेल स्कूलमध्ये टेबल टेनिस खेळायची. मनिकाला तिच्यामुळं या खेळाची गोडी लागली. वयाच्या नवव्या वर्षापासून तिनं दिल्लीतल्या स्पर्धा जिंकण्याचा सपाटा लावला. एरवी दंगामस्ती करणारी मनिका टेबल टेनिसचा सराव मात्र मनापासून करते. २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतल्या सहभागानंतर तिला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चुरशीची कल्पना आली. त्यानंतर तिनं तंदुरुस्तीवर मेहनत घेतली. पाच फूट ११ इंच उंची असलेल्या मनिकानं त्यामुळेच अनुभवात सरस असलेल्या देशभगिनींच्या जोडीला ऑलिंपिकसाठीची पात्रता साध्य केली. मनिका ऑलिंपिकला पात्र ठरल्यानंतर तिच्या वडिलांचा मानसिक आजार काही क्षणांसाठी पळून गेला आणि बात्रा कुटुंबीयाच्या आनंदाला पारावार उरला नाही. मनिकाचा एकच मंत्र आहे आणि तो म्हणजे टेबल टेनिसची मात्रा मनापासून घ्यायची. त्या मात्रेचा थोडा गुण तिच्या वडिलांना पण आला!
***
या खेळाडूंच्या कथा ऐकल्यानंतर त्यांनी ऑलिंपियन बनणं हाच मुळी किती मोठा पराक्रम आहे हे लक्षात येतं. बंगळूर, दिल्लीसारखी प्रगत महानगरं किंवा बागूला-अन्नासारखी दुर्गम-अतिदुर्गम खेडी अशा दोन्ही ठिकाणी या कथा साकारल्या आहेत. काही ठिकाणी कौटुंबिक पार्श्‍वभूमी खेळाची, तर काही ठिकाणी केवळ ते कुटुंबच नव्हे; तर गावही खेळापासून दूर. यानंतरही असे खेळाडू उदयास आले आहेत. त्यांचा खेळ, त्याचं तांत्रिक स्वरूप असं काही माहीत नसलं, तरी या कथा भावणाऱ्या आहेत.

आता रिओमध्ये हे आणि इतर काही स्पर्धक सुवर्णपदक किंवा किमान ब्राँझ तरी जिंकतील का, हा प्रश्‍न निर्माण होणं स्वाभाविक आहे. आपला देश शतक केलं नाही तर ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याच्यासारख्या ‘मास्टर-ब्लास्टर’लाही माफ करत नाही. शतकाला एक धाव जरी कमी पडली तरी त्याच्यावर ‘नर्व्हस नाईंटीनाईन’चा शिक्का मारला जायचा. क्रिकेटसारख्या ‘धर्मा’बाबत या खेळातल्या ‘देवा’ला चाहत्यांच्या दरबारात असा ‘न्याय’ मिळत असेल तर ऑलिंपियनची काय कथा...! पण याच ऑलिंपियनच्या अशा कथा ‘अच्छे दिन’ आणतील! या खेळाडूंचे खेळ वेगळे असले, तरी त्यांच्यात एक साम्य असं आहे, की आई-वडील, कुटुंब यांच्यावर या खेळाडूंचं जितकं प्रेम आहे, तितकंच प्रेम संघ-सहकारी-देश यांच्यावरही आहे. त्यांना स्वतःसाठी नव्हे, तर कुटुंबासाठी-देशासाठी खेळायचंय-लढायचंय-जिंकायचंय. आपल्या देशबांधवांचं काम सोप आहे...‘पदक की बदक’ अशा प्रश्‍नावर डोकं खाजवण्यापेक्षा ‘तुम्ही फक्त लढा!’ असं प्रोत्साहन देऊन (जोरदार) टाळ्या वाजवणं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com