
भटक्यांची मांदियाळी!
- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com
लहानपणी आजच्यासारखी आधुनिक माध्यमं उपलब्ध नसताना प्रवासवर्णनकारांनी लिहिलेल्या पुस्तकांतून आजूबाजूला असलेल्या देशांचं, अद्भुत जगाचं दर्शन घडत गेलं. नंतरच्या काळात दूरचित्रवाणीवर येणाऱ्या जगप्रसिद्ध अशा ट्रॅव्हल्सशोजनी त्याची जागा घेतली. आता तर ‘ओटीटी’च्या माध्यमातून आणि यूट्यूबमुळे आपल्याला पाहिजे त्या ठिकाणाची माहिती आपल्या बोलीभाषेत उपलब्ध होत आहे. आजच्या काळात ट्रॅव्हल ब्लॉगच्या माध्यमातून प्रवासवर्णनं आपल्याला वाचता येतात आणि त्या लेखकांशी प्रत्यक्षपणे तत्काळ संवादसुद्धा साधता येतो.
निसर्गसंपन्न महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, त्यामुळे कोणत्याही मराठी माणसाची पर्यटनाची सुरुवात ही महाराष्ट्रातूनच होते. आपल्या गड-किल्ल्यांच्या भटकंतीतून निर्माण झालेली ऐतिहासिक वास्तूंची गोडी ग्रीस-इजिप्तपर्यंत घेऊन गेली. आपल्या कोकणातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांनी लावलेली समुद्राची ओढ बाली, सीबूच्या बेटांपर्यंत घेऊन गेली; तर आपल्याकडच्या सुंदर देवळांची स्थापत्यशैली त्यांच्याबद्दलची उत्सुकता थेट कंबोडियामधील अंकोरवाटला जाऊन संपली. पर्यटनाची गोडी लागण्यामागे मार्गदर्शक म्हणून वरील सर्व माध्यमं जबाबदार आहेत असं मला वाटतं. पुस्तकं, टीव्ही, ओटीटी, इंटरनेट या सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडली.

अगदी शाळेत असताना पु. ल. देशपांडे यांची ‘अपूर्वाई’ आणि ‘पूर्वरंग’ अशी दोन प्रवासवर्णनं हातात पडली. ‘पुलं’नी केलेली युरोप आणि आग्नेय आशियातील भटकंती आणि तेथील अनुभव यांचं अतिशय खुमासदार वर्णन दोन्ही पुस्तकांमध्ये वाचायला मिळालं होतं. इतर देशांविषयीची उत्सुकता खऱ्या अर्थाने चाळवली गेली ती याच पुस्तकांमुळे.
मीना प्रभू म्हणजे प्रवासवर्णनपर साहित्यातलं अग्रगण्य नाव, त्यांचं लेखन या क्षेत्रातील मैलाचा दगड ठरलं. त्या काळात त्यांनी जाणते-अजाणतेपणी कित्येक मराठी पर्यटकांना परदेश प्रवासासाठी उद्युक्त केलं असेल. दृक-श्राव्य माध्यमात क्रांती झाल्याने अनेक आंतरराष्ट्रीय टीव्ही चॅनेल्स यांचं प्रसारण भारतात होऊ लागलं, यातीलच काही म्हणजे डिस्कवरी चॅनेल आणि बीबीसी.
‘एकदा का भटकंतीचा संसर्ग तुम्हाला झाला, की त्यावर कोणतंच औषध नाही. मरेपर्यंत जरी याची बाधा मला होत राहिली, तरी याचा मला मनस्वी आनंद असेल,’ असं सांगणारे प्रसिद्ध सूत्रसंचालक सर मायकेल पालीन यांनी ८० आणि ९० च्या दशकामध्ये जवळपास बारा ट्रॅव्हल शोज बीबीसी चॅनेलच्या माध्यमातून केले. ‘अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज’ ही त्यांची सर्वांत गाजलेली मालिका. कुठंही विमानाचा वापर न करता, शक्य तिथं पायी चालत, ट्रेनने, बसने, जहाजाने, काही ठिकाणी बलून राइड करून, तर बर्फात हसकी कुत्र्यांच्या मदतीने त्यांनी पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याचा हा थरारक प्रवास पूर्ण केला.

आजच्यासारख्या आधुनिक सोयी-सुविधा जशा की, जीपीएस इंटरनेट सहज उपलब्ध नसताना त्यांनी केलेला प्रवास अतिशय प्रेरणादायी होता. ‘डिस्कवरी’ वाहिनीवरच्या लोनली प्लॅनेट आणि ग्लोब ट्रेकर्स या कार्यक्रमांच्या माध्यमातून इयान राइट यांनी जवळपास शंभर देशांची सफर घडवली. विनोदी अभिनेते असल्याने इयानने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून, अतिशय बडबड्या स्वभावाने स्थानिक लोकांसोबत सहजगत्या मिसळत हा कार्यक्रम हाताळला आणि लोकांना आपल्या प्रेमात पाडलं. या दोघांच्या कार्यक्रमांच्या प्रचंड यशाने पुढे जाऊन फक्त पर्यटनाला वाहिलेले ट्रॅव्हल टीव्ही, टीएलसी असे अनेक चॅनेल्स निर्माण झाले.
रिक स्टिवज यांच्यावर तर एक वेगळं पुस्तक होईल इतकं विविध प्रकारचं पर्यटन त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं. त्यांनी केलेलं प्रचंड काम वर्तमानपत्रं, रेडिओ, टीव्ही शो, टॉक शो या सर्वच माध्यमांतून लोकांसमोर आलं. पर्यटनाचे राजकीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक असे विविध कंगोरे त्यांनी लोकांसमोर सादर केले. घरातील एखादा ज्येष्ठ सदस्य काळजीने सांगतो, तशाच एकदम प्रेमळ शैलीने त्यांनी पर्यटकांना अगदी ट्रीप प्लॅनिंग कशी करावी, बॅग कशी भरावी इथपासून ते परदेश प्रवास करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे, स्थानिक लोकांशी कसा संवाद साधावा, प्रवासाचं साधन कोणतं वापरावं, कुठे राहावं, कुठे खावं इथपर्यंत मौलिक सल्ले त्यांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून दिले.
सध्या तरी त्यांनी निवृत्ती घेतली असली, तरीसुद्धा त्यांचं सर्व काम हे त्यांनी वेबसाइटच्या माध्यमातून जगभरातील पर्यटकांना मोफत उपलब्ध करून दिलं आहे.
आजच्या आधुनिक काळातसुद्धा जगातील अनेक देश आहेत की, जे पर्यटकांसाठी ‘रीचेबल’ नाहीत. अतिशय सुंदर आणि अफाट सांस्कृतिक वारसा असलेले हे देश आहेत; परंतु तिथं असलेल्या अस्थिर राजकीय किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथं पर्यटकांना जाता येत नाही. अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये प्रवास करून मोठी जोखीम पत्करून लेविसन वूड यांनी अशा देशांच्या मोहिमा केल्या. अफगाणिस्तान, येमेन, सोमालिया, लेबनॉन आणि इस्राईलचा वादग्रस्त भाग, सीरिया, इराक, दक्षिण सुदान यांसारख्या अनेक देशांमध्ये ते फिरले, त्यांचं चित्रीकरण केलं, आलेल्या अनुभवांवर आधारित पुस्तकंसुद्धा लिहिली. वॉकिंग द नाईल मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी नाईल नदीच्या उगमापासून ते नाईल नदी समुद्राला जिथं जाऊन मिळते, तिथपर्यंतचा सात हजार किलोमीटर लांबीचा प्रवास चालत केला.
जगभरातील खाद्यसंस्कृती आपल्या ट्रॅव्हल्स शोच्या माध्यमातून ज्यांनी पर्यटकांच्या समोर आणली, ते अँथनी बोर्डन, अँड्रयू झिमर्न सर्वपरिचित आहेत. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून यूट्यूबच्या माध्यमातून जगभ्रमंती करत स्थानिक खाद्यसंस्कृती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न नव्या दमाच्या लोकांकडून होतो. मायग्रेशनलॉजी नावाने मार्क विन्स या भटक्याने शंभरपेक्षा जास्त देशांची भटकंती करत पर्यटकांनी त्या त्या देशात गेल्यावर नेमकं काय खायला हवं याचं जणू गाइडबुकच लिहिलं आहे. याची वेबसाइट आणि याचा यूट्यूब चॅनेल याद्वारे सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली गेली आहे.
नेमकी खाण्याची ठिकाणं, त्यांचे अचूक पत्ते आणि पदार्थांचे दर अशी बिनचूक माहिती त्याने पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. भारतातूनसुद्धा काही लोकांनी या क्षेत्रात मोलाची भर घातली. यामध्ये प्राधान्याने शिव्या नाथ हिचे ट्रॅव्हल ब्लॉग्ज आणि वरुण वगिष याचे ट्रॅव्हल व्ही लॉग यांचं नाव घेता येईल. पर्यटकांना मोफत सल्ला देणारा आणि मदत करणारा टुरिस्ट हेल्पलाइन नावाचा ग्रुप वरुण चालवतो आणि याचे आठ लाखांपेक्षा जास्त सदस्य आहेत. जगभरातील अनुभवी माहीतगार पर्यटक या माध्यमातून एकमेकांची मदत करतात.
या सर्वच लोकांनी पर्यटन क्षेत्रात अतिशय भरीव कामगिरी करून ठेवली आहे, त्यामुळे आता जगातील असा कोणता देश नाही, की ज्याची माहिती आज उपलब्ध नाही. आपण आपली पर्यटनाची स्टाइल ओळखून आपल्याला कशा पद्धतीने भटकायचंय, हे आपण ठरवायला हवं. दरवेळी प्रत्यक्ष पर्यटनाला बाहेर पडता येईल असं काही नाही, त्यामुळे या लोकांचं काम त्यांच्या पुस्तकांच्या किंवा ट्रॅव्हल शोजच्या माध्यमातून वाचून बघूनसुद्धा फिरण्याचं आत्मिक समाधान निश्चित मिळेल.
(लेखक जगभर भटकंती करणारे असून, साहसी पर्यटनावर त्यांचा भर आहे.)