
देवभूमी उत्तराखंड
- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com
पूर्वी उत्तरांचल आणि आता उत्तराखंड या नावाने प्रसिद्ध असलेले हे बृहत हिमालयाचा भाग असणारे राज्य चीन आणि नेपाळच्या सीमेला जोडून आहे. पंचकेदार आणि पंचकैलास मधील महत्त्वाची स्थळे, जीवनदायी गंगा नदीचा उगम, हिमालयातील चारी धाम तसेच देशातील चारधाम पैकी एक मुख्य धाम, जगातील सर्वांत उंच शिवमंदिर अशी अनेक महत्त्वाची तीर्थस्थळे या राज्यात असल्याने उत्तराखंडपेक्षा देवभूमी या नावानेच हे राज्य ओळखले जाते.
सध्या हिमालयातील चार धाम यात्रा सुरू आहे, गंगोत्री ,यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी ही चारी धाम आहेत. त्यात विशेषतः केदारनाथ कडे लोकांचा प्रचंड ओढा दिसून येतो. भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी वर्षातील केवळ सहा महिने ही मंदिरे खुली असतात. हिमालयांच्या मुख्य रांगांमध्ये ही मंदिरे असल्याने किमान दहा ते अकरा हजार फूट उंचीवर ही ठिकाणे आहेत त्यामुळे प्रचंड असा हिमवर्षाव हिवाळ्याच्या दिवसांमध्ये येथे होतो.
हिवाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे साधारणतः भाऊबिजेच्या आसपास या चारही मंदिरांचे दरवाजे बंद होतात आणि सहा महिन्यांनी अक्षयतृतीयेला पुन्हा हे दरवाजे उघडतात. यमुनोत्री हा यमुना नदीचा उगम आहे तर गंगोत्री हा गंगा नदीचा उगम आहे या उगम स्थळी ही मंदिरे बांधण्यात आली आहेत, केदारनाथ हे शंकराचे स्थान आहे तर बद्रीनाथ हे बद्रीनारायण म्हणजेच विष्णूचे स्थान आहे.
उत्तराखंड राज्याचे प्रामुख्याने दोन भाग पडतात एक म्हणजे गढवाल आणि दुसरा म्हणजे कुमाऊ . जवळपास सर्वच प्रमुख देवस्थाने ही गढवाल भागात आहे तर कुमाऊ हे पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या यात्रेनिमित्त लाखोंच्या संख्येने पर्यटक राज्यात येत आहेत पण अतिशय घाईगडबडीने तीन-चार दिवसातच केदारनाथ किंवा बद्रीनाथचे दर्शन घेऊन पुन्हा परतीचा प्रवास करत आहेत. स्वानुभवावरून मला असे वाटते की उत्तराखंडमध्ये कमीत कमी सात ते दहा दिवस तरी भटकंती करावी.

महाराष्ट्रातून विमानाने डेहराडून येथील जॉली ग्रांट एअरपोर्ट किंवा रेल्वे मार्गे हरिद्वार रेल्वे स्टेशन येथे पोहोचणे सहज शक्य आहे. दिल्लीमध्ये उतरूनसुद्धा बस अथवा रेल्वेने येथे पोहोचता येते. हरिद्वार, डेहराडून, ऋषिकेश, मसुरी ही चारही ठिकाणी एकमेकांपासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहेत. शक्यतो डेहराडून किंवा हरिद्वार मधूनच चारी धाम साठी सुरुवात करावी आणि परतीच्या प्रवासा वेळी आवर्जून ऋषिकेश आणि मसूरी या स्थळांना भेट द्यावी.
बंजी जंपिंग,रिव्हर राफ्टींग यासारख्या साहसी खेळांसाठी ऋषिकेश प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर ऋषिकेश हे जागतिक योग राजधानीचे शहरसुद्धा आहे. योग विद्येचे प्रशिक्षण देणारे अनेक आश्रम, विद्यानिकेतन इथं आहेत. अगदी सात दिवसांपासून ते दोन वर्षांपर्यंत प्रशिक्षण देणारे अनेक कोर्सेस येथे उपलब्ध आहेत. अध्यात्मामध्ये रुची असणारे परदेशी पर्यटक येथे मोठ्या सुट्ट्यांसाठी येतात.
अंतर अगदी कमी असून सुद्धा हिमालयाच्या अगदी उदरात ही स्थाने असल्यामुळे प्रवासासाठी लागणारा वेळ हा तुलनेने बराच जास्त आहे त्यामुळे स्वतःची गाडी असल्यास कोणत्याही वेळी आपण प्रवास सुरू करू शकता परंतु जर सरकारी बस सेवेवर अवलंबून असाल तर पहाटे पाचची बस हरिद्वार, डेहराडून किंवा ऋषिकेश या तिन्ही ठिकाणी उपलब्ध आहे . रुद्रप्रयागपर्यंतचा रस्ता केदारनाथ आणि बद्रीनाथ साठी एकच आहे. ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, गुप्तकाशी, सोनप्रयाग आणि गौरीकुंड असा केदारनाथ चा रस्ता आहे, आणि तिथून पुढे १७ किलोमीटरचा ट्रेक रूट आहे.
रुद्रप्रयागपासून दुसरा रस्ता कर्णप्रयाग, देवप्रयागमार्गे बद्रीनाथला जातो. कर्णप्रयाग येथील संगमावर असलेले कर्णाचे दुर्मिळ मंदिर आणि मूर्ती आवर्जून बघावी. बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या इतर तीन धामांना थेट मंदिराच्या जवळ पर्यंत वाहनाने जाणे योग्य रस्ता आहे.

अक्षयतृतीयेपासून पुढे दोन महिने यात्रा काळ असल्याने अतिशय प्रचंड गर्दी, अनेक किलोमीटरच्या गाड्यांच्या रांगा असतात त्यामुळे शक्यतो हे महिने टाळावे तसेच जून आणि जुलै हे पावसाळ्याचे महिने असल्यामुळे दरडी कोसळणे, रस्ते बंद होणे, यात्रा थांबवली जाणे यामुळे मोठी गैरसोय होण्याची शक्यता असते. ऑगस्ट आणि सप्टेंबर हा साधारणतः उत्तराखंड ला भेट देण्याचा योग्य काळ म्हणता येईल.
१९३१ मध्ये कामेट शिखराच्या मोहिमेदरम्यान हिमालयात फ्रँक स्मिद आणि एरिक शीप्टन या गिर्यारोहकांना हिमालयातील अशा एका भागाचा शोध लागला जिथे हजारो प्रकारच्या अत्यंत सुंदर आणि तितकेच दुर्मिळ फुले आणि वनस्पती यांचे विस्तीर्ण असे नैसर्गिक उद्यान होते. ''फुलो की घाटी'' किंवा ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ या नावाने हे ठिकाण ओळखले जाते ज्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त आहे.
बद्रीनाथच्या अलीकडे ६० किलोमीटर असलेल्या गोविंदघाट येथून घांगरिया मार्गे ट्रेक करत येथे पोहोचता येते, तेथे जवळच हेमकुंड साहेब हे शिखांचे पवित्र स्थळ आहे. शेजारील जोशीमठ गावापासून जवळच ऑली हे स्कीईंग या खेळासाठी जगप्रसिध्द असलेले ठिकाण आहे. केदारनाथ पासून जवळ असलेले परंतु पर्यटकांची गर्दी आणि गजबजाटापासून लांब असलेले पंचकेदार मधील एक स्थान म्हणजे मध्यमहेश्वर महादेव.
चौखंबा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरापर्यंत उखिमठ येथून दोन दिवसांचा ट्रेक करत येथे पोहोचता येते. याचप्रमाणे जगातील सर्वात उंच शिवमंदिर मानण्यात येणारे आणि पंचकेदार मधील एक तुंगनाथ मंदिर केदारनाथ ते बद्रीनाथ या मार्गावरील चोपता येथे आहे. याच भागात कस्तुरी मृगांचे अभयारण्य देखील आहे. येथे दोन दिवस मुक्काम केल्यास ही ठिकाणे बघून होतात.
गढवाल प्रमाणे कुमाऊँमध्ये प्रसिद्ध असलेली तीर्थस्थळे जरी नसली तरी प्रसिद्ध गिरिस्थाने आणि शिखरे येथे आहेत. गढवाल आणि कुमाऊँच्या अगदी मधोमध असलेले नंदादेवी शिखर हे संपूर्ण उत्तराखंड राज्याचे दैवत आहे. अतिशय मोठी अशी बारा वर्षातून एकदा नंदादेवीची यात्रा निघते, यामध्ये शेकडो गावे सहभाग घेतात. वाघ आणि बिबट्यांच्या जीवनशैलीचा विशेष अभ्यास असणारे प्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ उत्तराखंड राज्यात घालवला आणि नरभक्षक वाघ, बिबट्यांपासून इथल्या लोकांना भयमुक्त केलं.
रामनगर जवळील वाघांसाठी आरक्षित असलेल्या या अभयारण्याला जिम कॉर्बेट यांचे नाव दिलेले आहे. याच्याच उत्तरेला नैनिताल हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, नैनितालइतकं सुंदर परंतु फारसे प्रसिद्ध नसलेले सातताल हे ठिकाण येथून काही किलोमीटरवर आहे, नावाप्रमाणेच अतिशय सुंदर असे सात नैसर्गिक तलाव येथे आहेत. जगभरातील बर्ड वॉचर्स येथे पक्षी निरीक्षणासाठी येत असतात.
मुक्तेश्वर, अलमोडा, मुंसीयारी, कौसानी ही कुमाऊँ मधील आणखी काही प्रसिद्ध गिरीस्थाने आहेत. मुंसीयारी जवळ पंचचुली ही प्रसिद्ध हिमशिखरे आहेत. इथल्या पिठोरागढ जिल्ह्यामध्ये आदी कैलास,ओम पर्वत ही अतिशय पवित्र मानली जाणारी हिमशिखरे आहेत. हा सर्व भाग चीनच्या सीमेलगत असल्याने येथे भारतीय सेनेचा आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीस यांचा मोठा राबता असतो.
तसेच वरील हिमशिखरे पाहण्यासाठी इनर लाईन परमिट काढावे लागते, ते येथील जिल्ह्याच्या ठिकाणी मिळू शकते. येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे चीनमधील प्रवेश न करता भारतीय सीमेतूनच कैलास पर्वताचे दर्शन घेता येते. भारतसरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी असा लीपूलेख पास हा प्रकल्प चालू आहे. लीपूलेख जवळच कैलास व्ह्यू पॉईंट म्हणून जागा आहे तेथून कैलास पर्वताचे विहंगम दर्शन घडते.
उत्तराखंड राज्यामधील भौगोलिक स्थिती अतिशय आव्हानात्मक असल्याने अंतर्गत रेल्वे किंवा विमानांचे जाळे येथे नाही, परंतु दिवसातून ठराविक वेळेने बस सेवा व छोट्या टप्प्यांसाठी खाजगी शटल पुरेशा प्रमाणात आहेत. साधे भोळे साधे भोळे आतिथ्यशील लोक आणि अध्यात्म व निसर्गाची अद्भुत सांगड यामुळे उत्तराखंड राज्य आपले देवभूमी हे नाव सार्थ करते.
(लेखक जगभर भटकंती करत असतात आणि साहसी पर्यटनावर त्यांचा भर असतो.)