विस्मयकारी कथांचं जग (सम्राट फडणीस)

विस्मयकारी कथांचं जग (सम्राट फडणीस)

भारतीय वळणाच्या लोकप्रिय चित्रपट-मालिकांमध्ये सर्वसाधारण बाळबोधपणा आणि डोक्‍याला त्रास न होऊ देता ‘पैसा वसूल’ मनोरंजन असतंच असतं. ते पाहून पाहून डोकं जडावत असताना ‘ओव्हर द टॉप’ प्लॅटफॉर्ममुळं ॲमेझॉन प्राईमवरून ‘द मॅन इन द हाय कॅसल’सारख्या मालिका लाखो मोबाईलवर पोचल्या. त्यातून समोर येणारी कथानकं ही विज्ञान-तंत्रज्ञान मध्यवर्ती ठेवून बनलेली आहेत.

नॅथन जेम्स या अमेरिकी नौदलाच्या विनाशिकेचा कॅप्टन आहे टॉम शॅंडलर. ही विनाशिका आणि कॅप्टन शॅंडलर भेटतात ते टेहळणीचं मिशन संपवून घरी परतण्याच्या वाटेवर असताना. त्यांच्या विनाशिकेवर असणारी संशोधक डॉ. रॅचेल स्कॉट आणि तिचा सहाय्यक तोपर्यंत मामुली व्यक्ती असतात. अमेरिकेच्या वाटेवर असताना आर्क्‍टिक खंडावर परत जाण्याचा आदेश शॅंडलरला मिळतो आणि एक विज्ञानकथा जन्म घेते. पुढची पाच वर्षं समुद्रात नॅथन जेम्स विहार करत राहते. विषाणू (व्हायरस), पृथ्वीच्या अस्तित्वाचा प्रश्न, त्यासाठीची लढाई आणि संसर्गजन्य रोगांचा जैविक अस्त्र म्हणून होणारा वापर कॅप्टन शॅंडलरच्या रोजच्या जगण्यातली आव्हानं बनलीयत. त्याच्या अवतीभवतीचं विश्व बदलत जातंय...कॅप्टन शॅंडलर एकापाठोपाठ एक लढाई लढतोय...अमेरिकी टीव्ही चॅनेलवर पाच वर्षं ही लढाई ‘द लास्ट शिप’ या गाजलेल्या मालिकेत चाललीय. 

***

दुसऱ्या महायुद्धात मित्रपक्षांचा पराभव झालेला आहे. नाझी आणि जपान्यांनी जग जिंकलेलं आहे. अमेरिकेची वाटणी नाझींनी आणि जपान्यांनी करून घेतली आहे. वाटणीच्या सीमारेषेवरचा भाग दोन्ही राष्ट्रांनी स्वतंत्र ठेवलेला आहे. तिथं मोकळेपणा आहे आणि स्वैराचारही. हे झालं एक जग. त्याच वेळी दुसरंही एक जग आहे. ज्या जगातल्या दुसऱ्या महायुद्धात मित्रपक्ष जिंकलेले आहेत. स्वातंत्र्य आहे. स्वैराचार नाही. या दोन्ही जगांना जोडणारा धागा आहे डॉक्‍युमेंटरी फिल्म्स. हिटलरला या फिल्म्स हव्या आहेत. त्याचं जग सर्वांना कळू नये म्हणून. त्या स्वतंत्र जगावर हल्ला करायला तो सज्ज होतोय. त्यासाठी तंत्रज्ञान वापरतोय. एका जगातून दुसऱ्या जगात जाणारे-येणारे विशिष्ट लोक आहेत. त्या लोकांना ही दोन्ही जगं माहितीयत. हिटलरचा पराभव अशक्‍य आहे, असं मानणाऱ्या जगाला त्यांना सांगायचंय, की हिटलर हरू शकतो. त्यासाठी त्यांची लढाई सुरूय. ‘द मॅन इन द हाय कॅसल’च्या सर्व भागांमध्ये जिंकलेल्या नाझींविरोधात ही अभूतपूर्व लढाई सुरूय. 

***

अमेरिकेच्या किनारपट्टीवर अचानक एकामागून एक माणसं बेशुद्ध अवस्थेत सापडलीयत. त्या माणसांबद्दल कुणालाच काही माहिती नाही. कुठलं तरी जहाज फुटलंय की विमान कोसळलंय...? काहीच समजत नाहीय. त्या माणसांना नेमकं माहितीय की ती कुठं आलीयत. त्यांना अमेरिकेतच यायचं होतं. ती माणसं भविष्यकाळातली आहेत. आजपासून १८० वर्षं पुढचं त्यांचं विश्व आहे. मग का आलीयत ती मागं...? वैद्यकीय तंत्रज्ञानानं माणूस अधिकाधिक प्रभावी होत गेलाय. माणसांमधली सर्वश्रेष्ठ माणसं- ‘ॲपेक्‍स’ नावाची नवीनच जमात- तयार झालीयत १८० वर्षांनंतर. त्या जमातीला दया-माया, भाव-भावना नाहीत. ती जमात मानवी आहे की यांत्रिक आहे, समजेनासं झालंय. माणसांना गुलाम बनवतेय ॲपेक्‍स. त्यांच्या अत्याचाराला घाबरून माणसांनी वेळेचा काटा उलटा फिरवण्याचं तंत्रज्ञान शोधलंय. काटा उलटा फिरवून त्यांनी १८० वर्षं आधीच्या जगात प्रवेश केलाय. ज्यांनी ॲपेक्‍स बनवायला सुरुवात केली त्यांनाच संपवलं तर पुढच्या जगाला ॲपेक्‍सचा धोका कसा राहील...? या लोकांना विषाणूची लागण होतेय...तीही ॲपेक्‍सच्या जगात. या विषाणूवर ॲपेक्‍स हेच उत्तर आहे...ॲपेक्‍सचं जग जन्मण्याआधीच संपवायचं की कसं...? ‘द क्रॉसिंग’ या मालिकेचं हे कथासूत्र. 

***

जॅक रायन अमेरिकी संरक्षण खात्यातला डेस्क जॉब करतो; किंबहुना तसं दिसतं सुरवातीला. दहशतवाद्यांची बॅंक अकाउंट्‌स तपासत राहणं आणि संशयास्पद व्यवहारांवर देखरेख ठेवणं हे त्याचं वरकरणी काम. त्याला सुलेमानचा शोध लागतो. सुलेमानमधून बिन लादेन तयार होताना त्याला दिसतो. अमेरिकेच्या सगळ्या तपासयंत्रणांना सावध करण्यासाठी जॅक धडपड सुरू करतो. त्याची प्रेयसी डॉक्‍टर. तिला एबोलाच्या नव्याच विषाणूची लक्षणं काही रोग्यांमध्ये दिसतात. हा विषाणू आला कसा याचा शोध काही लागता लागत नाही. जॅकची प्रतिमा कारकुनाची. एकमेकांच्या कामाची ओळख व्हायला सुरवात होते आणि सुलेमान हा बिन लादेनची पुढची आवृत्ती असल्याची जाणीव जॅकला होते. एबोलाचे विषाणू पसरवून पाश्‍चिमात्य जगाचा, अमेरिकेचा विध्वंस करण्याचा त्याचा कट स्पष्ट समजायला लागतो. जॅक असतो प्रत्यक्ष युद्धात लढलेला सीआयएचा अधिकारी. आता तो मागं हटणार नाही. एबोला एकदा अमेरिकेत शिरला तर संपलंच सगळं. सीरियातल्या घरावर छापा टाकूनही सुलेमान थेट अमेरिकेत पोचतोय. एबोला विषाणूसह...‘जॅक रायन’ या वेब सिरीजमधला पहिला सीझन हा असा डोकं भंडावून सोडतो...

***

खिळवून ठेवणारी मूळ कथा, त्यात गुंतलेल्या अनेक लघुकथा, प्रत्येक भागामध्ये उलगडत जाणारा कथेचा नवा पडदा आणि पडद्यावर उगवणारं नवं जग हा या चारही मालिकांचा समान धागा. विस्मयकारी विज्ञान-तंत्रज्ञानाला आधार बनवून भविष्याकडं बघण्याची अचाट कल्पनाशक्ती पडद्यावर साकारणं हा या साऱ्या मालिकांचा सर्वात प्रमुख घटक. पाश्‍चिमात्य लेखकांनी वापरलेली कल्पनाशक्ती नजीकच्या काळात वास्तव बनल्याची अनेक उदाहरणं आहेत. ज्यूल्स वर्न यांनी एकोणिसाव्या शतकात केलेल्या कल्पनांवर विसाव्या-एकविसाव्या शतकात चित्रपट निघाले. त्यांनी मांडलेली चंद्रावर उतरण्याची कल्पना प्रत्यक्षातही आली. एच. जी. वेल्स यांनी ‘द वर्ल्ड सेट फ्री’मध्ये अणुबॉम्बची कल्पना मांडलेली. आर्थर सी. क्‍लार्क यांनी उपग्रह-दळणवळणाची कल्पना केलेली. ‘स्टार ट्रेक’मध्ये दिसलेली उपकरणं टॅब्लेटमधून वास्तव बनली. लेखकांनी मांडलेलं, चित्रपटांमधून दिसलेलं विज्ञान अकल्पित असू शकतं; मात्र ते अशक्‍य नसतं. त्यामुळं ‘द लास्ट शिप’ ते ‘जॅक रायन’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसणारं विज्ञान विलक्षण अस्वस्थ करणारं ठरतं. 

भारतीय वळणाच्या लोकप्रिय चित्रपट-मालिकांमध्ये सर्वसाधारण बाळबोधपणा आणि डोक्‍याला त्रास न होऊ देता ‘पैसा वसूल’ मनोरंजन असतंच असतं. ते पाहून पाहून डोकं जडावत असताना ‘ओव्हर द टॉप’ प्लॅटफॉर्ममुळं ॲमेझॉन प्राईमवरून ‘द मॅन इन द हाय कॅसल’सारख्या मालिका लाखो मोबाईलवर पोचल्या. त्यातून समोर येणारी कथानकं ही अशी, विज्ञान-तंत्रज्ञानाला मध्यवर्ती ठेवून बनलेली आहेत. प्रत्येक भागात गूढ जागतं ठेवणं हे खरं कौशल्याचं काम. मोबाईलच्या डिव्हाईसवरून या मालिका सर्वाधिक पाहिल्या जातात. परिणामी, जे गूढ पहिल्या भागात निर्माण केलंय, ते पुढं पुढं वाढवत नेणं आणि तरीही त्यामध्ये सूत्र राखणं यात दिग्दर्शनाची कमाल आहे. वर उल्लेख केलेल्या मालिकांमध्ये ती कमाल प्रत्येक भागाच्या सुरवातीला आणि शेवटी प्रत्ययाला येतेय. 

‘जॅक रायन’ किंवा ‘द मॅन...’ या मालिकाच मुळी ॲमेझॉन प्राईमसाठी बनवलेल्या. मोबाईल-प्रेक्षक मालिका बनवतानाच गृहीत धरलेला. मोबाईलच्या पडद्याला झेपेल; तरीही विशाल कथानक सांभाळलं जाईल, अशी मालिकांची रचना. एखादं घटकाची परिणामकारकता वारंवार ठसवण्यासाठी बर्डस आय व्ह्यू आणि लॅंडस्केप अँगल्स किती प्रभावी ठरतात, हे या मालिकांमधून दिसतं. ‘द मॅन...’मधली नाझींची अंगावर येणारी इमारत किंवा ‘जॅक रायन’मधलं सुलेमानचं सीरियातलं घर ही काही उदाहरणं. ‘द लास्ट शीप’मधला कॅप्टन शॅंडलर काही वेळा कंटाळवाणा होऊन बसतो हे मान्य. त्याच वेळी त्यानं उभी केलेली दणकट व्यक्तिरेखा सजीव होऊन बसते, हेही खरं. त्याचे संवाद, देहबोली यामधलं पाच वर्षांचं सातत्य एकसलग मालिका पाहणाऱ्यांच्या जगण्याचा भाग होऊन बसेल, इतकी ही भूमिका विस्तृत आहे. 

‘जॅक रायन’मध्ये मांडलेलं एबोलाचं कथानक अतर्क्‍य नाही. सुलेमान एकाच वेळी दहशतवादी आहे आणि लाघवी बापही. दहशतवादी म्हणून बिनडोक, गोळ्या झाडत सुटणारा तो नाही. डोकं वापरून मुळापासून व्यवस्था संपवण्यासाठी कट करणारा आहे. ‘द क्रॉसिंग’मध्ये कल्पनाशक्ती आणि वैद्यकीय संशोधन आहे. सुसह्य, आरामदायी जगण्यासाठीचं संशोधन माणसांपासून ‘ॲपेक्‍स’पर्यंतचा प्रवास करू शकेल का...? अगदीच अशक्‍य नाही...आजची नाही, तर दोनशे वर्षांनंतरची गोष्ट बोलतोय आपण. अशा कथानकांमध्ये हिंसाचार प्रचंड आहे. कथेचा भाग म्हणून म्हणा किंवा हॉलिवूडचा प्रभाव म्हणून म्हणा. हा हिंसाचार अंगावर येतो जरूर. तो हिंदीतल्याही ‘ओटीटी’ मालिकांमध्ये उतरतोय...त्याबद्दल बोलू नंतर कधीतरी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com