पडद्याआडची माणसं  (मंदार कुलकर्णी)

मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com
रविवार, 4 डिसेंबर 2016

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्यात नुकताच (२० ते २८ नोव्हेंबर) झाला. आतापर्यंत कधीही न बघितलेल्या, कधीही न भेटलेल्या अनोळखी माणसांची एक दुनियाच या महोत्सवात बघायला मिळते. ही माणसं पडदा भेदून तुमच्या हृदयापर्यंत पोचतात. ती तुम्हाला त्रास देतात, रडवतात, हसवतात, नवं काही सांगतात, तुमच्याच किती तरी जुन्या आठवणींचा गोफ तुमच्याभोवती विणायला लागतात. शब्दांपलीकडचा हा अनुभव ‘इफ्फी’मध्ये दर वर्षी मिळतो आणि म्हणूनच दर वर्षी नोव्हेंबर महिना उजाडला, की सच्चा चित्रपटरसिकाला या इफ्फीचे वेध लागतात.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्यात नुकताच (२० ते २८ नोव्हेंबर) झाला. आतापर्यंत कधीही न बघितलेल्या, कधीही न भेटलेल्या अनोळखी माणसांची एक दुनियाच या महोत्सवात बघायला मिळते. ही माणसं पडदा भेदून तुमच्या हृदयापर्यंत पोचतात. ती तुम्हाला त्रास देतात, रडवतात, हसवतात, नवं काही सांगतात, तुमच्याच किती तरी जुन्या आठवणींचा गोफ तुमच्याभोवती विणायला लागतात. शब्दांपलीकडचा हा अनुभव ‘इफ्फी’मध्ये दर वर्षी मिळतो आणि म्हणूनच दर वर्षी नोव्हेंबर महिना उजाडला, की सच्चा चित्रपटरसिकाला या इफ्फीचे वेध लागतात.

डोळे दीपवून टाकणारा लेझर शो, सगळीकडं सुरू असलेला दिव्यांचा झगमगाट, ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ची दुनिया दाखवणारे स्टॉल्स, रेड कार्पेट या सगळ्या गोष्टी हळूहळू मागं पडतात. ‘इज धिस टिकेट लाइन ऑर रश लाइन?’ वगैरेच्या विचारणा, प्रवेशद्वारावरचे किरकोळ वाद हळूहळू संपत तेही मागं राहतात. आपली पावलं चालतच राहतात. चित्रपटगृहात प्रवेश होतो. निवेदन, पाहुण्यांचं मनोगत वगैरे औपचारिक गोष्टी पुऱ्या होतात. हळूहळू दिवे मालवत जातात. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) सुवर्णमयूर पडद्यावर नाचायला लागतो. ‘क्वाएट प्लीज’, ‘बाहर जाकर बोलिये’ वगैरे प्रतिक्रियाही हळूहळू बंद होतात. चित्रपटगृहात अंधार होतो आणि तीव्र शांतता पसरते. पडदा हळूहळू उजळायला लागतो आणि मग त्याच्या मागची दुनियाही आपल्यासमोर प्रकट व्हायला लागते. आतापर्यंत कधीही न बघितलेल्या, कधीही न भेटलेल्या अनोळखी माणसांची ही दुनिया. ही दुनिया हळूहळू तुमच्या मनाचा ठाव घ्यायला लागते आणि ही माणसं पडदा भेदून तुमच्या हृदयापर्यंत पोचतात. ती तुम्हाला त्रास देतात, रडवतात, हसवतात, नवं काही सांगतात, तुमच्याच किती तरी जुन्या आठवणींचा गोफ तुमच्याभोवती विणायला लागतात. दोन-अडीच तास फक्त ती माणसं आणि तुम्ही. बाकी कुणीच नाही. शब्दांपलीकडचा हा अनुभव ‘इफ्फी’मध्ये दर वर्षी मिळतो आणि म्हणूनच दर वर्षी नोव्हेंबर महिना उजाडला, की सच्च्या चित्रपटरसिकाला या ‘इफ्फी’चे वेध लागायला लागतात. 

यंदाही ‘इफ्फी’ वेगळा नव्हता. ‘ॲकॉर्डिंग टू हर’मधली मुलाच्या संगोपनासाठी पियानोवादन सोडणारी आणि त्यामुळं स्वतःच तयार केलेल्या चक्रव्यूहात अडकलेली व्हेरॉनिका, तुर्कस्तानमधल्या युद्धजन्य स्थितीत स्वतःचं प्रेम शोधणारा राऊफ, मुलाच्या मारेकऱ्याला स्वतःच संपवायला निघालेला आणि त्याचं संपूर्ण चित्रीकरण करण्याचा अजब प्रस्ताव देणारा ‘रॅथ’मधला सीझर, स्वतःच्या भूतकाळामुळं स्वप्नांच्या जंजाळात सापडलेला ‘अलोन’ चित्रपटातला सू-मिन, सुधारगृहाच्या खिडकीपलीकडून प्रेम शोधणारी ‘फिओर’ चित्रपटातली डाफने, सलग २४ तास एका कैद्याच्या सुरक्षेत व्यग्र असणारा ‘किंग्ज शिफ्ट’मधला लात्वियन पोलिस, कुटुंबव्यवस्थेच्या साचेबंदपणातून कवितेच्या मुक्तपणाचा शोध घेऊ पाहणारा ‘एंडलेस पोएट्री’मधला आलेजांद्रो अशी किती तरी माणसं या वर्षी कडकडून भेटली. या प्रत्येकाचा देश, वेश, भाषा, वातावरण, कौटुंबिक विश्‍व, भावना या सगळ्या गोष्टी अगदी वेगवेगळ्या होत्या; पण तरीही या प्रत्येकानं प्रत्येक संवेदनशील रसिकाच्या मनाच्या तारा छेडल्या आणि स्वतःच्या विश्‍वात अक्षरशः खेचून घेतलं. सर्जनशील कलाकार कल्पनांची किती पराकोटीची उधळण करू शकतात किंवा उलटपक्षी त्यांचा किमान वापर करूनसुद्धा तितकाच परिणाम साधू शकतात, हे दाखवणारी ही जागतिक चित्रपटांची दुनिया विलक्षण होती. 
 

समकालीनतेचा धागा     
इफ्फीचं या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे समकालीन परिस्थितीचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलं आणि जगभरातल्या स्थितींमध्ये समान धागा कसा आहे हे त्यात दिसलं. एकीकडं नव्यानं तयार होणारा राष्ट्रवाद, विशिष्ट व्यक्तीभोवती केंद्रित होत असलेली व्यवस्था, दुभंगत चाललेली कुटुंबव्यवस्था, माणसाचं तुटलेपण, वाढत चाललेली धर्मांधता असे किती तरी मुद्दे वेगवेगळ्या चित्रपटांनी मांडले आणि जगभरातून आलेल्या प्रेक्षकांना त्यांच्याशी सहजपणे रिलेट करता आलं. साधारण काही वर्षांपूर्वी युद्धपट, दोन देशांमधला तणाव अशा गोष्टी दिग्दर्शक मांडायचे. नंतर मानवी नाती उलगडणाऱ्या चित्रपटांनी वर्चस्व गाजवलं आणि आता पुन्हा त्या त्या देशांमधल्या बदलत्या स्थितीचं चित्रण दिग्दर्शक करायला लागले आहेत. काही वेळा स्वतःच्याच देशातल्या लोकांचा विरोध झुगारूनही हे दिग्दर्शक ठामपणे काही तरी सांगू पाहत आहेत आणि त्यांचं हे सांगणं फक्त स्थानिक संदर्भांपुरतं राहत नाही, तर जगभरातल्या प्रत्येकाला त्याची बीजं कुठं कुठं दिसत आहेत, असं या वेळी स्पष्टपणे दिसलं. 

स्टॅलिनच्या राजवटीत व्लादिस्लाव्ह या चित्रकाराच्या कलात्मकतेच्या होणाऱ्या घुसमटीची ‘आफ्टरइमेज’मधली आपल्याकडच्या ‘पुरस्कारवापसी’ आणि ‘असहिष्णुता’ वगैरे मुद्द्यांशी जवळीक साधणारी होती. ‘स्टुडंट’ या चित्रपटात धर्मग्रंथातल्या प्रत्येक वाक्‍याचे अंधपणे अर्थ लावून सगळ्यांना वेठीला धरणारा व्हेनियामिन आपल्यालाही किती तरी प्रकारच्या बातम्यांतून रोज भेटत असतोच. ‘डेथ ऑफ साराजेव्हो’ या चित्रपटात युरोपातलं तुटलेपण दाखवलं जात असतानाच ‘ब्रेक्‍झिट’ची आणि याच आठवड्यात होऊ घातलेल्या इटलीतल्या सार्वमताची आठवण होत होती. ‘राऊफ’ चित्रपटातले दहशतवादी स्वतःला ‘स्वातंत्र्ययोद्धे’ समजत असताना आपल्याकडच्या काश्‍मीरपासून सीरियापर्यंतच्या लोकांमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतंच. ‘द कॉन्स्टिट्युशन’ चित्रपटात क्रोएशिया-सर्बिया भागातल्या नागरिकांचा एकमेकांविषयी असलेला तिरस्कार पुन्हा आपल्या भारत-पाकिस्तानमधल्या नागरिकांच्या भावनांचीच आठवण करून देत होता. त्यामुळं ‘दुनिया गोल है’ या उक्तीची खऱ्या अर्थानं आठवण येत राहिली.

कमी होत चाललेलं ‘सेलिब्रिटी स्टेटस’
‘इफ्फीचं सेलिब्रिटी स्टेटस आता कमी होत आहे’, ‘बॉलिवूडचे चित्रपट प्रीमिअरसाठी येत नाहीत’ वगैरे तक्रारींमध्ये तथ्य नाही असं नाही; पण ज्या गोष्टीसाठी मुळात हा महोत्सव असतो, त्या चित्रपटांचा दर्जा निश्‍चितपणे चांगला होत चालला आहे आणि चित्रपटरसिकाची नजर त्यामुळं तयार होत आहे, हे स्पष्टपणेच नोंदवायला हवं. ‘बाहुबली’, ‘एअरलिफ्ट’, ‘सैराट’सारख्या चित्रपटांना तोबा गर्दी होत असताना ‘आय डॅनिअल ब्लेक’सारखा चित्रपटही तितकीच गर्दी मिळवत होता आणि सोहा अली खानबरोबर ‘सेल्फी’ काढायला गर्दी होत असताना ‘मास्टरक्‍लास’मध्ये ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ची बदलत जाणारी दुनियाही जाणून घेणाऱ्यांची संख्या तितकीच होती. त्यामुळं ‘सेलिब्रिटी स्टेटस’ कमी झालं तरी काही बिघडत नाही, असंही मानणारा एक वर्ग आहेच. चित्रपटाकडं एक ध्यास म्हणून बघणारा एक खूप मोठा वर्ग आहे आणि तो ‘इफ्फी’ला कमालीच्या निष्ठेनं हजेरी लावतो आणि खरं तर ‘इफ्फी’च्या दृष्टीनं तोच ‘सेलिब्रिटी’ आहे. 
 

प्रयोगांची उधळण
यंदा ‘इफ्फी’मध्ये खूप वेगळ्या प्रकारचे प्रयोग दिसले. अब्बास किअरोस्तामी या दिग्दर्शकाच्या चित्रपटांचा एक वेगळा विभाग होता. त्यात ‘शिरीन’ या चित्रपटाचा विशेष उल्लेख करावा लागेल. शिरीन-फरहादची लोकप्रिय कहाणी या चित्रपटात फक्त ‘ऐकू’ येत होती आणि संपूर्ण चित्रपटभर त्या कहाणीवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या अभिनेत्री दिसत होत्या. त्यांच्या फक्त चेहऱ्यांतून चित्रपट ‘दाखवण्याची’ कल्पनाच अफलातून होती. ‘टेक मी होम’ हा त्यांचाच दुसरा एक लघुपट होता. त्यात एक फुटबॉल पायरीवरून घरंगळत जातो आणि नंतर पायऱ्यांचे किती तरी प्रकार पार करत तो प्रेक्षकालाही त्याच्याबरोबर प्रवास करायला लावतो. त्यातली एकेक फ्रेम थक्क करायला लावणारी होती. कोरियातल्या चित्रपटांचाही एक खास असा साचा आहे. ‘अलोन’ चित्रपटात स्वप्नातून उलगडत जाणारं स्वप्न असा एक गुंगवून टाकणारा अनुभव होता. त्या स्वप्नांमध्ये नायकाला स्वतःचीच वेगवेगळी रूपं दिसतात आणि ही कहाणी नक्की कोणत्या रूपाची असा अर्थ आपण शेवटपर्यंत काढत राहतो. ‘एंडलेस पोएट्री’मध्ये रंगांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला होता, तर ‘रॅथ’ चित्रपटात सुरवातीपासून शेवटपर्यंत कुणी तरी चित्रीकरण करत आहे, अशा प्रकारची वेगळी मांडणी करण्यात आली होती. ‘द लाँग नाइट ऑफ फ्रान्सिस्को सॅंक्‍टिस’ या चित्रपटात रूढार्थानं काहीच घडत नाही; पण तरीही अनेक गोष्टी प्रेक्षकांना जाणवत राहतात, हे त्याचं वैशिष्ट्य. ‘कॅलिडोस्कोप’सारखे वेगवेगळे तुकडे जोडत एकच कहाणी दाखवता येते, असंही खूप चित्रपटांत दिसलं. अनेक चित्रपटांत दिग्दर्शकांनी अनेक प्रश्‍नांची थेट उत्तरं देण्याचं टाळलं. काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवण्याच्या प्रयोगांमुळं किती तरी प्रकारचे अर्थ तयार होऊ शकतात, हेही या महोत्सवातून दिसलं.

अफलातून जग
इफ्फीचं जग अतिशय अफलातून असतं. त्यात पडद्यापलीकडं माणसं असतात, तशी पडद्यासमोरही किती तरी प्रकारची माणसं असतात. चुकलेली, हुकलेली, हरवलेली, नादात असलेली, व्यक्त होणारी, अव्यक्त अशी ही माणसं. सुरवातीला गडबड-गोंधळ होत हळूहळू या सगळ्यांचा मेळा शिस्तबद्ध होत जातो. चित्रपट सुरू होतो, तेव्हा त्यातल्या व्यक्तिरेखांच्या मुखवट्याच्या आत लपलेली माणसं पडदा भेदून चित्रपटगृहांतल्या या ‘माणसां’ना भेटतात. थोड्याच वेळात चित्रपटगृहातल्या माणसाचाही मुखवटा गळून पडतो आणि त्यामुळं या दोन ‘माणसां’च्या भेटीचा हा सोहळा खरंच विलक्षण ठरतो. कारण, चित्रपटगृहात एका व्यक्तीला पडद्यापलीकडच्या माणसाचं जे रूप दिसतं, ते त्याच्या शेजारच्याला दिसतंच असं नाही. प्रत्येकाच्या मनात ही सगळी रूपं तयार होत असतात. खरोखरच शब्दांपलीकडचाच हा सगळा अनुभव असतो. चित्रपट संपतो...रसिक अंधारातल्या जगातून हळूहळू बाहेर येतात. स्वतःचे जुने मुखवटे चढवतात. दिवे उजळतात. पुन्हा लखलखाट सुरू होतो... पण अनेकदा जाणवतं, की बाहेरच्या या लखलखाटापेक्षा मनच जास्त उजळून गेलंय!

Web Title: mandar kulkarni article