अमिट चित्रखुणा (मंदार कुलकर्णी)

अमिट चित्रखुणा (मंदार कुलकर्णी)

‘फ्युचर ऑफ सिनेमा’ म्हणजे चित्रपटांचं भविष्य असा यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) ‘फोकस’ होता. वर्तमानातले चित्रपट दाखवताना भविष्यात या चित्रपटांची दिशा काय राहील, याची चुणूक यंदा इफ्फीतल्या चित्रपटांनी दाखवून दिली. जगभरातले चित्रपट जास्तीत जास्त ‘पर्सनल’ होत आहेत आणि त्याचमुळं ते जास्तीत जास्त ‘युनिव्हर्सल’ होत आहेत. पूर्वी दिग्दर्शक ठोस भूमिका घेतानाच ठोस गोष्टही मांडायचे. प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना समजेल अशी असायची. मात्र, आता रिकाम्या जागा ‘भरण्या’पेक्षा रिकाम्या जागा ‘ठेवण्या’कडं लेखक-दिग्दर्शकांचा कल वाढतो आहे आणि तो सुखद आहे. इफ्फीमधल्या यंदाच्या प्रवाहांवर एक नजर.

ब्रिटनमध्ये आरोग्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल जेनेटनं एक पार्टी आयोजित केली आहे. केवळ जवळच्या मित्र-मैत्रिणींसाठी. या पार्टीत अचानक तिचा पती बिल एक घोषणा करतो. त्याला कर्करोग झाला आहे आणि त्याच्यापाशी आता काहीच दिवस आहेत. तो आणखी एक घोषणा करतो. राहिलेले दिवस त्याला एका दुसऱ्याच महिलेबरोबर घालवायचे आहेत. या घटनांना साक्षीदार आहेत खास ‘न्यूज’ असलेल्या दोन मैत्रिणींची एक जोडी, त्या महिलेचा अस्वस्थ पती, आणखी एक आगाऊ मैत्रीण आणि तिचा संयमी पती. एकीकडं पार्टीची तयारी सुरू आहे आणि त्याच वेळी एकेक धक्के बसत जातात. या सगळ्याच पात्रांची मनं एकेका मिनिटागणिक अक्षरशः पडदा भेदून प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोचत जातात. एका धक्कादायक शेवटानं ही पार्टी संपते...पण तिचे धागेदोरे प्रेक्षकांच्या मनात कायमच रुंजी घालत राहतील याची खात्री करून!

...आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) भरपूर प्रतिसाद मिळवलेल्या ‘पार्टी’ या चित्रपटाची ही कहाणी. केवळ हाच चित्रपट कशाला, ‘पोमेग्रेनेट ऑर्चर्ड’, ‘बीट्‌स पर मिनिट’, ‘अ मॅन ऑफ इंटिग्रिटी’, ‘लव्हलेस’, ‘द स्क्वेअर’, ‘मॅरिओनेट’, ‘रेसर अँड द जेलबर्ड’, ‘द मदर’ अशा अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांना घुसळून टाकलं. या चित्रपटांतल्या पात्रांच्या कहाण्या फार काही ग्रेट होत्या अशातला भाग नाही; पण विलक्षण सच्चेपणानं ही पात्रं कहाण्या सांगत राहिली आणि स्वतःच्या कहाण्यांमध्ये प्रेक्षकांना ओढत राहिली. ‘मेरिओनेट’मधली सिओ-रिन, ‘इंटिग्रिटी’मधला रेझा, ‘शेल्टर’मधली मोना, ‘रिडाऊटेबल’मधला गोदार्द, ‘नो बेड ऑफ रोझेस’मधला जावेद अशी किती तरी पात्रं पडद्याच्या सीमा ओलांडून प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करत राहिली. भाव-भावनांचं नाट्य पडद्यावर रंगत असतानाच प्रेक्षकांच्या मनामध्येही प्रतिमांचा, अर्थांचा खेळ रंगत होता आणि हेच यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य.

‘फ्युचर ऑफ सिनेमा’ म्हणजे चित्रपटांचं भविष्य असा यंदाच्या इफ्फीचा ‘फोकस’ होता. वर्तमानातले चित्रपट दाखवता दाखवता भविष्यात या चित्रपटांची दिशा काय राहील, याची चुणूक इफ्फीतल्या चित्रपटांनी यंदा दाखवून दिली आणि त्यामुळंच यंदाचा इफ्फी वेगळा ठरला. अमेरिकेपासून पोलंडपर्यंत आणि हिंदीपासून मालवणीपर्यंत किमान पावणेदोनशे चित्रपट दाखवत असताना जगभरातल्या चित्रपटांच्या प्रवासाची दिशा इफ्फीनं अधोरेखित केली. इफ्फीतले सगळे चित्रपट कुणालाच बघणं शक्‍य होत नाही; मात्र शक्‍य तितके जास्तीत जास्त चित्रपट बघून त्यांचा लघुत्तम सामायिक विभाजक (लसावि) काढता येतो का, हेही बघणं खूप रंजक असतं. यंदा अनेक ठोस ‘लसावि’ काढता आले.

सात-आठ वर्षांपूर्वीपर्यंत बहुतेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत महायुद्धं, युद्धं, वांशिक-धार्मिक संघर्ष असे विषय खूपदा यायचे. विशेषतः समूहातल्या एकाची किंवा काहींची गोष्ट सांगण्यात चित्रकर्मींना जास्त रस आहे असं जाणवायचं. चित्रकर्मी एक भूमिका, विचार घेऊन चित्रपटाची मांडणी करायचे. मात्र, विशेषतः गेल्या पाच-सहा वर्षांत चित्रपटांतले विषय, कथा, पात्रं यांच्यात ‘ट्रान्झिशन’ होत आहे असं जाणवतंय. जगभरातले चित्रपट जास्तीत जास्त ‘पर्सनल’ होत आहेत आणि त्याचमुळं ते जास्तीत जास्त ‘युनिव्हर्सल’ही होत आहेत. समूहाच्या गोष्टीकडून समूहात नसलेल्यांच्या गोष्टीकडं हा प्रवास सुरू आहे. गंमत म्हणजे समूहात नसलेल्यांच्या या गोष्टींमुळं उलट हा चित्रपट जास्तीत जास्त समूहांना जास्त जवळचा वाटायला लागलाय हे महत्त्वाचं.

आणखी एक विलक्षण बदल जाणवतो आहे व तो म्हणजे पूर्वी दिग्दर्शक ठोस भूमिका घेतानाच ठोस गोष्टही मांडायचे. गोष्टीचा शेवटही ठोस असायचा. प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना समजेल अशी असायची. मात्र, आता रिकाम्या जागा ‘भरण्या’पेक्षा रिकाम्या जागा ‘ठेवण्या’कडं लेखक-दिग्दर्शकांचा कल वाढतो आहे आणि तो सुखद आहे. साचेबद्ध प्रेक्षकांना कदाचित ते पचणार नाही; पण हळूहळू तोही सरावेल. रिकाम्या जागा ठेवण्यातून अर्थांच्या अनेक शक्‍यता चित्रकर्मी तयार करत जातात. ‘द मदर’सारखा चित्रपट एकीकडं एका जोडप्याची कहाणी सांगतो आणि त्याच वेळी ‘मदर अर्थ’ची कहाणी मांडतो. ‘लव्हलेस’मध्ये विभक्त झालेल्या आणि नवीन जोडीदार मिळवलेल्या एका जोडप्याच्या हरवलेल्या मुलाची कहाणी सांगताना दिग्दर्शक त्या मुलाचा कोणताही ‘क्‍लू’ देत नाही आणि त्याच वेळी कुटुंबातल्या दुराव्यावर भाष्य करत जातो. ‘केकमेकर’मध्ये मित्राच्या अपघातामुळं त्याच्या कुटुंबात शिरलेल्या नायकाची गोष्ट सांगताना दिग्दर्शक त्या नायकाचा हेतू कुठंही सांगत नाही; पण तरीही प्रेमाचं एक वेगळंच रूप दाखवून जातो. ‘द ग्रेट बुद्धा’मध्ये काही पात्रांचं पुढं काय झालं हे दिग्दर्शक ठोसपणे सांगत नाही; मात्र त्यातून अनेक प्रश्‍न तो प्रेक्षकांच्या मनात उभे करत जातो. हे अर्थ शोधण्याची मजाच काही और असते. ती यंदा मिळाली.
अनेक चित्रपटांतल्या पात्रांना नावं नव्हती, धर्म नव्हता, प्रदेश नव्हते; किंबहुना त्यातून काही सूचित करण्याचं दिग्दर्शकांना टाळायचं होतं. मात्र, काहीही सूचित न करता प्रेक्षकांना बरोबर ते कळत होतं. लेखक-दिग्दर्शक प्रगल्भपणे प्रेक्षकांनाही प्रगल्भ व्हायला सूचित करत आहेत, हे यंदा अगदी ठळकपणे जाणवलं आणि त्यामुळंच उद्याच्या चित्रपटांबाबतची उत्सुकता आणखी वाढली. अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक तरुण, पहिल्यांदा-दुसऱ्यांदाच चित्रपट करणारे होते. त्यांच्यावर भूतकाळाचं ओझं नव्हतं. त्यांनी महायुद्धं, युद्धं, वांशिक संघर्ष अनुभवलेले नाहीत. त्यामुळंच त्यांना या माध्यमाकडं लख्खपणे बघावंसं वाटतंय, हेही महत्त्वाचं होतं. जागतिकीकरणामुळं सगळं जग जवळ आलंय, तशा फक्त एका समूहाच्या समस्या मांडण्यापेक्षा समूहसूचक नसलेल्या समस्या मांडणं जास्त रंजक होतंय, असं चित्रकर्मीना वाटतंय का, असाही विचार करायला लावणारा यंदाचा इफ्फी होता. अर्थात समूहाच्या गोष्टी नव्हत्या असं नाही; पण त्यांच्याकडंही बघताना दुर्बिण लावून आणि जास्तीत जास्त नेमक्‍या गोष्टी बघण्याकडं चित्रकर्मींना जास्त रस असल्याचं जाणवतंय.
आणखी एक खूप चांगली गोष्ट यंदाच्या इफ्फीमध्ये जाणवली, ती म्हणजे तंत्राचं अवडंबर माजवण्यात किंवा त्याचा उगाच खेळ मांडण्यात चित्रकर्मींना रस नाही. अत्याधुनिक तंत्र ते नक्की वापरतात; मात्र ते त्यांच्या आशयाला पूरक म्हणून. गोष्ट सांगण्याचं तंत्रही सुरवात, मध्य आणि शेवट असं अनेकांना नको आहे. एकेक तुकडे मांडायचे आणि मग हळूहळू ते जोडायचे याकडं अनेकांचा कल वाढतो आहे. ठोस, नेमक्‍या शेवटापेक्षा अमूर्त शेवट असणारे चित्रपट अनेक होते. त्या अमूर्ततेचा प्रभाव मनावर जास्त होता. मनोव्यापार, लैंगिक हिंसाचार, तंत्रज्ञान आणि खुलेपणामुळं पुढच्या पिढीवर होणारे परिणाम, लिंगभावनिरपेक्षता अशा अगदी समकालीन समस्या यंदा इफ्फीमध्ये जाणवल्या. ‘बीट्‌स पर मिनट’मधल्या समलैंगिकांच्या समस्या, ‘एंजल्स वेअर व्हाइट’मध्ये अतीव स्वप्नरंजनातून लहान मुलींवर होणारे परिणाम, ‘स्कॅफोल्डिंग’मधल्या चाळिशीतल्या प्राध्यापकाचं नैराश्‍य, ‘पोमेग्रेनेट आर्चर्ड’मधली गाबिलची लालसा, ‘रेसर अँड द जेलबर्ड’मधली गुन्हेगारी असे सगळे विषय समकालीन होते आणि त्यामुळंच ते जास्त परिणामकारक ठरले.

एकूणच, भूतकाळाच्या खुणा प्रेक्षकाच्या मनात ठेवण्यापेक्षा समकालीनाच्या चित्रखुणा मनात ठेवणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य होतं. पात्रं दिसायला वेगळी होती, त्यांच्या सवयी, आहार-विहार वेगळे होते; पण तरीही ती प्रत्येकाला जवळची वाटणारी होती. त्यामुळंच इफ्फीतला गोष्टींचा खेळ यंदा कमालीचा रंगला. एकेका पात्रांच्या गोष्टी विलक्षणपणे सांगत चित्रपट संपत होते. प्रत्येक प्रेक्षक मनात वेगळा अर्थ मांडत होता. प्रत्येकाला समजलेली, जाणवलेली गोष्ट वेगळी होती. मात्र, प्रत्येकाच्या मनाच्या पडद्यावर किती तरी चित्रखुणा उमटत होत्या. अमिट आणि लख्ख. या चित्रखुणांची शिदोरी इफ्फीनं दिली आणि जगाकडं, माणसांकडं वेगळ्या प्रकारे बघण्याची दृष्टीही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com