नवं ‘कॉमेडी कल्चर’

मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई...अशा महानगरांमधलं एखादं हॉटेल. शनिवार संध्याकाळ आहे. बाइक्स, गाड्यांमधून तरुण-तरुणी किंवा जरा मध्यमवयीन लोक येतायत. ‘बुकमायशो’वर त्यांनी तिकीट बुक केलंय.
Standup Comedy
Standup ComedySaptarang

मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई...अशा महानगरांमधलं एखादं हॉटेल. शनिवार संध्याकाळ आहे. बाइक्स, गाड्यांमधून तरुण-तरुणी किंवा जरा मध्यमवयीन लोक येतायत. ‘बुकमायशो’वर त्यांनी तिकीट बुक केलंय. हॉटेलमध्ये एक छोटा-साधारण शंभरेक लोक बसू शकतील असा हॉल आहे. या हॉलमध्ये ही मंडळी बसतात आणि मग समोर एक रूपवान तरुण किंवा तरुणी निवेदक म्हणून येते. ती त्यानंतर एका व्यक्तीची ओळख सांगते आणि ती व्यक्ती येते. हातात एक कॉर्डलेस माइक किंवा बहुतेक वेळा फक्त कॉलरला लावलेला माइक एवढीच तिची सामग्री. हा अवलिया मग हळूहळू एकेक किस्से, निरीक्षणं सांगत राहतो आणि प्रेक्षक वर्गाला रिलेट करता येणारे विषय असल्यानं हास्याचे धबधबे कोसळत राहतात.

...स्वागत आहे नव्या हास्यनगरीत. ही नवी नगरी आहे ‘स्टँडअप कॉमेडी’ नावाच्या प्रकारानं व्यापलेली. ‘स्टँडअप कॉमेडी’ नावाच्या संस्कृतीनं सध्या बहुतांश भारतातल्या विशेषतः महानगरांमध्ये धुमाकूळ घातला आहे आणि पुढच्या काही काळात ती आणखी वाढत जाणार आहे. (अर्थात हे आपण कोरोना काळातली स्थिती सोडून बोलतोय हे लक्षात घ्या.) विशेषतः आयटी, फायनान्स कंपन्या ज्या भागांमध्ये आहेत, खर्च करण्याची आणि सगळं काही साजरं करण्याची वृत्ती असणारा वर्ग जिथं आहे तिथं ही संस्कृती अतिशय जोमानं वाढते आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचं अनेक ठिकाणी तात्पुरत्या ‘कॉमेडी क्लब्ज’मध्ये रूपांतर होतंय. एकेक काळी टीव्हीवरची करमणूक चौकटबद्ध होत होती आणि तिला कंटाळलेला वर्ग मनोरंजनाचे दुसरे मार्ग शोधत होता, त्याच काळात ठिकठिकाणी कॉमेडी क्लब्ज वाढायला लागले. वेब सिरीजचं जाळं जेव्हा पसरलं नव्हतं तो हा काळ आहे. याच काळात कॉमेडी क्लब्ज ठिकठिकाणी रुजायला लागले आणि भारतात कित्येक स्टँडअप कॉमेडियन्स तयार झाले. या कॉमेडियन्सना मिळणारा पैसा इतका होता, की काही जण मल्टिनॅशनल कंपन्यांमधल्या नोकऱ्या वगैरे सोडून स्टँडअप कॉमेडीकडे वळले.

स्टँडअप कॉमेडीचे शो हल्ली युट्यूबपासून काही ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरही असतात. त्यांची निरीक्षणं केली, तर या कॉमेडीतला एक पॅटर्न लक्षात येईल. एक तर अपमार्केट वर्गाला अपील होणाऱ्या गोष्टी त्यात असतात हे नक्कीच; पण अतिशय जबरदस्त, खोचक आणि सर्वसामान्यांनी बघूनही त्यांच्या लक्षात न निरीक्षणं त्यात असतात. ती समोरच्याला बरोबर समजतात आणि फस्सकन् हसायला येतं.

आज देशभरात लोकप्रिय झालेले जे स्टँडअप कॉमेडियन्स आहेत, ते हिंदी आणि इंग्लिश यांचं मिश्रण असलेली हिंग्लिश भाषा बोलतात आणि तो त्यांचा ‘यूएसपी’ आहे. ‘इंजिनिअरचं आयुष्य’ या विषयापासून ‘बुफे’ या विषयापर्यंत कोणत्याही विषयावर अतिशय धमाल कॉमेडी ते सादर करतात. गंमत बघा, या कॉमेडीसाठी निवडलेले जे विषय असतात, ते तसे कोणतेही चित्रपट, नाटकं, मालिका, पुस्तकं यांच्यामध्ये येत नाहीत. त्यामुळेच त्यांना प्रतिसाद मिळत असावा.

गेल्या दहा वर्षांमध्ये स्टँडअप कॉमेडी वाढली, त्याला कारण ‘बुकमायशो’सारखी नवनवीन कार्यक्रमांची माहिती सांगणारी अॅप्स, युट्यूबसारख्या माध्यमांमुळे त्या कॉमेडियनबद्दल घेता येणारी माहिती याही गोष्टी आहेत. कॉर्पोरेट कल्चरमध्ये कर्मचाऱ्यांना खूष ठेवण्यासाठी कंपन्या वीकेंड ट्रिप्स वगैरे आयोजित करतात, त्याबरोबर आता असे शोज आयोजित करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. एकूण ‘फील गुड’ परिणाम वाढवणं हे काम हे शो नक्की करतात. कॉर्पोरेट कल्चरनं दिलेला हात हेही स्टँडअप कॉमेडी वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे अनेकांना खूप मानधनं मिळायला लागली, मग हेही एक करिअरचं चांगलं क्षेत्र आहे हे ओळखून हुशार कॉमेडियन्स आले. या सगळ्यात ही संस्कृती वाढत गेली. राजू श्रीवास्तव, नवीन प्रभाकर यांनी खरं तर या प्रकाराला टीव्हीवर ग्लॅमर मिळवून दिलं, त्याचाही खूप मोठा वाटा आहे. टीव्हीवरच्या वेगवेगळे स्टँडअप कॉमे़डी शोजमुळेही त्या कलाकारांना प्रत्यक्ष रंगमंचीय सादरीकरणासाठी बोलावलं जाऊ लागलं. आज झाकीर खान, कुणाल कामरा, वीर दास, सौरभ पंत, कन्नन गिल, अभिषेक उपमन्यू, विपुल गोयल, बिस्व कल्याण रथ अशी किती तरी नावं विशिष्ट वर्तुळात प्रचंड लोकप्रिय आहेत.

आज देशभर स्टँडअप कॉमेडी नावाची संस्कृती वाढत असली, तरी मराठीत हा प्रकार खूप पूर्वीपासून आहे. एकपात्री प्रयोग या नावानं. पु. ल. देशपांडे यांची ‘बटाट्याची चाळ’ हा एकेकाळी तुफान लोकप्रिय झालेला एकपात्री प्रयोग, शिरीष कणेकर यांच्या माझी ‘फिल्लमबाजी’, ‘कणेकरी’ अशा कार्यक्रमांची वळणं घेत ‘भाडिपा’च्या स्टँडअप कॉमेडीपर्यंत आला आहे. मराठीत या प्रयोगाला ‘कॉर्पोरेट स्टँडअप कॉमेडी’ची तितकी झालर मिळाली नसली, तरी मोठ्या नाट्यगृहांपासून सोसायट्यांच्या छोट्या सभागृहापर्यंत अनेक ठिकाणी हे प्रयोग होतात, रंगतात, गाजतात. आज ‘एकपात्री कलाकार परिषद’ नावाची संघटना स्थापन होते आणि हे लोक उत्तम कामगिरी करतात यातच सगळं काही आलं.

बाकी, पूर्ण देशाचा विचार करता, स्टँडअप कॉमेडी हा प्रकार वाढत असताना त्याला एकीकडे कोरोनाच्या संकटानं घेरलं आहे आणि दुसरीकडे वेब सिरीज नावाच्या अजस्त्र संकटानंही घेरलं आहे. ‘स्टँडअप कॉमेडी’ घटकाभर करमणूक करणारी असली तरी शेवटी पॉपकॉर्न आणि जेवणाचं ताट यात फरक असतोच. शिवाय त्याचे डिजिटल अवतार आले असले, तरी प्रत्यक्ष कार्यक्रमात जितकं हसू येतं तितकं त्याच सादरीकरणाच्या डिजिटल अवतारात येत नाही हाही फरक आहेच. कारण शेवटी लाइव्ह सादरीकरण होत असताना प्रेक्षक सामूहिक आणि पूर्णपणे चित्त एकाग्र करून तो आस्वाद घेत असतात. मात्र, असं असलं तरी हा प्रकार संपणार नाही हे नक्की. विषय बदलू शकतील, कलाकार बदलतील; पण हा प्रकार कायम राहील.... कोणतंही नेपथ्य नाही, मेकअप नाही, ठरलेली कथा नाही, सहकलाकार नाही असं असूनदेखील जो कलाकार केवळ माइकच्या मदतीनं तुम्हाला इतका वेळ हसवू शकतो, तो परिस्थिती कितीही बिकट झाली तरी हसवू शकतोच की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com