विनोदाचा प्रवास : टीव्ही ते ‘ओटीटी’

‘साराभाई व्हर्सेस साराभाई २’मध्ये सतीश शहा आणि रत्ना पाठक-शाह.
‘साराभाई व्हर्सेस साराभाई २’मध्ये सतीश शहा आणि रत्ना पाठक-शाह.

एक धमाल वातावरण घेऊन खुसखुशीत विनोदांचे फटाके फोडणारी ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ ही मालिका एका विशिष्ट टप्प्यावर बंद करण्यात आली. त्यातला विनोद पातळ न होण्याच्या दृष्टीनं हा निर्णय जितका महत्त्वाचा होता, तितकाच त्यांचा पुढचा निर्णय महत्त्वाचा होता. या मालिकेचा पुढचा सीझन आणायचं त्यांच्या क्रिएटिव्ह टीमनं ठरवलं, तेव्हा इतर सगळ्या गोष्टी त्याच होत्या. तेच कलाकार, तेच लेखक, तेच (जरासं पुढचं-सात वर्षांनंतरचं) वातावरण. फरक फक्त एका गोष्टीचा होता-हा दुसरा सीझन टीव्हीऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणायचा निर्णय त्या निर्मात्यांनी घेतला होता. हा दुसरा सीझन पूर्ण फ्लॉप झाला, यात दुमत नाही. पहिल्या सीझनमधल्या अनेक गंमती या दुसऱ्या आवृत्तीत गायब होण्यापासून ओटीटी प्लॅटफॉर्म चार वर्षांपूर्वी नाही म्हटलं तरी आत्तासारखे फ्लरिश झाले नव्हते इथपर्यंत अनेक कारणं सांगता येतील. मात्र, हा दुसरा सीझन ‘साराभाई’च्या चाहत्यांना तितका का आवडला नाही, यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला सीझन टीव्हीवर सुपरहिट असूनही निर्मात्यांना तो टीव्हीऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणावा वाटला. 

‘साराभाई’चा टीव्ही ते ओटीटी हा प्रवास अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. एकीकडे टीव्हीवरचा-विशेषतः मालिकांमधला विनोद पातळ होतोय यावर सगळ्यांचं एकमत असताना ‘ईपी’ वगैरेंच्या हस्तक्षेपांपासून इतर अनेक गोष्टींमुळे विनोदनिर्मितीला पोषक वातावरण नाही ही गोष्ट जितकी खरी, तितकीच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर स्वातंत्र्य खूप आहे आणि प्रेक्षकही नवनव्या प्रयोगांना सामोरे जाण्यासाठी ‘फ्लेक्झिबल’ आहेत, ही गोष्टही खरी.

टीव्ही क्षेत्रात ‘टीआरपी’चं नाव सांगून एखादं पात्रच काढायला सांगितलं जातं, एखादा ट्रॅकच बदलायला सांगितलं जातं आणि मूळ गोष्ट कुणाच्याच हातात राहत नाही. टीव्हीवरच्या किती तरी विनोदी मालिका आपल्याला आवडत असतात; पण अचानक कळतं की त्यांना ‘टीआरपी’ नाही म्हणून त्या बंद झाल्यात. तुमच्यासारखे किती तरी लोक ती मालिका आवडीनं बघत असताना तिचा ‘टीआरपी’ कुठे गायब झाला हे आपल्याला कळतच नाही. आपल्याला आवडणारे अनेक ट्रॅक अचानक बदलतात, एखादं पात्र अचानकच एंट्री घेतं. त्यामुळे त्यातलं विनोदाचं मटेरिअल कमी होत जातं ही गोष्ट खरी. ‘ओटीटी’वर हा सगळा भाग नाही, त्यामुळेच ‘साराभाई’चा टीव्ही ते ओटीटी हा निर्णय त्या अर्थानं योग्यच होता. 

गंमत म्हणजे ‘ओटीटी’ हे नाव येण्यापूर्वी नवीन स्वरूपातल्या मालिका म्हणजे ‘वेब सिरीज’ हा प्रकार तरुणाईत लोकप्रिय झाला तो एका विनोदी वेब सिरीजमधून. ‘टीव्हीएफ पिचर्स’ ही वेब सिरीज लोकप्रिय झाली. टीव्हीमध्ये विनोदाचा जो कंटेंट त्या पिढीला ‘मिसिंग’ वाटत होता, तो त्यांना या वेब सिरीजमध्ये दिसला. अर्थात तेव्हा पूर्वी स्ट्रीमिंग युट्यूबवर जास्त असायचं आणि डेटा आजच्याइतका स्वस्त नव्हता ही गोष्ट खरी असली, तरी टीव्ही माध्यमातल्या विनोदातली चौकटबद्धता नको असणाऱ्या वर्गाला या नवीन प्रकाराची भुरळ पडली. 
आज ‘ओटीटी’ हे नाव इतकं चलनी झालं आहे त्याचं मूळही तिथंच तयार झालं.  

डेटा स्वस्त झाल्यावर आणि वेब सिरीज हा प्रकार ‘ओटीटी’च्या ओटीत गेल्यानंतरही विनोदानं या माध्यमात स्वतंत्र स्थान पटकावलं होतंच. ‘लिट्ल हार्ट्‌स’पासून ‘आणि काय हवं’पर्यंत अनेक सिरीजनी प्रेक्षकांना हसवलं आहे आणि हसवत आहेत. ‘ओटीटी’वरच्या मालिकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात अचानक बदल होत नाहीत. म्हणजे एखाद्या दिवशी अचानक एखादी व्यक्तिरेखाच बदलली आहे, एखाद्या दिवशी मूळ कथेचे संदर्भच बदलले आहेत, असं दिसत नाही. त्यामुळेच त्यातला खुलेपणा जितका प्रेक्षकांना आवडतो, तितक्याच त्यातल्या सातत्याच्याही प्रेमात प्रेक्षक पडताना दिसतात. 

गेल्या काही महिन्यांत मात्र ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर थ्रिलर्स, ड्रामा, क्राइम यांना जास्त पसंती मिळत असल्यानं विनोद तुलनेनं किंचित बाजूला पडला आहे हे नक्की असलं, तरी ‘ओटीटी’वरच्या विनोदांचे बदलते विषय तुमच्या लक्षात आले आहेत का? ‘वेब सिरीज’वरचे विनोदांचे विषय बहुतांश तरुणाईभोवतीच असायचे. ‘पिचर्स’पासून अगदी ‘लिट्ल हार्ट्‌स’पर्यंत. आज मात्र लोकप्रिय होत असलेल्या अनेक विनोदी वेब सिरीजचा कंटेंट आणि प्रेक्षकवर्ग हा खरं तर तत्कालीन टीव्हीसाठीचा आहे.

 ‘पंचायत’चं उदाहरण घ्या. या वेब सिरीजचा कंटेंट पूर्णपणे तत्कालीन टीव्हीसाठीचा आहे. विषयापासून प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक गोष्ट टीव्हीसाठी चालली असती. ‘ये है मेरी फॅमिली’ शंभर टक्के टीव्हीवर चालली असती. ‘गुलक’ शंभर टक्के टीव्हीवर चालली असती. म्हणजे जो तरुणवर्ग टीव्हीवर जे बघायला मिळत नाही म्हणून टीव्हीकडून ओटीटीकडे वळला, तसा टीव्हीवरचा विनोदी कंटेंट रुचत नाही म्हणून ओटीटीकडे वळू लागलेला कौटुंबिक प्रेक्षकवर्गही वाढतोय. हा प्रेक्षक वाढेल, तसे वेब सिरीजचेही विषय बदलत जाणार आहेतच. तेव्हा कदाचित तरुणाई आणखी वेगळं काही तरी शोधून काढेल हे नक्की; पण अनेक वर्षं विनोदाची टीव्ही, मालिका, चित्रपट आणि नाटक ही माध्यमचौकट टीव्हीची बाजू क्षीण झाल्यामुळे ‘बहुकोनी’ व्हायला लागली आहे. टीव्हीच्या प्रेक्षकांना परफेक्ट आवडणारे विषय असूनही संबंधितांना ते सोडून ओटीटीसारख्या मोकळ्या माध्यमाची भूल पडतेय, ही स्थिती हाच खरं तर एक ‘विनोद’ आहे एवढं मात्र खरं!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com