...पडदा ज्याचा त्याचा 

‘किसकिसको को प्यार करूं’ या चित्रपटात कपिल शर्मासह इतर. छोट्या पडद्यावरचा बादशहा मानल्या जाणाऱ्या या विनोदवीराला मोठ्या पडद्यानं मात्र जवळ केलं नाही.
‘किसकिसको को प्यार करूं’ या चित्रपटात कपिल शर्मासह इतर. छोट्या पडद्यावरचा बादशहा मानल्या जाणाऱ्या या विनोदवीराला मोठ्या पडद्यानं मात्र जवळ केलं नाही.

हिंदी चित्रपटातली यशाच्या शिखरावरची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिनं छोट्या पडद्यावर यायचं ठरवलं, तेव्हा तिला मार्ग जवळचा वाटला होता तो विनोदाचा. श्रीदेवी अनेक प्रकारच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असली, तरी ‘चालबाज’, ‘मिस्टर इंडिया’ अशा चित्रपटातून तिनं तिच्यातली विनोद सादर करण्याची क्षमता दाखवून दिली होती, जो तिचा ‘युनिकनेस’ ठरला होता. त्यामुळेच तिच्यातलं ते वैशिष्ट्य छोट्या पडद्यावर तिचं वेगळेपण ठरेल, असं सगळ्यांनाच वाटत होतं. त्यामुळं अतिशय गाजावाजा करून ‘मिसेस मालिनी अय्यर’ ही मालिका सहारा टीव्हीवर आणण्यात आली. खूप खर्च, प्रचंड जाहिरात करूनही निकाल एकच लागला....मालिका फ्लॉप!

छोट्या पडद्यावरचा सुपरस्टार कपिल शर्मा मोठ्या पडद्यावर जाणार हे तर निश्चितच होतं. कोणत्याही सेलिब्रिटीला आपल्या विनोदानं पूर्ण नामोहरम करू शकणारा, हजरजवाबी कपिलला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी व्हीनस फिल्म्ससारखी मातब्बर कंपनी पुढे सरसावली. कपिलला छोट्या पडद्यावर दणक्यात मिळणारा प्रतिसाद मोठ्या पडद्यावर कॅश करायचा एवढंच काम बाकी होतं. खूप तयारी करून ‘किस किसको प्यार करूं’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला. त्याचाही निकाल एकच लागला....चित्रपट फ्लॉप!

...खूप उदाहरणं सांगता येतील अशी. नाटकांतून चित्रपटांकडे वळलेले, चित्रपटांकडून मालिकांकडे, मालिकांकडून नाटकांकडे वळलेले किती तरी विनोदी कलाकार आहेत; पण एका माध्यमात विनोदाची तुफान आतषबाजी करणारे कलाकार दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात, तेव्हा मात्र ते तितके यशस्वी होऊ शकत नाहीत, असं दिसतं. फार कशाला, सध्या बोलबाला असलेल्या किती तरी विनोदी वेब सिरीजमधले कलाकार इतर कुठल्या माध्यमात फार चांगली कामगिरी करू शकत नाहीत असंही दिसतं. ‘चला हवा येऊ द्या’सारख्या कार्यक्रमात तुफान बॅटिंग करणाऱ्या कलाकारांचे चित्रपट किंवा नाटकं आली तर त्यांना तेवढा प्रतिसाद मिळत नाही आणि रंगभूमीवरचे अनभिषिक्त सम्राट प्रशांत दामले सब टीव्हीवर ‘फायरफायटर चंद्रकांत चिपळूणकर’ बनून जातात, तेव्हा तिथं जीव तोडून कामगिरी करूनही तिथले प्रेक्षक त्यांना तेवढा प्रतिसाद देत नाहीत. काय गंमत आहे ना? 

का होत असेल बरं हे? म्हणजे प्रत्येक माध्यमामध्ये आवश्यक असलेल्या विनोदाची एक विशिष्ट चौकट ठरली असेल का? किंवा अमुक माध्यमात तो विनोदवीर ज्या गोष्टींचा वापर करून (म्हणजे समजा ॲडिशन्स, टायमिंग, हजरजवाबीपणा) विनोदनिर्मिती करत असेल, त्यातले काही फंडे दुसऱ्या माध्यमाला तशाच प्रकारे लागू होत नसतील का? किंवा त्या विनोदवीराची त्या त्या माध्यमात जी प्रतिमा तयार झाली आहे तीच दुसऱ्या माध्यमातही त्या प्रेक्षकांना पाहिजे असेल का? 

श्रीदेवी ‘मालिनी अय्यर’ बनून अवतरली, तेव्हा ती स्वतःचा ‘ऑरा’ आणि नैपुण्यही घेऊन अवतरली खरी; पण छोट्या पडद्यावरच्या प्रेक्षकांना तशा प्रकारचा ऑरा नकोच होता, किंवा कदाचित ‘चालबाज’सारखीच विनोदशैली अपेक्षित होती, जी ‘मालिनी अय्यर’मध्ये नव्हती. त्यामुळे मालिकेवर फ्लॉपचा शिक्का बसला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कपिल शर्माही छोट्या पडद्यावर लोकांना आवडतो तो त्याच्या कोट्यांमुळे, त्याच्या निरीक्षणांमुळे किंवा तो आयत्या वेळी करत असलेल्या धमाल गोष्टींमुळे. चित्रपटासारख्या चौकटबद्ध माध्यमात या सगळ्या गोष्टी शक्यच नाहीत, त्यामुळे कपिलची नेहमीची जादू तिथं चालत नाही. तिथं कदाचित रितेश देशमुखसारखी कॅमेरा ऑन झाल्यावर एकदम तडातड फुटणाऱ्या पॉपकॉनर्सारखी शैली चालू शकते, जॉनी लिव्हरसारखं (तोचतोचपणा असूनही) एक खास टायमिंग चालू शकतं; पण कपिलचे छोट्या पडद्यावरचे गुण तिथं चालणार नाहीत. नाटकांत तर असंख्य उदाहरणं सांगता येतील.

‘यदाकदाचित’सारख्या ब्लॉकबस्टर नाटकातल्या वेगवान विनोदाची शैली छोट्या पडद्यावर सूट होणार नाही, किंवा विशाखा सुभेदार यांचा कॉमेडी शोमध्ये दिसणारा विनोदाचा सेन्स चित्रपटांमध्ये चालेलच असं नाही. ‘पर्मनंट रूममेट्स’पासून ‘लिट्ल हार्ट्‌स’पर्यंत किती तरी वेब सिरीजमध्ये आवश्यक विनोदांचं टायमिंग टीव्ही मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये चालत नाही त्याचंही तेच कारण असावं कदाचित.  त्यामुळेच काही म्हणा, माध्यमांतर वगैरे गोष्टींचं कौतुक करा-विनोदी कलाकृतींचं माध्यमांतर होऊ शकतं कदाचित, पण प्रत्येक माध्यमातल्या विनोदाशी संबंधित अभिनयाच्या शैलीच्या भिंती भल्याभल्यांना नाही मोडता येत. त्यामुळेच एकच विनोदवीर सगळ्याच माध्यमात विनोदाची आतषबाजी करतोय अशी उदाहरणं फार कमी दिसतील. 

आपलं हसणं ही गोष्ट कॉमन असली, तरी कोणत्या माध्यमात कशामुळे हसतो ही गोष्ट मात्र वेगळी असते. याचबरोबर अमुक माध्यमात अमुक विनोदी कलाकार येतो, तेव्हा त्याच्या इतकाच प्रेक्षकही विशिष्ट ‘स्टान्स’ घेऊन बसलेला असतो हेही खरं. अनेक घरांत ‘चला हवा येऊ द्या’च्या कलाकारांनी विनोद घडवण्याच्या आधी एंट्रीलाच हशा येतो इथंच सगळं आलं.  तुम्हाला कोणत्या प्रकारचा विनोद आवडावा हा जसा ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, तसंच प्रत्येक विनोदवीरासाठी एक पडदा, एक माध्यम ठरलेलं असतं. त्याच्यातले विनोदगुण आणि त्या माध्यमात लागणारे गुण यांची कुंडली जुळली की झालं! आता असं असताना बहुतेक सगळ्याच कलाकारांना तो पडदा सोडून दुसऱ्या पडद्यासाठी मुशाफिरी करावीशी वाटते हेही तितकंच खरं. काहींचा पडदाबदल यशस्वी होतो, काहींचा नाही...शेवटी ‘ज्याचा त्याचा पडदा’ एवढंच आपण म्हणायचं, नाही का?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com