प्रेमाच्या त्रिकोणाला विनोदाचा ‘चौथा कोन’

sonu-ke-titu-ki-sweety
sonu-ke-titu-ki-sweety

‘सोनू के टिटू की स्विटी’ या नावाचा चित्रपट तुम्ही एरवी कधी बघितला असता का? पण आधी मल्टिप्लेक्स आणि नंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्स यांच्यामुळे नवीन प्रयोगांना सरावलेल्या प्रेक्षकांनी हा चित्रपट बघितला आणि त्यानं तब्बल शंभर कोटी रुपयांपेक्षाही जास्त व्यवसाय केला. कोणताही ओढूनताणून आणलेला विनोद नाही. टिटू या निरागस मित्राचं स्विटी नावाच्या चालू मुलीशी सुरू असलेल्या लग्नाची प्रक्रियेवर सोनू हा बिलंदर तरुण कशा प्रकारे परिणाम करतो अशा प्रकारची अतरंगी कथा. प्रसंगनिष्ठ आणि सहज विनोद, खुसखुशीत वन-लायनर्स आणि टायमिंगचा उत्तम सेन्स असलेले कलाकार यांमुळे या चित्रपटानं एका वर्गाला वेड लावलं. गंमत बघा मंडळी, ‘लव्ह ट्रॅंगल’ हा बॉलिवूडचा अतिशय आवडता जॉनर असला, तरी ‘सोनू के टिटू’मध्ये या त्रिकोणाला असा काही धमाकेदार ट्विस्ट दिला आहे, की तोच त्याचा ‘यूएसपी’ झाला.

एक हिरो आणि दोन हिरॉईन, किंवा दोन हिरो आणि एक हिरॉईन असलेले आणि प्रेमाचा गुंता असलेले किती तरी चित्रपट आपण बघितले आहेत. पार अगदी ‘संगम’, ‘सिलसिला’, ‘सागर’पासून ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कल हो ना हो’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘दिल तो पागल है’, ‘रंगीला’पर्यंत किती तरी...पण हे नवं जग आहे मंडळी. प्रेम प्रेम म्हणत रडत किती बसणार? एके काळी प्रेमाच्या त्रिकोणांनी आपल्याला रडवलं जरूर; पण नवीन जमान्यात ‘आज मैने सैंयाजीसे ब्रेकअप कर लिया’ म्हणत नाचणारी हिरॉइन असेल आणि ‘क्षणात प्रेम, क्षणात ब्रेकअप’ अशी ‘व्हॉटसॲपिश’ स्थिती असेल, तर प्रेम-त्रिकोणांचे चित्रपट पूर्वीच्याच स्टाइलनं असून कसं चालेल? उलट ‘इन्स्टंट प्रेमा’चा मसाला बाळगणाऱ्या एका खास अशा प्रेक्षक वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून बॉलिवूडच्या मंडळींनी या प्रेम-त्रिकोण चित्रपटांना विनोदाचा चौथा, खुसखुशीत कोन दिला आणि बघताबघता त्यांचा चक्क एक जॉनरच तयार झाला. इंटरेस्टिंग ना? 

तीन व्यक्तिरेखांचा एक त्रिकोण घ्या (चौकोन, पंचकोन असेल तर आणखी धमाल), त्याला एक खास असा ट्विस्ट द्या, कथेला तडका देण्यासाठी कानपूर, बरेली, बनारस किंवा उत्तरेकडच्या कुठल्याही शहराची पार्श्वभूमी घ्या; आया-मावशा, काका, आजोबा, मित्र वगैरेंच्या शक्य तितक्या अतरंगी व्यक्तिरेखा घ्या, धमाल प्रसंगांची जुळवाजुळव करा आणि ‘अगर शकल देखके लडकियां शादी कर रही होती ना तो हिंदुस्थान मे आधे लडके कुंवारे होते’ अशासारख्या  चटपटीत संवादांनी मस्तपैकी झालर लावून टाका. झाला नव्या जमान्याचा हा लव्ह-ट्रॅंगल चित्रपट.

‘लव्ह ट्रँगल’च्या एकेकाळच्या रडकथांना या नवीन चित्रपटांनी इतकं चटकदार बनवलं, की बघताबघता त्यांचा खास प्रेक्षकवर्ग तयार झाला. पूर्वीच्या रुढ चौकटींना दिलेला धमाल ट्विस्ट हे त्यांचं वैशिष्ट्य. ‘तनू वेड्स मनू’सारख्या प्रेमाचा अक्षरशः ‘झोलझाल’ असलेल्या चित्रपटानं इतकी धमाल केली, की त्याचा दुसरा भागही आला आणि तोही लोकप्रिय झाला. प्रेमाच्या त्रिकोणाच्या चित्रपटांना खुसखुशीतपणाचा चौथा कोन देण्याचा प्रकार लोकप्रिय झाला तो ‘कभी हां, कभी ना’ या चित्रपटानं. गोव्याची मस्त पार्श्वभूमी, शाहरुख खान, दीपक तिजोरी आणि सुचित्रा कृष्णमूर्ती या त्रिकूटाबरोबरच नसरुद्दिन शहा, अंजन श्रीवास्तवपासून इतर सगळ्या गँगनं दिलेली जबरदस्त साथ यांमुळे या चित्रपटानं एक नवी वाट चित्रकर्मींना दाखवून दिली. 

‘मेरे यार की शादी है’ या चित्रपटानं खुसखुशीत प्रेम-त्रिकोण चित्रपटांना ग्लॅमर मिळवून दिलं; पण ‘शादी मे जरूर आना’, ‘बरेली की बर्फी’ असे किती तरी चित्रपट चाहत्यांना हसवतायत. ‘हॅप्पी भाग जायेगी’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ असे किती तरी या नव्या प्रकारात तयार होतायत. या चित्रपटांची थोडी विचित्र नावं बघितली तरी त्यांचं वेगळेपण लक्षात येईल. एकीकडे आयुष्मान खुराना हा ‘शुभमंगल सावधान’, ‘व्हिकी डोनर’ अशा प्रकारच्या चित्रपटांचा स्टार झाला असताना वेगळ्या प्रेम-त्रिकोण चित्रपटांसाठी राजकुमार राव, कार्तिक आर्यन, सनी सिंग अशी गँगच तयार होते आहे. ‘बरेली की बर्फी’ आठवतोय ना? राजकुमार रावनं त्यात केलेला अभिनय धमाल होता. 

कार्तिक आर्यननं ‘प्यार का पंचनामा’मध्ये केलेलं स्वगत तर काही जणांना अक्षरशः तोंडपाठ झालं होतं. त्यानंच ‘सोनू के टिटू’ मध्ये धमाल केली. या सगळ्याच चित्रपटांमध्ये प्रेमाचा कुठंही अपमान नसतो आणि विनोदही ओढूनताणून आणलेला नसतो. उलट दोन्हीचा सुवर्णमध्य धमाल पद्धतीनं साधला जातो. विशेषतः गेल्या काही वर्षांत अशा चित्रपटांना जास्त प्रतिसाद मिळतोय, कारण विशिष्ट प्रदेशाचं, व्यक्तिरेखांचं चित्रण त्यात करता येतंय आणि मोठे सुपरस्टार न घेताही असे चित्रपट विशिष्ट पॉकेट्समध्ये लोकप्रिय होतायत. त्यामुळे हा जॉनर आणखी वाढत जाणार. तुम्ही प्रेमात पडलेला असा, किंवा ब्रेकअप झालेलं असो, तुम्ही ‘तनू’, ‘हॅप्पी’, ‘टिटू’, ‘बिट्टी’ वगैरे अतरंगी मंडळींच्या प्रेमात नक्की पडणार एवढं मात्र नक्की. त्यांना बघून आपण एवढंच म्हणायचं...‘टेढा है पर मेरा है!’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com