सुसाट, अफाट कपिल

एके काळी टेलिफोन बूथवर काम करणारा आणि ‘जगराते’ करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणारा माणूस अंगभूत गुणांनी कसा झळाळू शकतो याचं कपिल शर्मा हे आदर्श उदाहरण.
Kapil Sharma
Kapil SharmaSakal

‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिलचे पंचेस, त्यानं अर्चना पुरणसिंगपासून सुमोना चक्रवर्तीपर्यंत सगळ्यांना मारलेले टोमणे, त्याचे खास प्रश्न हे सगळं बघून तुमची हसूनहसून पुरेवाट झाल्यानंतर एपिसोड संपल्यावर तुम्ही दुसरं काही बघायला लागलेले असता, तोपर्यंत कपिलभाई सुमारे पन्नास लाख रुपयांची कमाई करून मोकळे झालेले असतात. आकडा कमी-जास्त होऊ शकेल; पण भारतात केवळ विनोदबुद्धीवर आणि तेही छोट्या पडद्यावर इतकी मोठी कमाई करणारा, स्वतःचा ब्रँड तयार करणारा आणि लोकप्रियता कायम ठेवण्यात यशस्वी ठरलेला कपिल शर्मा हा एकमेव.

एके काळी टेलिफोन बूथवर काम करणारा आणि ‘जगराते’ करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणारा माणूस अंगभूत गुणांनी कसा झळाळू शकतो याचं कपिल शर्मा हे आदर्श उदाहरण. कपिलला त्याच्या वडिलांकडून वारसानं मिळालेल्या विनोदबुद्धीवर विलक्षण विश्वास होता. त्यामुळेच त्याच्या विनोदात एक विलक्षण असा आत्मविश्वास असतोच.

गंमत बघा मंडळी, आज ज्या कपिल शर्माच्या शोमध्ये झळकण्यासाठी शाहरूख खानपासून ऐश्वर्या राय-बच्चनपर्यंत प्रत्येक जण धडपडत असतो तो कपिल शर्मा ‘लाफ्टर चॅलेंज’च्या ऑडिशनमध्ये चक्क नापास झाला होता. अमृतसरमध्ये झालेल्या ऑडिशनमध्ये त्याची निवड झाली नाही; पण त्याच्या मित्राची निवड झाल्यामुळे कपिलनं पुन्हा एक संधी आजमावायचं ठरवलं. दिल्लीमध्ये मात्र त्याची निवड झाली आणि कपिलसाहेब त्या शोचे विजेतेच ठरले.

अर्थात त्या काळात असे स्टँडअप कॉमेडीचे शो तितके लोकप्रिय नव्हते. त्यामुळे कपिलची प्रतिभा तितकी पुढे आली नाही. कपिलला खरं व्यासपीठ दिलं ते ‘कॉमेडी सर्कस’नं. दोन दोन जणांनी स्किट सादर करण्याचा हा प्रोग्रॅम इतका विलक्षण ठरला, की कपिलचा डंका दर आठवड्याला वाजत राहिला. कोणतंही स्क्रिप्ट द्या, कपिल त्याचं सोनंच करणार याची खात्री सगळ्यांनाच होती. दर आठवड्याला एक खतरनाक व्यक्तिरेखा घेऊन कपिल यायचा. कपिलनं त्या व्यक्तिरेखांमध्ये असा काही जिवंतपणा भरला, की लोकांची हसूनहसून पुरेवाट झाली. त्याच्या विनोदाची शैली इतकी विलक्षण होती, की त्या शोचे तब्बल सहा सीझन तो विजेता ठरला. तो अक्षरशः संपूर्ण शो खाऊन टाकायचा. आजही हे एपिसोड्स तुम्ही बघितलेत, तर त्याचा प्रत्यय येईल.

याच लोकप्रियतेचा वापर करून कपिलनं ‘द कपिल शर्मा शो’ सुरू केला. खरं तर हा शो सुरुवातीला धमाल होता. म्हणजे त्यात कपिलचं वैशिष्ट्य असलेलं एक स्किट असायचं, ‘द मूव्हर्स अँड शेकर्स’मध्ये शेखर सुमन करायचा त्या प्रकारच्या एकामागोमाग पंचेसचं सादरीकरण असायचं. सुरुवातीला इंटरेस्टिंग व्यक्तींच्या मुलाखतीही होत्या, मात्र नंतर हळूहळू हा शो म्हणजे चित्रपटांच्या प्रमोशनचा प्लॅटफॉर्म ठरला, स्किट्समधलं वैविध्य गेलं, उत्स्फूर्तपणाच्या नावाखाली वेडेपणा सुरू झाला आणि तोचतोचपणा आला. आज कपिलच्या हजरजबाबीपणावर हा शो चालत असला, तरी त्याच्यातल्या सगळ्या गुणांचं त्यात चीज झालेलं नाही ही गोष्ट खरीच.

कपिलची यशाची ट्रेन सुसाट असली, तरी ती कायम वेगात आहे असंही नाही. कपिलचा अहंभाव मधल्या काळात वाढला आणि त्याचे सुनील ग्रोव्हर वगैरेंबरोबर खटके उडायला लागले. सगळे सुपरस्टार्स त्याच्या शोमध्ये येत असल्यामुळे मोठ्या पडद्यावरही आपण सुपरस्टार होऊ शकतो असं कपिलला वाटलं आणि त्याचा पहिलाच चित्रपट सपाटून आपटला, की पुढच्या चित्रपटांना कुणी हातच लावेना. खुद्द कपिलच्या घरी चारी ठाव श्रीमंती आली असताना तो नैराश्यातही गेला होता. त्याच्या शोच्या सेटला आग लागून त्याला प्रचंड नुकसान झालं ते वेगळंच... पण महत्त्वाचं हे, की कपिल या सगळ्यातून बाहेर पडला. त्यानं सगळ्यांवर मात केली. त्याच्यावर चाहत्यांचं इतकं प्रेम आहे, की यशाचा एक ट्रॅक हुकला तरी दुसऱ्या ट्रॅकवर त्याची रेल्वे धावत राहिली.

कपिलच्या विनोदात एक कुरकुरीतपणा, तिरकसपणा आणि निरागसपणा आहे. तो कमरेखाली वार करत नाही आणि त्याच्यातला ताजेपणा कमी होत नाही. संवादफेकीचा त्याचा खास ‘अंदाज’ आहे आणि टायमिंगचा तर तो बापच आहे.

उत्स्फूर्तपणाचा आदर्शच. त्याच बळावर आज कपिल शर्मा ही हास्यनगरीतली एक ‘दंतकथा’ बनली आहे. खरं तर कपिलच्या समांतर करिअर असलेले अभिषेक कृष्णा, भारतीसिंह, सुदेश लाहिरी अशा सगळ्यांनी स्वतःचे शो करून बघितले; पण त्यांना कपिलसारखं ब्लॉक बस्टर यश मिळालं नाही. कपिल इज कपिल. कपिलच्या याच लोकप्रियतेमुळे त्याच्या शोमध्ये गेले काही महिने खंड पडल्यानं त्याचे चाहते अक्षरशः उतावीळ झाले आहेत. एक-दोन महिन्यात पुन्हा एकदा कपिल त्याच्या खास पोजमध्ये उभा राहील. एकेका वाक्यानं षटकार मारत राहील. हास्याचा दणदणाट होत राहील आणि कपिल शर्मा नावाची आगळीवेगळी यशकथाही गावोगावच्या विनोदवीरांना प्रेरणा देत राहील...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com