समृद्ध साहित्याचा प्राचीन वारसा

परदेशी साहित्याचा विचार केला तर भारतीय अभ्यासकांना आणि वाचकांना जर्मन, रशियन, फ्रेंच आणि अर्थातच इंग्लिश साहित्याबद्दल कमी-जास्त प्रमाणात माहिती असते.
Heritage
HeritageSakal
Summary

परदेशी साहित्याचा विचार केला तर भारतीय अभ्यासकांना आणि वाचकांना जर्मन, रशियन, फ्रेंच आणि अर्थातच इंग्लिश साहित्याबद्दल कमी-जास्त प्रमाणात माहिती असते.

- मंदार पुरंदरे purandaremandars@gmail.com

परदेशी साहित्याचा विचार केला तर भारतीय अभ्यासकांना आणि वाचकांना जर्मन, रशियन, फ्रेंच आणि अर्थातच इंग्लिश साहित्याबद्दल कमी-जास्त प्रमाणात माहिती असते. या तुलनेत काही तुरळक अपवाद सोडले तर पोलिश साहित्य आपल्याकडे (मराठी भाषेत) फारसं आलेलं नाही. याचं एक महत्त्वाचं कारण असं की, युरोप खंडात बोलल्या जाणाऱ्या जर्मन, फ्रेंच यांसारख्या भाषा शिकवण्याची आणि शिकण्याचीही जी काहीएक परंपरा आहे ती पोलिश भाषेला नाही, म्हणूनच प्रस्तुत लेखात सुरुवातीला पोलिश भाषेची अगदी थोडक्यात ओळख करून घेऊ. त्यानंतर मध्ययुगीन काळापासून ते आजवरच्या काळापर्यंतची लिखित साहित्याची वैशिष्ट्यं कोणती ते पाहू, तसंच त्यातल्या काही लेखक-कवींच्या साहित्याचा धावता आढावाही घेऊ. हा आढावा घेताना काही भौगोलिक संदर्भही त्या त्या अनुषंगानं येतील.

उत्तरवाहिनी नदी विसुआ (विस्तुला) आणि ओद्रा या दोन प्रमुख नद्यांच्या काठी स्लाव्ह लोकांची वस्ती होती. पोलिश (पोल्स्की) भाषेचं मूळ हे पूर्वीच्या पश्चिमी स्लाव्ह भाषेत आहे. विशाल अशा भारोपीय (इंडो-युरोपीअन) कुळातली ही भाषा लिहिण्यासाठी जरी रोमन लिपी वापरली जात असली तरी या भाषेची वर्णमाला इंग्लिश किंवा जर्मन या भाषांपेक्षा निराळी आहे. या भाषेतील पहिलं लिखित वाक्य एका चर्चच्या मठातल्या बखरीमध्ये आढळतं. ‘मी ते काम करतो, तू आराम कर’ अशा अर्थाचं हे वाक्य सन १२६८ किंवा सन १२७० मधलं असावं असा अंदाज आहे. पोलंड देशाचा राजा मिएश्को पहिला यानं सन ९६६ मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे उल्लेख मिळतात. या काळात शिक्षणाची एकूण स्थिती फारशी चांगली नव्हती.

पोलिश भाषा ही लॅटिनच्या तुलनेत खालची होती, त्यामुळे लॅटिन आणि इतर भाषा शिकवण्याचा प्रघात होता, त्यातही या परदेशी भाषा (चेक, जर्मन आदी) एका यंत्रवत् पद्धतीनं शिकवल्या जात. याबरोबरच अभ्यासक्रमात चर्चमधील गायन, प्राथमिक व्याकरण आणि हिशेब यांचादेखील समावेश असे. अकराव्या/बाराव्या शतकात प्रामुख्यानं लॅटिन भाषेतील बखरी सापडतात. सुरुवातीचं लिखाण हे धार्मिक स्वरूपाचं होतं. अर्थात्, ही लॅटिनदेखील काळानुसार बदलत राहिलेली आहे.

पोलिश भाषेतील सर्वात जुनं लिखाण हे काझानिया म्हणजे धर्मोपदेश! एकोणिसाव्या शतकात हे लिखाण सापडलं. हे लिखाण तेराव्या किंवा चौदाव्या शतकातील असावं असा अंदाज आहे. कवितेबद्दल बोलायचं तर बोगुरोजीत्सा ही धार्मिक कविता/प्रार्थना पहिली मानावी लागते! बोगुरोजीत्सा म्हणजे देवाची जन्मदात्री अर्थात् माता मेरी. या कालखंडातील सापडणाऱ्या पोलिश लिखाणावर तत्कालीन चेक भाषेचा प्रभाव आहे, कारण; तत्कालीन पोलंडच्या काही भागावर चेक राजे राज्य करत होते. बाराव्या शतकातील विन्सेंतं कादउबेक (जन्म ११५५, क्राकुव) या कवीच्या सुरुवातीच्या काही कविता हे एक फार रोचक प्रकरण आहे. कारण; याच्या कवितेत यमकांचा आणि छंदाचा वापर दिसतो. या काळातल्या कवितेमध्ये आणखी काही खास सौंदर्यस्थळं विकसित झालेली दिसत नाहीत, तरीही एक चित्र उभं करण्यात ही कविता यशस्वी होते. काजीमिएश राजाच्या निधनानंतर निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती त्यानं एका कवितेत मांडली आहे. पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं फारशी उपलब्ध नसल्यानं राजाच्या मृत्यूची बातमी देशाच्या वेगवेगळ्या भागांत उशिरानं पोहोचली आणि त्यामुळे तिथले नागरिक लगेचच दुखवट्यात सहभागी झाले नाहीत. या कवितेमध्ये सुख आणि दुःख यांचा संवाद आहे.

सुख (किंवा आनंद) दुःखाकडे तक्रार करतं की, तू मला बळजबरीनं घेऊन जात आहेस...या संवादात न्याय, विषमता, स्वतंत्रता ही इतर पात्रंदेखील भाग घेतात. अखेरीस हार्मनी (अर्थात् परस्परमेळ) या सर्वांमध्ये मेळ घडवून आणण्याचं काम करते.

चर्चमध्ये होणारं पारंपरिक शिक्षण हे मोफत असलं तरी अगदी चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत लाकडं तोडून सरपणाची व्यवस्था करण्याची सेवा विद्यार्थ्याला करावी लागे. पंधराव्या शतकात क्राकुवमध्ये (दक्षिण पोलंड) ॲकॅडमी (विद्यापीठ) सुरू झाली. त्यामुळे तेव्हापासून क्राकुव शहर हे भाषेच्या, संस्कृतीच्या क्षेत्रात कायम महत्त्वाची भूमिका बजावत आलेलं आहे. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला बायबलची भाषांतरं छापलेली आढळतात.

या शतकात गद्य आणि पद्य विभागात अनेक लेखक पाहायला मिळतात, तरी मिकोवाय रेय (सन १५०५-१५६९) या लेखकाचा उल्लेख इथं करावाच लागेल. एका अर्थानं हा पोलिश साहित्याचा जनक! उच्च कुळात जन्माला आलेल्या रेय याचं जीवन विविधरंगी आहे. रेय हा प्रोटेस्टंट पंथाचा होता. त्याच्या व्यक्तिमत्त्वात अनेकविध विरोधाभासी गुणांचा समुच्चय दिसून येतो. तत्कालीन राजकारणातही त्याचा सहभाग होता. गद्य आणि पद्य या साहित्याच्या दोन्ही प्रकारांमध्ये त्याचा समर्थपणे संचार दिसून येतो. तो स्वतः उच्च सरदार कुळातील असला तरी त्यानं राजकीय उपहासिकाही लिहिल्या आहेत.

सन १५४९ मध्ये त्यानं कुपिएत्स (व्यापारी) हे काव्यनाट्य लिहिलं. रेय यानं त्याच्या हयातीत छोट्या छोट्या विनोदी पदांची रचनाही विपुल प्रमाणात केलेली आहे. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर रेय याचं त्याच्या मातृभाषेवरील आणि मातृभूमीवरील प्रेम पुढील वाक्यावरून स्पष्ट व्हावं : ‘आमच्या आजूबाजूच्या देशांना मी सांगू इच्छितो की, पोलिश लोक म्हणजे कुणी किडा-मुंगी (मूळ वाक्यात ‘बदक’ ) नव्हेत, त्यांना त्यांची स्वतःची अशी भाषा आहे.’

यान कोहानोवस्की (१५३०-१५८४) हा पोलिश कवितेवर दीर्घ काळ प्रभाव असलेला एक महत्त्वाचा कवी. यानं लॅटिन भाषेतदेखील रचना केलेल्या आहेत. कोहानोवस्कीनं या काळात पोलिश कवितेला एक विशिष्ट संरचना बहाल केली, हे त्याचं एक महत्त्वाचं योगदान. त्यानं काही सुंदर गाणीदेखील लिहिलेली आहेत. या गाण्यांवर बायबलमधील ‘साम’चा (Psalm) प्रभाव जाणवतो. धर्म, तत्त्वज्ञान आणि सुरेख निसर्गचित्रं हे या गाण्यांचे विषय आहेत.

यानंतर आता, काळाच्या दृष्टीनं, थोडी उडी मारून आपण थेट आदाम मित्सकीएविच (१७९८-१८५५) या अत्यंत प्रतिभावान साहित्यिकाच्या कामगिरीवर संक्षिप्त नजर टाकू या. उत्कृष्ट लेखक, कवी, भाषांतरकार, नाटककार, राजकीय विचारवंत, ॲक्टिव्हिस्ट, तसंच पोलिश रोमँटिसिझमच्या प्रमुख अध्वर्यूंपैकी एक असे या एकाच व्यक्तीचे अनेक पैलू आहेत. याच्या साहित्याचा मूळ भाषेतच आनंद घ्यायला हवा. बर्लिनमध्ये हेगेलची व्याख्यानं ऐकण्याची संधी याला मिळाली, तसंच ग्योथे आणि पुश्किन अशा बऱ्यापैकी समकालीन साहित्यिकांशी याच्या प्रत्यक्ष भेटी झाल्या. मित्सकीएविच याचा जन्म लिथुआनियातला. मायदेशाची ओढ, आपल्या अस्मितेचा शोध या बाबींचं फार रोचक प्रतिबिंब त्याच्या साहित्यात आढळून येतं. दीर्घ नाटकांमध्ये ‘ज्यादं- (पूर्वज)’ आणि ‘पान तादेउश ( मि. तादेउश)’ या त्याच्या नाटकांचे प्रयोग आजही संपूर्ण देशात होत असतात. नाट्यसंरचना, विषय, भाषा आणि आशय या सर्व पातळ्यांवर ही नाटकं अत्युत्कृष्ट असून ती प्रत्येक नवीन रंगकर्मीला आकर्षून घेत असतात.

आज इतकंच!

यापुढील भागात (म्हणजे, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात) आधुनिक काळातील कमीत कमी दोन लेखकांची जवळून ओळख करून घेऊ या.

(‘भाषास्पंदन’ या सदरामधील या भागाचे लेखक हे भाषाप्रेमी-साहित्यप्रेमी-अनुवादक आहेत. पोलंडच्या पश्‍चिम भागातील पोझनान या शहरात ते हिंदी भाषेचे शिक्षक आहेत. तिथल्या रंगमंचावरही ते सक्रिय असतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com