अज्ञाताचा प्रदेश... (मंगेश नारायणराव काळे)

अज्ञाताचा प्रदेश... (मंगेश नारायणराव काळे)

कोणत्याही ललितकलेच्या संदर्भातल्या अजून एका समानधर्मी गोष्टीचा इथं उल्लेख करता येईल. तो म्हणजे ‘कल्पिता’च्या, अज्ञाताच्या प्रदेशाची ओढ.  निर्मिक, कलावंत त्या कलेच्या संदर्भात किती आसुसलेला आहे, त्याला त्या कलेच्या पूर्वसुरी, वर्तमानातल्या रूपांचं किती ज्ञान, भान, आहे नि त्याच्या ठायी ‘कल्पिता’च्या प्रदेशाची किती आसक्ती आहे, यावर त्याची सर्जनप्रक्रिया अवलंबून आहे. केवळ कलानिर्मिती करणं, निर्मितीचा प्रदेश शाकारणं, भवतालाला प्रतिसाद देणं, एवढ्यापुरतं हे दायित्व मर्यादित असणार नाही, तर त्या कलापरंपरेतल्या जुन्याचा त्याग करणं, ‘नवी’ भर घालणं, त्यासाठी प्रतिरोध निर्माण करणंही अभिप्रेत आहे.

जें होये ना नव्हे। जे नाहिं ना आहे।
जें पाहुनु उपाये। उपजति ना ।।
(ज्ञानेश्वरी ः अध्याय १२, ओळ ४४)


द  र्शन, कला नि विज्ञान या तीनही घडणींत समानधर्मी कोणती गोष्ट असेल, तर ते म्हणजे निसर्गदत्त कुतूहल. मानवी सभ्यतेच्या जवळजवळ दहा लाख वर्षांच्या मोठ्या कालखंडात अगदी अलीकडच्या काळात मानवी सभ्यता विचारप्रवण झालेली दिसत असली, तरी विश्वासंबंधीचं कुतूहल नेहमीच त्याच्यासोबत होतं. त्याचे असंख्य पुरावे आपल्याला आपल्या पुरातन संचितातून, वारशातून पाहता येतात. त्यामुळं क्रमच लावायचा झाला तर कला, दर्शन नि विज्ञान असा हा प्रवास पाहता येतो. अर्थात हे विधानही तसं पुरेसं नाही. कारण या लाखो वर्षांतल्या प्रवासातला एक मोठा कालखंड आपल्यासाठी अज्ञातातच आहे. एक मात्र निश्‍चित, की मानवी सभ्यतेच्या या प्रदीर्घ प्रवासात मानवाला समृद्ध करणारी; त्याचं माणूसपण, निर्मिकपण घडवणारी जी काही महत्त्वाची घटितं आहेत त्यात दर्शन, कला नि विज्ञानाला आतोनात महत्त्व आहे. या तीन तत्त्वांच्या उपस्थितीशिवाय मानवी जीवनाचा विचार जवळजवळ अशक्‍य आहे. कलेचा बंध जसा थेट पाषाणयुगापर्यंत मागं जाऊन पाहता येतो, तसाच दर्शनाचा बंधही थेट इसवीसनपूर्व सहाव्या-सातव्या शतकापर्यंत मागं जाऊन पाहता येतो. भारतापुरतं बोलायचं झालं, तर दार्शनिक चिंतनाची सुरवात थेट उपनिषदांपासून झालेली दिसते. या दर्शनांनी मानवाला, निर्मिकाला विश्वाचा नि त्याचा नेमका काय बंध आहे, नातं आहे याचा बोध देण्याचं महत्त्वाचं कार्य केलं आहे. ‘कुतूहलातून’ मानवी कला अवतरत गेल्या असल्या, तरी दर्शनांनी मानवी मन समृद्ध नि विचारप्रवण केल्यामुळं ‘निर्मिक’ म्हणून त्याला पहिल्यांदा त्याच्या अभिव्यक्तीचं प्रयोजन सापडलं. विज्ञानानं मानवाचं भौतिक आयुष्य जसं समृद्ध केलं, तसंच कलेच्या सानिध्यासाठी त्याला अनेक माध्यमं उपलब्ध करून दिली. विज्ञानात लागलेल्या नवनवीन शोधांमुळं विकसित झालेल्या तंत्रामुळं मानवाचा कलेशी असलेला संबंध अधिक दृढ होत गेला. मानवी सभ्यता, समाज, संस्कृतीची जडणघडण सुकर होत गेली. त्यामुळं असं म्हणता येईल, की कोणत्याही दर्शनांचा, कलांचा, विज्ञानाचा विस्तार जसजसा निसर्गदत्त कुतूहलातून होत गेला, तसतसा त्याचा प्रवास ‘अज्ञाता’च्या प्रदेशाकडं होत गेला. कला नि विज्ञानाची नवनवी रूपं त्याला या कल्पित प्रदेशात सापडली. कलांच्या संदर्भात सांगायचं, तर त्या एक मानवनिर्मित ‘प्रॉडक्‍ट’ असल्या, तरी त्यांचं अस्तित्व, असणं हे मानव नि विश्वाच्या नात्यावर, साहयर्चावर बेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूनं असंही म्हणता येईल, की कोणत्याही कलेचं अवतरीत होणं हे निर्मिकाशी, कलावंताशी, त्याच्या भवतालाशी जोडलं गेलेलं आहे.
निर्मिक, कलावंत, कला, दर्शन नि विज्ञानाच्या या परस्परावलंबी घडणीच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न समोर येतात. ते म्हणजे, कलावंत, निर्मिक, त्याचा भवताल, त्याचा वर्तमान, त्याचा भूतकाळ नि भविष्यासंबंधीची असोशी यांचं काही एक नातं असतं का? या नात्यातून तो काय स्वीकारतो नि काय टाकून देतो? कलावंत म्हणून, निर्मिक म्हणून तो त्याच्या समूहापेक्षा वेगळा कसा घडतो? वेगवेगळ्या अनुभवातून स्वतःला पुनःपुन्हा घडवत, आकारत तो सर्जनाकडं कोणत्या प्रेरणेनं जातो? सर्जन हे त्याचं साध्य असतं की साधन?

‘जें होये ना नव्हे। जे नाहीं ना आहे।’ असं जे ज्ञानेश्वर विश्व नि वस्तुमात्रांच्या बंधावर भाष्य करतात, त्याप्रमाणं जर ‘असणारं’ सगळंच मिथ्या असेल नि जे प्रत्यक्षात नाही, अप्रकट आहे ‘त्याच्या’ असण्याविषयी दृष्टांताची अपेक्षा व्यक्त केली जात असेल, तर कलावंत, निर्मिक या आभासी (व्हर्चुअल) जगाला कसा सामोरा जात असेल? नि अशा अनेक प्रश्नांच्या शोधात निघालेल्या कलावंताला, निर्मिकाला स्वतःच स्वतःचं आकलन, पुनर्मूल्यांकन करता येणं शक्‍य असेल का? ...असे अनेक प्रश्न जे सर्वसामान्य माणसाला प्रसंगी क्‍लिष्ट, अनाकलनीय वाटण्याची शक्‍यता असली, तरी कलावंत, निर्मिक ज्या अज्ञाताच्या प्रदेशाची असोशी बाळगतो त्या ‘कल्पित’ प्रदेशात अशा प्रश्नांसाठी नेहमीच खूप मोठी ‘स्पेस’ कायम उपलब्ध असते. कारण हा निसर्गदत्त अशा कुतूहलाचा प्रदेश असतो. या भूमीवरच तो त्याचा कलाव्यवहार त्याच्या अनुभूतीच्या परिघात घडवत असतो, घडवू देत असतो. उत्तराधुनिक कलेत तर हा परीघ विस्तीर्ण नि जाणीवपूर्वक घडवलेला पाहता येतो. कारण उत्तराधुनिक दृश्‍यकलेनं जेवढ्या मोठ्या प्रमाणावर कलेत दर्शन नि विज्ञानाचा हस्तक्षेप स्वीकारला, तितक्‍या प्रमाणातला हस्तक्षेप आधुनिक कलेच्या परिप्रेक्ष्यात या दोन्ही तत्त्वांचा (दर्शन नि विज्ञान) दिसून येत नाही.

‘कला नि मानव’ या संबंधात ‘कला ही सगळ्यांसाठी नाही नि कला ही सगळ्यांसाठी आहे,’ हे प्रख्यात अमूर्त चित्रकार पिएट मॉन्द्रिअनचं कोड्यात टाकणारं विधान आपल्याला समोर ठेवता येईल. ‘कला नि मानवी जीवन’ हे द्वैत मॉन्द्रिअनला अभिप्रेत होतं. या काहीशा गूढ वाटणाऱ्या विधानातून मॉन्द्रिअन मानवी जीवन नि कलेचा संबंध ‘मर्यादित’ समूहापर्यंत कल्पितो तसाच तो ‘अमर्याद’ समूहासाठीसुद्धा कल्पितो. थोडक्‍यात काय, कला नि मानवी जीवनाचा संबंध हा परस्परपूरक आहे, तसाच तो काही एक ‘विशेष तत्त्वाची’ अटही घालणारा आहे. शिवाय मानवी मनाला, संवेदनशीलतेला आकर्षून घेण्याचं, भुरळ घालण्याचं कार्य विविध कला नि त्यांची कलारूपं सातत्यानं करत असल्यानं ज्याप्रमाणे विश्वातल्या निसर्ग, प्रकृतीतत्वाची ओढ मानवी जीवनात प्रत्येक वळणावर पाहता येते, तशीच ओढ निसर्गतत्वातून प्रेरित होऊन अवतरणाऱ्या विविध कलारूपांमध्येही दिसून येते. यात थेट कलेशी संबंध असणारं, रीतसर शिक्षण, तंत्र आत्मसात केलेले निर्मिक दिसून येतात, तसेच कलेशी थेट कोणताही संबंध नसणारेही दिसून येतात. इथं असंही म्हणता येईल, की कोणतीही कला तिच्या सर्जनासाठी, नव्या कलारूपाच्या निर्मितीसाठी स्वतःच आपल्या ‘साधकाचा’ शोध घेत असते.

कोणत्याही ललितकलेच्या संदर्भातल्या अजून एका समानधर्मी गोष्टीचा इथं उल्लेख करता येईल. तो म्हणजे ‘कल्पिता’च्या, अज्ञाताच्या प्रदेशाची ओढ. ललितकलांचा नि मानवी संवेदनशीलतेचा बंध हा कुतूहलावर बेतलेला असल्यानं तर या ‘कल्पिता’च्या भूमीचं कलेच्या संदर्भात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ‘सर्जनाची भूमी’ म्हणूनही या प्रदेशाचा उल्लेख करता येईल. आज आपल्यासमोर असलेलं जे कलासंचित, कलावारसा आहे, यातली जी असंख्य कलारूपं आहेत ही सगळी काही एक अर्थानं तत्कालीन मानवानं, निर्मिकानं स्वतःच्या ‘असण्या’ला बळ देण्यासाठी घडवलेली, घडू दिलेली कलारूपं आहेत. या पार्श्वभूमीवर ‘कला नि मानव’ या द्वैताचाही विचार इथं आपल्याला करता येईल. कोणत्याही कलेची ‘घडण’ समजून घ्यायची असेल, तर त्या कलेचं मानवी जीवनातलं स्थान, उपयुक्तता, अपरिहार्यता याचा सगळ्यात आधी विचार करावा लागतो. कारण हे असं एक द्वैत आहे, जे कलेच्या प्रदेशात प्रत्येक वेळी निर्मिक, कलावंताकडून सोडवलं जातं नि पुढच्या वळणावरच्या निर्मिक, कलावंतासाठी पुन्हा अनाकलनीय बनून साद घालतं. एकार्थानं ते पुनःपुन्हा रचलं जाणारं असं द्वैत आहे. या द्वैतात निर्मिक, कलावंताचं कलेकडं आकर्षिलं जाणं-कुतूहलातून कलेला साद घालणं, घडवणं-नि कलानिर्मिती-अशी ही एकरेषीय रचना आहे. निर्मिक, कलावंत त्या कलेच्या संदर्भात किती आसुसलेला आहे, त्याला त्या कलेच्या पूर्वसुरी, वर्तमानातल्या रूपांचं किती ज्ञान, भान, आहे नि त्याच्या ठायी ‘कल्पिता’च्या प्रदेशाची किती आसक्ती आहे, यावर त्याची सर्जनप्रक्रिया अवलंबून आहे. निर्मिक, कलावंत जितक्‍या जास्त पूर्वतयारीनं, भान, ज्ञान, ओढ आसक्तीनं सामोरा जाईल, तितकी निर्माण होणारी कलाकृती ही सशक्‍त निपजेल. ‘जें होये’वर विसंबून न राहता, ‘जें नाही’ त्याचा पाठलाग इथं अपेक्षित आहे. तरच तो त्या त्या कलेच्या परंपरेत आपली उपस्थिती नोंदवू शकेल. स्वतःची ओळख निर्माण करू शकेल. हे करायचं असेल, तर त्याला त्याच्या ‘दायित्वा’चा परीक्ष समजून घ्यावा लागेल. केवळ कलानिर्मिती करणं, निर्मितीचा प्रदेश शाकारणं, भवतालाला प्रतिसाद देणे, एवढ्यापुरतं हे दायित्व मर्यादित असणार नाही, तर त्या कलापरंपरेतल्या जुन्याचा त्याग करणं, ‘नवी’ भर घालणं, त्यासाठी प्रतिरोध निर्माण करणंही अभिप्रेत आहे. अर्थातच प्रत्येक निर्मिकाला, कलावंताला हे शक्‍य नाही. फार थोडे निर्मिक, कलावंत ही कसोटी पार करू शकतात. मात्र, ‘सर्जनाची वाट नेहमीच निसरडी असते,’ ही धारणा उभी करून ही कसोटी पार करता येणं शक्‍य आहे. इथं ‘निसरडी वाट’ ही धारणा जशी अवघड, अप्राप्य लक्ष्याचा पाठलाग करणारी आहे, तशीच ती प्रसंगी ‘कपाळमोक्षा’चं सूचन करणारीही आहे. म्हणजे कोणतीही कलानिर्मिती ही एक अप्राप्य, अवघड, सहजासहजी न घडणारी अशी घटना आहे. या घटनेत निर्मिक, कलावंताचं भान, ज्ञान नि संतुलन पणाला लागलेलं आहे. एकतर अतिशय समृद्ध अशी कलानिर्मिती किंवा सपशेल अपयश, अशा दोन टकमक टोकांवर कल्पिलेली ही ‘सर्जना’ची गोष्ट. इथं ही धारणा कलानिर्मितीला अनन्यसाधारण महत्त्व देणारी नि सहजता, उत्कटतेला नाकारणारी वाटत असली, तरी या धारणेचा बंध सर्जनापूर्वीच्या पूर्वतयारीला निर्मिक, कलावंताच्या सर्जनक्षमतेला ठळक करणारा आहे. तिचं साध्य हे कलानिर्मितीचं अत्युच्च शिक्षर गाठण्याचं आहे. तिथं कलानिर्मितीकडं सहजतेनं, सोपेपणानं पाहण्याला वाव नाही.

काही एक अर्थानं कलेच्या उच्चतम अभिव्यक्तीची, कलेच्या ‘घडणी’तल्या प्युअरिटीची आस नि किशोरी आमोणकर यांसारख्या गानसरस्वती सर्जनासाठी ज्या ‘सुख सुखासि भेटो आले’ या ‘ब्रह्मानंदी’ अवस्थेला पोचण्याची अट घालतात, ती धारणा इथं अनुस्युत आहे.

कदाचित त्यामुळंच कलेच्या हजारो वर्षांच्या इतिहासात जवळजवळ प्रत्येक वळणावर ही कलाधारणा पुनःपुन्हा नव्या रूपात अवतरीत झालेली दिसते. केवळ चित्र काढण्याचा, शिल्प घडवण्याचा प्रयत्न करणारी कोणतीही व्यक्ती- ज्यानं चित्र-शिल्पकलेचा इतिहास, वर्तमान समजून घेतलेला नाही, कलाइतिहासातल्या  संप्रदायांची, प्रवाहांची ओळखदेखील नाही, तो त्यानं घेतलेल्या कलाशिक्षणातून त्याच्यापर्यंत पोचलेल्या तोकड्या ज्ञानावर नि शिकलेल्या तंत्रावर विसंबून राहून फार तर रंगाची आतषबाजी करण्यात किंवा पूर्वसुरींच्या आकारांना नव्यानं गिरवण्यात यशस्वी होईल किंवा रंग-रेषांच्या सलगीतून काही परिचित, अपरिचित आकार कॅनव्हासवर उतरवेल. मात्र, त्यातून कोणतीही ‘कृती’ घडणार नाही. ज्याला आपण कलावंताची ‘अनुभूती’ म्हणतो, तीसुद्धा प्रक्षेपित होणार नाही. कारण त्याचा भर हा अनुकरणावर नि शिकलेल्या ज्ञानावर असेल. त्यातच चित्रकलेच्या क्षेत्रात असलेल्या कलाबाजाराचं अस्तित्व त्याला सातत्यानं खुणावत असल्यानं कलेच्या भूमीत स्थिरावण्यापेक्षा त्याचा कल हा ‘कलाबाजारा’त स्थिरावण्यावरच जास्त असेल. दुर्देवानं कलाशिक्षणाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा कलेपेक्षा व्यावसायिक जास्त असल्यानं ती त्याची गरजही असल्यानं उमेदीच्या काळात अतिशय समृद्धपणे कलेचा मागोवा घेणारे अनेक कलाविद्यार्थी या ‘रॅट-रेस’मध्ये हरवून जातात. स्वतःला काय नि कसं व्यक्त करायचं आहे यापेक्षा कलाबाजारात काय ‘विकलं’ जाऊ शकेल, या चिंतातूरतेतून तो आपलं कलारूप निवडतो, घडवतो. विशेषतः आज अमूर्त चित्रांची निर्मिती करणाऱ्या नव्या फळीतल्या (किंवा गेल्या पिढीतल्या) अनेक चित्रकारांच्या कलाकृतींना सामोरं जाताना जाणवतं, की पूर्वसुरी ज्येष्ठ चित्रकारांच्या प्रभावातून मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते आहे. ‘प्रत्येक कलावंताला, निर्मिकाला आपला रंग, रेषा घडवाव्या लागतात. स्वतःची एक रंगसंहिता तयार करावी लागते,’ याची जाणीव कुठंच दिसत नाही.

इथं जतीन दास या ज्येष्ठ चित्रकाराची आजच्या नव्या चित्रकारांच्या संदर्भातली प्रतिक्रिया आठवतेय. कलावंताच्या ‘घडणी’संदर्भात ते रियाजाचा आग्रह धरताना दिसतात. ‘ड्रॉइंग इज लाइक रियाज. अँड आय एम सॅड दॅड ९९.९% हॅव निग्लेक्‍टेड इट,’ असं ते म्हणतात. रियाजाशिवाय कलावंत त्याला हवा असलेला आकार, रंग शोधू शकणार नाही, हेच ते अधोरेखित करतात. हा प्रश्न पडतो, की नव्या पिढीमध्ये ही असोशी का दिसत नाही? हे असं का व्हावं? पूर्वसुरींचा प्रभाव ही कोणत्याही कलेतली एक अपरिहार्य घटना असली, तरी त्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी काय करावं याचं आकलन न झाल्यानं त्याचा प्रवास दिशाहीन होतो. खरं तर प्रभावमुक्तीसाठी पूर्वसुरी कलावंताच्या निर्मितीचं सखोल ‘आकलन’ ही प्राथमिक अट आहे. मात्र, आवडणाऱ्या, प्रभाव टाकणाऱ्या ज्येष्ठ कलावंताच्या निर्मितीपासून दूर जाऊन, तिचे आकलन टाळून हा ‘प्रभाव’ टाळता येतो, या गैरसमजात तो पुन्हा त्वेषानं ‘नेणिवे’त रुतून बसलेल्या पूर्वसुरींचंच अनुकरण करत राहतो. या निर्मितीतून त्याला त्याची ‘ओळख’ मिळणार नाही. ती त्याच्या पूर्वसुरीची ‘ओळख’ असते. कलेच्या प्रातांत नेहमीच आपलं अनुकरण करणाऱ्या शिष्याला गुरूकडून शाबासकी मिळत असते, किंवा गुरूस्थानी असलेला कलावंत आपल्या शिष्यात स्वतःला कल्पत असतो. एका विशिष्ट अंतरापर्यंत असं अनुकरण स्वीकारार्हही असतं. मात्र, त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता ना तो जाणून घ्यायचा प्रयत्न करतो ना त्याचा पूर्वसुरी त्याला तो सांगतो. (इथं अपवाद असू शकतात.) कलाइतिहासाचा धांडोळा घेतला तर दिसून येतं, की आधुनिक कलेत प्रत्येक वळणावर महत्त्वाच्या कलावंताचं अनुकरण मोठ्या प्रमाणावर पुढच्या पिढीतल्या कलावंतांनी केलं. मात्र, फार थोड्यांना हा प्रभाव पचवून मुक्त होता आलं, स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करता आलं.

या संदर्भात जॅक्‍सन पॉलक या जगप्रसिद्ध चित्रकाराचं उदाहरण देता येईल. जॅक्‍सन पॉलाकच्या ‘ॲक्‍शन’ तंत्राचं गारुड इतकं विलक्षण होतं, की जगभरातल्या अनेक कलासमाजांत हा प्रभाव खूप दूरपर्यंत झिरपत गेला. मात्र या ‘ॲक्‍शन’ तंत्रानं दृश्‍यकलेच्या इतिहासात दुसरा पॉलाक घडवला नाही. याउलट अमूर्तातल्या ज्या अध्यात्माला पॉलाकनं पायदळी तुडवलं, त्याच पॉलकच्या समकालीन असलेल्या नि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अराजक, असुरक्षिततेच्या भावनेतून उभ्या राहिलेल्या अमूर्त अभिव्यक्तीवादी चळवळीत पॉलाकच्या बरोबरीनं सक्रिय असलेल्या मार्क रोथकोसारख्या महत्त्वाच्या चित्रकारानं अमूर्ततेतलं एक नवं अध्यात्म रचलं. तेही एका विस्तीर्ण नि आवेगी परीघात. पॉलाकच्या ॲक्‍शन तंत्रातून अवतरलेलं कलारूप हे जसं मानवी जीवनाच्या निरर्थकतेचं, आगतिकतेचं, अनिश्‍चिततेचं प्रतीक होतं, तसंच याच चळवळीतल्या रोथकोचं कलारूप मानवी क्षणभंगुरतेला लोकेट करणारं नि निसटून चाललेल्या मानवी मूल्यांना जपण्यासाठी स्पिरीच्युअलिटीला नव्यानं रचणारं होतं. त्यामुळं ‘प्रभावा’त वाहून न जाता किंवा त्याचा बाऊ न करता नवी पिढी आपल्या पूर्वसुरीकडून किंवा समकालीनांकडून प्रेरणा, घेऊन स्वतःला कशी घडवते, घडवू शकते ही घटना इथं महत्त्वाची ठरते. कलेचा इतिहास सांगतो, की प्रत्येक कालखंडात पूर्वसुरी परंपरेला स्वीकारून-नाकारूनच नव्या पिढीनं स्वतःला स्थापित केलं आहे. एका नव्या परंपरेची पायाभरणी केलेली आहे. ही खरं तर कोणत्याही कलेत घडणारी नैसर्गिक अशी ‘प्रभाव’वहनाची नि ‘प्रभाव’हरणाची गोष्ट आहे. म्हणजे जोपर्यंत नवी पिढी पूर्वसुरींच्या प्रभावाचं जाणीवपूर्वक ‘वहन’ करणार नाही, तोवर प्रभावहरणाच्या वळणावर त्याला पोचता येणार नाही नि स्वतःचं वेगळंपणही त्याला अधोरेखित करता येणार नाही.

कलेचा इतिहास सांगतो, की कोणत्याही कलेत ‘नवं’ असं काहीच नसतं. असते ते प्रत्येक वेळी केलं गेलेलं पुनर्सर्जन. फार तर पुनर्सर्जनाच्या या प्रक्रियेत काळाचे तुकडे मागं-पुढं होत असतात. म्हणजे हा किती विलक्षण योगायोग होता. की ज्यावेळी आधुनिक कलेत कॅन्डिन्स्की, पॉल क्‍ली, पिएट मॉन्ड्रीअन काझीमीर मस्थेविच अशी आकृतीलयाच्या (अमूर्ताच्या) शोधात निघालेली चित्रकारांची एक विलक्षण पिढी आकार घेत होती, त्याच वेळेस पिकासो-ब्राकच्या घनवादानं जगभरातल्या कलासमाजाला वेडावून टाकलं होतं. या प्रभावातून तत्कालीन काळात घनवादाचा अतिरेक इतका वाढला, की कॅनव्हासवरच्या प्रतिमेचा जवळजवळ लोप झालेला होता. ही घटना आकार-लयाच्या शोधात (अमूर्ततेच्या) असलेल्यांसाठी एका अर्थानं इष्टापत्ती ठरली. हे उदाहरण इथं सांगण्याचं प्रयोजन एवढंच, की कलावंत-निर्मिक हा त्याच्या कलाइतिहासातून, वर्तमानातून स्वतःच कलारूप ‘रचणं’ शिकत असतो. नि त्याला हे ‘प्रभावा’चं शास्त्र नीट समजून घेता येणं अपरिहार्य असतं.

इथं हेराल्ड ब्लूम या विख्यात अमेरिकन समीक्षकाची साक्ष ‘प्रभाव’धारणेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची आहे. ब्लूमचा ‘प्रभाव’ निष्कर्ष हा कवितेच्या संदर्भात असला, तरी तो साहित्याप्रमाणंच चित्र-शिल्पकला, संगीत आदी कलांच्या संदर्भात तंतोतंत वापरता येण्यासारखा आहे. ‘अँक्‍झायटी ऑफ इन्फ्लूएन्स’(प्रभावचिंता) हा शब्दप्रयोग ब्लूमनं या संदर्भात केला आहे. त्याच्या मते, ‘वर्तमानातल्या कवीची (कलावंताची) ताकद ही आपल्या पूर्वसुरींच्या प्रभावाशी लढण्यातूनच प्राप्त होत असते. काही एक अर्थाने ही ‘लव्ह अँड हेट’ या स्वरूपातली रिलेशनशिप असते.’ ब्लूमच्याच शब्दांत सांगायचं, तर  ‘पूर्वजांबद्दलच्या सुरवातीच्या प्रेमाचं रूपांतरण झपाट्यानं द्वंद्वात्मक संघर्षात होते. त्याशिवाय कवीचा (कलावंताचा) विकास शक्‍य नसतो.’

प्रभावचितेनं ग्रासलेल्या कलावंत, निर्मिकांनी ब्लूमच्या धारणेला समजून घेतलं, तर तो निश्‍चितच ‘नव्या’ निर्मितीसाठीच्या अज्ञाताच्या भूमीच्या शोधात जाऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com