प्रेरणा, स्वीकृती नि पुर्नरचनेचा बंध

mangesh kale
mangesh kale

निसर्ग ही एक अशी गोष्ट आहे, की तो चराचरातले सगळे आकार-रुकार, भ्रम-विभ्रम, रूप-अरूप एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विखरून ठेवतो. कलावंतानं ते आपापल्या वकुबानुसार वेचायचं असतं नि या सगळ्या सृजनवेळा प्रत्येक कलेत, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर येत असतात. यातून सृजनाची पुनर्रचना होत असते. जुनं, कालबाह्य गळून पडत असतं.

आपल्या अगोदर जगभरात इतक्‍या वेगवेगळ्या प्रकारची निर्मिती झालेली आहे, की आपल्याजवळ नवीन काही करण्यासारखं राहिलेलं नाही. आपण जर पूर्वी झालेलंच नीट नव्यानं रचू शकलो, तरी ते मोठं यश असेल.
- जहाँगीर सबावाला

कोणतीही मानवी संस्कृती ही तिच्या म्हणून असलेल्या चौकटीतच वेगवेगळ्या टप्प्यांवर उत्क्रांत होत असते. म्हणजे भारतीय संस्कृतीचा उत्क्रांती क्रम हा तिच्या सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय वारशातून जसा घडत गेला आहे, तसाच तो वेळोवेळी झालेल्या परकीय आक्रमणांनंतरच्या तुटलेपणातूनही घडत गेला आहे. मानवी संस्कृतीचा संकोच करणारी ही आक्रमणं त्या त्या संस्कृतीतून जसं काहीएक हिरावून घेत असतात, तसेच स्वतःसोबत आलेल्या बऱ्या-वाईट प्रथा-परंपरांचे, चाली-रीतींचे, कला-कसबांचे अवशेषही मागं ठेवून जात असतात. जगभरातल्या मानवी संस्कृतीच्या इतिहासाची पानं उलटून पाहिली तर अशा वेगवेगळ्या अवशेषांच्या खुणा पाहता येतात नि कोणत्याही संस्कृतीची विचारपूस करताना या खुणा, अवशेष ज्या कलारूपात सापडतात, त्या कलारूपांचा मागोवा घेत त्या त्या संस्कृतीविषयी काहीएक धारणा उभ्या करता येतात.

मानवी संस्कृतीचा इतिहास हा ‘कुतूहला’चा इतिहास आहे. या कुतूहलातून माणसानं आपल्या गरजा भागवण्यासाठी असंख्य शोध लावले. तेच कलेविषयीही म्हणता येईल. आज उपलब्ध असलेली जी असंख्य कलारूपं, कला-अवशेषाच्या रूपानं आपल्यासमोर आहेत, त्यातून त्या त्या काळातल्या मानवी समूहाचं जीवन, जगणं, कुतूहल, प्रेरणा यांचा थोडाफार अदमास घेता येतो. दृश्‍यकलेच्या संदर्भात भारतीय संस्कृती जगभरातल्या संस्कृतीच्या तुलनेत बरीचशी प्रगल्भ असल्याचे पुरावे सापडतात. जगाच्या तुलनेत एकट्या भारतातच पाच हजारांपेक्षा जास्त ठिकाणी अश्‍मयुगीन कला-अवेशष सापडलेले आहेत. नर्मदेच्या खोऱ्यात ७०० पेक्षा जास्त ठिकाणी शिलाश्रये आहेत, आणि त्यातल्या अनेकांमध्ये रंगीत चित्रं रेखाटलेली आहे. यातलं जगप्रसिद्ध नि ‘युनेस्को’नं जागतिक वारसा म्हणून घोषित केलेलं ध्य प्रदेशातलं भोपाळजवळचं भीमबेटका हे एक गुहाचित्रं असणारं महत्त्वाचं ठिकाण. ‘अश्‍मयुगीन अजिंठा’ अशी ओळख असलेल्या भीमबेटकातली आदिमानवानं रेखाटलेली चित्रं म्हणजे आजच्या आधुनिक कलेचं आद्यरूप म्हणता येईल. भारतात अश्‍मयुगीन कलेचे अवशेष मोठ्या प्रमाणावर सापडतात. अगदी युरोपच्याही अगोदर भारतात उत्तर प्रदेशातल्या कैमूर डोंगरातल्या अश्‍मयुगीन रंगीत चित्रांचा शोध लागला होता. त्यानंतर १२ वर्षांनी जगप्रसिद्ध अल्तामिरा या प्रसिद्ध गुहाचित्रांचा. स्पेनमधल्या पिरनिज पर्वताच्या नैसर्गिक गुहेत आदिमानवानं रेखाटलेल्या चित्रांमुळं किंवा भीमबेटकातल्या चित्रांमुळं जगभरातल्या दृश्‍यकलेचा एक मोठा पुरावाच आपल्या हाती लागला आहे. तसं पाहिलं तर अश्‍मयुगीन मानव भारतात १५- २० लाख वर्षांपूर्वी आल्याचे पुरावे आता समोर आले आहेत. मात्र, भारतातले बहुतांश कला-अवशेष हे मध्य-अश्‍मयुगीन, म्हणजे फार तर १०-१२ हजार वर्षांपूर्वीचे आहेत. केवळ अपवादात्मक म्हणून दोन-चार पुराश्‍मयुगीन आहेत. मात्र, भारतात मानवप्रवेशाच्या २० लाख वर्षांचा कला-इतिहास हा आजही अज्ञानातच आहे, असं म्हणता येईल. भारतीय पुराणांमध्येही कलेच्या संदर्भात काही उल्लेख सापडतात. म्हणजे यक्ष व नाग जमाती या चिताऱ्यांचं काम करत असत. पुराणं ही कपोलकल्पित जरी मानली तरी दोन हजार वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय संस्कृतीत चित्ररेखनकला केवळ स्थिरावलेलीच नव्हती, तर ती निर्मितीच्या उंच शिखरावर होती, याचा ढळढळीत पुरावा म्हणून अजिंठा लेण्यातल्या चित्रकलेचा निर्देश करता येतो. या लेण्यांचं वय ख्रिस्तपूर्व २०० वर्षं ते इसवीसनाच्या आठव्या शतकापर्यंत मोजता येतं. पुढच्या दहाव्या-अकराव्या शतकात मात्र अजिंठ्याच्या विशालकाय भित्तिचित्रातून बहरणारी कला ही भूर्जपत्राच्या छोट्या मर्यादित आकारापर्यंत संकोचत गेलेली दिसते. जैन धर्मग्रंथातल्या चित्रमालिका हे याचं एक महत्त्वाचं उदाहरण दिसतं. एका अर्थानं हा कालखंड भारतीय स्थापत्यकलेचा नि शिल्पकलेच्या उत्कर्षाचा कालखंड होता, असंही म्हणता येईल. म्हणजे भीमबेटकातल्या आदिमानवाच्या रेखाटनापासून सुरू झालेला हा कलाप्रवास अजिंठ्याच्या भित्तिचित्रातल्या रंगलेपनाच्या अनवट तंत्रापर्यंत विकसित होत गेलेला दिसतो आणि पुढच्या काळात जैन धर्मग्रंथांतल्या लघुरूपापासून मोगलशैली, रजपूतशैली, कांगडाशैली अशा अनेक प्रांतवार शैलीरूपांतून, प्रयोगांतून, शक्‍यत्यांतून थेट आजच्या आधुनिक-उत्तराधुनिक रूपांपर्यंत आलेला दिसतो.
इथं सुरवातीलाच भारतीय कलारूपांचा, परंपरेचा आढावा एवढ्याचसाठी, की भारतीय चित्रकलेचं हे दालन कसं समृद्ध होत गेलं, याची साक्ष समोर असावी आणि या निर्मितीमागं असलेल्या प्रेरणास्रोतांचा, निर्मितीमागं दडलेल्या ऊर्जास्रोतांचा, कुतूहलाचा विचार आपल्याला करता यावा, कलेच्या विविध रूपांजवळ जाता यावं. कोणत्याही कलेचं निरुपण हे जसं काळ आणि अवकाशातच सिद्ध होत असतं, तसंच ते कोणत्या प्रेरणेतून, कुतूहलातून, संस्कारांतून निर्माण झालेलं आहे, या घटकांच्या अवलोकनातूनही केलं जात असतं. कलानिर्मितीमागचं प्रेरणातत्त्व तपासून पाहिल्याशिवाय ‘त्या’ निर्मितीचा आस्वाद घेता येणार नाही, तिच्याशी जवळीक साधता येणार नाही.

भारतासारख्या देशात कोणत्याही कलेविषयी सुरवातीच्या टप्प्यावर सामान्यजन ते कलारसिक हा परीघ जवळजवळ सारख्याच प्रमाणात रुंदावलेला दिसतो. कुतूहलही सारखंच असतं. म्हणजे ‘हे काय आहे?’ ‘हे असंच का आहे?’ ‘हे कसं सुचलं असेल?’ ‘यामागचं प्रयोजन काय?’ ‘याचा काय अर्थ आहे?’ ‘हे कशासाठी आणि कुणासाठी आहे?’ अशा अनेक प्रश्‍नांना इथं जागा आहे. साहित्य-संगीत-चित्रकला आदींसारख्या सहोदरकलांमध्ये सुचण्याच्या मागं अज्ञानात दडून बसलेल्या ‘त्या’ प्रेरणातत्त्वाविषयी जवळजवळ प्रत्येकालाच कुतूहल असतं. ते केवळ एवढ्याचसाठी, की जर प्रेरणातत्त्वाचा उलगडा झाला तर ती निर्मिती, ते सृजन, ती कलाकृती परिचिततेच्या पातळीवर येईल. ओळखीचं रूपांतर सलगीत होऊन ती कलाकृती एक रसिक-प्रेक्षक-वाचक-श्रोत्याच्या आवाक्‍यात येईल.
मानवी जीवनाचा परीघ हा प्रेरणेनं व्यापलेला आहे. प्रेरणा असल्याशिवाय पुढं जाता येत नाही. अगदी सामान्य जीवन जगतानाही आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी प्रेरणातत्त्वांचा आधार असल्याशिवाय पुढं जाता येत नाही. कलेच्या संदर्भात तर हे प्रेरणातत्त्व अधिकच निकडीचं ठरतं. भारतीय संस्कृतीतला गेल्या दोन हजार वर्षांतला किंवा थेट मध्य अश्‍मयुगीन काळापासून कला-इतिहास जरी पाहिला तरी हे लक्षात येतं, की प्रत्येक काळ नि अवकाशाच्या पार्श्वभूमीवर त्या त्या काळातल्या विविध प्रेरणा त्या निर्मितीमागं होत्या. म्हणजे थेट आदिमानवानं भीमबेटकात रेखाटलेली चित्रं ही काही कलानिर्मिती म्हणून निर्माण झालेली नसली, तरी त्यामागं काहीएक निश्‍चित ‘कुतूहल’ किंवा ‘प्रेरणा’ तर राहिल्या असणारच. कारण, या काळातली बहुतांश चित्रांकनं ही ‘शिकारीचं दृश्‍यरूप’ म्हणून मांडणारी आहेत किंवा सामूहिक नृत्यासारखे काही प्रसंग. ही दृश्‍यं तत्कालीन मानवी संस्कृतीसमोरचं कुतूहल आणि प्रेरणादायी प्रकारातले प्रसंग असू शकतात, म्हणूनच कदाचित त्यांनी ते रेखाटले असावेत. पुढच्या काळात या कुतूहलाचं नि प्रेरणेचं रूपांतरण थेट कलेत होईपर्यंतच्या हजारो वर्षात यात तंत्र, साधन, उपयोगिता यांची भर पडली आणि या सर्जनाला मानवी जीवनात एक हक्काची जागा मिळाली. मात्र, प्रत्येक टप्प्यावर या सर्जनामागच्या प्रेरणा बदलत गेलेल्या असणार हे उघड आहे. आहे त्यापेक्षा वेगळं निर्माण करण्याचं कुतूहल मानवी संस्कृतीच्या डीएनएतच असल्यानं तो कुतूहलातून नव्या प्रेरणास्रोताचा शोध घेत असतो. मानवी संस्कृतीच्या विकासासोबत हा परीघ रुंदावत गेला. पूर्वी भारतीय परंपरेच्या चौकटीतच उभा असलेला भारतीय कलासमाज वेगवेगळ्या आक्रमणकर्त्या राजवटींमध्ये नवं जे काही आलं ते स्वेच्छेनं, अनिच्छेनं स्वीकारत गेला, यातूनच भारतातल्या अनेक चित्रशैलींचा विकास झाला. आधुनिक काळात पाश्‍चात्य कलारूपांतून, कलाविचारांतून मोठ्या प्रमाणावर  स्वीकार वाढल्यानं त्याचा काहीएक बरा-वाईट परिणाम इथल्या निर्मितीवर झालेला आपण पाहू शकतो. 

या लेखाच्या सुरवातीलाच जहाँगीर सबावाला या ज्येष्ठ भारतीय चित्रकाराचं अवतरण दिलेलं आहे. सबावाला यांच्यावरील धारणेचा मथितार्थ हाच, की कलानिर्मितीच्या संदर्भात जागतिक कलापटलावर इतकं प्रचंड नि वेगवेगळ्या प्रकारचं काम झालं आहे, की आज आपण जे काही रचतो आहे, ते एका अर्थानं जुन्याचंच पुर्नसर्जन आहे. याचा अर्थ आपण काहीतरी ‘नवी’ निर्मिती केली, हा काही महानुभवांना होणारा साक्षात्कार उपरा आहे नि आपल्यासमोरचा किंवा पूर्वसुरी कलावंत हा कुणाच्या तरी प्रेरणेतून, प्रभावातून उभा राहिला आहे. इथं प्रेरणा नि प्रभाव या तत्त्वांचा विचार निश्‍चितच वेगवेगळा करावा लागेल. एखादी कलाकृती पाहून, वाचून, ऐकून, प्रभावित होऊन, तो संस्कार स्वीकारून त्या ‘कृती’च्या समकक्ष निर्मिती करणं, या प्रकारात पूर्वसुरी कृतीचं, कलावंताचं, त्याच्या शैलीचं लगेच स्मरण होतं नि पाहणारा, ऐकणारा, वाचणारा म्हणतो, ‘अरे, हे तर यांच्यासारखे आहे.’ यात स्वीकारलेला प्रभाव जसाच्या तसा प्रक्षेपित करणं हे एका अर्थानं दुसऱ्या कुणाला तरी कॉपी करणं ठरेल, म्हणूनच जर आपण प्रत्येक वेळी कलादालनातून गायतोंडे, हुसेन, रझा यांच्या अनेक नकला पुनःपुन्हा पाहत असू, तर ती कला नसून केवळ ‘नकलाकारी’ आहे, असं म्हणता येईल. मात्र, ज्या कॅन्डिन्स्की, पॉल क्‍ली, पिकासो यांच्यासारख्या पूर्वसुरीपासून प्रेरणा घेऊन जे भारतीय कलापटलावर घट्ट पाय रोवून उभे राहिले, स्वतःचं अस्तित्व शोधलं, त्यांनी केवळ नक्कल करून काय साध्य होईल? कारण नकलाकार हा जसं आहे तसं वहन करत असतो. प्रेरणातत्त्व मात्र तुमच्यातल्या सृजनला जागं करत असतं, दिशादर्शक ठरत असतं. अशा वेळी सुरवातीच्या काळात काहीएक प्रभाव दिसत असला, तरी त्या कलावंतांच्या सर्जक रियाजातून तो धूसर होत जातो. कारण इथं प्रेरणा हे प्रमुख तत्त्व आहे आणि प्रभाव हे दुय्यम तत्त्व.

कॅन्डिन्स्की, पॉल क्‍ली, पिकासो, ब्राक ही खरंतर समकालीन नावं. तरीही पिकासो, ब्राकच्या क्‍यूबिस्ट शैलीतून पॉल क्‍ली, ज्याँ मिरो यांच्यासारख्यांनी काहीतरी घेतलं. द्यूशाँच्या ‘रेडीमेड’पासून पिकासोनं काहीएक स्वीकारलं किंवा आफ्रिकी आदिवासी कलेनं पिकासोची ‘रेषा’ ठळक केली. हे जे सारखंपण, सहोदरपण आहे ते संगीत, गायकीतल्या घराण्यासारखं आहे. जे जे सहोदर आहे, त्या घराण्यातून हा स्वीकार पुढच्या पिढीत संस्कारित होत जातो. यातूनच कलेचं ‘स्कूल’ तयार होतं. अपवादानं काही वेळा संस्कार न होताही काही साम्यस्थळं आढळतात. कलेच्या संदर्भात यासाठीच ‘सहोदर’ ही संकल्पना मांडली जाते. एकाच वेळी दोन किंवा जास्त संस्कृतींमध्ये एकसारखी कृती घडणं. उदाहरणार्थ ः पॉल क्‍ली याचा तसा भारतीय धर्मसंकल्पनांशी, तत्त्वज्ञानाशी कोणताही थेट संबंध नसताना शिवलिंगसदृश प्रतिमा त्याच्या कृतीत सापडते. म्हणजे निसर्ग ही एक अशी गोष्ट आहे, की चराचरातले सगळे आकार-रुकार, भ्रम-विभ्रम, रूप-अरूप तो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विखरून ठेवतो. कलावंतानं ते आपल्या वकुबानुसार वेचायचं असतं नि या सगळ्या सृजनवेळा प्रत्येक कलेत काळाच्या प्रत्येक टप्प्यावर येत असतात. यातून सृजनाची पुनर्रचना होत असते. जुनं, कालबाह्य गळून पडतं. संगीतात, गायकीत तुम्ही कुठलं घराणं आपलं मानता, स्वीकारता यावर तुमची परंपरा निश्‍चित होत असते. संगीतामध्ये प्रत्येक घराण्याची एक शैली घडत गेलेली असते; त्यामुळं त्या त्या घराण्याची सांगण्याची पद्धत, भाषा वेगळी असते. त्यांचे लयीचे अंदाज वेगळे असतात. आवाज, स्वर, ताना घेण्याच्या लकबी, पद्धती वेगवेगळ्या असतात. कुमार गंधर्व यांनी म्हटलंय ः ‘‘जो गाणारा गातो ते गुरूंचे, बुजुर्गांचे संस्कार घेऊनच गातो. गाणारा वाटेल ते गायला तरी तुम्हाला जर ती गायकी कळली, तर तुम्हाला त्याचं घराणं कळेलच. गाणारा घराणं सांगत येतो. गाणारा गुपचूप येत नाही.’’ इथं कुमार गंधर्व यांची साक्ष महत्त्वाची आहे. कारण, हेच तत्त्व संगीतकलेची सहोदर असलेल्या चित्रकलेसारख्या कलेसंदर्भातसुद्धा तंतोतंत लागू होतं.

भारतीय चित्रकलेत अनेक ज्येष्ठ चित्रकारांवर असलेले पाश्‍चात्य प्रभाव, प्रेरणा तपासून पाहता येतात. उदाहरणार्थ : फ्रान्सिस बेकनचा प्रभाव तय्यब मेहता यांच्या सुरवातीच्या काही कृतींमध्ये दिसतो; पण तो पुढं विरळ होत होत नष्ट होतो. फारतर घराण्याच्या अंगानं हा प्रभाव, प्रेरणा पाहता येईल. गणेश पाईन यांच्यासारखा भारतातला एक अनवट चित्रकार पाश्‍चात्य अतिवास्तववादी प्रेरणेत ‘लोकेट’ होतो. मात्र, भारतीय पुराणांत मोठ्या प्रमाणावर आढळून येणारा ‘जादूई एलिमेंट’ तर आपल्याकडं पूर्वीपासूनच अस्तित्वात होता. विशेषतः बंगालसारख्या ‘जादूई एलिमेंट’ला मोठी स्वीकारशीलता असणाऱ्या प्रदेशात तर हे जादूई जग येणं साहजिकच आहे. ‘प्रेरणा’ या कधीच एकांगी नसतात. ज्ञात-अज्ञात स्रोतांमधून त्या निर्मिकावर कोसळत असतात. हा ‘कोसळ’ नव्या पिढीतला कलावंत कसा स्वीकारतो, पचवतो, कोणत्या परंपरेत, घराण्यात स्वतःला उभं करतो, यावर त्या प्रेरणातत्त्वांची महत्ता सिद्ध करता येते.उदाहरणार्थ : गायतोंडे, रझा यांच्या अगोदर पॉल क्‍ली हे नाव येतं. हुसेन यांच्याअगोदर पिकासो हे नाव येतं. हे प्रेरणा नि प्रभावाचं द्वैत आहे. जे कोणत्याही कलापरंपरेत, संस्कृतीत नित्यनेमानं घडत असतं. निर्मिक, रसिक, प्रेक्षक तिथं केवळ साक्षीदार म्हणून असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com