अनुभवण्याचं गारुडं (मंगेश नारायणराव काळे)

mangesh kale writes about modern art
mangesh kale writes about modern art

मेरिना अब्रामोविक या प्रसिद्ध युगोस्लावियन कलावतीनं परफॉर्मन्स आर्टमध्ये किंवा हॅपनिंगमध्ये केलेले अभूतपूर्व प्रयोग भारतीय मानसिकतेला केवळ थक्क करणारेच नाहीत, तर मुळापासूनच हादरवणारेही आहेत. भारतीय मन अशा प्रयोगांमधून ‘कले’चा शोध घ्यायला भलेही फारसं राजी होणार नसलं, तरी मेरिनासारखे कलावंत आधुनिक, उत्तराधुनिक काळात आपल्या प्रयोगांमधून नवनव्या शक्‍यता शोधण्याचा मनस्वी प्रयत्न करताना दिसतात.

म्हणौनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृते येणे।
सणु भोगिजे सणे । विश्‍वाचे नि।। - ज्ञानेश्‍वर

कोणतीही कलाकृती पाहणं, अनुभवणं म्हणजे काय? हा एक सनातन प्रश्‍न दृश्‍यकलेच्या परंपरेत, इतिहासात, वर्तमानात शिरताना हमखास पडणारा. या प्रश्‍नाच्या मागावर चालत राहिल्यास थेट आठव्या-नवव्या शतकापर्यंत मागं जाऊन या ‘पाहण्या’चे अनेक दृष्टान्त शोधता येतात. भारतीय वैदिक परंपरेतून ज्या वेगवेगळ्या विचारशाखा, ज्ञानशाखा पुढं आल्या, त्यातून जगाकडं पाहण्याचे, स्वतःच्या आत डोकावण्याचे किंवा जिथपर्यंत सामान्यजनांची दृष्टीही पोचत नाही तिथवर किंवा त्याहीपुढं जाऊन ‘पाहण्याचे,’ ‘पाहिल्याचे’ दाखले आढळतात. अर्थात हे सगळेच दृष्टान्त ‘अनुभवण्याच्या’ संदर्भातले आहेत. ‘पाहणं’ हा अनुभवण्याच्या प्रवासातला पहिला ‘थांबा’ म्हणता येईल. नवव्या शतकात उदयाला आलेल्या शैव परंपरेत ‘अनुभवण्याचं’ वर्तुळ पूर्ण झालेलं दिसतं. शैवदर्शनात ते साक्षात्कारी स्वरूपाचं आहे. एका अर्थानं ‘शैव’दर्शन म्हणजे अवघ्या सृष्टीकडं ‘पाहण्या’ची एक संपूर्ण दृष्टी आहे. ‘अनुभवण्या’च्या प्रवासाची ओळखदेख सांगण्यासाठी ‘अमृतानुभवा’तल्या शेवटच्या ओवीची साक्ष सुरवातीलाच समोर ठेवली आहे.

काश्‍मिरी शैवागमाचं योगशास्त्र नि काव्यशास्त्र ज्या ‘अमृतानुभवा’तून ज्ञानेश्‍वरांनी मराठीत सिद्ध केलं, त्या ‘अनुभवामृता’च्या पायथ्याशी ‘अनुभवण्या’च्या असंख्य लीळा सापडतात. असणं (शिवतत्त्व) नि भान, चित्त (शक्तितत्त्व) यांचा संयोग या ‘अनुभवण्या’मागं आहे. शमन करणारा ‘शिव’ नि चेतवणारी ‘शक्ती’ यांच्या एकरूपतेच्या अतोनात शक्‍यता यात अनुस्यूत आहेत. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी अनुभवामृताच्या या ग्रंथरूपी शिदोरीला ‘उत्सव’ मानलं आहे नि हा उत्सव सगळ्यांनी एखाद्या सणासारखा साजरा करावयाच आहे. ‘उत्सव आमार जाती, आनंद आमार गोत्र’ असं ओशो यांनीही कदाचित त्यामुळंच म्हटलं असणार. जे आहे ते, जसं आहे तसं स्वीकारणं, अनुभवणं, या अनुभवण्यातून अंतिमतेकडं जाणं. ज्ञानदेव ‘अनुभवामृता’च्या शेवटच्या ओवीत ज्या सणाचा, उत्सवाचा उल्लेख करतात, तोच उत्सव अनुभवण्यातून समाधी‘तत्त्वा’कडं जाणं आहे. आध्यात्मिक अर्थानं साधक आपल्या चित्तवृत्ती अगोदर नियंत्रित करतो नि त्यानंतर स्वतःतलं ‘चैतन्य’तत्त्व आकाश ‘तत्त्वा’त विलीन करतो. या क्रियेलाच विवेकानंदांनी समाधी म्हटलं आहे. वेदान्तातही ‘साक्षात्कारा’कडं घेऊन जाणाऱ्या ‘सविकल्प’ समाधीचा उल्लेख आहे. यात आत्म्यावरची सगळी आवरणं गळून पडतात नि पुढच्या पायरीवर बुद्धी, अस्मिता, ज्ञानाचा संकर होऊन एक प्रकारच्या संपूर्णतः रितेपणाची (Emptyness) अवस्था प्राप्त होते; ती ब्रह्मैक्‍याची. यालाच ब्रह्मानंदी टाळी लागणं (Ecstacy) असंही म्हणता येईल. कलेतही निर्मिक, सर्जकाच्या मनोवृत्तीचं वर्णन काहीसं असंच करता येईल.

इथं अर्थातच ही पडताळणी ‘कलारूपासाठीच’ किंवा ‘कलारूपातून’ अनुभवणं यासंदर्भात केली आहे. या ‘अनुभवण्या’च्या शोधात असलेली ही एक सविकल्प अवस्था आहे. अर्थात स्वतःची जाणीवच नष्ट होणं, भान हरपणं, निर्विकल्प होणं अशी अवस्थाही दुसऱ्या बाजूला आहे. मात्र, या प्रकारचं अनुभवणं अत्यंत दुर्मिळ प्रकारातलं म्हणता येईल. कलोपासनेत या अवस्थेपर्यंत फार थोड्यांना पोचता येतं; तेही फक्त निर्मिक, सर्जकालाच. या वाटेवरच्या रसिक-प्रेक्षकाला इथं स्थान नाही! त्यामुळं दोहोंमधलं द्वैतही यात घडत नाही. कोणत्याही कलेच्या संदर्भात ‘अनुभवण्या’च्या पातळीवरची अशक्‍यप्राय वाटू शकणारी ही घटना आहे.

आपल्या रोजच्या जगण्याच्या धबडग्यात जगात एक व्यक्ती/माणूस म्हणून वेगवेगळे अनुभव येणं नि ‘अनुभवणं’ ही प्रक्रिया सामान्यतः प्रत्येक सेकंदाला घडत असते. मात्र, निर्मिक-सर्जक-कलावंत म्हणून येणाऱ्या कोणत्याही अनुभवाला सामोरं जाणं यात मोठा फरक आहे. कलावंताचं ‘अनुभवणं’ हे कलारूपासाठीचं, ‘कलारूपातून’ अनुभवणं आहे नि या ‘अनुभवण्या’तूनच आस्वाद, अन्वयार्थ आणि अंतिमतेकडं घेऊन जाणारा महत्त्वाचा थांबा सापडतो. या थांब्यावर पोचल्यावरच पुढची वाट परिचित नि सहज होत जाते. एक सर्जक, निर्मिक अशा ‘अनुभवण्याला’ कसा सामोरा जातो नि दुसऱ्या बाजूनं एक रसिक, प्रेक्षक हे ‘अनुभवणं’ कसं स्वीकारतो/नाकारतो हे द्वैत समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण एकीकडं अनुभवण्याची ही प्रक्रिया एकाच वेळी किंवा एकानंतर दुसरी या क्रमानं घडणारी आहे. एका अर्थानं ती परस्परावलंबीसुद्धा आहे. सर्जक-निर्मिकाच्या ‘अनुभवण्या’जवळ जर रसिक-प्रेक्षक पोचू शकला नाही, तर हे द्वैत पूर्णत्वाला जात नाही. किमान दोन्ही ठिकाणी घडणारी अनुभवण्याची क्रिया ही समांतर असणं इथं अभिप्रेत आहे. कारण ही क्रियाच जर परस्परविरोधी घडत असेल तर सर्जक-निर्मिकाच्या अनुभवण्यातलं ‘समाधी’तत्त्व रसिक-प्रेक्षकाच्या दृष्टिक्षेपात न येता ते दुर्बोध ठरवलं जाऊन दुर्लक्षित राहण्याचा धोका संभवतो. भारतातल्या गायतोंडे, अंबादास, स्वामीनाथन, प्रभाकर बरवे आदींसारख्या महत्त्वाच्या नि ज्येष्ठ कलावंतांच्या संदर्भात हे पडताळून पाहता येतं. (इथं मिळालेलं यश, कीर्ती हा विषय पुन्हा वेगळ्या अंगानं चर्चिला जाऊ शकतो) किंवा अमूर्त कलेच्या (Abstract art) संदर्भात तर ही ‘दुर्बोधता’ नेहमीच ठळक होताना दिसते. इथं ‘अनुभवण्या’च्या दोन वेगवेगळ्या शक्‍यतांचाही विचार करून पाहता येईल. ‘सजाण’ अनुभवणं नि ‘अजाण’ अनुभवणं या दोन शक्‍यतांमध्ये ‘सजाण’ अनुभवणं हे सर्जक-निर्मिक आणि रसिक-प्रेक्षक हे द्वैत स्वीकारणारं आहे, तर ‘अजाण’ अनुभवण्यात दोघांमधलं द्वैत घडण्याच्या शक्‍यता धूसर होत गेलेल्या दिसतात. मात्र, कधी कधी पूर्वसंस्कार, उपजत ज्ञान यातूनही ‘अजाण’ अनुभवण्यातलं द्वैत साकारलं जाऊ शकतं. मात्र, हे क्वचितच अपवादानं घडतं. इथं काही प्रमाणात समांतर जाऊ शकणारं लोककलेचं (Folk art) उदाहरण देता येईल. इथला निर्मिक-सर्जक हा ‘अजाण’ अनुभवण्यातून व्यक्त होतो, असं म्हणायला वाव आहे. कारण, त्याच्या अभिव्यक्तीमागं ‘कलानिर्मिती’ असा सजग उद्देश नसतो. त्याची अभिव्यक्ती ही त्याच्या जीवनानुभवातून, परंपरेतून नि तो ज्या संस्कृतीत वाढला त्या संस्कृतीतून आलेली असते. त्यामागं कलावंताचा, सर्जक-निर्मिकाचा भाव नसतो. मात्र, त्याचं हे अनुभवणं, व्यक्त होणं कलाप्रांतात स्वीकारलं गेलं आहे. पिकासोसारख्या जगप्रसिद्ध चित्रकारापासून थेट आजच्या जगभरातल्या महत्त्वाच्या कलावंताच्या निर्मितीमागं असलेली लोककलेची प्रेरणा तपासून पाहता येते.

इथं ‘अनुभवण्या’संदर्भात सुरवातीलाच नमनाला घडाभर तेल यासाठी, की आधुनिक कलेच्या प्रांतात, विशेषत्वानं उत्तराधुनिक काळात, जे काही नवे संप्रदाय उदयाला आले, त्यांचा ‘बंध’ हा ‘अनुभवण्या’च्या क्रियेशी, त्याच्या क्रमाशी नि परस्परातल्या द्वैताशी आहे. तसं पाहिलं तर ‘अनुभवण्या’ची क्रिया ही निरंतर घडत राहणारी गोष्ट आहे. कलाकृतीच्या निर्मितीच्या अगोदरचं सर्जक-निर्मिकाचं अनुभवणं नि निर्मिती झाल्यानंतर किंवा त्याच्या प्रत्यक्ष प्रस्तुतीनंतर रसिक-प्रेक्षकाचं ‘अनुभवणं’ येतं. हा क्रम इथं सांगण्याचं प्रयोजन यासाठी, की दृश्‍यकलेच्या आधुनिक परंपरेत निर्मिक-सर्जक आणि रसिक-प्रेक्षक नात्यातलं द्वैत याच क्रमावर अवलंबून राहिलेलं दिसतं. मात्र, ज्याला उत्तराधुनिक कला म्हणता येईल, अशा या काळातल्या नव्या संप्रदायात हा क्रम उलटापालटा करण्याचा प्रयत्न या काळातल्या कलावंतांनी केलेला दिसतो. सादरीकरण (Performance art), घटितं (Happening), संकल्पनाकला (Conceptual art) अशा बऱ्याच अंशी ‘सहोदर’ असलेल्या संप्रदायात हा पारंपरिक ‘अनुभवण्या’चा क्रम जाणीवपूर्वक बदलण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. यातून अन्वयार्थाच्या शक्‍यता जशा वाढलेल्या दिसतात, तशाच काहीएक सर्जनाच्या नव्या शक्‍यताही समोर आलेल्या दिसतात. या नव्या संप्रदायाचं नातं मात्र पूर्वसुरींच्या कलेत अथवा साहचर्य असणाऱ्या कलांमध्ये आढळतं. सादरीकरणकलेचं नातं भारतीय परंपरेतल्या नाट्यपरंपरेत शोधता येतं. सादरीकरण हा नाट्यकलेचाच एक महत्त्वाचा अवयव! विशेषतः एकपात्री नाट्यात, मुद्राभिनयाशी निगडित मायमिंगसारख्या कलेत ‘सादरीकरण’ जास्त महत्त्वाचं दिसतं नि या सादरीकरणाचंच एक नवं रूप म्हणून आपल्याला या कलेकडं पाहता येतं. इथं फरक असलाच तर तो हाच, की पूर्वसुरींचं सादरीकरण हे क्रियाशील, आशयाला प्रवाहित करणारे, लेखकाला अभिप्रेत असलेल्या ‘विचारा’चं वहन करणारं नि सगळ्या घटकांच्या एकत्रिततेतून विशिष्ट अनुभव प्रदान करणारं होतं. याउलट या नव्या सादरीकरणात ‘क्रियाशील’ असण्याची अटच शिथिल करण्यात आलेली आहे!

म्हणजे परफॉर्मन्स करणाऱ्या सर्जक-निर्मिकानं ‘क्रियाशील’ असलंच पाहिजे असा आग्रह नाही किंवा तो हवं तेव्हा ‘सक्रिय’ अथवा ‘निष्क्रिय’ राहू शकतो नि प्रेक्षक-रसिकाच्या क्रियाशील होण्याची तो वाट पाहतो. एका अर्थानं रसिक-प्रेक्षक या घटकाचं आजवर असलेलं दुय्यम स्थान नाकारून त्याला समांतरत्व देऊन या ‘परफॉर्मन्स’मध्ये सहभागी होण्याचा आग्रह इथं दिसतो. शिवाय सहोदर असलेल्या संकल्पनकलेत निर्मिकाला-सर्जकाला अभिप्रेत असलेल्या विचारासोबत रसिक-प्रेक्षकानं असण्याचं गृहीतकही इथं नाकारलेले दिसते. आणखी एख विशेष म्हणजे, आधुनिक कलेच्या परंपरेत एरवी बराचसा निष्क्रिय असलेला रसिक-प्रेक्षक ‘सक्रिय’ होण्याचा खटाटोपही इथं दिसतो. तो सक्रिय व्हावा यासाठी त्याच्या अचेतन मनाला साद घालण्याचा, त्याला उद्युक्त करण्याचा प्रयत्नही यामागं आहे. या सगळ्याच्या पडताळणीसाठी आपण मेरिना अब्रामोविक (Marina Abramovic) या प्रसिद्ध युगोस्लावियन परफॉर्मन्स आर्टिस्टच्या प्रयोगांची साक्ष काढू या.

परफॉर्मन्स किंवा हॅपनिंगमध्ये तिनं केलेले अभूतपूर्व प्रयोग भारतीय मानसिकतेला केवळ थक्क करणारेच नाहीत, तर मुळापासूनच हादरवणारेही आहेत. एक मात्र नक्की, की भलेही भारतीय मन अशा प्रयोगांमधून ‘कले’चा शोध घ्यायला फारसं राजी होणार नसलं, तरी मेरिनासारखे कलावंत आधुनिक, उत्तराधुनिक काळात आपल्या प्रयोगातून नवनव्या शक्‍यता शोधण्याचा मनस्वी प्रयत्न करताना दिसतात. मेरिनानं सादर केलेलं एक प्रसिद्ध घटित किंवा परफॉर्मन्सचं उदाहरण इथं पाहू या...

या प्रयोगात ती आपल्या एका सहकाऱ्यासोबत गॅलरीतल्या आतल्या प्रवेशद्वारात विवस्त्रावस्थेत उभी राहिली नि अशा निष्क्रिय अवस्थेत खांबागत समोरासमोर उभ्या असलेल्या दोघांतल्या उरलेल्या अंतरामधून रसिक-प्रेक्षकांनी ये-जा करावी हे या प्रयोगात अभिप्रेत होतं. इथं सर्जक-निर्मिक असलेल्या मेरिना नि तिच्या सहकाऱ्याचं ‘अनुभवणं’ जसं अभिप्रेत होतं, तसंच दोहोंदरम्यान तयार झालेल्या या ‘प्रवेशद्वारा’तून ये-जा करणाऱ्या प्रेक्षक-रसिकाचं ‘अनुभवणं’ही अभिप्रेत होतं. इथं अर्थातच या ‘अनुभवण्या’त विवस्त्र स्त्री-पुरुषाच्या चोरट्या स्पर्शासाठी उत्सुक होणं आलं. तिथले रसिक-प्रेक्षकही असे बिलंदर, की ज्या निरुंद अंतरातून कुण्या एकालासुद्धा स्पर्शाविना धड पलीकडं जाता येणार नाही, तिथं हे रसिक-प्रेक्षक हातात बॅग, पाठीवरची सॅक यांसारख्या जास्तीच्या वस्तू सोबत घेऊन हे ‘प्रवेशद्वार’ पार करत होते.

दुसऱ्या एका मेरिनाच्याच परफॉर्मन्स/घटितामध्ये ती अतिशय सभ्यतेनं, म्हणजे नीटनेटके, पुरेसे कपडे परिधान करून सादरीकरणाच्या ठिकाणी ‘निष्क्रिय’ होऊन उभी राहिली. या सहा तासांच्या सादरीकरणादरम्यान मेरिनानं समोरच ठेवलेल्या टेबलावरच्या वस्तूंपैकी कोणत्याही वस्तूचा वापर (मेरिनाच्या ‘निष्क्रिय’ शरीरावर) करण्याची खुली मुभा दिलेली होती. या सहा तासांत ती कोणतीच प्रतिक्रिया देणार नव्हती. जो काही त्रास, छळ होईल, बरं-वाईट होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी तिचीच.

त्या टेबलावर कोणकोणत्या ७२ वस्तू होत्या? तर त्यात होतं ब्लेड, चाकू, दोरी, पाण्याची भरलेली बादली, साखळदंड, फुलं अशा वेगवेगळ्या रूपाच्या, आशयाच्या नि उपयोगाच्या वस्तू होत्या. सुरवातीला बराच वेळ प्रेक्षक-रसिक चुळबुळत राहिला. त्यानंतर काहींनी आपल्या जवळच्या कॅमेऱ्यानं हवे तसे फोटो काढले. काहींनी फुलं हातात दिली, काहींनी केसात माळली, काहींनी गळाभेट घेतली. हळूहळू रसिक-प्रेक्षकातली अस्वस्थता वाढून तो ‘सक्रिय’ होत गेला. काहींनी तिला बळजबरीनं उठवलं, निजवलं, बसवलं, ओरबाडलं, डोक्‍यावर पाणी ओतलं. जसजसा वेळ जात होता, तसतसा रसिक-प्रेक्षक जास्त आक्रमक होत होता. काहींनी तिचे कपडे फाडले. साखळदंडानं, दोरीनं हात-पाय बांधले. दोन्ही उघड्या पायांमध्ये चाकू आडवा ठेवला, निर्वस्त्र करूनही रसिक-प्रेक्षकांचं समाधान झालं नाही, तेव्हा एकानं तिचं ब्लेडनं रक्त काढलं, ओघळू दिलं. एकानं तर ते प्यायचाही प्रयत्न केला!

मेरिनाच्या या सहा तासांच्या ‘कलाकृती’त माणसाचं हिंस्र श्‍वापदात होणारं रूपांतरण मेरिनाला अभिप्रेत असेल का? गलितगात्र झालेली, वेदनेनं व्याकूळलेली, जखमी अवस्थेतली मेरिना सहा तासांनंतर पुन्हा सामान्य झाली. ती त्या प्रेक्षक-रसिकांमध्ये फिरायला लागली. आता ती सक्रिय नि प्रेक्षक-रसिक निष्क्रिय अशी स्थिती. तिच्या शरीरावर निष्ठूरपणे ‘वस्तू’ चालवणारे प्रेक्षक-रसिक अपराधबोधानं तिची नजर चुकवू लागले. तिच्या नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य त्या प्रेक्षक-रसिकांमध्ये नव्हतं.
मेरिनाचा हा प्रयोग मानवी मनोवस्था विशद करणारा तर होताच, शिवाय माणसाची बौद्धिक नि शारीरिक क्षमतेची दिवाळखोरी दर्शवणाराही होता. तिनं सादर केलेल्या निष्क्रिय ‘ऍक्‍ट’मधून उभं राहणारं सर्जक-निर्मिक आणि रसिक-प्रेक्षक हे जे नवं द्वैत समोर येतं, ते भारतीय मनाला स्वीकारायला जड जाणारं आहे. शिवाय सादरीकरण, घटितात ‘परफॉर्मर’ झालेला सर्जक मेरिनानं इथं निष्क्रिय करून टाकलाय नि निष्क्रिय असणाऱ्या प्रेक्षक-रसिकाला सक्रिय! या उलटापालटीत निर्मिकाच्या-सर्जकाच्या ‘अनुभवण्या’लाही तिनं कोसळण्याच्या ‘टकमकटोका’वर उभं केलेलं दिसतं!
उत्तराधुनिक कलेतल्या या नव्या संप्रदायांची भविष्यातली स्थिती काय असेल, हे सांगणं आज जरी अवघड असलं, तरी असे संप्रदाय कलेच्या शक्‍यता वाढवणारे असतात, हे मात्र नाकारता येत नाही. विशेषतः भारतासारख्या ‘अनुभवण्या’ची मोठी आध्यात्मिक परंपरा असलेल्या, तत्त्वज्ञानाची/दर्शनाची विविध रूपं असलेल्या प्रदेशात तर उत्तराधुनिक कलेतल्या या नव्या संप्रदायाचा स्वीकार नि त्याचं भारतीय रूप हा कुतूहलाचा नि औत्सुक्‍याचा विषय ठरू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com