‘चित्रसूत्रा’चं अवतरण (मंगेश नारायणराव काळे)

‘चित्रसूत्रा’चं अवतरण (मंगेश नारायणराव काळे)

एकीकडं रंग पाहता येणं, अनुभवता येणं किंवा रंगाचा स्पर्श जाणवणं या क्रिया घडण्याच्या शक्‍यता पडताळता येतात. तो वास्तवातला ‘जाणीवपातळी’वर घेतलेला अनुभव असतो. मात्र ‘रंग ऐकणं’ किंवा ‘चित्रं ऐकलं जाणं’ ही शक्‍यता वास्तवात अशक्‍यच असते. जर मग असं असेल, तर अमूर्त चित्रातले गायतोंडे-कादरी यांच्यासारखे दोन दिग्गज या अनुभूतीविषयी असं का सांगत आहेत?

चित्रसूत्रं न जानाति वस्तू सम्यङः नराधिप।
प्रतिमा लक्षणं वेत्तुं न शक्‍यं तेन कर्हिचित।।
(विष्णुधर्मोत्तर पुराण, खंड तिसरा, अध्याय दुसरा)

(हे राजन, जोवर तुला चित्रसूत्राचं ज्ञान होणार नाही, तोवर तुला प्रतिमा (चित्र/शिल्प) समजून घेता येणार नाही).
इथं सुरवातीलाच ‘चित्रसूत्रा’तलं हे एक अवतरण दिलं आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानंतर सौंदर्यशास्त्र नि कलानिरुपणाचा एक बृहद्‌ग्रंथ म्हणून विष्णुधर्मोत्तर पुराणाच्या तिसऱ्या खंडाकडं पाहता येईल. चित्र/शिल्प, संगीत, नृत्यादी कलांच्या साहचर्याची अपरिहार्यता, अनिवार्यता नि पूरकता यांची प्रदीर्घ चर्चा या ४३ व्या अध्यायात विभागलेल्या ‘चित्रसूत्रा’त केली आहे. कोणत्याही कलेविषयी कुतूहल असणाऱ्या कुणीही किंवा आपापल्या कलेत मग्न होऊन, काठोकाठ भरून पावणाऱ्या प्रत्येक कलावंतानं तर आवर्जून वाचावंच असं हे ‘चित्रसूत्र’ आहे.
साहचर्य, आंतरसंबंधांमधली अपरिहार्यता यासंबंधानं झालेला मार्कंडेय नि राजा वज्र यांच्यातला हा संवाद प्रत्येक कलेची महत्ता सांगणारा तर आहेच; शिवाय रसिक-प्रेक्षक-आस्वादक-अभ्यासक किंवा प्रत्यक्ष कलावंताच्या आकलनाच्या कक्षा रुंदावणाराही आहे.

राजा वज्र मार्कंडेय ऋषींना विचारतो ः ‘हे मुनिवर, मला देवतांच्या प्रतिमा (चित्र/शिल्प) निर्माण करण्यासाठीचं शास्त्र सांगावं.’ तेव्हा वर उल्लेखिलेलं उत्तर मार्कंडेय ऋषी वज्राला देतात. राजा वज्र मार्कंडेयांना पुन्हा विनंती करतो ः ‘मुनिवर, कृपया मला चित्रसूत्र समजावून सांगा.’ त्यावर मार्कंडेय पुन्हा उत्तरतात ः ‘हे वज्रा, जोवर तुला नृत्यशास्त्राची ओळख होत नाही, तोवर चित्रसूत्र नीट समजून घेता येणार नाही.’ वज्र पुन्हा विनंती करतो ः ‘मला चित्रसूत्र समजावून सांगण्याअगोदर नृत्यशास्त्र सांगावं.’ त्यावर मार्कंडेय वज्राला पुन्हा म्हणतात ः ‘तुला नृत्यशास्त्र समजून घ्यायचं असेल, तर वाद्यशास्त्र माहीत असणं गरजेचं आहे.’
वज्र पुन्हा विनंती करतो ः ‘मुनिवर, मला नृत्यशास्त्राच्या अगोदर वाद्यशास्त्र समजून सांगावं.’ त्यावर मार्कंडेय वज्राला पुन्हा म्हणतात ः ‘वज्रा, तुला वाद्यशास्त्र समजून घ्यायचं असेल, तर काव्यशास्त्र (गीत) माहीत करून घ्यावं लागेल.’
मार्कंडेय नि वज्राच्या या संवादाचं तात्पर्य काय तर, चित्र-शिल्प, नृत्य, संगीत, काव्यादी कलांमध्ये साहचर्याचं नातं आहे नि कोणत्याही एका कलेत प्रावीण्य मिळवण्यासाठी इतर कलांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ‘चित्रसूत्रा’च्या एकूण ४३ अध्यायांमधून कलाविषयक अत्यंत विस्तृत अशी चर्चा झालेली दिसून येते. उपपुराणांपैकी एक असलेल्या विष्णुधर्मोत्तर पुराणाची उत्पत्ती सातव्या शतकात काश्‍मीरमध्ये झाली.

या पार्श्‍वभूमीवर चित्रार्थाच्या दिशेनं निघालेले आस्वादक-रसिक-प्रेक्षक-कलाप्रेमी-कलावंत म्हणून तुम्ही किती ‘तयार’ आहात याला काहीएक निश्‍चितच महत्त्व आहे. म्हणजे ज्याप्रकारे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीला जाताना तुमचा कान किती पक्का आहे, यावर आस्वादप्रक्रिया ठरते, त्याचप्रकारे कोणत्याही कलेच्या सामीप्यासाठी कलारसिकांकडूनसुद्धा काहीएक सहभाग अपेक्षित आहे. मथितार्थ असा की, आस्वाद घ्यायचा तर रसिक-आस्वादक हा तयारीचा (Prepared) असला पाहिजे. इथं ‘तयार’ रसिकासाठी आपण ‘कलासाक्षर’ असा शब्दप्रयोग करू या. म्हणजे संगीतसाक्षर, नृत्यसाक्षर, चित्रसाक्षर, शिल्पसाक्षर, काव्यसाक्षर इत्यादी. या साक्षरतेच्या प्रत्येक पायरीवर चढून जाताना रसिक-आस्वादकाची साक्षरता अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल, त्याची निपुणता वाढेल. अर्थात ज्या समाजात साहित्य-कला-संगीत या चैनीच्या किंवा मूठभर लोकांपर्यंतच मर्यादित समजल्या जातात किंवा समाजाच्या मुख्य परिघात या कलांचं स्थान नगण्य असतं, तिथं या प्रकारच्या साक्षरतेचा आग्रह (तोही सामान्य रसिकांकडून) अनाठायी ठरतो. मात्र, कोणत्याही एका कलेत किंवा अधिक कलांमध्ये स्वारस्य असणाऱ्या कोणत्याही कलावंताकडून या प्रकारची साक्षरता अपेक्षित आहे. अर्थात इथं या प्रकारची ‘साक्षरता’ ही केवळ सुरवातीची पायरी असून, कलासाधनेतून त्या त्या कलेत एकरूप होत जाणं अपेक्षित आहे. इथं हे प्रतिपादन यासाठी की ‘मी रंग ऐकतो’ म्हणणारे वासुदेव गायतोंडे असतील किंवा ‘माझी चित्रं ऐकली जावीत’ म्हणणारे सोहन कादरी असतील, यांची कलानिष्ठा या कुळातली आहे.

म्हणजे एकीकडं रंग पाहता येणं, अनुभवता येणं किंवा रंगाचा स्पर्श जाणवणं या क्रिया घडण्याच्या शक्‍यता पडताळता येतात. तो वास्तवातला ‘जाणीवपातळी’वर घेतलेला अनुभव आहे. मात्र ‘रंग ऐकणं’ किंवा ‘चित्रं ऐकलं जाणं’ ही शक्‍यता वास्तवात अशक्‍यच असते. असं असेल तर अमूर्त चित्रातले हे दोन दिग्गज या अनुभूतीविषयी का सांगत आहेत? इथं रियाज, साधना, मेहनत अशी वरवर कारणमीमांसा शक्‍य आहे. मात्र, हा प्रवास ‘चित्रसूत्रा’त सांगितलेलं ‘कलासाहचर्य’ नि ‘आंतरसंबंधां’ यांच्याशी निगडित आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे किंवा याच अनुषंगानं आधुनिक चित्रकलेच्या परंपरेत डोकावून पाहिलं तर लक्षात येतं, की रंगाच्या ‘ऐकणं’ नि ‘ऐकलं जाणं’ यातलं जे संगीततत्त्व आहे ते गायतोंडे, कादरी यांचे पूर्वसूरी पॉल क्‍ली, कॅडिन्स्की यांच्या चित्रनिर्मितीतही दिसून येतं. मथितार्थ हाच, की संगीततत्त्वाचा निकटचा संबंध हा अमूर्ताशी आहे नि केवलाकार हा संगीततत्त्वाचाच एक उद्गार आहे.

आजवर कलांच्या आंतरसंबंधाची, साहचर्याची जी काही चर्चा झाली आहे, ती विशेषत्वानं चित्र नि संगीत कलेच्या साहचर्याची, आंतरसंबंधांचीच झाली आहे आणि त्यानंतर झाली आहे ती चित्र-काव्य कलेच्या संदर्भात. इथं आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की चित्रार्थशोधाच्या प्रक्रियेत चित्रातली प्रतिमा किंवा आकार हा केंद्र असतो नि या प्रतिमेचा, आकाराचा अन्वयार्थ हा त्या प्रतिमेशी, आकाराशी निगडित असलेल्या अवकाशावर अवलंबून असतो. रसिक-आस्वादकाची अर्थनिर्णयनासाठीची धडपड ही या दोन्ही घटकांवरच अवलंबून असते. त्यामुळे हा अवकाश कोणते संदर्भ प्रकट करतो, त्यातूनच अर्थनिर्णयनाची प्रक्रिया घडते. म्हणजे चित्रातली प्रतिमा/आकार संदर्भमूल्य असलेल्या अवकाशापासून वेगळा केला, तर प्रतिमा/ आकाराचा अर्थ धूसर होत जाईल. ही क्रिया अमूर्ततेत वेगानं किंवा मोठ्या प्रमाणावर घडताना दिसते. कारण, अमूर्त चित्रात ‘केवलाकार’ ही अंतिम स्थिती आहे किंवा आकाराचा अंत होणं ही शेवटची पायरी. केवलाकार नि त्या भवतालचा किंवा निगडित असलेला अवकाश यातून निर्माण होणारी स्पेस संगीततत्त्वासाठी ‘सहोदरघटना’ म्हणता येईल. कदाचित यामुळंच आकार-अंताच्या शेवटच्या पायरीवर संगीततत्त्वाचा आढळ वाढताना दिसतो. त्यामुळं हा काही निव्वळ योगायोग नाहीय, की पॉल क्‍ली, कॅडिन्स्की, गायतोंडे, कादरी यांच्यासारखे संगीततत्त्वाशी एकरूप होणारे चित्रकार ‘अमूर्त’ चित्रकार आहेत. याउलट थेट प्रतिमांकन करणाऱ्या किंवा आकारालाच चित्रावकाशात ठळक करणाऱ्या चित्रकृतीत संगीततत्त्व दिसून येत नाही. मात्र, थेट प्रतिमा नि आकार टाळून स्थिर, अचल प्रतिमांचं एका मोठ्या अवकाशात संयोजन करणाऱ्या प्रभाकर बर्वे यांच्यासारख्या काही मोजक्‍या चित्रकारांच्या चित्रचौकटीत संगीततत्त्व दिसतं. इथं अर्थातच ‘रंगभान’ हा एक महत्त्वाचा अवयव असतो.
खरंतर प्रत्येक चित्रकार आपापल्या परीनं रंगांशी जुळवून घेत असतो. मात्र, रंगांशी खेळता येण्याचं, रंगाशी क्रीडा करण्याचं कसब काही मोजक्‍याच चित्रकारांना साध्य झालेलं दिसतं. बर्वे यांच्या चित्रसृष्टीत फेरफटका मारून आल्यावर आस्वादक-रसिकाला हा रंगभानाचा ठळक अनुभव अनुभवता येतो. इथं बर्वे यांचा संदर्भ आलाच आहे, तर त्यांची रंगधारणा गायतोंडे यांच्या समकक्ष ठेवून पाहू या. कारण रंग ऐकण्याचा दृष्टान्त बर्वे यांनाही झालेला आहे. अर्थात बर्वे यांची रंगधारणा ही गायतोंडे/कादरी यांच्या कुळातली नाही. ते म्हणतात ः ‘आपण शांतपणे ऐकू लागलो की रंग बोलतात, फिके रंग कुजबुजतात. मध्यम रंग बरंच काही सांगतात. तेजस्वी रंगाचा हलकल्लोळ माजतो. एकच गडद रंग प्रामुख्यानं कॅनव्हासवर हळूहळू पसरत गेला, तर तो सागरासारखा गंभीर ध्वनी निर्माण करतो. हलकेफुलके रंग झुळझुळ वाऱ्यासारखे मंद मंद हुंकारतात...रंग गातात, जल्लोषही करतात आणि कधी कधी मूक होऊन रंग ऐकतातही. रंगामधून संगीतातला सनातन ‘सा’ हा शांततेचा मूलभूत नाद निघत असतो. रंग निर्माण करत असलेलं हे संगीत डोळ्यांनी ऐकायचं असतं. रंगाचा आक्रोश पाहता पाहता ऐकू येतो.’

बर्वे यांच्या या धारणेवरून असं निश्‍चितपणे म्हणता येतं, की बर्वे यांची रंगधारणा निखळ सौंदर्यवादी अवतरणातून या प्रक्रियेकडं (Process) पाहते. ती गायतोंडे-कादरी यांच्यासारखी केवलाकारी, सूफी परंपरेतून किंवा स्पिरिच्युअल रिॲलिटीतून आलेली नाही. इथं जोशात मारलेले रंगाचे फटकारे नाहीत. रंगाची बेहोशीतली उधळण नाही. वस्तू, आकार, प्रतिमांची चित्रावकाशात रेलचेल नाही. आकारांची-प्रतिमांची मोडतोड नाही. अवकाशाचं भंजन नाही. आहे ते एक शिस्तबद्ध संवेदन आणि त्यातून होणारी क्रमबद्ध अभिव्यक्ती. जे काही आहे ते आखीव-रेखीव. ‘जाणिवे’त घट्ट उभं राहणारं. कदाचित त्यामुळंच श्रद्धा, समर्पण नि साधना ही त्रिसूत्री ‘सौंदर्यवादी’ जाणिवेच्या दुसऱ्या टोकावर अनुभवता येते. मात्र, बर्वे यांचं चित्रकृतीमागचं संयोजन, रंगप्रवृत्तीशी असलेली जवळीक नि सृजनाच्या अनंत शक्‍यता शोधण्याची ध्यासवृत्ती यातून वर्बे यांच्या चित्रचौकटीतल्या आहे त्या अवकाशात संगीततत्त्वासाठी लागणारी स्पेस निपजते नि रंग-आकार-नादतत्त्वाचा सुंदर मिलाफ कलारसिकाला खिळवून ठेवतो. (कदाचित बर्वे यांच्या या संन्यस्त वृत्तीमुळंच त्यांनी नंतरच्या काळात पारंपरिक तैलरंग किंवा पॉप्युलर, ॲक्रॅलिक रंगापेक्षा ‘ॲनेमल’सारख्या निसरड्या प्रवृत्तीच्या रंगावर भिस्त ठेवली). इथं थोडे विषयांतर होईल; पण बर्वे यांच्या सृजनाचा आवाका पाहता, भारतीय चित्रकलेच्या परंपरेत त्यांचं स्थान ज्या अग्रक्रमानं, ठळकपणे अधोरेखित व्हायला हवं होतं, ते झालेलं दिसत नाही किंवा त्यांची पुरेशी समीक्षाही झालेली दिसत नाही.

...तर अमूर्ततेच्या अरण्यात भिन्न वृत्ती-प्रवृत्ती एकत्र नांदताना दिसतात. साहचर्य, आंतरसंबंध, परस्परपूरकता यांतून चित्रार्थाच्या शक्‍यता वाढीस लागतात, तर कधी या संकरातून जन्माला आलेल्या अभिव्यक्तीच्या नव्या रूपामुळं सगळ्या शक्‍यता नाकारून एका वेगळ्या अवकाशासमोर रसिक-प्रेक्षकाला थांबायला भागही पाडतात. अमूर्त चित्रकलेच्या संदर्भात ज्यॉ सेरानं लिहिलंय ः ‘आधुनिक चित्रकला म्हणजे नेमकं काय, असं लोक नेहमीच विचारतात. एका प्रसिद्ध चित्रकाराला विचारलं, की तुम्ही तुमच्या चित्राचा अर्थ सांगू शकाल का? तेव्हा तो चित्रकार म्हणाला, ‘शब्दांच्याच साह्यानं चित्राचा अर्थ सांगावा लागणार असेल, तर चित्र काढायची काय गरज आहे?’ थोडक्‍यात, चित्राची स्वतःची एक भाषा आहे. रंग-रेषांची भाषा नि ज्या प्रेक्षक-रसिकाला ही भाषा अवगत नाही, त्याला दुसऱ्या कोणत्याही भाषेत चित्राचा अर्थ सांगता येणार नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com