दृश्‍यम्‌ ! (मंगेश काळे)

दृश्‍यम्‌ ! (मंगेश काळे)

‘पाहणं’ हीसुद्धा एक कला आहे, अशी धारणा काही कलाभ्यासकांनी मांडली आहे. मात्र, जागतिकीकरणोत्तर काळात हे असं ‘पाहणं’ या प्रक्रियेतले अडथळे मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसतात. माध्यमक्रांतीनंतर पहिल्यांदाच ‘पाहण्या’चे असंख्य पर्याय समोर आले आहेत. इंटरनेटच्या मायाजालानं नि फेसबुक-ट्विटरसारख्या सोशल मीडियानं तर माणसाचं ‘पाहणं’ अक्षरशः खेचून घेतलं आहे.

सगळ्यांना चित्रकला समजून घ्यायची आहे...पण पक्ष्याचं गाणं समजावून घेण्याचा प्रयत्न आपण का करत नाही? ः पिकासो
स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो (१८८१-१९७३) ही आधुनिक चित्रकलेतली सगळ्यात मोठी आख्यायिका. एका अर्थानं गेल्या शतकातला ‘कल्चरल हीरो’ म्हणता येईल एवढी अमाप प्रसिद्धी मिळवलेला हा कलावंत. इथं सुरवातीलाच पिकासोचं वचन उद्‌धृत एवढ्याचसाठी केलंय, की ‘चित्रकृती-चित्रकार-प्रेक्षक’ (कला-रसिक) यांच्यातल्या आंतरसंबंधांबद्दल कलेच्या क्षेत्रात वारंवार बोललं जातं. तेव्हा इथं पिकासोचं विधान वरवर पहाता ‘चित्रकृती-चित्रकार-प्रेक्षक’ हे द्वैत नाकारणारं आहे किंवा पिकासो ‘पाहणाऱ्या’ला जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करत आहे, असं वाटेल. मात्र हे विधान त्या तथाकथित रसिक-प्रेक्षकांसाठी आहे, जे चित्रकलेला कोणत्याही पूर्वतयारीशिवाय भेटू इच्छितात, म्हणजे ‘घाई झालेला प्रेक्षक’ इथं अनुस्यूत आहे. या प्रकारचा प्रेक्षक-रसिक (भारतासारख्या कलांच्या बाबतीत बऱ्यापैकी उदासीन असलेल्या प्रांतात) तर मोठ्या प्रमाणावर आढळतो. खरंतर मानवी संस्कृतीच्या अगदी सुरवातीला जेव्हा मानवाला संवादासाठी भाषा सापडली नव्हती किंवा तो भाषेच्या शोधात असताना त्यानं सर्वप्रथम व्यक्त होण्यासाठी चित्रभाषेचाच वापर केलेला होता. भीमबेटकातल्या दगडावरची आदिम रेखाटनं हा त्याचा भक्कम पुरावा आपल्याकडं आहे. तेव्हा आधुनिक-उत्तराधुनिक काळातल्या माणसासाठी एक भाषा म्हणून का होईना चित्रभाषेची ओळख असण्याचा आग्रह अनाठायी ठरणार नाही.

पिकासो एकीकडं चित्रकलेबद्दलच्या कुतूहलाबद्दल नाराजी व्यक्त करतो आणि पुढं ‘पक्ष्याचं गाणं’ समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही, अशी तक्रारही करतो. इथं हे लक्षात घेतलं पाहिजे, की मानवाची जशी काहीएक भाषा असते, तशीच ती प्राणी-पक्षी यांचीही असते हे सिद्ध झालेलं आहे. मग पक्ष्याचं त्याच्या भाषेतलं गाणं माणसानं (रसिक-प्रेक्षकानं) कसं ओळखायचं? त्याचं व्याकरण काय? त्याची लिपी, स्वर, मात्रा कोणत्या? असे असंख्य प्रश्‍न ‘पक्ष्याचं गाणं’ शोधताना पडू शकतात. दोन वेगवेगळ्या जैविक समूहांतल्या भाषा थेट एकमेकींशी परिचित नसल्या तरी प्रगत जैविक समूहातला भाषक (मानव) मात्र हे ज्ञान सहवासातून, अभ्यासातून, संवेदनेतून किंवा अनुभूतीतून प्रयत्नपूर्वक मिळवू शकतो. याचा मथितार्थ हाच आहे, की ‘पक्ष्याचं गाणं’ समजून घेण्यासाठी रसिक-प्रेक्षक-श्रोता हा ‘तयारी’चा असला पाहिजे. संस्कारातून, अभ्यासातून, जवळिकीतून तो या अनवट भाषेच्या जवळ जाऊ शकतो. म्हणूनच पिकासो पक्ष्याच्या गाण्याचं ‘रूपक’ आपल्यासमोर उभं करतो. याच पार्श्‍वभूमीवर ‘चित्रकृती-चित्रकार-प्रेक्षक’ या द्वैताला नाकारणारं पिकासोचं दुसरं विधान पाहू या. ते असं आहे ः ‘मी माझं चित्र जसं जगतो, तसं ते प्रेक्षकांनी जगावं, अशी अपेक्षा कशी करता? माझ्याकडं चित्र दुरून येतं. किती दुरून कुणास ठाऊक. त्याला मी ओळखलेलं असतं. मी ते पाहतो, मी ते करतो आणि जे केलं, ते दुसऱ्या दिवशी माझं मलाही ओळखता येत नाही. अनेक दिवसांपासून माझ्या डोक्‍यात विकसित होणाऱ्या आणि माझ्या इच्छेविरुद्ध एक दिवस निर्मितीच्या अवस्थेत येणाऱ्या माझ्या स्वप्नांमध्ये, मूलभूत प्रेरणा-इच्छा-विचारांमध्ये कसं शिरता येईल?’ इथं पिकासोचा विरोध हा ‘प्रेक्षकांनी चित्रकाराच्या चष्म्यातून पाहणं’ किंवा ‘चित्रकाराच्या धारणा समोर ठेवून पाहणं’ या घटनेला आहे. इथं पिकासो रसिक-प्रेक्षकांची स्वायतत्ता अपेक्षित धरतो. त्याचं कथन सूचित करतं, की प्रेक्षक-रसिकाचा स्वीकार-नकार हा त्यावर झालेल्या कलासंस्कारांतून नि त्यातून उपजलेल्या स्वयंप्रेरणेतून झाला पाहिजे. चित्रकाराची सर्जकता, त्यातली गुंतागुंत नि प्रेक्षकाची स्वीकारण्याची वृत्ती यात गल्लत होता कामा नये. कलेच्या संदर्भात एकच एक अशी धारणा कधीच उभी करता येत नाही किंवा कला ही सतत स्खलनशील असणारी गोष्ट असल्यानं तिचा विशिष्ट अशा चौकटीतच अन्वयार्थ शोधता येत नाही. विशेषतः दृश्‍यकलेच्या संदर्भात तर इतकी वेगवेगळी वळणं आलेली दिसतात, की उत्तर-आधुनिक काळात पूर्वीच्या अनेक व्याख्या एकतर जुन्या, कालबाह्य झालेल्या दिसतात किंवा निसरड्या तरी. यातूनच कलेच्या निकटतेच्या संदर्भात प्रत्येक कालखंडात वेगवेगळी मिथकं तयार होत असतात. बऱ्याचदा प्रेक्षक-रसिक-वाचक अशा ‘रचित मिथका’चं बोट धरूनच कलाकृतीकडं जाऊ पाहतो. अर्थात इथं मिथकनिर्मिती किंवा त्याअंगानं होणारं आकलन अभिप्रेत नसून, अशी मिथकं तयार होण्यासाठी त्या कलाकृतीकडं ‘पाहणं’ ज्या अनेकविध पद्धतीनं होत असतं, ते ‘पाहणं’ (Seeing) अभिप्रेत आहे.

...तर पाहाणं ही कलाकृतीकडं जाण्याची पहिली पायरी. आणि जर समाज अशा प्रकारचं ‘पाहाणं’च टाळत असेल तर ‘चित्रकृती-चित्रकार- प्रेक्षक’ द्वैत कसं उभं राहणार? अर्थात या द्वैतासाठी केवळ ‘पाहण्या’ची क्रियाच तेवढी अपेक्षित नसून, ‘पाहण्या’च्या अनेक शक्‍यता निर्माण होणं अभिप्रेत आहे. या शक्‍यतांसाठी दुसऱ्या पायरीवर प्रेक्षक-रसिक कलाकृतीचं ‘अवलोकन’ संपवून त्या कृतीच्या कर्त्याचा शोध घेत असतो. कारण त्या चित्रकर्त्याची शैली, तंत्र, त्याच्या कामाचा परीघ याविषयी प्रेक्षक-रसिकाला किमान जुजबी ज्ञान असलं, तर तो ती चित्रकृती जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो नि त्याच्या ‘पाहण्या’तला आनंद दुणावू शकतो.

इथं आपण तैयब मेहता या भारतातल्या ज्येष्ठ चित्रकाराचं उदाहरण घेऊ या. ज्यांना तैयब मेहतांची चित्रशैली परिचयाची असेल, त्यांच्या लक्षात येईल, की मेहता आपला कॅनव्हास एका डायगोनल रेषेचा वापर करून विभागतात. त्यामागची त्यांची धारणा अशी होती, की त्यांचं चित्र त्यामुळं अधिक गतिमान झालं! किंवा त्यांच्या रंगाच्या वापराबद्दल त्यांचे समकालीन बहुतांश चित्रकार रंगमिश्रणातून स्वतःला हवा तसा रंग तयार करून वापरत असताना मेहतांचा कल मात्र ‘प्युअर कलर’ वापरण्याकडं आहे किंवा त्यांच्या आकृतीतलं ‘डिस्टॉर्शन’ही एका विशिष्ट मर्यादेतच झालेलं आहे. आता हे जर थोड्याफार प्रमाणात प्रेक्षक-रसिकाला माहीत असेल, तर तो त्या चित्राच्या अधिक जवळ पोचू शकेल. दुर्दैवानं भारतीय समाजात चित्र ‘पाहणं’ ही क्रिया पहिल्या पायरीवरच थांबते. अपरिचिततेमुळं भारतीय समाज चित्राकडं जाण्यास धजावत नाही. टाळतो. प्रदर्शनादरम्यान मात्र अशा संधी असतात; पण बऱ्याचदा चित्रकाराची उदासीनता, अहं (Ego), स्वतःहून रसिक-प्रेक्षकांशी संवाद साधण्याची तयारी नसणं अशा कारणांमुळं संवाद घडून येत नाही. चित्रकाराची ही कृती गैर आहे, असं इथं सुचवायचं नसून, ज्या प्रांतात चित्रकलेसारखी कला समाजापासून एका मोठ्या अंतरावर उभी आहे, अशा ठिकाणी ही वृत्ती ‘चित्रकृती-चित्रकार-प्रेक्षक’ यांच्यातल्या द्वैताला मारक ठरणारी आहे, हे सुचवायचं आहे. ...तर दुसऱ्या बाजूनं ‘चित्रकृतीला, चित्रकर्त्याला समजून घेण्यासाठी काहीएक कष्ट प्रेक्षक-रसिकानंही घ्यायचे असतात नि ते मी घेईन,’ असा विचार किती भारतीय प्रेक्षक-रसिक करतात? हा प्रश्‍नही इथं महत्त्वाचा आहे. या परिप्रेक्ष्यात त्यामुळं ‘चित्रकृती-चित्रकार-प्रेक्षक’ हे द्वैत उभं राहत नाही. असं म्हटलं जातं, की एक महत्त्वाची कलाकृती ही त्या काळाची नि तत्कालीन समाजाच्या प्रगल्भतेची ‘साक्ष’ असते किंवा असंही म्हणता येईल, की त्या काळाला दिलेला कलावंताचा तो ‘कलात्म’ प्रतिसाद असतो. विशेषतः चित्र-काव्य-संगीत या साहचर्य असणाऱ्या कलांच्या संदर्भात हे अनेक कोनातून तपासून पाहता येतं. मात्र, त्यासाठी ‘पाहणं’, ‘वाचणं’, ‘ऐकणं’ या क्रिया निरंतर घडत राहणं महत्त्वाचं असतं. काही कलाभ्यासकांनी तर ‘पाहणं’ हीसुद्धा एक कला आहे, अशी धारणा मांडली आहे; म्हणजे अशी एक विशिष्ट ‘शक्ती’ जी दूरपर्यंत पाहू शकते. भारतीय तत्त्वज्ञानात याला समांतर अशी ‘दिव्यचक्षू’ अशी एक व्याख्या आढळते (श्‍लोकवर्तिका ः कुमारिल भट्ट). यात दूरपर्यंत ‘पाहणं’ हा एक महत्त्वाचा ‘अवयव’ म्हणता येईल. जोपर्यंत हा ‘अवयव’ प्रेक्षक-रसिकांजवळ असणार नाही, तोपर्यंत कलाकृतीच्या असंख्य शक्‍यतांना ते भेटू शकणार नाहीत. मात्र, हा ‘अवयव’ उगवून येण्यासाठी प्रेक्षक-रसिकाचं पाहणं संशयी होणं गरजेचं आहे. कारण, या संशयातून निर्माण होणारे प्रश्‍न नि त्या प्रश्‍नांचा तार्किकतेतून व अनुभूतीतून केलेला पाठलाग यातूनच कलाकृतीच्या जवळ जाता येईल. (इथं ‘संशयी होणं’ ही संकल्पना सांख्यांच्या निरीश्‍वरवादातून घेतलेली आहे). इथं आपण पुन्हा मेहतांकडं येऊ या. बंगाली समाज-संस्कृतिविश्‍वाचा अविभाज्य भाग असलेल्या काली-दुर्गाचं मेहतांच्या चित्रात होणारं पुनर्सर्जन किंवा ज्या फ्रान्सिस बेकनचा प्रभाव मेहता मुरवून घेतात, त्या बेकनच्या चित्रामागची ‘हिंसा’ नि मेहतांच्या काली-दुर्गा यांसारख्या प्रतिमांमागची ‘हिंसा’ यांचा मेळ कसा घालायचा? असे अनेक प्रश्‍न या पायरीवर पडू शकतात. या प्रश्‍नांच्या शोधातच प्रेक्षक-रसिक पुढच्या पायरीवर पोचतो. या पायरीवरचं ‘पाहणं’ मात्र एक विशेष घटना म्हणता येईल. पतंजलीच्या योगसूत्रात अशा ‘पाहणं’साठी ‘दृश्‍यम्‌’ (Seen/ The knowable) असा शब्द योजला आहे. ‘पाहणं’ (Seeing) हा मानवाच्या अनेक ज्ञानचक्षूंपैकी एक घटक, जो वास्तवाच्या पल्याडचं सौंदर्य, अस्तित्व पाहणाऱ्याला अनुभूतीच्या स्वरूपात प्रदान करतो. तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत ही एक ज्ञानप्राप्तीची ‘साधना’ आहे, असंही म्हणता येईल. या अवस्थेत निव्वळ ‘पाहणं’ उरत नाही, तर जगाच्या उत्पत्तीविषयीचं कुतूहल असणारं ‘पाहणं’ यात अनुस्यूत आहे. खरंतर कुतूहल असणं हे मानवी स्वभावाचं नैसर्गिक असं वैशिष्ट्य आहे; पण फार कमी रसिक-प्रेक्षकांना हा ‘अवयव’ वापरता येतो, असं दिसून आलं आहे. हा ‘अवयव’ माहिती (Data), वास्तव नि अनुभवातून जन्माला आलेलं शहाणपण देणारा असतो किंवा अशी एक आत्मगत ‘खिडकी’ प्रदान करणारा असतो, जिच्यातून वास्तवापल्याडच्या ‘वास्तवाकडं पाहणं’ शक्‍य आहे. मात्र, पाहणारा या सगळ्या पायऱ्या चढून चित्रकृतीसमोर आलेला असेल, तेव्हाच ही खिडकी उघडणं शक्‍य होतं.

पतंजलीची ‘योगसंहिता’ इसवीसनपूर्व ४०० वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे ‘पाहण्या’विषयीचे संस्कार भारतीय प्रेक्षक-रसिकांवर झालेला आहे, असं म्हणायला वाव आहे.
थोडक्‍यात, या सगळ्या पायऱ्या चित्रकृतीच्या जवळ जाण्यासाठी महत्त्वाच्या आणि अपरिहार्य आहेत. हा क्रम आपण थोडक्‍यात पाहू या. ‘पाहणं’ हे कुतूहलाच्या पायरीवरून सुरू होतं...त्याच्या पुढच्या पायरीवर प्रेक्षक-रसिक हा सरावातून-ओळखीतून चित्रावकाशाजवळ जातो...त्याच्या पुढच्या पायरीवर ‘संशयी’ पाहणं, ही क्रिया जाणीवपूर्वक घडणारी आहे. तर्क, कल्पकता, कार्यकारण भाव इथं सोबत असतो. त्यामुळं या पायरीवरचं ‘पाहणं’ म्हणजे चित्रावकाशाला भिडण्याचा एक पूर्वनियोजित प्रयत्न ठरतो. यापुढच्या पायरीवरचं ‘पाहणं’ मात्र एका अर्थानं आतला आवाज (अनाहत/अनहद नाद) ‘ऐकणं’ असतं. तर्क, विचार, पूर्वग्रह, संयोजन बाजूला ठेवून खुल्या हृदयानं सामोरं जाण्याची अट यामध्ये असते. या पायरीवर पोचलेला प्रेक्षक-रसिक कोणत्याही आधाराशिवाय त्या कलाकृतीला प्रतिसाद देतो, संवादाला जागा निर्माण करतो. मात्र, जागतिकीकरणोत्तर काळात या ‘पाहणं’ प्रक्रियेतले अडथळे मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसतात. मानवी संस्कृतीच्या इतिहासात माध्यमक्रांतीनंतर पहिल्यांदाच ‘पाहण्या’चे असंख्य पर्याय (जे कधीच अस्तित्वात नव्हते) समोर आले आहेत. शेकडो मनोरंजनपर वाहिन्या, अध्यात्म, विज्ञान, शोध, प्रवास अशा बहुविध विषयांच्या बहुभाषिक वाहिन्या, सोशल मीडिया असं बरंच काही... यातल्या इंटरनेटच्या मायाजालानं नि फेसबुक-ट्विटरसारख्या सोशल मीडियानं माणसाचं ‘पाहणं’ अक्षरशः खेचून घेतलं आहे. आजचा प्रत्येक माणूस हा एकतर फोनवर बोलत असतो किंवा वाचत/पाहत तरी असतो. प्रश्‍न हाच आहे, की हे अडथळे पार करून कलेसाठीचं ‘पाहणं’- तेही प्रत्येक पायरी चढून जाण्याच्या अटीवर- कितपत शक्‍य होणार आहे! अर्थात ‘पाहणं’ ही एक निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे. अशा ‘पाहण्या’तून जन्माला येणाऱ्या शक्‍यतांमधूनच कलेतल्या ‘सत्या’जवळ प्रेक्षक-रसिकाला पोचता येईल किंवा ‘कला हे एक असं असत्य आहे, की जे आपल्याला सत्याची जाणीव करून देते. मात्र, आपलं असत्य हे सत्य आहे हे भासवण्याची किमया कलावंतानं आपल्या अभिव्यक्तीतून साधली पाहिजे,’  या पिकासोच्या धारणेतून त्याचं खंडनही करता येईल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com