उपरा उत्सव की समृद्ध अवशेष? (मंगेश नारायणराव काळे)

उपरा उत्सव की समृद्ध अवशेष? (मंगेश नारायणराव काळे)

कोणत्याही संप्रदायाचा जन्म हा विशिष्ट धारणेतून होत असतो. समानधर्माचे लोक आपल्या धारणा प्रत्यक्षात आणण्यासाठी नि पूर्वसुरींच्या धारणेला नकार देण्यासाठी एकत्रित येऊन संप्रदाय, चळवळ घडविण्यात हातभार लावतात. ‘पॉप आर्ट’ संप्रदायही अशाच काही धारणा घेऊन पुढं आला.

‘जर अँडी वॉरहोलची कला ही ‘आर्ट’ असेल, तर सिगारेटच्या पाकिटावरचा वैधानिक इशारा हीसुद्धा कविताच समजायला हवी’ सन १९६० च्या दशकात न्यूयार्क नि लंडन इथं आधुनिक चित्रकलेच्या परंपरेतलं ‘पॉप्युलर आर्ट’ (Pop Art) नावाचं वादळ स्थिरावल्यावर नि त्या नंतरच्या उत्पातानंतर एका अमेरिकी कलासमीक्षकानं उद्वेगानं काढलेले हे उद्गार आहेत. साठचं दशक पॉप आर्ट संप्रदायाच्या झंझावाताचं, पडझडीचं नि उत्पाताचं होतं नि याचा हीरो होता अँडी वॉरहोल (Andi Warhol). आधुनिक चित्रकलेच्या परंपरेत पिकासोनंतर खऱ्या अर्थानं एखाद्या सुपरस्टारसारखा जगलेला; जिवंतपणीच आख्यायिका होत गेलेला, मृत्यूनंतरही एक मोठा सेलेबल ‘ब्रॅंड’ ठरलेला अँडी वॉरहोल नि पॉप आर्ट संप्रदाय हे आधुनिक चित्रकलेतलं (DADA परंपरेतलं) एक महत्त्वाचं वळण म्हणता येईल. तरीही एका कलासमीक्षकानं वॉरहोलच्या किंवा एका अर्थानं पॉप आर्टच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारं विधान करावं?

वॉरहोल सादर करू पाहत असलेल्या निर्मितीला कला (Art) असं म्हणायलाच नकार द्यावा, हे धक्कादायक आहे. असं कशामुळं झालं? कोणताही बंडखोर कलावंत (किंवा चळवळ) जेव्हा परंपरेला नकार देऊन नव्याच्या शोधात निघत असतो, तेव्हा त्याच्या अंगी भिनलेला तुच्छतावाद हा पूर्वसुरींच्या कलेला दिलेला नुसता नकारच नसतो, तर बऱ्याचदा स्वतःचं वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी केलेला तो अट्टहासही असतो. यातूनच तो काही असंबद्ध, चमत्कारिक, हास्यास्पद कल्पनांचा पाठपुरावाही करत असतो...काही वेळा तर तो कलाविरोधी घटकही जवळ करत असतो. अशा वेळी जर तत्कालीन सांस्कृतिक समाजाकडून त्याला मोठ्या प्रमाणावर स्वीकृती मिळत असेल, कलावंतांचं एका ‘स्टार’मध्ये रूपांतरण होत असेल, तर ही स्वीकृती त्याला नावीन्याच्या ध्यासाकडं न्यायचं सोडून विक्षिप्ततेकडं घेऊन जात असते. यातून मूळ परंपराभंजनाचा उद्देश बाजूला पडून स्वीकृतीच्या, वाद-विवादाच्या नि चर्चेत टिकून राहण्यासाठीच्या क्‍लृप्त्यांची एक मालिकाच सुरू होते. अशा वेळी कलाव्यवहाराकडं आत्मीयतेनं पाहणारे अभ्यासक या बंडखोरीतल्या ‘बनवे’गिरीला, क्‍लृप्त्यांना विरोध दर्शवतात, नकार देतात. लेखाच्या सुरवातीलाच उल्लेखिलेलं विधान हे ‘पॉप आर्ट’ संप्रदायानं; विशेषतः अँडी वॉरहोल या पॉपच्या सर्वाधिक चर्चित चेहऱ्यानं तत्कालीन काळात केलेल्या निर्मितीच्या ‘कलारूपा’संदर्भातच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारं आहे. कारण, ही निर्मिती कलेच्या नावाखाली केलेली फसवणूक होय, या भावनेतून तिला ‘विरोध’ झालेला दिसतो. इथं हे सांगण्याचं प्रयोजन एवढ्याचसाठी, की कोणत्याही बंडखोर संप्रदायाला परंपरा नाकारतानाच्या वळणावर या धोक्‍याला सामोरं जावं लागत असतं. विसाव्या शतकाच्या मध्यावर नि दुसऱ्या महायुद्धानंतर आधुनिक चित्रकलेच्या प्रांतातला हा बंडखोर संप्रदाय म्हणजे DADA परंपरेतलं दुसरं वळण म्हणता येईल.
आधुनिक कलेचा अमेरिकाप्रवेश ही घटना चित्रकलेच्या प्रांतात नवं पर्व सुरू करणारी होती. अमेरिकाप्रवेशाआधीच्या आधुनिक कलेच्या चळवळी या युरोपातच झालेल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातलं सांस्कृतिक केंद्र युरोपातून अमेरिकेकडं सरकलं. या सगळ्यामागं अर्थातच दुसऱ्या महायुद्धानंतरची पडझड, युद्धाचे दुष्परिणाम अशी अनेक कारणं नोंदवता येतात. कदाचित याच पडझडीचा परिणाम म्हणून युरोपातल्या अनेक कलावंतांनी युरोप सोडून अमेरिकेला जवळ केलं. यात मार्क शागाल, मॅक्‍स अर्नेस्ट, मॉन्द्रिआन यांसारखे कितीतरी महत्त्वाचे कलावंत होते.

दुसऱ्या महायुद्धाची सुरवात (१९३९) ते दुसऱ्या महायुद्धाचा शेवट (१९४५) नि त्यानंतरचा कालखंड - म्हणजे जवळजवळ एक दशक (१९४० ते १९५०) हे आधुनिक कलेच्या अमेरिकाप्रवेशाचं, रुळण्याचं, स्थिरावण्याचं नि बहरण्याचं दशक होतं, असं म्हणता येईल.

अमेरिकाप्रवेशानंतर आधुनिक चित्रकलेनं एक नवं वळण घेतलेलं दिसत असलं, तरी हे वळण परंपरेला नाकारणारं नव्हतं, तर काही अंशी परंपरेला छेद देणारं, परंपरेच्या कक्षा रुंदावणारं, आधुनिक कलेचा परीघ विस्तृत करणारं असं होतं. कॅडिन्स्कीप्रणित ‘स्पिरिच्युअल’ अमूर्ततेचं रूपांतरण ‘ॲक्‍शन’ अमूर्ततेत करणारं असं हे वळण म्हणता येईल. १९४० नंतर अमेरिकेत दाखल झालेला हा संप्रदाय पुढं ‘अमूर्त अभिव्यक्तिवाद’ (Abstract Expressionism) या नावानं रूढ झाला. पुढं जवळजवळ दशकभर या संप्रदायाचं गारूड आधुनिक चित्रकलेच्या प्रांतावर पडलेलं आढळून येतं... व्हाया जॅक्‍सन पोलॉक (ॲक्‍शन पेंटिंग), विल्यम डी. कुनिंग-मार्क रोथको असा हा प्रवास असल्याचं दिसतं. अर्थात इथं कॅडिन्स्कीची ‘स्पिरिच्युअल’ अमूर्ततता ते रोथकोची ‘मिथका’तून अवतरणारी आध्यात्मिक अमूर्तता असं एक वर्तुळही पूर्ण झालेलं दिसतं. रोथकोनं स्वतःचं नातं पूर्वसुरींच्या अमूर्त चळवळींशी असल्याचं नाकारलं असलं, तरी स्वतःची ‘अमूर्त अभिव्यक्तिवादी’ ओळख जपलेली दिसते. या पंथात जॅक्‍सन पोलॉक, विल्यम डी. कुनिग, फ्रांझ क्‍लाइन, मार्क रोथको असे काही महत्त्वाचे चित्रकार होते. जॅक्‍सन पोलॉक नि त्याच्या समकालीनांच्या ‘ॲक्‍शन’तंत्राचं गारूड इतकं विलक्षण होतं, की या तंत्रापासून प्रेरणा घेऊन जगभरातल्या तरुण कलावंतांनी या प्रभावातूनच आपली वाट शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. दस्तुरखुद्द अमेरिकेत मात्र ‘ॲक्‍शन’तंत्राची तीच तीच पुनरावृत्ती, तेच तेच भडक रंग, साचलेपणा यामुळं या पॉप्युलर अमूर्ततेला ग्रहण लागलं. याच पोकळीचा (Empty space) उपयोग पॉप्युलर आर्ट संप्रदायाला आपलं बस्तान बसवण्यासाठी होत गेलेला दिसतो.

कलासाहित्यातला एक नैसर्गिक नियम म्हणजे साचलेपण वाढू लागलं, की परंपरेचं स्खलन सुरू होतं. जगभरातल्या आधुनिक कलासाहित्य-चळवळींचा इतिहास पडताळून पाहिला तर लक्षात येतं, की हा स्खलनबिंदू (Melting point) साधारणतः सरासरी तीन दशकांनंतर आलेला दिसतो. या प्रक्रियेमध्ये परंपरेचं द्राव्य (Liquidity) होणं अनुस्यूत असून, या द्राव्यतेमुळंच परंपरा जुन्याचं ‘विसर्जन’ नि नव्याचं ‘सर्जन’ करत असते नि ज्या परंपरा ‘दगड’ होतात, त्या द्राव्यतेला नकार देतात, त्या परंपरा कालबाह्य होऊन नष्ट पावतात.

पॉप्युलर कलेत (Pop art) नवा घटक हा होता, की या कलेनं नागरी संस्कृतीतल्या प्रतिमांचा वापर अग्रक्रमानं स्वीकारला. कलेत ‘उपयोजित’ असणारी जाहिरातकला नि अशा उपयोजित कलेतून जन्माला आलेली कला म्हणजे पॉप आर्ट असं बारसं होनेन्स एलोवे या कलासमीक्षकानं केलं. पुढच्या काळात इतर कलांमध्येही या घटकांचा वापर होऊ लागल्यानं हेच नाव सर्वत्र स्वीकारलं गेलं. पुढं पॉप आर्ट नि पॉप म्युझिकनं आपापल्या परंपरेत महत्त्वाचं स्थान मिळवलं.

ही चळवळ अमेरिकेत उभी राहिली असली तरी न्यूयॉर्क नि इंग्लंड अशा दोन केंद्रांमध्ये हा संप्रदाय बहरत गेलेला दिसतो. पाश्‍चात्य संस्कृतीचं अपत्य असलेल्या या संप्रदायाचा प्रभाव लगतच्या काळात जसा मोठ्या प्रमाणावर पडला, तसाच तो थेट नव्वदोत्तर काळापर्यंतही पाझरत आलेला दिसतो. अगदी जागतिकीकरणानंतरसुद्धा अनेक आशियाई देशांमधल्या कलेवरही हा प्रभाव पाहता येतो. मात्र, मधल्या ५० वर्षांत आलेल्या जगभरातल्या सहोदर नि विरोधी चळवळींनी DATA चळवळीतून प्रेरणा घेऊन उभ्या राहिलेल्या या पॉप संप्रदायाचं जसंच्या तसं अनुकरण न करता त्यातल्या काही घटकांचाच स्वीकार केलेला दिसतो.

पॉप आर्टची पडताळणी DADA संप्रदायाच्या पाऊलवाटेनं करताना एक फरक लक्षात घ्यावा लागतो, तो हा की DADA संप्रदायाचा विरोध असमाधान, साचलेपणा, नैराश्‍य यातून उभा राहिलेला होता नि त्यांचा मुख्य भर परंपरा नाकारण्यावर होता नि पहिल्या महायुद्धानंतरच्या पडझडीचे संदर्भ त्यामागं होते, तर दुसरीकडं पॉप संप्रदायाच्या विरोधाची कृती ही परंपरा थेट नाकारणारी नव्हती, तर या संप्रदायाचा हा नकार थेट सर्जनातून आलेला दिसतो. (उपहास, टर उडवणं हे DADA चं सूत्र मात्र इथंही आढळतं). आधुनिक कलेच्या पहिल्या परंपरेत त्याज्य असलेल्या किंवा दखलपात्र नसलेल्या, एका अर्थानं अडगळ, कचरा असलेल्या निरुपयोगी वस्तूंनी आशयतत्त्वाची नि रूपतत्त्वाची जागा घेतलेली दिसते. कोकच्या बाटल्या, फॅन, सूपचे डबे, झेंडे, ग्लॅमरविश्‍वातल्या चेहऱ्यांचा ‘चित्रप्रतिमा’ म्हणून थेट वापर (उदाहरणार्थ ः मेरिलिन मन्‍रोसारख्या सौंदर्य-सेक्‍शुॲलिटीचा संदर्भ असलेल्या प्रतिमेचा मोठ्या प्रमाणावर वापर) किंवा तत्कालीन पेज थ्री कल्चरमधल्या चेहऱ्यांना थेट स्थान देणं नि स्वतः चित्रकाराचंही पेज थ्री कल्चरमध्ये (प्रॉडक्‍ट म्हणून) रूपांतरण होणं हे अटळ होत गेलेलं दिसतं. कलेच्या इतिहासात अगदी सुरवातीच्या काळातसुद्धा (प्रबोधनयुग, १५ वं शतक) तत्कालीन पेज थ्री कल्चर, म्हणजे राजे-उमराव-सरदार घराण्यातले स्त्री-पुरुष, उदाहरणार्थ ः मोनालिसा) थेटपणे (प्रतिमेसह) कलेचा एक अविभाज्य अंग होतं. पॉपचळवळीच्या दशकातसुद्धा या संस्कृतीचा थेट शिरकाव चित्रावकाशात मोठ्या प्रमाणावर झाला. मुळातच ‘जाहिरात’कलेचं अपत्य असलेल्या पॉपकलेला मिळालेली प्रसिद्धी, स्वीकृती नि सर्वसामान्य ते सुप्रतिष्ठ (एलिट) वर्गापर्यंत पडलेला प्रभाव यामुळं या काळातला कलाबाजार तेजीत आलेला दिसतो.

इथं एका दुसऱ्या धारणेचाही उल्लेख करायला हवा. तो म्हणजे DADA संप्रदायातून आलेली पारंपरिक कलेसंबंधीची तुच्छतेची भावना, हास्यास्पद गोष्टींचं आकर्षण, भडक रंगसंगती, ‘कोलाज’ किंवा ‘कम्बाइन’मधून ‘रेडिमेड’चा वापर, निरर्थतेचं अवडंबर, युरोपीय कल्चरचं आकर्षण, पिकासो-फोबिया अशा अनेक गुंत्यांमुळं ‘कलामूल्यं’ दुर्लक्षित होऊन ‘दाखवे’पणा वाढीला लागत गेलेला दिसतो. यातूनच विक्षिप्तपणाच्या आख्यायिका, व्यसनाधीनता यांना इंधन मिळत गेलेलं दिसतं. यासंदर्भात जेन मिचेल बॅस्क्वीट (Jean michel Basquiat) या वयाच्या २७ व्या वर्षीच हेरॉईनच्या अतिसेवनानं अकाली मरण पावलेल्या अमेरिकी कलावंतांचं उदाहरण इथं देता येईल.

पॉप आर्टच्या उत्तरार्धात मूळ धरू लागलेल्या Neo-expressionism या संप्रदायाशी बॅस्क्वीटचं जवळचं नातं असलं तरी त्याच्या निर्मितीवर पॉप आर्टचा मोठा प्रभाव दिसतो. ग्राफिटीचा चित्रचौकटीत केलेला अनोखा वापर, तत्कालीन घडामोडींवरचा रोष प्रकट करणाऱ्या जळजळीत प्रतिक्रिया, प्रखर रंगांचा सढळ वापर आदी अनेक गोष्टींमुळं बॅस्क्वीट हा तत्कालीन अमेरिकी संस्कृतीत एक चलनी नाणं बनत गेला नि मोठ्या प्रमाणावर स्वीकृती, पैसा, ग्लॅमरच्या आभास-वास्तवाच्या खेळात त्यानं स्वतःला संपवलंही. इथं हे उदाहरण अशासाठी, की अमेरिकी उपभोक्तावादी जीवनशैलीचा अतिरेक या कलेत शिरला होता नि त्यामुळं पॉप आर्ट हा केवळ एक कला-संप्रदाय राहिला नव्हता, तर तत्कालीन सांस्कृतिक जीवनावरही याचा बरा-वाईट परिणाम मोठ्या प्रमाणावर होत होता.

रॉय लिख्टेन्स्टाइन (Roy Lichtenstein), अँडी वॉरहोल (Andy warhol), जॅस्पर जोन्स (Jaspar Johns), रॉबर्ट रॉशेनबर्ग (Robert Rauschenberg), क्‍लेस ओल्डनबर्ग (Claes Oldenburg), डेव्हिड हॉकनी (David Hockney), रिचर्ड हॅमिल्टन (Richard Hamilton) आदी महत्त्वाच्या चित्रकारांनी पॉप आर्ट संप्रदाय रुजवला, वाढवला. असं असलं तरी या सगळ्यांमध्ये जास्त चर्चेत राहिला तो अँडी वॉरहोल हाच! त्याज्य समजल्या गेलेल्या विषयांना (उदाहरणार्थ ः बाँबस्फोट, कारदुर्घटना, डेथचेअर आदी), ग्लॅमराइज्ड्‌ चेहऱ्यांना चित्रात जागा देणं (उदाहरणार्थ ः मेरिलीन मन्‍रो) अशा अनेक गोष्टींमुळं वॉरहोल नेहमीच चर्चेत राहिला. शिवाय, त्याच्या विवादास्पद जीवनशैलीमुळंही त्याच्याबद्दलचं कुतूहल वाढत गेलेलं दिसतं.
पॉपचळवळीचं DADA शी असलेलं नातं सांगणारे काही समान दुवेही इथं पाहता येतात. वॉरहोलची एक ‘निर्मिक’ म्हणून असणारी धारणा नि त्यातून कलाविरोधी तत्त्वांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वीकृती यातूनच स्टुडिओला ‘फॅक्‍टरी’ संबोधणं, स्टुडिओत (फॅक्‍टरीत) सहायक नोकरीला ठेवणं, चित्र प्रत्यक्ष हातानं रंगवण्यापेक्षा सिल्कस्क्रीनसारख्या तंत्राचा वापर करून एकापेक्षा अनेक प्रती निर्माण करणं या सगळ्याच गोष्टी पारंपरिक कलाधारणांना छेद देणाऱ्या, नाकारणाऱ्या होत्या. ‘आय वाँट टू बी अ मशिन’ असं कदाचित वॉरहोल त्यामुळंच म्हणत असावा.
मात्र, जॅस्पर जोन्स नि रॉबर्ट रॉशेनबर्ग ही जोडगोळी पॉप आर्टकडं जास्त गांभीर्यानं पाहायला भाग पाडणारी होती. काही काळ या दोन्ही कलावंतांनी एकत्रितही काम केलं होतं.

जॅस्पर जोन्सची वस्तूंना ‘नवी ओळख’ देण्याची कृती पॉप आर्टकडं अधिक कुतूहलानं पाहायला लावणारी होती, तर ‘जीवन आणि कलेतलं अंतर,’ कमी करण्याच्या ध्यासानं झपाटलेल्या रॉशेनबर्गचं ‘कम्बाइन’ तंत्र या व पुढच्या बंडखोर संप्रदायाला नवी रसद पुरवणारं ठरलं, कधी अर्ध्या भागात रंग-रेषांचा उत्सव नि अर्ध्या भागात कोलाज, तर कधी वेगवेगळ्या ‘रेडिमेड’ वस्तूंच्या संयोगातून हे ‘कम्बाइन’ उभं राहत होतं.’ ‘मोनोग्राम’ हे रॉशेनबर्गचं एक उत्कृष्ट कम्बाइन ‘चित्रशिल्प’ म्हणता येईल. नेहमी उभी असणारी चित्रचौकट जमिनीवर अंथरूण त्यावर आरूढ झालेला बोकड नि हा बोकड चित्रचौकटीत एकटा नसून, एका टायरमध्ये तो अडकलेला आहे. चित्र-शिल्प असा संयोग तर यात आहेच; शिवाय ‘टायर’ची योजना करून एका तिसऱ्या तत्त्वाची उपस्थिती ‘कन्स्पेच्युअल आर्ट’साठी किंवा नंतरच्या काळातल्या ‘मांडणीशिल्पा’ची एक रंगीत तालीमच म्हणता येईल. रॉशेनबर्गच्या या किंवा अनेक चित्र-शिल्पांपासून पुढच्या कलावंतांनी प्रेरणा घेऊन काम केलेलं दिसतं. भारतात रॉशेनबर्गच्या ‘कम्बाइन’तंत्राचा अत्यंत चपखल नि नवी भर घालणारा वापर अतुल डोडिया या भारतीय चित्रकाराच्या काही कृतींमध्ये दिसून येतो.

कोणत्याही संप्रदायाचा जन्म हा विशिष्ट धारणेतून होत असतो. समानधर्मात लोक आपल्या धारणा प्रत्यक्षात आणण्यासाठी नि पूर्वसुरींच्या धारणेला नकार देण्यासाठी एकत्रित येऊन संप्रदाय, चळवळ घडवण्यात हातभार लावतात. ‘पॉप आर्ट’ संप्रदायही अशाच काही धारणा घेऊन पुढं आला. यासंदर्भात अमेरिकी पॉप शिल्पकार क्‍लेस ओल्डनबर्गचं वक्तव्य प्रसिद्ध आहे. तो म्हणतो ः ‘मी एका अशा राजकीय, रहस्यमय नि इरॉटिक कलेच्या बाजूनं उभा आहे, जी संग्रहालयात अडकून पडण्यापेक्षा मोकळ्या वातावरणात दिसायला हवी.’ इथं या वक्तव्याची साक्ष एवढ्यासाठीच, की पारंपरिक कलाधारणा, ‘एलिट’तत्त्व नाकारणाऱ्या पॉपचळवळीलाही शेवटी पारंपरिक कलेसारखं ‘म्युझियम’मध्येच बंदिस्त व्हावं लागलं. पॉपकर्त्यांना अभिप्रेत असलेली ‘लोकां’ची कला, ही चळवळ होऊ शकली नाही. कदाचित त्यामुळंच आधुनिक कलेतलं हे बंड एका दशकातच शमलं नि पुढची अनेक वळणं १९६० ते १९७० च्या दशकात उदयाला आली. याच वळणांच्या रूपानं पाठोपाठ आधुनिक कलेतलं तिसरं बंडही उभं राहिलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com