निर्मिकाचं कल्पित की परंपरेतलं द्वैत? (मंगेश काळे)

मंगेश नारायणराव काळे mangeshnarayanrao@gmail.com
रविवार, 7 मे 2017

उत्तराधुनिक कलेनं आधुनिक कलारूपाला नकार देणं हे समजण्यासारखं आहे; पण कलेच्या नावाखाली केली जाणारी ‘इन्स्टॉलेशन आर्ट’ या प्रकारातली थोतांडं मात्र या कलारूपांसंदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी, ‘कलेचा अंत’ करणारी आहेत, असं ठामपणे म्हणता येतं. याचा अर्थ पाश्‍चात्य देशांमध्ये झालेले ‘इन्स्टॉलेशन’चे सगळेच प्रयोग संशयास्पद होते असा नसून, ‘नव्या शक्‍यता’ तपासून पाहणाऱ्या प्रयोगांचं प्रमाण अत्यल्प होतं, अत्यल्प आहे, एवढंच.

उत्तराधुनिक कलेनं आधुनिक कलारूपाला नकार देणं हे समजण्यासारखं आहे; पण कलेच्या नावाखाली केली जाणारी ‘इन्स्टॉलेशन आर्ट’ या प्रकारातली थोतांडं मात्र या कलारूपांसंदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी, ‘कलेचा अंत’ करणारी आहेत, असं ठामपणे म्हणता येतं. याचा अर्थ पाश्‍चात्य देशांमध्ये झालेले ‘इन्स्टॉलेशन’चे सगळेच प्रयोग संशयास्पद होते असा नसून, ‘नव्या शक्‍यता’ तपासून पाहणाऱ्या प्रयोगांचं प्रमाण अत्यल्प होतं, अत्यल्प आहे, एवढंच.

मला कोणत्याही आकाराची शिल्पं बनवायची नाहीत, त्यात मला रुचीही नाही. मात्र, माझी एवढीच इच्छा आहे, की भोवतालातल्या भौतिक पसाऱ्यापासून दूर असलेल्या वस्तूचं, अनुभवाचं, आनंदाचं नि आस्थेचं शिल्प मला घडवता यावं.
- अनिश कपूर

जगातला समकालीन दृश्‍यकलेतला अत्यंत महत्त्वाचा कलावंत म्हणून ओळख मिळवलेल्या अनिश कपूर या भारतीय वंशाच्या दृश्‍यरचनाकाराची, चित्रकार-शिल्पकाराची साक्ष इथं सुरवातीलाच काढण्याचं प्रयोजन म्हणजे, या कलावंतानं ‘घडवण्या’ऐवजी ‘स्वयंभू’ निर्मितीची धारणा मांडली. विशेषतः उत्तराधुनिक कलासंप्रदायात बहुचर्चित ‘इन्स्टॉलेशन आर्ट’ या कलासंप्रदायाच्या निर्मितीमागं तर दूरपर्यंत कपूर यांचीही धारणा अनुवता येते. आज भारतात सगळ्यात जास्त कुतूहल ज्या उत्तराधुनिक कलासंप्रदायाबद्दल अजूनही टिकून आहे, ज्या कलासंप्रदायाबद्दल टोकाचे वाद-विवाद झाले आहेत, होत आहेत, अशा ‘इन्स्टॉलेशन आर्ट’बद्दलची कपूर यांची ही साक्ष महत्त्वाची आहे. भारतात गेल्या दोन-तीन दशकांत ‘इन्स्टॉलेशन आर्ट’चे झालेले प्रयोग, त्यातला भारतीय कलावंतांचा सहभाग हा काही अंशी नव्या शक्‍यतांचा शोध घेणारा असला, तरी बहुतांश प्रयोगांवर पाश्‍चिमात्य प्रयोगांची सावली पडलेली दिसून येते. तर नेमका कसा आहे हा कलासंप्रदाय? त्याची उत्पत्ती कुठं व कशी झाली? त्याचे पूर्वसुरी कोण? भारतीय संस्कृतीत हा संप्रदाय रुजला का? या संप्रदायाचं मूळ भारतीय समाजात, संस्कृतीत असल्याचा दावा अनेक कलावंत, अभ्यासक करतात, तो कितपत खरा आहे? असे अनेक प्रश्‍न सामान्य प्रेक्षक-रसिक-वाचक-कलावंतांना पडू शकतात.

उत्तराधुनिक दृश्‍यकलेतल्या अनेक कला-संप्रदायाप्रमाणेच ‘इन्स्टॉलेशन आर्ट’ची पाळंमुळं सापडतात ती थेट DADA चळवळीत. DADA संप्रदायाचे प्रणेते मार्शल द्यूशाँ यांच्या ‘फाउंटन’ (मुतारीचं भांडं) या कृतीकडं या उत्तराधुनिक कलासंप्रदायाचंही पूर्वसुरीपण जातं; अर्थात त्या वेळी द्यूशाँ यांचा हेतू भविष्यातल्या कला-चळवळींना ‘रेडीमेड’ विषय पुरवण्याचा नसला तरी ‘घडवण्या’पेक्षा ‘न घडवता’ सापडलेल्या (Found object) किंवा दिसलेल्या ‘रेडीमेड’ वस्तूला कलारूप देण्याचा होता हे नक्की. द्यूशाँ यांचं ‘रेडीमेड फाउंटन’ ते कपूर यांची ‘स्वयंभू’ निर्मिती असं इथं ‘न घडवण्याच्या’ हेतूनं एक वर्तुळही पूर्ण झालेलं दिसतं. अर्थात कपूर यांनी अनेक कलाकृती त्यांच्या अफाट नि स्तंभित करणाऱ्या शैलीत ‘घडवल्या’ असल्या, तरी त्यांची ‘स्वयंभू’ निर्मितीची कल्पना मात्र समकालीन दृश्‍यकलेला नव्या शक्‍यता देणारी ठरली आहे, हे नाकारता येणार नाही.

इथं ‘इन्स्टॉलेशन आर्ट’चे पूर्वसुरी शोधताना द्यूशाँ यांच्याच एका अनपेक्षित प्रयोगाचीही साक्ष काढता येईल. ‘चित्रकलेत करण्यासारखं फारसं काही उरलं नाही,’ या उद्वेगातून द्यूशाँ यांनी आपल्या आयुष्यातला एक मोठा कालखंड केवळ बुद्धिबळ खेळण्यात घालवला, हे सर्वश्रुत आहे. मात्र, याच बुद्धिबळाच्या व्यासंगात त्यांनी ‘एका (Nude) स्त्रीसोबत खेळलेला बुद्धिबळाचा डाव’ हे आजच्या इन्स्टॉलेशन, घटित, परफॉर्मन्स आर्टचं पूर्वरूप होतं, याकडं फारसं लक्ष वेधलं गेलेलं नाही. आजच्या अर्थानं ते एक ‘इन्स्टॉलेशन’ होतं नि ‘डाव संपल्यावर’ हे इन्स्टॉलेशन संपलं होतं. इथं द्यूशाँ त्या स्त्रीसमवेत सर्जकांच्या भूमिकेत होते, तर प्रेक्षक/रसिक हे ‘प्रेक्षका’च्या.
असं म्हटलं जातं, की ज्या वेळी युरोपात युद्ध संपलं होतं, त्या वेळी निर्माण झालेल्या अराजकात तिथला कलाबाजारही थंडावला होता. आर्ट गॅलरीज्‌ बंद होत्या, तेव्हा ‘कलावंतांना हवी असलेली ‘स्पेस’ उपलब्ध नाही’, या जाणिवेतून तत्कालीन कलावंतांनी आपल्या अभिव्यक्तीसाठी बाहेरची मोकळी जागा शोधली. तिथं त्यांनी आपल्या अभिव्यक्तीचं प्रदर्शन तत्कालीन ‘पॉप आर्ट,’ ‘पब्लिक आर्ट’ यांसारख्या संप्रदायातून प्रेरणा घेऊन सुरू ठेवलं. ही घटना, हे प्रयोजन ‘इन्स्टॉलेशन आर्ट’च्या निर्मितीमागं होतं, असं म्हणता येईल. पुढच्या काळात हा संप्रदाय ठळक होत गेला. ‘प्रोजेक्‍ट आर्ट,’ ‘टेम्पररी आर्ट’ अशा सुरवातीच्या अवस्थांमधून आजच्या उत्तराधुनिक ‘इन्स्टॉलेशन’च्या रूपापर्यंत हा प्रवास झालेला दिसतो. ‘इन्स्टॉलेशन आर्ट’चं प्रयोजन, प्रेरणातत्त्वाचा मागोवा घेताना थोडं मागं जाऊन पाहिलं तर आढळून येतं, की १९४० च्या दशकानंतर (दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात) ब्रिटनमध्ये एका अर्थानं, चित्रकलेपेक्षा शिल्पकलेला अधिक महत्त्व येत गेलेलं दिसतं. पुढच्या काळात तर शिल्पकलेत आमूलाग्र बदल होत गेलेले दिसतात. अमेरिकी शिल्पकार ॲलेक्‍झेंडर काडर (Alexandar Calder) यांनी अभियांत्रिकीच्या साह्यानं गॅलरीच्या हॉलमध्ये छताला टांगलेल्या अवस्थेत एक मोठं शिल्प उभारलं (१९५१). त्यात त्यांनी माशाच्या (Fish) आकाराचे लोखंडी पत्रे आडव्या तारांनी बांधून ठेवले. ते पक्ष्यासारखे हवेत तरंगत असल्याचा भास त्यातून निर्माण झाला. या ‘हलणाऱ्या’ शिल्पानं शिल्पकलेतल्या परंपरेला धक्का देण्याचं काम केलं. कारण, तोवर शिल्प म्हणजे स्थिर आणि पेडस्टेलवर उभं असणं अपेक्षित होतं. दुसरं उदाहरण म्हणजे, ‘पॉप आर्ट,’ ‘पब्लिक आर्ट’ चळवळीचे प्रणेते क्‍लॅईस ओल्डनबर्ग (Claes Oldenburg) या अमेरिकी शिल्पकारानं प्लास्टर ऑफ पॅरिस, फोम, रंग अशा विविध माध्यमांतून एक भलंमोठं रंगीत ‘हॅम्बर्ग’ तयार करून ‘वस्तू’च्या प्रचलित रूपाला धक्का देण्याचं काम केलं. एक खाद्यवस्तू- तीही वास्तवापेक्षा कितीतरी पटींनी महाकाय- तत्कालीन प्रेक्षक-रसिकांना चकित करणारी ठरली. आता ‘इन्स्टॉलेशन आर्ट’चं थेट उदाहरण घेऊ या. ख्रिस्तो व्लादिमिरोव्ह (Christo Vladimirov) या शिल्पकारानं त्याच्या ज्याँ क्‍लाउदे (Jean Claude) या  कलाकार-पत्नीच्या साह्यानं उभं केलेलं  Running Fence हे १८ फूट उंच व २४ मैल लांब अंतराचं ‘इन्स्टॉलेशन’ केवळ थक्क करणारंच नव्हतं, तर चित्र-शिल्पकलेच्या मर्यादा ओलांडून दृश्‍यकलेतल्या असंख्य शक्‍यतांना हात घालणारंही होतं. शिवाय, केवळ दृश्‍यरूपाचा जरी विचार केला तरी सूर्याच्या उगवत्या-मावळत्या प्रकाशाच्या  खेळात ते अत्यंत विलोभनीय झालं होतं. याशिवाय ‘इन्स्टॉलेशन आर्ट’चं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या जॉन फेकनर (John Fekner) या अमेरिकी कलावंताचं Wheels over Indian Trails या न्यूयार्कच्या आयलॅंड शहरातल्या युलस्की ब्रीजवरचं ११ वर्षं (१९७९ ते ९०) उभं असलेलं  इन्स्टॉलेशन...ही काही उदाहरणं आजच्या ‘इन्स्टॉलेशन आर्ट’ची आद्य रूपं किंवा प्रेरणातत्त्वं म्हणून पाहता येतील.

वरील उदाहरणांवरून ‘इन्स्टॉलेशन आर्ट’च्या बदलत्या रूपांचा, शक्‍यतांचा काहीसा अदमास बांधता येतो. इथं हा क्रम सुरवातीपासून तपासून पाहू या. विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत घनवाद (Cubism) आणि नवकालवाद (Futurism ) या दोन आधुनिक चळवळींनी परंपरागत शिल्पमाध्यमं नाकारली (उदाहरणार्थ ः ब्रांझ, संगमरवर). त्याऐवजी मिश्र माध्यमांतली म्हणजे लोखंडी पत्रा, प्लास्टिक, काच अशी तत्कालीन अपरिचित माध्यमं वापरली. यांतून जोडणीशिल्प (Assemblage) ही ‘इन्स्टॉलेशन आर्ट’ची ‘पूर्वसुरी संज्ञा’ अस्तित्वात आली. या प्रकारात अर्थातच नव्या तंत्राचा वापर झालेला दिसतो. दुसरीकडं याच कालखंडात (१९१७) द्यूशाँ यांनी एका अर्थानं पारंपरिक शिल्पकलेलाच नकार दिलेला दिसतो.

या कालखंडातले शिल्पकलेतले महत्त्वाचे कलावंत - हेन्‍री मूर (Henry Moore), कॉन्स्टंटिन ब्रांकुसी (Constantin Brancusi), अल्बर्टो जिॲकोमेट्टी (Alberto Giacometti) हे कार्यरत होते. ‘गती’च्या शोधात असणारे ब्राँकुसी, आकाराच्या शोधात रमणारे मूर, तर आकाराचाच ऱ्हास व्हावा म्हणून प्रयत्नरत असलेले जिॲकोमेट्टी असा हा परिवर्तनाचा, नव्याच्या शोधातला, पूर्वसुरींच्या परंपरा नाकारणारा कालखंड. असं असतानाही त्याच काळात ब्रांकुसी यांच्या (कधीकाळी विकत घेतलेल्या) कलाकृती विकून आपला चरितार्थ चालवणाऱ्या द्यूशाँ यांनी इन्स्टॉलेशन आर्टचं आद्य रूप ‘फाउंटन’ हे सादर करून कलाजगत हादरवून टाकलं होतं. हे उघडच आहे, की द्यूशाँ यांची ही ‘कृती’ तत्कालीन शिल्पकलेविषयी निरर्थकता वाटल्यानंच झाली असणार. शिवाय, लगेचच्या काळातच पिकासो यांनी ‘रेडीमेड’ व ‘फाउंड ऑब्जेक्‍ट’ वापरून तयार केलेलं ‘बुल्स हेड’ हे शिल्पसुद्धा या परंपरेतलं ‘पूर्वसुरी-रूप’ म्हणता येईल. याच काळात साल्वोदार दाली (Salvador Dali), ज्याँ आर्प (Jean Arp) यांच्यासारख्या महत्त्वाच्या नि अतिवास्तववादी कलावंतांनी केलेली असांकेतिक शिल्पंसुद्धा या परंपरेत भर घालणारी होती.

मूर-ब्रांकुसी-जिॲकोमेट्टी-व्हाया द्यूशाँ-पिकासो-दाली-ज्याँ आर्प-रॉशेनबर्ग-काडर-ओल्डनबर्ग-क्रिस्तो-कून-हिर्स्ट- कपूर-भारती खेर-सुबोध गुप्ता- सुदर्शन शेट्टी आदींपर्यंत ही ‘इन्स्टॉलेशन आर्ट’ परंपरेची श्रृंखला ताणली जाऊ शकते.
इथं वरील परंपरेतून ‘इन्स्टॉलेशन आर्ट’चा जवळचा संबंध शिल्पकलेशी प्रामुख्यानं दिसत असला, तरी नव्वदोत्तर कालखंडात ‘इन्स्टॉलेशन आर्ट’च्या उत्तराधुनिक रूपानं शिल्पकला, चित्रकला, नाट्यकला, नृत्यकला, संगीत, साहित्यिक कलारूपांमधून काही ना काही स्वीकारून स्वतःचा विस्तार केलेला दिसतो.
एकीकडं ‘इन्स्टॉलेशन आर्ट’नं इतर कलांमधून बरंच काही स्वीकारलेलं असलं, तरी या कलांना असणाऱ्या परंपरागत मर्यादा ओलांडून जाण्याचं महत्त्वाचं कामही यातून कळत-नकळत होत गेलेलं दिसतं. ‘इन्स्टॉलेशन आर्ट’च्या गेल्या अर्धशतकाच्या इतिहासात, भिंतीवरचं चित्र, पेडस्टेलवरचं शिल्प जमिनीवर आलं. कलाकृती नि प्रेक्षक-रसिक यांदरम्यानचं अंतर कमी झालं. या अशा अनेक घटकांनी ‘इन्स्टॉलेशन आर्ट’च्या कक्षा मोठ्या प्रमाणावर रुंदावल्या. असं असलं तरी ‘इन्स्टॉलेशन आर्ट’बद्दलचं कुतूहल चाळवलं गेलं ते या संप्रदायातले वाद-विवाद, श्‍लील-अश्‍लील, सौंदर्यहीनता, बीभत्सता अशा चर्चांमुळंच.

कोणतीही कला ही स्वातंत्र्याच्या जेवढ्या म्हणून शक्‍यता असतात, तेवढं स्वातंत्र्य घेण्यासाठी उत्सुक असते. त्या त्या कलेतले महत्त्वाचे कलावंत या मर्यादा ओलांडून प्रत्येक वेळी नवी सीमा निर्माण करत असतात. मात्र, बऱ्याचदा ‘स्वैर’ स्वातंत्र्याच्या अमर्याद व सहेतुक वापरामुळं दाखवेपणा, विकृती, बीभत्सता, सेक्‍शुॲलिटी आदींचा वापर वाढून ती कला आपलं ‘कलापण’ हरवून कलाबाजारातली एक क्रय-विक्रयमूल्य असलेली केवळ एक ‘वस्तू’ बनत जाते. याचं एक चपखल उदाहरण म्हणजे, आजचा जगभरातल्या समकालीन कलेतला आघाडीचा नि तितकाच वादग्रस्त कलावंत डेमियन हिर्स्ट. त्याच्या बहुसंख्य कृतींचं कलारूप ‘संशयास्पद’ असूनही, कलाबाजारातलं मोठं क्रय-विक्रयमूल्य असलेली ‘वस्तू’ म्हणून त्याची प्रत्येक ‘कृती’ विकली जाते. उदाहरणार्थ ः ‘गॉड ऑफ लव्ह’ हे मानवी कवट्यांचं दृश्‍यरूप असणारं हिरेजडित शिल्प. लंडनच्या ‘व्हाईट क्‍यूब गॅलरी’त सन २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या शिल्पात तब्बल आठ हजार ६०१ अस्सल हिरे बसवलेले होते, तर कवटी प्लॅटिनमपासून तयार केलेली होते. हे शिल्प कल्पनेपलीकडच्या किमतीला विकलं गेलं. त्यानंतर हिर्स्ट यांनी अशा कवट्यांची ‘शृंखला’च विकायला काढली! (यातली एक विनोदी नि केविलवाणी गोष्ट म्हणजे, हेच हिर्स्ट भारतातल्या प्रदर्शनासाठी आले असता त्या प्रदर्शनातल्या अनेक भारतीय कलावंताच्या चित्र-शिल्प कृतीत अचानक मानवी कवट्या ठळकपणे अवतरित झाल्या होत्या!)

...तर कुठं उभं होतं ‘इन्स्टॉलेशन आर्ट’ पाश्‍चात्य पटलावर नि कोणतं टोक गाठलं होतं या नव्या संप्रदायानं? सन २००६ मध्ये जपानमधल्या ‘याकोहामा त्रिनाले’मध्ये व्हिएन्नाचा परफॉर्मन्स आर्टिस्ट हर्मन नीस यानं एका खोलीत इन्स्टॉलेशन उभं केलं होतं. कॅनव्हासवर रक्ताचा सडा पडलेला...समोरच्या भिंतीवर गाय-शेळी यांचे कोथळे...नि या सगळ्या रक्त-मांसाच्या चिखलात नीसनं केलेलं सादरीकरण. नीसच्या या किळसवाण्या, विक्षिप्त कृतीला भारतीय मन कोणत्याही अंगानं ‘कला’ म्हणून स्वीकारणार नाही. याच नीसनं त्याच्या ‘ॲक्‍शन’ मालिकेतल्या एका इन्स्टॉलेशनमध्ये तर याहूनही किळसवाणी आणि उबग आणणारी कृती केलेली दिसते. एका खोलीत एक विवस्त्र मुलगी...तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली नि तिच्या शरीरावर मृत प्राण्याचं शरीर अडकवलेलं. या मृत प्राण्याच्या शरीरातून अत्यंत क्रूरपणे कापून काढलेला कोथळा, आतडं लोंबकळत ठेवलेलं नि हे कमी म्हणून की काय, वर पुन्हा खोलीभर रक्त-मासांचा चिखल! ही दोन्ही उदाहरणंही सौम्य वाटावीत असं एक ‘इन्स्टॉलेशन’ म्हणजे २००७ मध्ये ‘निकाराग्वा त्रिनाले’मध्ये ‘कोर्डास गॅलरी’त गुलइमो वर्गास या परफॉर्मन्स आर्टिस्टनं सादर केलेली कृती होय. हे इन्स्टॉलेशन केवळ स्तंभित करणारंच नव्हतं, तर कलेच्या नावाखाली ‘मानव्याला’च नाकारणारं होतं. वर्गास यानं चक्क रस्त्यावरचं बेवारशी कुत्रं गॅलरीत आणून ते ‘इन्स्टॉलेशन’ म्हणून दोरीनं बांधून ठेवलं होतं आणि तेही अन्न-पाण्याशिवाय. शेवटी तहान-भुकेनं व्याकुळ होऊन ते कुत्रं एके दिवशी मेलं नि या ‘इन्स्टॉलेशन’ची सांगता झाली!

उत्तराधुनिक कलेनं आधुनिक कलारूपाला नकार देणं हे समजण्यासारखं आहे; पण कलेच्या नावाखाली केली जाणारी या प्रकारातली थोतांडं मात्र या कलारूपांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी, ‘कलेचा अंत’ करणारी आहेत असं ठामपणे म्हणता येतं. याचा अर्थ पाश्‍चात्य देशांमध्ये झालेले ‘इन्स्टॉलेशन’चे सगळेच प्रयोग असे संशयास्पद होते असा नसून, ‘नव्या शक्‍यता’ तपासून पाहणाऱ्या प्रयोगांचं प्रमाण अत्यल्प होतं, अत्यल्प आहे, एवढंच इथं सूचित करायचं आहे. लेखाच्या सुरवातीलाच कपूर या आजच्या आघाडीच्या कलावंताचं अवतरण दिलेलं आहे. ‘इन्स्टॉलेशन’ कलेच्या शोधात निघालेल्या, या संप्रदायाविषयी कुतूहल असणाऱ्या प्रत्येकालाच वस्तूचं, अनुभवाचं, आनंदाचं, आस्थेचं शिल्प शोधण्याची जिज्ञासा कायम असते. या चतुष्ट्याच्या भारतीय रूपाचं (मांडणकलेचं) स्वरूप काय होतं, काय आहे हे जाणून घेणं या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाचं ठरतं.

विशेषतः आपण सगळेच जागतिकीकरणोत्तर वेगवान काळात वावरत असताना जगण्याच्या, कलेच्या धारणांची उलटापालट झालेली असताना, माध्यमक्रांतीमुळं, जागतिकीकरणामुळं जगाचं रूपांतरण एका खेड्यात झालेलं असताना, अनेक संस्कृतींची, समाजांची सरमिसळ होत असताना भारतासारखा कलेची सोज्वळ परंपरा मानणारा समाज या नव्या उत्तराधुनिक कलासंप्रदायाला कसा सामोरा गेला? हा अनुभव घेण्याची क्षमता भारतीय कलासमाजात होती का, आहे का? जर ती क्षमता होती, आहे तर मग कालचे, आजचे नि उद्याचे प्रतिनिधित्व करणारे या कलासंप्रदायातले भारतीय कलावंत कोणते, अशा अनेक प्रश्‍नांचा मागोवा घेत आपल्याला जावं लागेल. (पूर्वार्ध)

Web Title: mangesh kale's article in saptarang