आजीचा ‘बेस्ट फ्रेंड’ (मंगेश कुलकर्णी)

मंगेश कुलकर्णी manas.mangesh@gmail.com
रविवार, 3 सप्टेंबर 2017

‘‘...नाही रे बाबा. ज्याच्याजवळ मी हट्ट करू शकते आणि जो माझा हट्ट पूर्णही करू शकतो, असा फक्त तूच एक आहेस,’’ असं राघवला म्हणताना मालतीताईंचा गळा भरून आला. राघवच्या नजरेतूनही ही गोष्ट सुटली नाही. त्यानं मुद्दामहून काही वेळ जाऊ दिला. सदैव हसतमुख असणाऱ्या मालतीताईंच्या वागण्या-बोलण्यामागचा एकटेपणा, खिन्नपणा त्याला खूप दिवसांपासून जाणवत होता.

‘‘...नाही रे बाबा. ज्याच्याजवळ मी हट्ट करू शकते आणि जो माझा हट्ट पूर्णही करू शकतो, असा फक्त तूच एक आहेस,’’ असं राघवला म्हणताना मालतीताईंचा गळा भरून आला. राघवच्या नजरेतूनही ही गोष्ट सुटली नाही. त्यानं मुद्दामहून काही वेळ जाऊ दिला. सदैव हसतमुख असणाऱ्या मालतीताईंच्या वागण्या-बोलण्यामागचा एकटेपणा, खिन्नपणा त्याला खूप दिवसांपासून जाणवत होता.

‘‘तू  पण त्याच्यासारखाच.’’
‘‘कसं काय?’’
‘‘तो न सांगता निघून गेला अन्‌ तू सांगून जातो आहेस, एवढाच काय तो फरक!’’
‘‘असं काय करताय? सांभाळा स्वतःला.’’
‘‘कसं आणि का सांभाळू? जरा कुठं आनंद मिळाला, मन स्थिर होतंय असं वाटलं, की लगेच धक्का बसतोच आणि हे असं नेहमीच होत आलंय. काय योगायोग आहे बघ, तो मला सोडून गेला ती आणि आज तू जातो आहेस तीही तारीख आहे नेमकी २९ फेब्रुवारी. ही तारीखसुद्धा तुम्हा दोघांसारखीच! एकदा गेल्यावर पुन्हा भेटण्यासाठी भरपूर वाट बघायला लावणारी...!’’
***

- मालतीताई आणि राघव यांची ती निरोपाची भेट. राघवला बढती मिळाल्यामुळं त्याची बदली झाली होती. तो प्रकल्प नवीन असल्यामुळं त्याला किमान तीन वर्षं तरी बदलीच्याच ठिकाणी राहावं लागणार होतं आणि त्यानंतर प्रकल्पाच्याच कामानिमित्त आणखी एक वर्ष परदेशी जावं लागणार होतं. त्यामुळं मालतीताईंना भेटायला व त्यांचा निरोप घ्यायला तो आला होता. दोघंही खूप भावनाशील झाले होते; तरीही निरोपाच्या वेळी डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही, याचा दोघंही कसोशीनं प्रयत्न करत होते.

मालतीताई. वय ७० वर्षं. उंचापुऱ्या. धडधाकट शरीरयष्टी. घारे डोळे. डोळ्यांवर कायम असलेला चष्मा. वयामुळं चालण्यात पोक आलेलं. उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्थिती उत्तम. राहणी अगदी नीटनेटकी. त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली व निवृत्त होताना त्या शाळेच्या मुख्याध्यापिक होत्या. बोलका स्वभाव आणि मुळातूनच माणसं जोडायची सवय त्यांना होती. त्यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. ते एक यशस्वी वकील होते. मालतीताईंन दोन मुलं, सुना, नातवंडं असा सगळा गोतावळा होता. मोठा मुलगा मनोहरसोबत त्या राहत होत्या. मुकुल हा मालतीताईंचा धाकटा मुलगा. एके दिवशी अचानकच न सांगता तो घरातून निघून गेला. त्याला स्वतःचा व्यवसाय करायचा होता; पण अनेकदा प्रयत्न करूनही अपयश आलं होतं आणि नाइलाजानं नोकरी करावी लागत होती. हेच त्याला फार अपमानास्पद वाटत होतं. त्यामुळंच तो निराश, हताश झाला होता. मालतीताई व घरातल्या इतर सदस्यांनी त्याला खूपदा समजावून सांगितलं. शक्‍य ते सहकार्य केलं; पण फारसा उपयोग झाला नाही. त्या निराशेच्या अवस्थेतच तो एके दिवशी कुणालाही न सांगता घरातून निघून गेला. या गोष्टीला आता १४ वर्षं होऊन गेली होती. खूप शोध घेतला, पोलिसांकडं तक्रार केली; पण सगळं व्यर्थ. त्याची बायको मुलीला घेऊन माहेरी राहायला जाऊनही आता १० वर्षं झाली होती. इतका काळ लोटूनही मुलगा निघून गेल्याची वेदना मालतीताईंना आजही तितक्‍याच तीव्रतेनं जाणवत होती. ती त्यांची भळभळती जखम होती. त्यांची मोठी सून, कॉलेजला जाणारी नात आणि नातू हे स्वभावानं चांगले होते. तीच फार मोठी जमेची बाजू मालतीताईंसाठी होती. या सगळ्यांबरोबर त्या राहत होत्या.  मनोहर हा सध्या नोकरीनिमित्त दुसऱ्या राज्यातल्या एका मोठ्या शहरात राहत होता. मुलांच्या शिक्षणामुळं व नोकरीमुळं त्याची बायको व मुलं या शहरात राहत होती. लौकिकार्थानं मालतीताईंचं आयुष्य सुखी-समाधानी होतं; पण...
***

राघव. तिशीतला तरुण. हुशार. बोलका. मदतशील. विनम्र. उच्चशिक्षित. एका नावाजलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत अधिकारी आणि सामाजिक कामांत उत्साहानं भाग घेणारा. वाचनाची आवड असलेला. विचारी. विनम्र. बऱ्यापैकी उंची. डोळ्यांवर कायम ग्रे काडीचा चष्मा, शिडशिडीत बांधा. त्याला क्रिकेटपेक्षा फुटबॉलची जास्त आवड! गप्पिष्ट आणि हरहुन्नरी. मध्यमवर्गीय वातावरणातल्या संस्कारांत मोठा झालेला. आई-वडील दोघंही शिक्षक व लहान बहीण असं त्याचं कुटुंब छोट्या शहरात राहत होतं. नोकरीनिमित्त हा या शहरात आला होता. कंपनीतर्फे आयोजित कार्यक्रमांत तो नेहमीच सक्रिय सहभागी असे. दीड वर्षापूर्वीची घटना. मालतीताई रोजच्या प्रमाणे देवळाजवळ असलेल्या कट्ट्यावर बसण्यासाठी चालल्या होत्या. रस्त्यात त्यांना बानूबी भेटल्या. बानूबी लोकांच्या घरी धुण्या-भांड्याचं, स्वयंपाकाचं काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या. मालतीताई आणि बानूबी जवळपास एकाच वयाच्या असल्यामुळं व त्या मालतीताईंकडं कामाला येत असल्यामुळं दोघींमध्ये जिव्हाळा. जशा जिवलग मैत्रीणीच. मालतीताईंच्या घराजवळ असलेल्या देवळासमोरच्या अंगणात कट्ट्यावर बसून गप्पा मारणं, एकमेकींचं सुख-दुःख वाटून घेणं हा त्यांचा दिनक्रम. आजदेखील नेहमीप्रमाणे देवळता पोचल्यावर त्यांना तिथं गर्दी दिसली. चौकशी केली असता कळलं की एका कंपनीनं गरीब, गरजू लोकांसाठी आरोग्यप्रकल्प सुरू केला आहे.
देवळाच्या परिसरात सुरू झालेल्या सामाजिक प्रकल्पाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. जेव्हा जेव्हा मालतीताई त्या ठिकाणी जात तेव्हा तेव्हा तिथं चाललेल्या कामाचं, कर्मचाऱ्यांचं, कामाच्या पद्धतीचं बारकाईनं निरीक्षण करत. त्यात सगळ्यात जास्त उत्साहानं, तळमळीनं, मनापासून काम करणारा एक तरुण होता. त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमुळं, सगळ्यांशी अदबशीर बोलण्यामुळं त्या तरुणाविषयी अधिक जाणून घेण्याची मालतीताईंना उत्सुकता निर्माण झाली. चौकशी केली असता कळलं, की त्याचं नाव ‘राघव’ आहे व तो कंपनीमध्ये इंजिनिअर असून, या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. राघव हा मालतीताईंच्या लक्षात चांगलाच राहिला. कारण, फोनवर बोलण्याची त्याची एक लकब होती. मान किंचित तिरकी करून तो ‘हॅलो, मी राघव’ असं म्हणत असे. नेमकी अशीच स्वय मालतीताईंचा धाकटा मुलगा मुकुल यालाही होती. त्यामुळं राघवला पाहिलं, की त्यांना मुकुलची आठवण हमखास होत असे.

राघवची कामावरची निष्ठा, पूर्णपणे झोकून देऊन काम करण्याची त्याची पद्धत, एरवीच्या बोलण्याची लकब आणि फोनवर बोलण्याचीही मुकुलसारखीच सवय याबद्दल मालतीताईंना आता अधिकच उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी राघवशी जाणीवपूर्वक ओळख वाढवली. हळूहळू दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं. नंतर गप्पा सुरू झाल्या. राघवलादेखील मालतीताईंशी बोलायला मनापासून आवडायचं. ते दोघं एकमेकांचे छान मित्र झाले. दोघांच्याही वयांतलं अंतर या मैत्रीत आलं नाही. कारण, दोघांच्याही स्वभावातली लवचिकता आणि दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती. मालतीताई आणि राघव यांचं जवळपास रोजच फोनवर बोलणं होत असे. दिवसातलं पाच ते दहा मिनिटांचं बोलणं मालतीताईंना २४ तासांसाठी पुरत असे. कारण, कुणीतरी खास वेळ काढून आपल्याशी बोलत आहे, हेच त्यांच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं होतं. अगदी घरगुती विषयांपासून ते राजकारण, समाजकारण, सिनेमा, वाचलेलं पुस्तक अशा कोणत्याही विषयावर दोघांच्या गप्पा चालत असत. याचं कारण, दोघांच्याही अनेक आवडी एकसारख्याच होत्या.
***

तो मालतीताईंचा सत्तरावा वाढदिवस होता. बरोबर सकाळी सात वाजता त्यांचा फोन वाजला. ‘जीवेत्‌ शरदः शतम्‌...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’ तो राघवचाच फोन होता. मालतीताईंना प्रचंड आनंद झाला. काही वेळानं दुसरा फोन आला ः ‘‘ह्यॅप्पी बड्ड्ये, ताई.’ बानूबी फोनवर होत्या. अजून एक सरप्राईज!र्‌  आनंदात आपल्या खोलीतून बाहेर आल्या; पण मनातून खट्टूही झाल्या. कारण, घरातला प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र होता. मालतीताईंच्या समोरच नातीनं आपल्या मैत्रिणीला बर्थ डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या; पण आजीचा वाढदिवस तिच्या लक्षात नव्हता. काही वेळानंतर सगळेच आपापल्या कामानिमित्त घराबाहेर पडले. एकापाठोपाठ दोन टोकाचे अनुभव मालतीताईंना आले होते. त्यांना वाईट वाटलं. आपला वाढदिवस घरातले लोक विसरले आणि कोण कुठला राघव आणि बानूबी यांनी सकाळीच फोन करून आपल्याला शुभेच्छा दिल्या...मालतीबाईंना वाटून गेलं. नंतर ते सगळे देवळाच्या परिसरात भेटले, तेव्हा त्यांनी चक्क केक आणला होता. मालतीताईंनी सगळ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसाला सगळ्यांनी केलेली तयारी पाहून मालतीताई गहिवरल्या. डोळ्यांत येणारं पाणी त्यांनी मोठ्या मुश्‍किलीनं रोखलं; पण राघवनं ते ओळखलंच. काही न बोलता मालतीताईंचा हात हातात घेऊन तो उभा राहिला. त्या वेळी मात्र मालतीताईंच्या निग्रहाचा बांध फुटला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थोडा वेळ गेल्यानंतर त्या सावरल्या. त्यांनी डोळे रुमालानं पुसले आणि राघवकडं पाहत त्या हसल्या.
‘‘सॉरी, थोडं भरून आलं म्हणून...आणि धन्यवाद अगदी मनापासून...’’
राघवच्या डोक्‍यावर हात ठेवून ‘खूप खूप मोठा हो’ असा तोंडभरून आशीर्वाद त्याला मालतीताईंनी दिला.
त्या वेळी राघवनं फोन आला म्हणून बोलण्याचं निमित्त करून तोंड फिरवून आपले डोळे पुसले.
-मालतीताईंना घरातल्या सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या; पण जेव्हा संध्याकाळी त्यांनी स्वतःहून सांगितलं तेव्हा! कुणीही मुद्दाम केलं नव्हतं...सगळे आपापल्या व्यापात होते; त्यामुळं विसरले होते. शुभेच्छा देऊन झाल्यानंतर, आजच्या प्रथेनुसार मालतीबाईंसमवेत सगळ्यांनी सेल्फीसुद्धा काढले! ‘आजी...बर्थ डे सेलिब्रेशन’ म्हणून नातवानं ते फोटो लगेच सोशल मीडियावर पोस्टही केले. त्यानंतर लगेचच मालतीताईंना मोठ्या मुलाचा - मनोहरचा - शुभेच्छा देणारा फोन आला.
मालतीताईंच्या भौतिक सुखात कमतरता अशी कशाचीच नव्हती. घरातले सगळे प्रेमळ होते. घरातल्यांचं त्यांच्याशी बोलणं-वागणंही व्यवस्थितच होतं. फक्त अडचण एकच होती व ती म्हणजे मालतीताईंच्या अस्तित्वाची दखल जशी पाहिजे तशी घेतली जात नव्हती. कामाचं सोडल्यास त्यांच्याशी कुणीही स्वतःहून जाऊन बोलत नसे; विचारपूस तर लांबचीच गोष्ट. जणू काही त्या म्हणजे घरातली एक वस्तू...रोजच समोर दिसणारी. गरज पडेल तेव्हाच वापर केली जाणारी. फ्रिज, सोफा, टीव्हीचा रिमोट...या वस्तूंप्रमाणेच आपणही एक वस्तूच आहोत जणू, असंच मालतीताईंना वाटत असे.
***

मालतीताईंनी राघवला एक दिवस आग्रहानं आपल्या घरी नेलं. त्याची तयारी नव्हती. त्यांच्या घरी जायला त्याला अगदी अवघडल्यासारखं होत होतं. आपल्याला बघून त्यांच्या घरचे लोक काय म्हणतील, काय विचार करतील, याचीच त्याला काळजी वाटत होती; पण मालतीताईंच्या आग्रहापुढं त्याचा अगदीच नाइलाज झाला. घरी गेल्यावर मालतीताईंनी सून, नात आणि नातू यांची राघवशी ओळख करून दिली.
‘नमस्कार... हाय, मी राघव’ त्यानं मालतीताईंच्या सुनेला आणि नातवंडांना बघून म्हटलं.
‘‘तुम्हीच ते राघव ना ? माझ्या आजीचे फ्रेंड?’’ नातीनं विचारलं. ‘‘तुम्ही मला ओळखता?’’
‘‘नाही...पण आजीच्या बोलण्यात तुमचा उल्लेख सतत असतो. त्यामुळं नाव ओळखीचं आहे.’’
‘‘आहेच तो माझा फ्रेंड, नुसताच फ्रेंड नाही तर बेस्ट फ्रेंड,’’ - मालतीताई म्हणाल्या.
‘‘म्हणजे राघव हा आजीचा मित्र आणि तोही एवढा यंग?’’ नातू पटकन्‌ म्हणाला आणि सगळेच मोठ्यानं हसले.
औपचारिक गप्पांनंतर काही वेळानं घरातले तिघं आपापल्या कामांसाठी घराबाहेर पडले. आता घरात फक्त मालतीताई आणि राघव होते.
स्वयंपाकघरात लगबगीनं जाऊन मालतीताई एक स्टीलचा डबा घेऊन आल्या.
‘‘घे, लाडू घे’’
‘‘नको’’
‘‘दोन लाडू खाल्ल्यामुळं लगेच तुला डायबेटिस होणार नाही...’’
‘‘मला आत्ता नकोय ना पण काही खायला.’’
‘‘घे रे...असं काय करतोस? तुला माझी...’’
‘‘ओके. द्या...तुम्हीपण हट्टी आहात’’
‘‘नाही रे बाबा. ज्याच्याजवळ मी हट्ट करू शकते आणि जो माझा हट्ट पूर्णही करू शकतो, असा फक्त तूच एक आहेस,’’
असं म्हणताना मालतीताईंचा गळा भरून आला. राघवच्या नजरेतूनही ही गोष्ट सुटली नाही. त्यानं मुद्दामहून काही वेळ जाऊ दिला. सदैव हसतमुख असणाऱ्या मालतीताईंच्या वागण्या-बोलण्यामागचा एकटेपणा, खिन्नपणा त्याला खूप दिवसांपासून जाणवत होता. त्यानं एक-दोनदा तसं त्यांना विचारलंसुद्धा; पण काही ना काही कारण देत मालतीताईंनी विषय बदलला होता.
आज मालतीताईंनी स्वतःहूनच विषय काढला आणि राघवला आपल्या कुटुंबाविषयी सांगायला सुरवात केली. त्यांचे यजमान, मुलं, परागंदा झालेला धाकटा मुलगा...हे सगळं ऐकून नेहमी हसतमुख असणाऱ्या मालतीताई प्रत्यक्षात कोणत्या प्रकारच्या मानसिक यातना सहन करत आहेत, याची राघवला जाणीव झाली.
मालतीताई पुढं सांगू लागल्या ः ‘‘राघव, काय सांगू अन्‌ किती सांगू...माझी अवस्था म्हणजे ‘आहे सुखासीन तरीही नाही सुखी’ अशी आहे. दोन मुलं...त्यापैकी एक दुसऱ्या शहरात, तर दुसरा कुठं आहे, त्याचा या क्षणापर्यंत काही थांगपत्ताच नाही. तो परत येईल न येईल, याचाही काहीच भरवसा नाही. मी ज्यांच्याबरोबर राहते ती मोठी सून, नातवंडं स्वभावानं चांगली आहेत...माझ्याशी नीट वागतात...वयाचा मान ठेवतात; परंतु ते सगळे आपापल्या विश्वात असतात. तिथं मी कुठंच नाही. या घरात माझं फक्त अस्तित्व आहे...गरजेपुरतं बोलणं, कधी मूड असेल तर ‘हाय, हॅलो’ म्हणणं...नाहीतर मग शेजारून निघून जातात; पण बोलत नाहीत. रोज सकाळी दुनियेला ‘गुड मॉर्निंग’ करतील; पण मला मात्र चुकूनसुद्धा नाही. एक-दोनदा मी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न केला; पण प्रतिसाद थंड. मला हेही समजतं, की ते कुणीही मुद्दाम करत नाहीत; पण आपल्याच घरात आपण अदखलपात्र होणं, याचा प्रचंड मानसिक त्रास होतो मला. आपला नवरा घरातून निघून गेल्याचा राग धाकट्या सुनेनं माझ्यावरच काढला. पूर्णपणे संबंध तोडून टाकले. गेल्या आठ वर्षांत एक शब्दही आम्ही एकमेकींशी बोललेलो नाही. माझ्या माणसांमध्ये राहून जाणवणारा एकटेपणा मला सहन होत नाही.’’

मालतीबाई मन मोकळं करत राहिल्या ः ‘‘त्यामुळंच आमच्या घरी काम करणाऱ्या बानूबीबरोबर माझी मैत्री झाली. त्यांच्याशी बोलल्यामुळं थोडं बरं वाटतं इतकंच. त्यांचं दुःख तर आणखीच मोठं आहे. त्यांना एकुलता एक मुलगा. तो असाध्य विकारानं आजारी. घरीच असतो. कमाई नाही. त्याच्या आजारपणाला कंटाळून बायको निघून गेलेली. त्यामुळं घर चालवण्यासाठी, बानूबी धुण्या-भांड्याची कामं करतात; पण आपलं दुःख कधीही त्या माउलीनं चेहऱ्यावर आणलेलं नाही. त्यांच्याशी माझी गट्टी जमली. दोन दुःखी माणसं एकत्र आली! त्यांच्यामुळंच मी देवळाच्या कट्ट्यावर गप्पा मारायला येऊ लागले...आणि तिथंच तर तुझी आणि माझी भेट झाली.’’
हे सगळं ऐकून राघव सुन्न झाला. म्हातारपणाची एक वेगळीच व्यथा त्याला कळली होती. र्‌ पुढं सांगू लागल्या ः ‘‘जगाच्या दृष्टीनं मला कशाचीही कमतरता नाही, अजून तरी घरातल्या लोकांनी मला सांभाळलं आहे. कधीतरी रागाच्या भरात माझ्यावर ओरडलेही आहेत ते; पण त्यांनी लगेच ‘सॉरी’देखील म्हटलं आहे. अजूनतरी माझा अपमान करण्याचा प्रसंग मी त्यांच्यावर येऊ दिलेला नाही. सतत मला जागरूक राहावं लागतं. आपल्यामुळं त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. घरच्यांबरोबर वागताना, बोलताना एक प्रकारचं दडपण मनावर असतं. आजकाल खासगी आयुष्य, प्रायव्हसी जपण्याचा ट्रेंड आहे. मला तर कुणाचा मोबाईल वाजत असेल आणि संबंधित कुणी जागेवर नसेल, तर तो फोन रिसिव्ह करायचीसुद्धा भीती वाटते. घरातल्या वस्तूंना हात लावायची हिंमत होत नाही. ‘आपल्यावर कुणी ओरडणार नाही ना,’ असं सतत वाटत राहतं आणि आपलं काही चुकणार नाही, याची फार काळजी घ्यावी लागते. ज्यांना अंगा-खांद्यावर खेळवलं-चालायला-बोलायला शिकवलं, जगात वावरायला शिकवलं, त्या आपल्याच मुलांची आणि नातवंडांची भीती वाटते. मग धास्तावलेल्या मनानं घरात वावरताना नकळतपणे काही चुका होतातच. प्रत्येक वेळी ठोस असं काही कारण असेलच असं नाही; पण हे वास्तव आहे. माझ्यासारख्या अनेक म्हाताऱ्यांना ही भीती सतावत असते. मात्र, आपल्याला ही भीती सतावत आहे, हे बहुसंख्यांना जाणवत नाही, सांगता येत नाही इतकंच. मात्र, अनेकजण हा ताण सतत अनुभवत असतात. इतरांकडं पाहिलं असता मी खरंच सुखी आहे; पण रक्ताच्या नात्यातल्या माणसांमध्ये मला माझं अस्तित्व आणि माझ्या जगण्यातला अर्थ पुसट होत असल्याची जाणीव अतिशय बेचैन करते. ‘म्हातारपण नको रे बाबा. म्हातारपण म्हंजी कुतारपण...समदे ‘हाड हाड’ करतात आणि गरज असंल तेव्हाच जवळ करतात,’ असं बानूबी नेहमी म्हणत असते. ’’
***

राघव इतका वेळ सगळं शांतपणे ऐकत होता; परंतु तो आतून अतिशय अस्वस्थ झाला होता. कारण, कायम गप्प-शांत राहणारे, एका ठराविक जागी बसणारे आणि कायम एका हातानं जपमाळ ओढणारे त्याचे आजोबा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागले. ‘त्यांचीही अशीच काही व्यथा असली तर?’ हा विचार मनात येऊन राघवचे डोळे भरून आले. सुनेला आणि मुलाला त्रास नको म्हणून रोज सकाळी सहा ते दहा आणि संध्याकाळी पाच ते नऊ मुद्दाम घराबाहेर राहून वेळ काढणारे शेजारचे बाबूकाका त्याला आठवले.
‘‘माफ कर; पण तुला सांगितल्याशिवाय राहवलं नाही...तुझा बराच वेळ घेतला,’’ मालतीताईंच्या या वाक्‍यानं राघवची विचारश्रृंखला तुटली.
‘‘असं काही नाही,’’ मालतीताईंनी दिलेला चहाचा कप घेत राघव म्हणाला.
‘‘तू विचार करत असशील की मी तुलाच का हे सगळे सांगितलं ? तर तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस आणि बेस्ट फ्रेंडशीच आपण आपली सिक्रेट्‌स शेअर करतो ना !! अजून एक कारण, इतके दिवस तुझ्या वागण्या-बोलण्यातून एक गोष्ट नक्की आहे व ती म्हणजे तू समजूतदार आहेस. तुला भेटण्याआधी बानूबी हीच माझी मैत्रीण होती; पण निमूटपणे ऐकून घेण्यापलीकडं ती काहीच करू शकत नव्हती. ...आणि आता तूही चाललास. तुझ्या भेटण्यानं, आपुलकीच्या बोलण्यानं वयाचं अंतर पार करून आपली मैत्री झाली. तू कधी माझा बेस्ट फ्रेंड झालास, हे कळलंदेखील नाही. असो. तुझ्या आयुष्याचं नवीन पर्व आता सुरू होतंय, त्यासाठी तुला खूप खूप खूपच आशीर्वाद. तू यशस्वी होणारच आहेस; पण ‘खूप मोठा माणूस हो,’ हेच अगदी मनापासून सांगणं...’’ असं बोलून मालतीताईंनी राघवच्या डोक्‍यावर हात ठेवला. त्यानं डोळे मिटले व नमस्कार करण्यासाठी तो खाली वाकला. दोघांनाही भरून आलं होतं. नंतर मालतीताईंनी हात पुढं केला व त्या राघवला म्हणाल्या ः ‘‘ऑल द व्हेरी बेस्ट, माय बेस्ट फ्रेंड’’ आणि त्या आतल्या खोलीत निघून गेल्या.
विचारांच्या तंद्रीतच मोटारीतून राघव घरी चालला होता. जाताना बसस्टॉपवर, रस्त्याच्या कडेला, कट्ट्यावर, देवळात...ज्या ज्या ठिकाणी त्याला वृद्ध मंडळी दिसली, त्या प्रत्येकाकडं पाहून राघवच्या मनात विचारांचं काहूर उठत होतं. काहीजण हसत होते...गप्पा मारत होते... कुणी फक्त शांत बसून होतं... प्रत्येकाच्या वेदना शोधण्याचा प्रयत्न राघव करत होता ः ‘काय असेल वेदना? की ‘असलं म्हातारपण’ हीच वेदना...?’
तेवढ्यात मोबाईलवर मेसेज आला म्हणून राघव विचारांतून वास्तवात आला.
- मालतीताईंनी मेसेज पाठवला होता ः ‘तुला आयुष्यात अनेक मैत्रिणी मिळतील; त्यात काही माझ्यासारख्या म्हाताऱ्याही असाव्यात, हीच सदिच्छा! हॅपी जर्नी, काळजी घे...’ ः  बेस्ट फ्रेंड. आता भेटूच पुढच्या २९ फेब्रुवारीला...!’

Web Title: mangesh kulkarni write article in saptarang