डोळसाचा दृष्टान्त... (मंगेश नारायणराव काळे)

डोळसाचा दृष्टान्त... (मंगेश नारायणराव काळे)

परंपरेतलं जुनं झालेलं गळून पडतं, नवं त्याची जागा घेतं. मात्र, ही प्रक्रिया नेहमी यंत्रवत्‌ किंवा एकाच एका क्रमानं घडत नाही, तर त्या त्या वळणावर आलेले नवे चित्रकार-कवी-लेखक-कलावंत ही मंडळी जे आहे त्यातले काही अंशी नाकारून किंवा संपूर्णतः नाकारून नव्याचं सर्जन नि रोपण करत असतात नि अशाच कलावंतांना पुढं परंपरेत अग्रक्रमाची जागा मिळत असते. त्यांच्यामुळं परंपरा समृद्ध होत जाते.

डोळेयाचा ठाइं स्वतःसीया दोनि सामग्रीयाः। 
तेजसामग्री आणि मेदसामग्रीः।।
तेजसामग्री वाढवी तरी रत्नाचिये गर्भीचे खुतले रंग देखेः । मेदसामग्री वाढवी तरि काहीचि न देखे।।
- श्रीचक्रधर (दृष्टान्त/१४. डोळेयाचा दृष्टान्त)

चक्रधरांचा हा दृष्टान्त ‘पाहणं’ यासंदर्भात आहे. इथं ‘डोळियाचा दृष्टान्त’ हे मूळ शीर्षक असलं, तरी - सृजनकर्त्यांचं, निर्मिकाचं, कलावंतांचं ‘पाहणं’ इथं अभिप्रेत असल्यानं ‘डोळसाचा दृष्टान्त’ असं शीर्षक योजलं आहे. चित्रं ‘पाहणं,’ ‘अनुभवणं,’ ‘भासणं,’ ‘जाणवणं’ अशा अनेक पातळ्यांवर सर्जकाचा संबंध चित्राशी, त्यानं निर्माण केलेल्या दृश्‍यकृतीशी येत असतो. मात्र, जेव्हा एखादा कलावंत-लेखक-चित्रकार-दिग्दर्शक आपल्या ‘नजरे’तून (Vision) निर्मितीकडं पाहतो, तेव्हा तो नुसता अभिव्यक्तीचाच विचार करत नाही, तर त्यानं आपल्या काळाला, भवतालाला, समाज-संस्कृतीला नि अर्थात स्वतःला दिलेला प्रतिसादही त्यात अनुस्यूत असतो. साहित्य-कलेच्या परंपरेत एक गोष्ट आवर्जून अनुभवास येते ती ही, की वेगवेगळ्या कालखंडांत, वेगवेगळ्या टप्प्यांवर एक नवं वळण येऊन गेलेलं आहे.

मागची, भूतकाळातली निर्मिती तशीच सांस्कृतिक ऐवजाच्या स्वरूपात मागं राहत असली, तरी त्या त्या वळणावरून निर्मितीच्या दिशा आणि दशा बदलत असतात. कारण, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर समाज नि संस्कृतीचं स्खलन मोठ्या प्रमाणावर होत असतं. परंपरेतलं जुनं झालेलं गळून पडतं, नवं त्याची जागा घेतं. मात्र, ही प्रक्रिया नेहमी यंत्रवत्‌ किंवा एकाच एका क्रमानं घडत नाही, तर त्या त्या वळणावर आलेले नवे चित्रकार-कवी-लेखक-कलावंत ही मंडळी जे आहे त्यातले काही अंशी नाकारून किंवा संपूर्णतः नाकारून नव्याचं सर्जन नि रोपण करत असतात नि अशाच कलावंतांना पुढं परंपरेत अग्रक्रमाची जागा मिळत असते. त्यांच्यामुळं परंपरा समृद्ध होत असते.

एखादा कलावंत हे कसं करू शकतो? त्याच्या प्रेरणा काय असतात? आहे ते स्वीकारून निर्मिती करून ‘व्यवस्थे’त शिरण्याचं, स्थिरावण्याचं सोडून तो व्यवस्थेला विरोध करण्यात धन्यता का मानतो? बऱ्याचदा परंपरेच्या विरोधात जाऊन, तत्कालीन ‘व्यवस्था’ नाकारून अशा कलावंतांची संपूर्ण हयात संघर्षात, विजनवासात गेलेली दिसते. व्यक्तिगत पातळीवर मोठ्या नुकसानीलाही अशा कलावंतांना सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ ः आज चित्रकलेचा इतिहास ज्याच्या नावाशिवाय लिहिता येत नाही, अशा व्हॅन गॉग (Van Gogh) या चित्रकाराची किती चित्रं त्याच्या हयातीत विकली गेली? स्वतःला संपवण्याची वेळ त्याच्यावर का आली? प्रसिद्धीच्या शिखरावर असताना जॅक्‍सन पॉलाकनंही स्वतःला का संपवलं? अशी असंख्य उदाहरणं यासंदर्भात वेगवेगळ्या अंगांनी तपासून पाहता येतात. तात्पर्य काय? तर नवं वळण गिरवणारे कलावंत या वळणावर कसे येतात? त्यासाठी त्यांना काय करावं लागतं? यशाच्या शिखरावर असताना किंवा अपयशानं ते स्वतःला संपवून का टाकतात? लेखाच्या सुरवातीला चक्रधरांचा दृष्टान्त इथं देण्याचं प्रयोजन यासाठीच होतं, की ‘पाहणं’ ही क्रिया सर्जकासाठी प्रेक्षक/रसिकाच्या ‘पाहणं’पेक्षाही अधिक महत्त्वाची, निकडीची नि गुंतागुंतीची असते. कारण, याच पाहण्यातून चक्रधर म्हणतात तशी ‘तेजसामग्री’ तो मिळवत असतो.

या परिप्रेक्ष्यात बऱ्याचदा द्रष्टा (Prophet Or Seer) अशी एक व्याख्या केली जाते, म्हणजे ‘अमुक एक कलावंत हा द्रष्टा असल्यानं त्यानं हे क्रांतिकारी कार्य उभे केलं...’ इत्यादी. इथं ‘भविष्याबाबतचा अंदाज बांधणारा’ असा काही अर्थ यातून ध्वनित होत असला, तरी चक्रधर म्हणतात ती ‘तेजसामग्री’ जो वाढवेल, तोच रत्नाच्या गर्भापर्यंत पोचू शकतो, हे या द्रष्टेपणाचंच एक लक्षण म्हणता येईल. दृश्‍यकलेच्या संदर्भात अशा द्रष्ट्या कलावंतांचं ‘पाहणं’ नि अशा पाहण्यातून परंपरेला छेद देत/नाकारत/स्वीकारत नवं ‘सर्जन’ उभं करणं हे त्या त्या कलेतल्या परंपरेची जडण-घडण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. एक निश्‍चित की जेव्हा जेव्हा साचलेपण येतं, तेव्हा तेव्हा कलेच्या इतिहासात एक नवं वळण निर्माण होतं. या पार्श्‍वभूमीवर, दृश्‍यकलेचा गेल्या शतकातला प्रवास, डोळसांचं बंड नि परंपरेचं स्खलन यांची काहीएक मांडणी इथं अभिप्रेत आहे.

तर १९१६ मध्ये म्हणजे १०० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या DADA या चळवळीपासून या ‘डोळस’ परंपरेची सुरवात झाली, असं म्हणता येईल. (अर्थात याअगोदरच्या परंपरेतही अनेक वळणं आलेली दिसतात. मात्र, परंपरेला थेटपणे नाकारण्याची सुरवात या DADA चळवळीपासूनच झाली असल्यानं ही परंपरा इथून गृहीत धरली आहे.)

राष्ट्रीयत्व, भांडवलशाही नि वसाहतवादाच्या रेट्यातून पहिल्या महायुद्धाची सुरवात झाली. युद्धानंतरच्या अराजकातून, मानवी मूल्यांच्या हननातून नि त्यातून उद्भवलेल्या भ्रमनिरासातून आलेलं नैराश्‍य या DADA चळवळीमागं होतं. या नैराश्‍यालाच प्रेरणा मानून ही चळवळ उभी राहिली. अस्तित्वात असलेलं साहित्य नि कला, तत्कालीन सांस्कृतिक समाजाची जीवनमूल्यं ही कुचकामी, निरर्थक आहेत नि अशा ‘मूल्य’ गमावलेल्या वास्तवाला विरोध करायचा म्हणून जन्माला आलेली ही चळवळ. एकीकडं विरोध करणं, नाकारणं नि निरर्थ निर्मिती साकारणं हे DADA चळवळीचं उद्दिष्ट होतं. (एका अर्थानं कलात्मक अराजक Artistic Anarchy उभं करणं).

या परंपरेचा आद्य डोळस, DADA चळवळीचा कर्ता म्हणून मार्शल द्यूशाँकडं पाहता येईल. (न्यूयॉर्क इथं १९१७ मध्ये झालेल्या चित्रप्रदर्शनात ‘फाउंटन’ या शीर्षकांतर्गत ‘मुतारीचं भांडं’ ठेवण्याची द्यूशाँ याची कृती यापासून ते ‘कलेचा अंत’ या घोषणेसाठी साक्ष ठरलेलं डेमियन ह्रीस्ट (Damien Hirst) या आजच्या आघाडीच्या कलावंताचं Home -Sweet Home हे मांडणीशिल्प किंवा भारतीय वंशाचा आजचा आघाडीचा दृश्‍यरचनाकार अनीश कपूर याच्या आकाराच्या नैसर्गिक नि उत्स्फूर्त रूपांचा शोध घेणाऱ्या कलाकृती म्हणजे ‘चित्रकलेतल्या डोळसांचे दृष्टान्त’च म्हणता येतील. DADA चळवळीचे कर्ते हे केवळ दृश्‍यकलेशी संबंधितच नव्हते, तर साहित्य नि कलेच्या क्षेत्रातले अनेक महत्त्वाचे लोक या चळवळीद्वारे एकत्र आले होते नि या सगळ्यांमध्ये समान सूत्र होतं व ते म्हणजे परंपरा नाकारण्याचं. यात ‘आजचं असत्य उद्याचं सत्य असतं’ असं म्हणणारा रशियन-ज्यू वंशाचा जगप्रसिद्ध छायाचित्रकार मान रे जसा होता, तसाच नंतरच्या अतिवास्तववादी (Surrealistic) चळवळीचा कर्ता नि चळवळीचा जाहीरनामा लिहिणारा फ्रेंच कवी-लेखक आंद्रे ब्रेताँ हाही होता.

शिवाय DADA चळवळीचा जाहीरनामा लिहिणारा जर्मन कवी-लेखक ह्यूगो बॉल (Hugo Ball), कवी-चित्रकार फ्रान्सिस पिकाबिआ (Francis Picabia), ह्यूगो बॉलची पत्नी नि जर्मन कवयित्री इमी हेनिंग्ज (Emmy Hennings), रोमेनिअन कवी-लेखक-चित्रपटकर्ता त्रिस्तान त्झारा (Tristan Tzara), जर्मन चित्रकार हान्स रिश्‍टर (Hance Richter) आदी नामवंत या चळवळीचे प्रमुख होते.

कला-इतिहासातली एक अत्यंत महत्त्वाची चळवळ म्हणून DADA चळवळीकडं पाहावं लागेल. पुढच्या काळातला अतिवास्तववाद (Surrealism), नव-अतिवास्तववाद (Neo-surrealism), पॉप आर्ट (Pop Art), फ्लक्‍सेस (Fluxus) अशा अनेक चळवळींना DADA नं प्रभावित केलेलं दिसतं.

या चळवळीचा अजून एक विशेष म्हणजे, या कलाचळवळीनं पूर्वसुरींची परंपरा, ‘आस्था,’ ‘सौंदर्यतत्त्व’च नाकारलं नाही, तर या घटकांची कुचेष्टाही केली. या उपहासातूनच मोनालिसाच्या चित्राला मिश्‍या काढणं, बसची तिकिटं, चॉकलेटची रॅपर डकवून कोलाज करणं (Kurt Schwitters), कपड्यांना करण्याच्या इस्त्रीचं साधंसुधं रूप घालवून तिचं एका भयावह प्रतिमेत रूपांतर करणं (Man Ray) अशी अनेक कलारूपं त्या वेळी समोर आली. या चळवळीतल्या कलावंतांच्या या टर उडवण्याच्या वृत्तीमुळं ‘DADA चळवळ ही कलाविरोधी आहे,’ अशी संभावनाही त्या वेळी करण्यात आली. असं असलं तरी दृश्‍यकला, साहित्यक्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारी अतिवास्तववादी चळवळ (Surrealistic Movement) ही याच DADA चळवळीतून जन्माला आली आहे, हे विसरता येत नाही. (Surrealism हा शब्द पुढं शतकभर ठळक होत गेलेला दिसत असला, तरी १९१७ पर्यंत हा शब्द ‘कॉईन’ झालेला नव्हता हे विशेष! गुलियम आपोलिनिअर नावाच्या कवी-नाटककारानं पहिल्यांदा हा शब्द वापरला. अतिवास्तववादी चळवळीचा जाहीरनामा लिहिताना आंद्रे ब्रेताँ यानं हा शब्द स्वीकारला नि त्याचं ‘अतिवास्तववाद’ असं बारसं केलं).

आंद्रे ब्रेताँ यानं आपल्या जाहीरनाम्यात  ‘अंसज्ञ मनाचं संज्ञ मनाशी झालेलं मीलन’ अशी अतिवास्तववादाची व्याख्या केलेली आहे. DADA चळवळीच्या पूर्वीच आलेलं सिग्मंड फ्रॉईड यांचं ‘द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’ (१८९९) या पुस्तकानं मानवी मनाचा केवळ सखोल अभ्यासच मांडला नाही, तर फ्रॉईड यांच्या या तत्त्वज्ञानाचा दूरगामी परिणाम थेट २१ व्या शतकापर्यंतच्या जगभरातल्या साहित्यावर नि कलाचळवळीतल्या लेखक-कलावंतांवरही झाला. या प्रभावातूनच  ‘माणसाच्या मनात खोलवर रुजलेले भाव-भावना-विचार अभिव्यक्त करणं हेच अतिवास्तववादी साहित्याचं नि कलेचं उद्दिष्ट असलं पाहिजे,’ हा विचार अतिवास्तववादी कवी-चित्रकारांनी शिरोधार्य मानला होता, असं दिसतं.

या कालखंडातल्या अतिवास्तववादी कवी-लेखक-चित्रकारांनी - कोऱ्या मनानं, कोणत्याही पूर्वतयारीशिवाय, पूर्वग्रह न ठेवता उत्स्फूर्त प्रेरणेतून निर्मिती होणं या प्रणालीत अपेक्षित असल्यानं - अनेक चमत्कृतिपूर्ण, विस्फोटक (Radical) कल्पनांचा वापर या निर्मितीत केलेला आढळून येतो. साल्वादोर दाली (१९०४-१९८९) हा या अतिवास्तववादी चळवळीतला सगळ्यात जास्त प्रसिद्ध नि चर्चित चित्रकार. अनेक विक्षिप्त नि चमत्कृतिपूर्ण कल्पनांचा वापर त्याच्या चित्रांमधून झालेला दिसतो.

‘झाडाच्या फांदीवरून ओघळणारं घड्याळ’ किंवा ‘ओट्यावरून ओघळणारं घड्याळ’ (The Persistence of Memory) हे दालीचं चित्र या अतिवास्तववादी चळवळीची उच्चतम निर्मिती म्हणता येईल किंवा दालीनं बनवलेली शॉर्ट फिल्म An Andalusian Dog (१९२९) किंवा अतिवास्तववादी प्रेरणेतून तयार झालेलं Age of Gold (१९३०), The Blood of Poet (१९३१) किंवा व्यावसायिक प्रकारातली Basic Instict (१९९२), Dark City (१९९८) अशी कितीतरी उदाहरणं इथं देता येतील. गेल्या १०० वर्षांत शंभराच्या वर अतिवास्तववादी सिनेमे हॉलिवूड आणि जगभरातल्या चित्रपट उद्योगात तयार झालेले दिसतात, एवढी ही प्रणाली पुढच्या काळात लोकप्रिय झाली. विसाव्या शतकातली ही अत्यंत महत्त्वाची चळवळ तर होतीच, शिवाय या चळवळीचा सर्वाधिक प्रभाव जगभरातल्या कला-साहित्यावर झालेला दिसतो. साल्वादोर दाली, रेन मॅग्रीड (Rene Magritte) अ- मॅक्‍स ॲर्नेस्ट (Max Ernest), जॉन मीरो (Joan Miro), य्वेस तन्गुय (Yves Tanguy), फ्रिडा काहलो (Frida Kahalo) आदी चित्रकार या चळवळीतले मुख्य चित्रकार म्हणून पुढं आले. भारतातल्या आधुनिक चित्रकलेवरही हा प्रभाव कमी-अधिक प्रमाणात पाहता येतो. उदाहरणार्थ हे चित्रकार ः गणेश पाईन, शक्ती बर्मन, ए. रामचंद्रन, गोगी सरोज पाल इत्यादी.

गेल्या ५० वर्षांपासून जगभरातल्या साहित्यात अधिराज्य गाजवणारा जादूई वास्तववाद (Magic Realism) हे याच अतिवास्तववादाचं उत्तराधुनिक साहित्यिक रूप म्हणता येईल. गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ (Gabrial Garcia Marquz), सलमान रश्‍दी (Salman Rushdie), जॉर्ज लुईस बोर्हेस (Jorge Luis Borges), टोनी मॉरिसन (Toni Morrison), हारुकी मुराकामी (Haruki Murakami), गुंटर ग्रास (Guntur Grass) अशी जगभरातल्या मातब्बर लेखकांची फळी या जादूई वास्तववादानं झपाटलेली दिसते. त्याचप्रमाणे मार्क शागाल (Marc Chagall) हा जगप्रसिद्ध रशियन चित्रकार जादूई वास्तवतावादाचं एक वेगळं उदाहरण म्हणून सांगता येईल.

अतिवास्तववादी चळवळीतल्या अनेक चित्रकारांनी शागालच्या जादूई चित्रसृष्टीतून खूप काही घेतलं. शागालचा समावेश अतिवास्तववादी कलावंत म्हणून होत असला, तरी त्याच्या चित्रसृष्टीत चमत्कृती किंवा स्फोटक कल्पनांना फारसा वाव नाही. तिथं आढळतो तो जादूई वास्तववादामधला मुक्त स्वप्नाळूपणा नि जादूई जग. शहराच्या, गावाच्या, लॅंडस्केपच्या साक्षीनं हवेत उडणाऱ्या पऱ्या, माणसं, जोडपं, व्हायोलिन वाजवणारं गाढव, उडणारा मासा...अशा ‘जादूगाराच्या पोतडीतल्या कितीतरी गोष्टी’ (खजिना) शागालच्या चित्रसृष्टीत आढळतात.

कोणत्याही कालखंडात कला-साहित्याच्या प्रांतात होणारी डोळसांची बंडं (वळणं) ही कधीच एकेकटी नसतात. जगाच्या वेगवेगळ्या प्रांतांत ही वळणं वेगवेगळ्या रूपानं अभिव्यक्त होत असतात. कधी ती एकमेकांची सहोदर असतात, तर कधी एकमेकांना नाकारणारीही. अर्थात या स्वीकारा-नकारातूनच कला-साहित्याच्या परंपरा बळकट होत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com