मातृदिनाचं भारतीय पाऊल! (मंगला सामंत)

mangla samant
mangla samant

भारतीय संस्कृतीतला मातृदिन आज (श्रावणी अमावास्या) साजरा होत आहे.
या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या मातृदिनाचं महत्त्व जगभर सांगितलं गेलं पाहिजे. भारतीय प्राचीन संस्कृतीचं प्राचीनत्व जगाला त्यामुळं समजू शकेल. मात्र, त्यासाठी आधी आपण भारतीयांनी हा श्रावण अमावास्येचा "मदर्स डे' अर्थात "मातृदिन' आवर्जून मानला पाहिजे!
मातृदिन मानण्याचा हा भारतीय परंपरेतला प्रवास कसकसा होत गेला असावा, त्याचा संशोधनाच्या अंगानं घेतलेला हा वेध...

श्रावण अमावास्या हा आपल्या भारतीय संस्कृतीमधला "मातृदिन' म्हणून मानला जातो. आपल्या पंचांगात
"मातृदिन' नोंदला जाणं ही बरीच प्राचीन नोंद म्हणावी लागते. माणसाची वेगवेगळ्या युगातली अवस्था जर आपण तपासात गेलो, तर "मातृदिन' प्राचीन काळापासून मानला जाण्यासारखं काही घडलं आहे का? तर अशा पाऊलवाटा शोधता येतात. मात्र, त्यासाठी मानवाचं कुटुंब आणि त्यातली नाती यांच्या परस्परसंबंधांपासून आपल्याला सुरवात करावी लागेल.

"कुटुंब' ही निसर्गनिर्मित कल्पना आहे. "प्रेम, विश्वास, सुरक्षितता या मूल्यांच्या पायावर उभं असलेलं सहजीवन म्हणजे कुटुंब' अशी कुटुंबाची नैसर्गिक व्याख्या आहे. अगदी उघड्या माळावर, आईच्या कुशीत असलेल्या बाळाचं आणि त्या आईचंसुद्धा ते एक कुटुंबच असतं. कारण प्रेम, विश्वास, आणि सुरक्षितता ही मूल्यं तिथं ओतप्रोत दिसतात. आजच्या घरामध्ये माता-पिता आणि अपत्ये असे कुटुंब असतं; पण त्यात पती-पत्नीत भांडणं असतील, पालक व मुलं यांच्यात विश्वासाचं नातं नसेल किंवा कुणी कुणाला मारत असेल तर ते कुटुंब नसतं; मग ते फक्त चार भिंतींचं घर असतं. त्यामुळे, कुटुंबाची संकल्पना ही तशी "अर्थानं' खूप सखोल आहे, प्रगल्भ आहे. निसर्गाचं सस्तन प्राण्यासाठी नेमून दिलेलं कुटुंब म्हणजे "माता-मूल' हे कुटुंब! "माता-मूल' हे कुटुंब तमाम सस्तन प्राण्यांत जसं दिसतं तसंच ते मानवप्राण्यातही आहे. जंगली युगापासून मानवामधल्या"माता-मूल' कुटुंबाचा, उत्क्रांतीला धरून झालेला प्रवास पाहणं हे "मातृदिना'साठी इथं महत्त्वाचं ठरेल.

जंगली युगात, मानवाचं "माता-मूल' हे कुटुंब स्थिर नव्हतं. पती, पिता, भाऊ अशा कोणत्याही नात्यातून पुरुषांची कायमस्वरूपी मदत स्त्रीला नव्हती. जीव वाचवण्यासाठी डोंगर-दऱ्यांतून पळणं, झाडावर चढून बसणं या धावपळीत माता व अपत्याची ताटातूट होणं, अपत्ये दुरावणं, कायमची परागंदा होणं अशी स्थिती होती. ही स्थिती अशीच राहिली असती तर मानवप्राणी उत्क्रांतीच्या या टप्प्यावर अडचणीत आला असता; पण उत्क्रांतीतून मानवाच्या बुद्धीचा व स्मरणशक्तीचा विकास होत राहिला. त्या बुद्धीच्या साह्यानं स्त्रीनं स्थिर होण्याचा पुरुषाआधी केलेला पहिला विचार हा तिच्या सुरक्षित बाळंतपणासाठी असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे. पेटता अग्नी घेऊन स्त्री गुहेत स्थिर झाली तो मानवी जीवनातला एक "टर्निंग पॉईंट' समजला जातो. इथून रानटी युगाला सुरवात झाली, असं संशोधक मानतात. मानवाचा प्रगतीपट इथून सुरू होतो. अग्नीमुळं रात्रीचा प्रकाश आणि उष्णता मिळते, हे तर स्त्रीला माहीत होतंच; पण अग्नीमुळं अन्न शिजवता येऊ लागलं, त्यामुळं ते टिकाऊ झालं. परिणामी, रोज जंगलात जाऊन फळं, शिकार मिळवण्याचे स्त्रीचे श्रम व वेळ वाचू लागला. अग्नी हिंस्र प्राण्यावर फेकून रक्षण करता येऊ लागलं, वनस्पतींपासून काढे, चूर्ण, भस्म हे अग्नीमुळं करता आल्यामुळं स्त्रीला आपल्या अपत्यांचा रोगराईपासून बचाव करता यायला लागला; पण त्याचबरोबर इतरही बदल मानवी जीवनात बुद्धिविकासानुसार येत गेले. उदाहरणार्थ : फळं खाऊन बिया फेकल्यावर त्याच जागेवर काही दिवसांनी मातीतून काहीतरी फुटून वर येतं, हे गुहेत निवांत झालेल्या स्त्रीच्या लक्षात येऊ लागलं आणि स्त्रीनं टोकदार काठीनं वा दगडानं जमीन खणून बी, कंद मातीत पुरण्यास सुरवात केली आणि जगण्यासाठी "शेती'ची सुरवात झाली. मानवी बाल्य सुरक्षित आणि पोषित करून ते टिकवून धरण्याचा हा रानटी मातृनात्याचा एकाकी प्रयत्न म्हणजे जणू मानवी जीवनातल्या भक्कम मातृस्थानाची कोनशिला म्हणायला हरकत नाही. मात्र, हा विकास होत असताना, याच उत्क्रांतीतून मानवी नात्यांची पायाभरणीसुद्धा होत गेली.

कारण, जंगली युगाच्या धावपळीनंतर प्रथमच माता आपल्या अनेक पुरुषांपासून झालेल्या अपत्यांसह गुहेत जेव्हा स्थिर झाली, तेव्हापासून अपत्यांना मातेचा दीर्घ काळ सहवास उपलब्ध झाला आणि तिच्या एकसमान अपत्यप्रेमातून त्या अपत्यांमध्ये,"भावंडपणाची एकसंध भावना' तयार झाली, ज्या भावनेतून सख्ख्या बहीण-भावांचं नातं उदयाला आलं, तसंच त्या मातेला आपल्या मुलीचं बाळंतपण काढण्याची जेव्हा प्रथमच संधी मिळाली, तेव्हा "आजीपालकत्व' या नव्या नात्याचा जन्म मानवी जीवनात झाला. हे पुन्हा एक मातेचं अजोड स्थान, जे नातं अन्य सस्तन प्राण्यांत कुठंही आढळत नाही.

"आजी आणि नातवंड' असा नव्या नात्याचा "बॉंड' तयार झाला. बहिणीबहिणींच्या अपत्यांमधून मामा, मावशी आणि मावसभावंडं ही नाती पुढच्या कालखंडात तयार होत गेली आणि "माता-मूल' या छोट्या कुटुंबाचं रूपांतर आजी, आई, मावश्‍या, मामा, बहीण-भाऊ अशा एका अखंड मातृकुळात झालं, ज्यामध्ये "माता-मूल' या नैसर्गिक बीजकुटुंबाची सुरक्षितता अधिक बळकट झाली. तयार झालेल्या या विस्तारित कुटुंबालाही "नैसर्गिक कुटुंब' म्हणावं लागतं. कारण, ते मातृत्व या नैसर्गिक घटनेतून घडत गेलेलं आहे. विशेष म्हणजे, स्त्रीच्या स्थैर्यामुळं आजीपालकत्वाचा मानवी कुटुंबात झालेला प्रवेश ही या उत्क्रांतीच्या टप्प्यावरची मानवजातीला मिळालेली मोठी देणगी म्हणावी लागते. कारण, पुढच्या उत्क्रांतीच्या प्रवासात, मानवी जीवनात उद्भवलेल्या पेचप्रसंगात मानवी जीवाला जगवण्यात या आजीची "आईच्या आईची' भूमिका नेहमीच मध्यवर्ती महत्त्वाची राहिलेली आहे.

माणसातल्या या नात्यांच्या उत्क्रांतीबरोबर मेंदूचीही उत्क्रांती होत होती. एकूणच, सस्तन प्राण्यांत मेंदूचा विकास हा गर्भाशयात पूर्ण होत नाही. कारण, त्यामुळं डोक्‍याचा आकार वाढून जन्म घेताना अडचणी येतात. मनुष्यप्राण्यातसुद्धा मेंदूचा फक्त 30 टक्के विकास गर्भाशयात होत असतो. बाकीचा विकास हा जन्मल्यावर होतो. अर्थात, मानवामध्ये जे बौद्धिक आणि भौतिक उत्क्रांतीचं सातत्य होतं,
त्यातून मेंदूच्या पूर्ण विकासाचा टप्पा गाठायचा म्हणजे प्रत्येक पिढीत क्रमाक्रमानं माणसाचा बाल्यकाळ वाढत गेला. दुसरीकडं, उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर सस्तन प्राण्यांमध्ये असणारा समागमासाठीचा ठराविक काळ (हीट पीरिअड) मनुष्यप्राण्यामधून नष्ट झालेला होता. "केव्हाही समागम आणि केव्हाही मूल' अशी स्थिती त्यातून निर्माण झाली. त्यामुळं स्त्री फार अडचणीत आली. तिचं एक मूल वर्ष-दोन वर्षांचं होईपर्यंत तिला दुसऱ्या बाळंतपणासाठी तयार व्हावं लागे. अर्थात, एरवी अशा स्थितीत बालकं मृत्युमुखी पडून या टप्प्यावर पुन्हा एकदा मानववंश धोक्‍यात आला असता; पण त्याच वेळी आजी पुढं सरसावली. आपापल्या मातृकुळातल्या नवमाता व त्यांची अपत्ये यांना आजी, आई आणि मावश्‍या यांनी आधार दिला. त्या बालकांचं एकमेकींनी संगोपन केलं. अशा रीतीनं या मातृत्वभावनेचं इथं मोलाचं योगदान दिसतं. त्याच बरोबरीनं आणखी एक घटना म्हणजे, निसर्गानं उत्क्रांतीद्वारे स्त्रीची मातृत्वक्षमता रोखून धरली. म्हणजे मेनोपॉज येऊन स्त्री ही मातृत्वचक्रातून मुक्त होत गेली. वयाच्या 45 - 50 पर्यंत स्त्री अशा प्रकारे मुक्त झाल्यानंतर ती आपल्या मुलीच्या मुलांचं संगोपन करण्यास मोकळी झाली आणि आजीपालकत्व अधिक बळकट होत गेलं. खरंतर, नातवंडं जगण्यासाठी आजीचा जन्म पहिल्याप्रथम व्हायला पाहिजे. त्याची काळजी इथं निसर्गानं घेतलेली दिसते.

हा सर्व उत्क्रांतीचा अन्वयार्थ लावणारा पट झाला; पण या आजीपालकत्वाचं आणि मातृकुलाचं प्रत्यक्ष उदाहरणसुद्धा आपल्याला डॉ. हॉक्‍स आणि निकोलस जोन्स हे अनुक्रमे उटाह आणि कॅलिफोर्निया या विद्यापीठांतले मानववंशशास्त्रज्ञ देतात. सन 1998-99 मध्ये संशोधन करताना टांझानियामधल्या एयासी सरोवराजवळच्या प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या "हादसा'नामक आदिम जमातींचा त्यांनी दीर्घ काळ अभ्यास केला. ही जमात दगडांची हत्यारं वापरणारी होती. यांच्यामध्ये स्त्रीचं पहिलं मूल दीड-दोन वर्षांचं असताना तिला पुन्हा मूल झाल्यास तिचं पहिल्या मुलाकडं दुर्लक्ष होई. अशा वेळी त्या स्त्रीची आई त्या बाळाचा ताबा घेत असे आणि ती त्याला कंदमुळं शिजवून खाऊ घालत असे. अशी आजी ज्या बालकांना लाभत असे, ती मुलं बाळसं धरून जगत असत. मात्र, ज्या मुलांना अशी आजी मिळत नसे, ती मुलं मृत्युमुखी पडत होती. या निरीक्षणातून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष मांडला, की नातवंडं सांभाळणाऱ्या आजीची नातवंडं जास्त संख्येनं जगली, त्यामुळं त्या आजीची जनुकं (जीन्स) ही जास्त संख्येनं पुढच्या पिढ्यांमध्ये गेली आणि नातवंडं सांभाळणाऱ्या आजीची संख्या मानवामध्ये वाढत गेली.

साहजिकच, मानवजात जगण्यासाठी या आजीमातेचा मोठाच आधार मिळाला. जंगली व रानटी युगात विवाहप्रथा अज्ञात असल्यामुळं पित्याची आई किंवा त्याची अन्य नाती यांना तोपर्यंत मानवी जीवनात कोणतीच ओळख नव्हती. त्यामुळं "आईची आई' हेच एक नातं समृद्ध होत गेलेलं दिसतं. अशा रीतीनं उत्क्रांतीतून दृढ झालेलं मानवामधलं "आजी'चं नातं हे अगदी मूलभूत आणि अद्भुत नातं म्हणावं लागेल. मूल जन्माला घालून स्त्री ही माता बनते आणि म्हणून तिच्यात वात्सल्य निर्माण
होतं, हा जैविक नियमच आहे; पण मूल जन्माला न घालता निव्वळ मुलीवर असणाऱ्या वात्सल्यातून तिच्या अपत्यांबद्दल निर्माण होणारं "आजीचं ममत्व' हा निसर्गाचा लांब पल्ल्याचा चमत्कार म्हणावा लागतो. अशा प्रकारे आजी, आई आणि त्या स्थानावरील मावश्‍या अशा ममत्वाच्या तयार होणाऱ्या साखळीमध्ये उत्क्रांतीच्या कठीण वळणावर "- मानवी वंश' जगण्याचं रहस्य आहे आणि म्हणूनच हे आजीचं नातं जेव्हा केव्हा जंगली युगात मानववंशात प्रथम निर्माण झालं असेल तो दिवस, निसर्गानं मानवी जीवनाला बहाल केलेला पहिला "मातृदिन' म्हणावा लागेल.

भारतीय उपखंडातली मातृसंस्कृती पुढं अतिशय भरभराटीला आली. आपल्या कुळात उत्पादन घेण्याबरोबरच व्यापारविनिमयासाठी अन्य कुळातून जाणं, अग्नीच्या साह्यानं बनवलेली चूर्णं, भस्म, काढे इत्यादींचा उपयोग समाजाला करून देण्यासाठी गावोगाव संचार करणं, युद्ध-संघर्षामध्ये भाग घेणं, अशा स्त्रियांचे उल्लेख आपल्या प्राचीन भारतीय साहित्यात भरपूर आढळतात. उदाहरणार्थ : पटकी या रोगावर इलाज करणारी मरीआई, देवी या रोगावर उपचार करणारी शीतलादेवी, गोवरावर उपाय सांगणारी गोरंबादेवी इत्यादी. मातांच्या विविध समाजोपयोगी कार्यामुळं व त्यांच्या वैद्यकीय ज्ञानामुळं, तसंच युद्धातल्या त्यांच्या विजयामुळं भारतीय समाजात त्यांना मातृदेवतांचं स्थान देऊन, त्यांची मंदिरं उभारून त्यांच्या आठवणी कायम केल्या गेल्या. मातृदिनाचं एक मूर्त स्वरूप अशा रीतीनं भारतीय संस्कृतीमधून दिसून येऊ लागलं.

जगातली पहिली दिनदर्शिका (कॅलेंडर) ही स्त्रियांनी बनवली, असं काही संशोधकांचं म्हणणं आहे. त्यानुसार, एकूण भारतीय मातृसंस्कृतीची तत्कालीन भरभराट पाहता  भारतातली प्राचीन दिनदर्शिका (पंचांग) ही स्त्रियांनी बनवली असावी, याची खात्री वाटते. कारण, ती चंद्रावरून बनवलेली आहे. प्राचीन काळात, सूर्यावरून फक्त "एक दिवस संपला' एवढंच कळत होतं; पण चंद्राच्या कलांवरून आणि चंद्राकडं बघता येणं शक्‍य असल्यामुळं, एका घटनेपासून पुढच्या दिवसांचा हिशेब त्याच्या कमी-अधिक होणाऱ्या कलांवरून घालता येत होता. चंद्रकलांवरून प्रतिपदा, द्वितीया अशा प्रकारे बोली-संबोधनातून पुढं लेखनाद्वारे हे दिवस नोंदवले गेले. ते आपलं भारतीय "पंचांग.' त्यात चंद्राचं "एक पौर्णिमा ते पुढील पौर्णिमा' हे चक्र सुमारे साडेसत्तावीस दिवसांचं आणि स्त्रीचं मासिक चक्रसुद्धा साडेसत्तावीस दिवसांचंच असतं. अर्थात, आपल्या येणाऱ्या मासिक चक्राची नोंद ठेवणं हे स्त्रीला चंद्रावरून शक्‍य होत होतं. त्यातून सर्वच घटनांची नोंद ठेवणं हे स्त्रीचं दैनंदिन काम झालं असावं. दुर्गेसारख्या मातांनी केलेले युद्धपराक्रम, स्त्रियांना उपद्रव देणाऱ्या दुष्टाच्या पारिपत्याचा नरकचतुर्दशीद्वारे नोंदवलेला विजयदिवस, काही वैद्यमातांचे स्मृतिदिन, त्यांच्या मिरवणुकीचा किंवा पालखीचा कालखंड, ऋषिपंचमीच्या नोंदीद्वारे स्त्रियांच्या नांगरपूर्व शेतीची जपलेली आठवण, मुलीला माहेरी आणण्याचा महिना, भावाला तिच्या सासरी भेट (ओवाळणी) घेऊन पाठवण्याचा भाऊबीजेचा दिवस अशा अनेक नोंदी त्या काळात या मातांनी वेळोवेळी आणि पिढ्यान्‌पिढ्या केलेल्या असाव्यात आणि त्यातूनच सर्व मातांना एकत्रित वंदन करण्याचा एक दिवस "मातृदिन' या संबोधनानं त्या काळात पुढं कधीतरी नोंदवला गेला असावा, जो आपल्या पंचांगात श्रावण अमावास्येच्या दिवशी नोंदवलेला आढळतो.

विळ्या-कोयत्यानं शेती करण्याचा शोध ज्या मातांनी लावला, त्यांनी शेतीहंगामातल्या एका दिवसाची निवड "मातृदिन' म्हणून करावी, हेसुद्धा अर्थपूर्ण आहे. भारतीय संस्कृतीचं हे प्राचीनत्व लक्षात घेता अमेरिकेचा जन्म हा काही मिनिटांपूर्वीचा म्हणावा लागतो! औद्योगिक क्रांतीनंतर जन्मलेल्या अमेरिकेत विभक्त कुटुंबपद्धतीमुळं, आई-बाबांच्या योगदानाचं मुलांना स्मरण राहावं म्हणून आणले गेलेले हे मदर्स डे आणि फादर्स डे खूपच अलीकडचे म्हणावे लागतात. ही त्यांची कृती स्वागतार्ह आहे; पण पुरुषप्रधान संस्कृती रूढ होण्यापूर्वी काही शतकं आधीपासून आपण
आपला "मदर्स डे' अर्थात "मातृदिन' मानत आलेले आहोत, तो कोणत्या भावनेनं? तर अत्यंत कष्टप्रद, तसंच मानवी वंश नष्ट होऊ शकेल अशा धोक्‍याच्या रानटी अवस्थेपासून मानवी मातांनी मानवी संतती जगवण्याचे व या संततीला सतत प्रगतीकडं नेण्याचे जे अव्याहत श्रम या भूतलावर घेतले, तिला वंदन करण्याच्या भावनेतून! जगातल्या सर्वच मातांचा एका परीनं यात अंतर्भाव आहे, ज्यामुळं 'भारतीय मातृदिना'चं महत्त्व काही वेगळंच आहे. श्रावण अमावास्येला येणारा या मातृदिनाचं महत्त्व खरं तर जगभर सांगितलं गेलं तर भारतीय प्राचीन संस्कृतीचं प्राचीनत्व जगाला समजणार आहे. मात्र, त्यासाठी आधी आपण भारतीयांनी हा श्रावण अमावास्येचा "मदर्स डे' अर्थात "मातृदिन' आवर्जून मानला पाहिजे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com