वेदनांबाबत मंथन आणि फुंकरही! (मनीषा अतुल)

मनीषा अतुल
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी, रमिझाबी, मनोरमा कांबळे, माया त्यागी या केसेसनी जनमानस ढवळून काढलं होतं. अशा देशभरात घडलेल्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या महत्त्वपूर्ण केसेसचा या पुस्तकात सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.

ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी, रमिझाबी, मनोरमा कांबळे, माया त्यागी या केसेसनी जनमानस ढवळून काढलं होतं. अशा देशभरात घडलेल्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या महत्त्वपूर्ण केसेसचा या पुस्तकात सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. अशा घटनांची तीव्रता या कादंबरीतल्या कथानकातून वाचकाच्या मनाला भिडत जाते आणि या गैरप्रवृत्तींविरुद्ध उभं राहणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे याचं भान आणून देते
बलात्कार झाल्यावर स्त्री एकटी संपत नाही, तर संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त होतं. अनेक स्त्रियांची बलात्कारानंतर हत्या होते किंवा शारीरिक वेदना होऊन त्यांचा मृत्यू होतो; पण ज्या जगतात त्यांच्यासाठीही जिवंत जाणिवा वाहणं सोपं नसतं. अशांसाठी या पुस्तकातून संदेश दिला गेला आहे, की बलात्कार हा आयुष्याचा शेवट नसतो. बलात्कार हा क्रूर अपघात आहे. बलात्कारारासारखे अपघात हे फार निष्ठूर आहेत; पण तरीही ते शेवट ठरता कामा नयेत. या कादंबरीच्या निमित्तानं आपल्या देशातल्या स्त्री-सुरक्षाविषयक कायदे, स्त्रीच्या अधिकारांशी निगडित कायदे, त्रुटी यांचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. परंतु, त्याच वेळी त्यातल्या त्रुटी, त्यात आवश्‍यक बदल, नव्या कायद्यांची गरज यांबाबतही चर्चा आहे. बलात्काराशी संबंधित महत्त्वाच्या घटनांची नोंद यात आहे. विशेषत: समाजमन ढवळून काढणाऱ्या, संघटित करणाऱ्या आणि जनरेट्यापुढे कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागली, नव्या सरकारी समित्या स्थापन झाल्या, राज्यसभेत, लोकसभेत महिला सुरक्षा या विषयावर विधेयकं मांडली गेली, अशा घटनांचा महत्त्वाचा दस्तावेज या पुस्तकाच्या निमित्तानं नोंदवण्यात आला आहे.

गौरी या पत्रकार मुलीच्या कथानकासह हे पुस्तक पुढं जातं. गौरीवर तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना बलात्कार झालेला आहे. जगाच्या नजरेतून घरच्यांनी तो लपवून ठेवलेला आहे; पण ती स्वत: त्या अनुभवांपासून पळू शकलेली नाही. त्या भयाच्या छायेनं तिचं मन आणि आत्मा व्यापून टाकलेला आहे. लग्नानंतरही दांपत्यजीवनात या कृष्णसावल्यांनी ग्रहण लावलेलं आहे आणि तिचं वैवाहिक जीवन उद्‌ध्वस्त करून टाकलेलं आहे. मात्र, घटस्फोटानंतर गौरी खऱ्या अर्थानं उभी राहते. उशिरा का होईना ती त्या घटनेचं वास्तव स्वीकारते, जगापुढं मांडते आणि ताठ मानेनं पुढचा प्रवास आरंभ करते. अशा सगळ्याच भगिनींना ती मदतीचा हात देते. या विषयावर लेखन करते. हिरीरीनं सर्व समस्या मांडते.

ज्योती पुजारी या चाकोरीबाहेरचे विषय घेऊन लेखन करणाऱ्या लेखिका. समकालीन वास्तवाचा वेध घेत, प्रश्‍नाच्या मुळाशी जाणं, त्यावर वैचारिक चर्चा करणं, त्यावरच्या उपायांचा सर्वांगानं वेध घेणं आणि वाचकांची या समस्यांशी नाळ जोडून त्यांच्या कर्तव्यांचं भान करून देणं हे काम त्या सहजगत्या करत आहेत. खरं तर लेखणीद्वारे केलेली ही एक समाजसेवाच आहे.

बलात्कारच नव्हे, तर सर्व प्रकारच्या लैंगिक विकृतींकडं या पुस्तकाच्या निमित्तानं लक्ष वेधलं गेलं आहे. शरीर, मन, भावना, कुटुंब या सगळ्यांवर होणारे नंतरचे भीषण परिणाम, या घटनांमागच्या, कारणांची मीमांसा, विशेषत: मूल्यऱ्हास, सांस्कृतिक आदर्शवादांचा ऱ्हास, माणसाच्या आत्मकेंद्री प्रकृतीनं वाढलेला चंगळवाद आणि त्यातून जन्माला आलेले हे विकृत अपराध याकडंही लक्ष वेधण्यात आलं आहे. नव्या पिढीला वर्तणुकीची दिशा दाखवण्याचं कामही यातून झालेलं आहे. अंधारात बसलेल्या तरुणीला प्रकाशवाट दाखवणारं मुखपृष्ठ सूचक आहे. प्रकाशवाट दाखवणाऱ्या या महत्त्वपूर्ण पुस्तकाचं स्वागत मराठी साहित्यात नक्कीच केलं जाईल.

पुस्तकाचं नाव : शेवटाचा आरंभ
लेखिका : ज्योती पुजारी
प्रकाशक : विद्या बुक्‍स पब्लिशर्स, औरंगाबाद (0240-2337371)
पानं : 192, किंमत : 250 रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manisha atul write book review in saptarang