जाणिवेचा जागर (मनीषा कोरडे)

manisha korde
manisha korde

नवरात्र म्हणजे स्त्रीला स्वतःची जाणीव होण्याचाही जागरच. त्यासाठी खेळू हे नऊ खेळ. स्वतःलाच स्वतःची ओळख करून देऊ आणि आपल्यामधल्या शक्तींचीही ओळख करून घेऊ...

आदिशक्ती असलीच, तर ती स्त्री असेल, पुरुष असेल, की इतर कुठली, याबद्दल मला शंका आहे. मात्र, जे सर्वत्र आहे, ते स्त्रीत असणारच- आहेच, याविषयी मला शंका नाही. ती शक्ती कशा प्रकारची, यानं काय फरक पडतो? त्या शक्तीची आपल्यात असलेली ज्योती तेवतेय का विझतेय, याचं भान आपल्याला आहे का, हे बघणं महत्त्वाचं. आदर्श परिस्थिती अशी असेल, की प्रत्येकाला आपल्यामधल्या शक्‍यता कळलेल्या आहेत, प्रत्येक जण त्या शक्‍यतांचा पूरेपूर वापर करून घेतोय... पण असं होत नाही. किती व्यवधानं असतात. किती आवरणं असतात आणि रूप जर शतकानुशतकं दमन झालेल्या स्त्रीचं असेल, तर त्याचा विसर पडणं अगदीच शक्‍य आहे. म्हणून हा जागर! नवरात्रोत्सव करावा का करू नये, स्त्रियांनी नऊ रंग परिधान करावेत की करू नयेत, उपवास करावेत का करू नयेत, हे ज्याचं त्यानं ठरवावं आणि करू द्यावं. आपणच जर हट्टीपणे असंच करा, असंच करू नका म्हणायला लागलो, तर बाकीच्यांचे हट्टसुद्धा आपल्याला पाळावे लागतील ना!

मानवी मन हे जरा गंमतिशीर प्रकरण आहे. तिरप्या चालीनं चालणारं, बुद्धिबळातल्या घोड्यासारखं. करू नको म्हटलं, की करणारं आणि कर म्हटलं, की रुसणारं. त्याला सोहळे लागतात. अगदी आदिमानवालासुद्धा हे कळलं होतं आणि त्यानं त्याच्या-त्याच्या बुद्धीनं, सोयीनं त्याचे त्याचे सोहळे रचले होते. काही कालबाह्य झाले- काही होतील, काही स्वरूप बदलतील... पण जोवर माणसाचं मन आणि बुद्धी विकसित होत नाही, तोवर काहींना हे उपचार लागणार; पण म्हणून "आली आता नवरात्र, झाले यांचे रंग सुरू, झाल्या यांच्या सेल्फीज सुरू' असा टवाळीचा सूर लागू नये.
मुद्दा काय आहे? मुद्दा स्वतःत डोकावण्याचा आहे. ते होतंय का? या निमित्तानं ही जी एक जागा तयार होते आहे स्त्रियांसाठी- ती अनमोल आहे- तिचा पूरेपूर वापर आपण करतोय की नाही, हे बघणं महत्त्वाचं!
नऊ दिवसांचे नऊ नवे खेळ मी तुम्हाला सुचवणार आहे. आपण हे करून बघूयात का? मी तरी करणार आहे. तुम्ही ते केलंत, तर मजा येईल.

1. लहानपणीचा स्वतःचा एखादा फोटो उकरून काढावा आणि ती जी लहान मुलगी आहे, तिच्याकडं माया-ममतेनं बघावं. त्या अजाण अबोध दिवसांपासून ते आजवरच्या तिच्या प्रवासाचं कौतुक करावं. याचा अर्थ खूप जुन्या गोष्टी आठवत बसायच्या, असा नाही, तर त्या फोटोकडं बघून किंवा फोटो नसेल, तर मनात प्रतिमा आणून "छान, मस्त मोठी झालीस गं तू, पूर्वी काही कळायचं नाही तुला, आज किती शहाणी झालीस,' एवढंच म्हणायचं आहे. भूतकाळातल्या भूतांना शितं घालायची नाहीत ("मला यानं मारलं', "कमी मार्क मिळाले' असं डिटेलिंग करत बसायचं नाही). ज्या अस्तिक आहेत, त्यांनी त्या आपल्या छोटेपणातल्या मुलीला आशीर्वाद दिले तरी चालतील. ज्या नास्तिक आहेत त्यांनी त्या छोट्या लेकराचं कौतुक केलं तरी पुरे!
2. कधीकाळी आपल्याला जे येत नव्हतं आणि आज नीट येतंय, असा आपलाच एक गुण आपल्या मैतरणीला सांगायचा. कोणत्याही छोट्या कलेला, गुणाला "हे काय मेलं सांगायचं,' असं म्हणून अव्हेरू नये. (मला अजूनही पोळ्या करता येत नाहीत, की वेणी घालता येत नाही.) आपला गुण तिला सांगताना खूप लांबड लावू नये. (तिचंसुद्धा ऐकायचं आहे.) आपल्याला हे जमलंय- जमतंय, याचा आनंद मानून या कानापासून त्या कानापर्यंत हसायचंय.
3. एखादी आपल्याला प्राणप्रिय असलेली गोष्ट मैत्रिणीला सांगायची आहे. यातही, केवळ "मला पैठणी इतकी म्हणजे इतकी आवडते,' असं सांगणं अपेक्षित नाही. एखादी अशी गोष्ट ज्यामुळं आपला मूड बदलतो, आपण निराश असलो, की परत उत्साही होतो, अशा गोष्टी असाव्यात. शक्‍यतो ती गोष्ट पैशांनी होणारी किंवा दुसऱ्यानं केलेली/ दिलेली नसावी. "यांनी मला अचानक बांगड्या दिल्या दहा तोळ्यांच्या. त्या बघितल्या, की मूड छान होतो', "बॉयफ्रेंडनं ड्रेस दिला- तो घातला की मस्त वाटतं' इत्यादी चालणार नाही. आपल्याला भूक लागली, की आपण आपलंआपलं जेवतो, तेव्हा आपल्याला छान वाटतं, तसं काहीतरी असावं. अस्तिक स्त्रियांनी "मी जेव्हा जेव्हा उदास होईन, तेव्हातेव्हा ही गोष्ट मला मिळू दे,' अशी प्रार्थना करायची, नास्तिक स्त्रियांनी "या गोष्टीमुळं आपल्यावर हा चांगला परिणाम होतो,' अशी मानसिक नोंद करायची... आणि "ए, मी विसरले तरी तू सांग ह मला,' अशी जबाबदारी मैत्रिणीला द्यायची.
4. आपल्या आयुष्यातला एखादा असा प्रसंग आठवायचा (आणि शक्‍य झाल्यास मैतरणीला सांगायचा). जिथं कठीण परिस्थितीत अचानक कुठून तरी मदत आपल्याला मिळाली होती आणि आपल्यावरचा कठीण प्रसंग कसा- डोक्‍यावरून ढग अलगद जातात, स्पर्श न करून, तसा- निघून गेला होता, हे आठवायचं आहे. त्या प्रसंगाचं गांभीर्य खूप असलं किंवा नसलं, तरी फरक पड़त नाही; पण तेव्हाच्या सुटकेचा आनंद आज अनुभवायचा आहे. अस्तिक स्त्रियांनी "हे डिव्हाईन इंटरव्हेंशन म्हणजेच दैवी हस्तक्षेप माझ्यासोबत असंच घडत राहो, मी फारच आभारी आहे,' असं मनमोकळं हसून बोलावं आणि नास्तिक स्त्रियांनी "हां, जगरहाटीत असे कर्मधर्मसंयोग होतच राहतात, पुढंसुद्धा होत राहतील,' अशी मानसिक नोंद करायची आहे.
5. आपापल्या आईला आठवा. आई आठवत नसेल, तर मनात तिची प्रतिमा तयार करायची. आईनंतर मग तिच्या आईला. मग तिच्या आईला! आपल्या आधी किती आयांनी जन्म दिला-घेतला, ही साखळी किती लांब जाऊ शकते, तितकी जाऊ द्यावी आणि जणू त्या एका बळकट दोरीनं आपण बांधले गेलो आहोत, जोडले गेलो आहोत, अशी कल्पना करायची आणि अप्रूप वाटून घ्यायचं. अस्तिक स्त्रियांनी "आपल्या इथं असण्याचे ऋणानुबंध किती शतकांचे आहेत, यात निव्वळ संयोग नसावा. आपल्या जन्मामागं काहीतरी कारण असावं, किंवा ते मला लवकरात लवकर कळावं,' अशी प्रार्थना करायची, तर नास्तिक स्त्रियांनी "कित्येक गर्भ पडतात; पण आपण जगलोय, वाचलोय. अशीच धारा पुढंही चालू राहणार आहे,' अशी नोंद करावी.
6. आपल्या हृदयावर हात ठेवावा आणि आपलं नाव घ्यावं. गंमत वाटेल- आपणच आपल्याला हाक कशाला मारतोय? (किंवा मूर्खपणाही वाटू शकेल; पण एखाद्या दिवशी थोडा वेडेपणा केला, तर काय बिघडणार आहे? हे आपल्याला चारचौघांमध्ये निश्‍चितच करायचं नाही, त्यामुळं आपला वेडेपणा लोकांना कळण्याची शक्‍यता नाहीच. अस्तिक स्त्रियांनी "हृदया, किती रे तू रडतोस, सगळं उराउरी घेतोस, कितीदा आखडतोस; पण तू छान आहेस, असाच राहा, तुला माझे आशीर्वाद,' असं म्हणावं, तर नास्तिक स्त्रियांनी, "दिल का हाल सुने दिलवाला, सीधी सी बात ना मिर्च मसाला,' गाणं म्हटलं तरी चालेल. "तुझ्या जोरावर माझं इंजिन छान चालतंय,' असं म्हटलं, तर उत्तमच!
7. नऊच्या नऊ दिवस कोण्या अनोळखी स्त्रीकडं बघून हसावं किंवा बोलावं. अगदी जुनी मैत्रीण असल्याप्रमाणं जोरदार "हाय- हेलो' करावा. तिला कळणार नाही- न कळू देत! ती विचित्र नजरेनं तुमच्याकडं बघेल- बघू देत! आजूबाजूचे तुम्हाला "बावळटच आहे,' अशा माना डोलावतील- करू देत! आपल्याला रोज एका नव्या बाईकडं बघून हसायचं आहे, जमल्यास तिची काहीतरी स्तुती करायची आहे.
8. पंचेंद्रियांना काहीतरी खाद्य पुरवायचंय. कानासाठी एखादं गाणं, नाकासाठी सुवास, स्पर्शासाठी एखादं कापड किंवा मॉइश्‍चरायझर, चवीसाठी एखादं फळ/ पदार्थ. डोळ्यांसाठी फुलं! तासन्‌ तास खात बसणं किंवा गाणं ऐकत बसणं अपेक्षित नाही. एखादाच घास, एखादंच गाणं! पण ते अगदी परिपूर्णपणे, खोल खोल जाऊन, खोल श्‍वास घेत त्याचा आनंद घेणं अपेक्षित आहे. फुलाचा सुगंध घेतला, की तो थेट नाभीपर्यंत जातोय अशी कल्पना करावी. तीच गोष्ट गाणं, पदार्थ, स्पर्शाची. हा पंचेंद्रियांचा जागर आहे.
9. अस्तिक स्त्रियांनी "गेल्या आठ दिवसांत आपण वा आपल्या मैत्रिणीनं काय काय प्रार्थना केल्या,' हे आणि नास्तिक स्त्रियांनी "आपण वा आपल्या मैत्रिणीनं काय काय मानसिक नोंदी केल्या,' हे थोडंसं आठवायचं आहे. हे नव्या युगाचं वाण आपण दर वर्षी घेऊ आणि बाकीच्या मैत्रिणींना पण सांगू- आपापसांत याची चर्चा करू, असं ठरवायचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com