परीक्षा

manisha vani
manisha vani

सप्तरंग राहुलच्या पाठीवरून हात फिरवत अनिता त्याला म्हणाली ः‘‘बेटा, खरी चूक माझी आहे. जगात संकटं येतात जातात, परीक्षा येतात आणि जातात; पण सगळेच निकाल आपल्या बाजूनं लागत नसतात. काही परीक्षा आपण हरतो म्हणून काही ती आपली कायमची हार नसते. देवानं आपल्यावर टाकलेला विश्वास असतो तो. जो अपयशी होऊन पुनःपुन्हा आव्हान स्वीकारतो, तोच खरा मनुष्य असतो, हे जीवनाचं सार मी तुला शिकवू शकले नाही ...म्हणजे ही माझी हार आहे; तुझी नव्हे. मी चुकले, मला माफ कर. क्षुल्लक परीक्षेवरून मुलाचं मूल्यमापन करणारे आई-वडील नाही आहोत बेटा आम्ही. आम्हाला तू हवा आहेस. अगदी जसा आहे तसाच.’’

अनिता आज खूप संभ्रमात होती. कालपासूनच तिला राहून राहून घाबरल्यासारखं होत होतं. सारखी आत-बाहेर करत होती ती. उद्याचा दिवस कधी येऊच नये, असं तिला वाटत होतं. एकसारखी धडकी भरत होती तिला. एकतर आज ती घरातही एकटीच होती; पण मग असा काय विचार करत होती बरं ती आज? दरवर्षी लागतो तसाच तर उद्या बारावीचा निकाल लागणार होता. हो, पण या वर्षी अनिताच्या एकुलत्या एक मुलानं -राहुलनं - बारावीची परीक्षा दिलेली होती आणि त्या परीक्षेचाच उद्या निकाल होता. ...पण मग निकाल लागूच नये, असं तिला का वाटत होतं? राहुल तर अत्यंत हुशार मुलगा होता. मेडिकलला त्याला सहज प्रवेश मिळेल, अशी खात्री राहुलच्या सरांनाही होती. आजपर्यंत राहुलनं क्वचितच दुसरा नंबर मिळवला होता.

राहुल लहानपणापासूनच अभ्यासात चांगला होता. खेळातही त्यानं खूप बक्षिसं पटकावलेली होती. लहान होता तेव्हापासूनच काहीतरी वेगळं करायची त्याला हौस. नवीन खेळणं जरी घेतलं तरी ते तो एकसारखं उलटून-पालटून बघायचा. खेळणं उघडून पाहिल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे. खेळण्याच्या आतल्या गोष्टी पाहिल्यावरच त्याची उत्सुकता शमायची आणि एकदा का ते खेळणं उघडून मोकळं केलं की स्वारी लगेच दुसऱ्या खेळण्याची मागणी करायला तयार! नवीन खेळणं घरात येईपर्यंत तो अनिताला अगदी हैराण करून सोडायचा. अनिताही राहुलच्या सगळ्याच जिज्ञासा पूर्ण करत असे. 

राहुलचे बाबा कामावरून उशिरा घरी यायचे. तोपर्यंत राहुलची समजूत घालून अनिता त्याला झोपवायची. साहजिकच राहुलला आईचाच खूप लळा होता.
...तर असा हा राहुल आता या वर्षी बारावीला होता. राहुलनं मेडिकलला जायचं निश्‍चित केलं होतं आणि याच गोष्टीचा अनिताला त्रास होत होता. तिच्या मनात एकच विचार एकसारखा घुमत होता. जर राहुलला मार्क कमी मिळाले किंवा त्याला जर -मेडिकलला प्रवेश नाही मिळाला, तर हा मुलगा स्वतःच्या जिवाचं काही बरं-वाईट तर करून घेणार नाही ना, या विचारानं अनिताला पछाडून टाकलं होतं. 

राहून राहून तिला धडकी भरत होती. तसं पाहिलं तर राहुल खूप समजदारही होता; पण एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की तो खूप भडकायचा. समोर कोण आहे, हेदेखील तो संतापाच्या भरात विसरून जायचा. मात्र, त्याचं एक होतं, की थोड्या वेळानं तो शांतही होत असे. कुणी जर त्याच्याकडून जाणता-अजाणता दुखावलं गेलं असेल, तर तो संबंधितांची माफीदेखील मागायचा. राहुलला सगळ्याच विषयांचे पेपर चांगले गेले होते. खासकरून मेडिकल ग्रुपच्या विषयांची त्याची तयारी जय्यत होती. परीक्षेच्या वेळी तो खूप आजारी पडला. घशाला इन्फेक्‍शन झालं होतं त्याच्या. त्यामुळं निकालावर परिणाम होईल, असं अनिताला सारखं वाटत होतं.
***
राहुलचे वडील आज नेमके दौऱ्यावर होते, म्हणून तिला फारच एकाकी वाटत होतं. राहुलही तसा काळजीतच होता. सकाळी उठल्यापासून आईशी एक शब्दही तो बोलला नाही. सारखा लॅपटॉपजवळ बसून रिझल्टच्या वेबसाईटवर जाऊन पाहत होता. त्याच्या मनातली काळजी त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. एकदोनदा अनिता त्याला तसं म्हणालीदेखील ः ‘‘बाळा, एवढा का घाबरा झालायंस? सगळं काही ठीक होईल. जे होईल ते चांगलंच होईल. नको काळजी करूस.’’
अचानक लॅपटॉपच्या स्क्रीनवर रिझल्ट दिसायला लागला. राहुलनं आईला जोरात हाक मारली ः ‘‘आई, लवकर ये...रिझल्ट लागलाय.’’ अनिता देवाचा धावा करू लागली. तिच्या काळजाचा ठोका चुकला. मन धास्तीनं भरून गेलं. भाजी चिरायची सोडून हात धुऊन ती राहुलच्या खोलीत आली. पाहते तर काय, राहुल एकदम घाबरलेला दिसत होता. अनितानं राहुलच्या नजरेतले भाव टिपले आणि तिलाही घाम फुटला. तिनं त्याला काही विचारायच्या आतच तो रागारागानं घराबाहेर निघून गेला. अनिताच्या पायाखालची जमीनच सरकली. ती त्याच्यामागं धावत गेली; पण तोपर्यंत राहुल बाईक घेऊन निघूनही गेला होता. मग ती रडत राहिली. एकटीच. काय करावं ते तिला सुचत नव्हतं. तिला वाटलं, संपलं सगळं आता. ज्या गोष्टीची तिला भीती वाटत होती तेच झालं असावं, असा तर्क तिनं केला. राहुलला कमी मार्क मिळाले असावेत म्हणूनच तो रागा-संतापात घराबाहेर निघून गेला असावा, असं तिला वाटलं. 
***
स्वतःला सावरत अनितानं राहुलला फोन केला; परंतु तो मोबाईल घरीच ठेवून गेला होता. तिनं राहुलचा लॅपटॉप तपासला आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ती अगतिकपणे राहुलची वाट पाहत राहिली. तिला काय करावं काहीच कळत नव्हतं. नवऱ्याला फोन करून काहीच फायदा नव्हता. राहुलच्या मित्रांना फोन करावा म्हणून ती आतल्या खोलीकडं वळणार, तेवढ्यात राहुलनं घरात प्रवेश केल्याचं अनिताच्या लक्षात आलं...तिनं चपळाई केली...! राहुल सरळ त्याच्या खोलीत गेला. त्यानं दरवाजा आतून बंद करून घेतला. आपली आई कुठं आहे, याची साधी दखलही त्यानं घेतली नाही. राहुल काहीतरी मनाशी ठरवूनच घरी आला होता, हे अनितानं ताडलं. अनिता त्याला काही सांगूही शकली नाही. काय सांगायचं होतं बरं अनिताला?? कदाचित ते ऐकल्यावर राहुलचा निर्णय बदलला असता. असा कोणता निर्णय तो घेणार होता? 
***
होय, राहुलनं स्वतःला संपवायचा निर्णय घेतला होता. पंख्याला चादर बांधून, खाली एक उंच स्टूल ठेवून तो वर चढला होता. तेवढ्यात त्याला काहीतरी सुचलं व तो खाली उतरला. त्यानं विचार केला, की आपल्या आई-बाबांना कल्पना दिलेली बरी. म्हणून शेवटची चिठ्ठी लिहिण्याचं त्यानं ठरवलं. डोक्‍यात राक्षस शिरला होता त्याच्या. चिठ्ठी लिहून पूर्ण होताच त्यानं पाठ वळवली व तो स्टूलवर चढणार इतक्‍यात त्याचं लक्ष गेलं...तर अनिताच स्टूलवर चढून स्वतःच्या गळ्यात फास अडकवत होती! आता अनिताच हे आयुष्य संपवायला निघाली होती. हा अविचार तिच्या मनात का आला? हे काय अघटित करणार होती ती? तिला पाहताच राहुल ओरडला :‘‘आई, हे तू काय करत आहेस? तुझं कुठं काय चुकलंय? चूक तर माझ्या हातून घडलेली आहे. मी तुझा नालायक मुलगा आहे. लहानपणापासूनच मी तुला छळत आलो आहे. आई, मला माफ कर. मी तुला कधीही खूश ठेवू शकलो नाही.’’
अनिता राहुलच्या मदतीनं स्टुलावरून खाली उतरली. बराच वेळ दोघंही मनमोकळेपणानं रडत राहिले. राहुल तर एकदम हमसून हमसून रडत होता. त्याला त्याची चूक समजली होती. तो आज काहीतरी अघटित करणार होता. ज्या गोष्टीची भीती अनिताला होती, तीच आज सत्यात उतरली असती; परंतु राहुलच्या एकंदरीत जलद हालचाली पाहता आणि त्याचं आपल्याकडं लक्ष नाही, याची खात्री करून घेत ती चपाळाईनं राहुलच्या आधीच त्याच्या खोलीत जाऊन दडून बसली होती...ती त्याच्या खोलीत होती म्हणूनच तर ती राहुलचे प्राण वाचवू शकली. तिचा एकुलता एक मुलगा तिच्या प्रसंगावधानामुळं वाचला होता. बराच वेळ रडल्यानंतर दोघंही शांत झाले. अनिता हळूच राहुलजवळ गेली. त्याच्या पाठीवरून हात फिरवत ती त्याला म्हणाली : ‘‘बेटा, खरी चूक माझी आहे. जगात संकटं येतात आणि जातात, परीक्षा येतात आणि जातात; पण सगळेच निकाल आपल्या बाजूनं नाही लागत. काही परीक्षा आपण हरतो म्हणून काही ती आपली कायमची हार नसते. देवानं आपल्यावर टाकलेला विश्वास असतो तो. जो अपयशी होऊन पुनःपुन्हा आव्हान स्वीकारतो, तोच खरा मनुष्य असतो. हे जीवनाचं सार मी तुला नाही शिकवू शकले...म्हणजे ही माझी हार आहे; तुझी नव्हे. मी चुकले, मला माफ कर. क्षुल्लक परीक्षेवरून मुलाचं मूल्यमापन करणारे आई-वडील नाही आहोत बेटा आम्ही. आम्हाला तू हवा आहेस. अगदी जसा आहे तसाच.’’
***
राहुलनं चुकीची माफी मागितली. अनिता माफ करत त्याला म्हणाली :‘‘तुझा रिझल्ट तू नीट बघ! तुझ्या नंबरच्या वर असलेल्या मुलाचे मार्क तू मघाशी बघितले होतेस...घाईघाईत! बेटा, तुला ९८ टक्के मिळालेत.अभिनंदन!’’ डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन राहुलचे वडील दारातून हे सगळं बघत होते. अनिताविषयीचा आत्मविश्वास आणि राहुलवरचं प्रेम त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं. त्यांचा मुलगा राहुल आज खऱ्या अर्थानं जीवनाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता आणि परीक्षकाची भूमिका त्याची आई अनिता हिनंच निभावली होती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com