स्वप्न (मंजिरी कारेकर)

manjiri karekar
manjiri karekar

स्वीनं ड्रॉवरमधली किल्ली घेतली. कपाट उघडलं. त्यात तिचा कॅमेरा अनेक वर्षांपासून तिची वाट पाहत होता. तिनं तो बाहेर काढला. आपला पांढरा ऍप्रन व्यवस्थित घडी केला. त्यावर स्टेथोस्कोप ठेवला. कपाट बंद केलं. ""बाबा, आजपर्यंत तुमच्या स्वप्नांसाठी मी जगले. आता मला जगण्यासाठी माझी स्वप्नं पाहू देत. नाही तर मी घुसमटून जाईन,'' असं ती ठामपणे म्हणाली...

मनस्वीनं मऊशार दुलई बाजूला केली. सूर्यकिरणांची कोवळी तिरीप तिच्या चेहऱ्यावर पडली होती. पहाटेची स्वप्नं खरी होतात, असं आई नेहमी म्हणते. तिला हसू आलं. स्वप्नंसुद्धा गमतिशीरच असतात. कितीही दूरची असली तरी एकदम जवळची वाटणारी. आपल्या भावनांचं "व्हेंटिलेशन'च जणू. तिला पुन्हा एकदा खळकन्‌ हसू आलं. "मनस्वी हॉस्पिटल'चा बोर्ड. "डॉक्‍टर' मनस्वीची मुलाखत आणि फोटोग्राफरसुद्धा मनस्वीच.

रात्री छान झोप लागली. कितीतरी दिवसांनी लागलेली गाढ झोप. मेडिकलचा अभ्यास सोपा नसतो. त्यात ती इंटर्नशिप. सगळं यशस्वीरित्या पार करून ती डॉक्‍टर झाली होती. आईबाबांची इच्छा-स्वप्नं पूर्ण झालं होतं. तिचं हॉस्पिटलही बांधूनही तयार होतं. त्याचं उद्‌घाटन आज तिच्याच हस्ते होणार होतं. तिचे बाबा स्वतःच डॉक्‍टर असल्यामुळे "मनस्वी' हॉस्पिटलमध्ये सगळेच निष्णात असणार होते.
तिनं शॉवर सोडला. थंडगार पाण्याचे हलकेच शिंतोडे; पण तिला फ्रेश वाटलं. कधी कधी स्वप्नांच्या मागं धावताना आपण स्वतःला इतकं ताबलतो, की सत्याची मुक्कामं निसटूनच जातात. तिनं नवीन ड्रेस घातला. फिका गुलाबी ड्रेस आणि त्यावर काळी ओढणी. तिनं स्वतःचाच एक सेल्फी काढला.

तिला तिचं बालपण आठवलं. ती आई-बाबांची एकुलती एक मुलगी होती. बाबांचा तर जीव की प्राण होती. घरात पहिल्यापासूनच अभ्यासाला पूरक वातावरण होतं. आई इंजिनिअर आणि बाबा डॉक्‍टर. मनस्वीनंही पुढं डॉक्‍टर व्हावं, असंच दोघांचंही स्वप्न होतं; पण दोघांचंच. मनस्वीला मात्र त्यात फार काही रस नव्हता. म्हणजे तिला ते पेलवणार नव्हतं असं नव्हतं. बुद्धिमत्ता तिच्याकडे उपजतच आली होती. लहानपणापासून बाबा तिच्या अभ्यासासाठी दक्ष होते. सुटीत मात्र मनस्वी स्वतःचं आयुष्य स्वतःसाठी जगायची.

आजी-आजोबांकडं ती गावी जायची. आजोबांबरोबर ती किल्ले चढायची. समुद्रावर जायची. सूर्योदय - सूर्यास्त जसे तिच्यासाठीच व्हायचे. रोजचाच सूर्योदय आणि रोजचाच सूर्यास्त; पण रोज तिच्या कॅमेऱ्यात बंदिस्त व्हायचे. रोज त्यांच्यातलं नावीन्य तिला जाणवायचं. तिला झाडावरचे पक्षी दिसायचे. त्या पक्ष्यांची घरटी, त्या घरट्यातली अंडी सगळंच तिच्या कॅमेऱ्यात सुरक्षित असायचं. मंदिरांतली नक्षी असो, किल्ल्यावरच्या दगडातून फुटलेले गवताचे कोंब, देवीची मळवट असो किंवा एखाद्या गरिबाच्या चेहऱ्यावरची सुरकुती तिच्या कॅमेऱ्यातून काहीच सुटत नसे. पक्ष्याच्या उंच भरारीत तिचा श्‍वास रोखला जायचा. माशाच्या उंच उडीत तिची नजर खिळायची. "नजाऱ्यापलीकडची नजर' असणं हीसुद्धा निसर्गदत्त देणगीच असते. चालताबोलता क्षण पकडायचं कसब तिच्यात होतं. तिच्या चुलतबहिणीच्या लग्नात तिनं टिपलेलं गाव इतकं खुबीदार होतं, की तिच्या सासरच्या लोकांनी तिला मनस्वीला खास भेट दिली होती. फोटो आणि मनस्वी हे जणू समीकरणच झालं होतं.

मनस्वीच्या बाबांना मात्र या सगळ्याचा तिटकारा होता. कॅमेऱ्यापेक्षा स्टेथोस्कोप तिच्या हातात असायला हवा, असं त्यांना वाटायचं, नव्हे तसा त्यांचा आग्रहच होता. आईचंही मत याहून काही निराळं नव्हतं. ""मनू, तुझं फोटोग्राफीचं वेड वाढत चाललंय. अभ्यासावर त्यामुळं दुष्परिणाम होतोय हे तुझ्या लक्षात येतयं का?'' असं बाबांनी खडसावलं. ""पण बाबा मला खरंच फोटोग्राफीत करिअर करावंसं वाटतंय...'' असं धाडधाड बोलावसं वाटलं तिला. पुरोगामी विचारधारा असणाऱ्या पाल्याकडून हे बोललं जाणं काही आश्‍चर्यकारक नसलं, तरी स्वप्नांचे मनोरे रचणाऱ्या पालकांना हे पचवणं निश्‍चितच जड गेलं असतं.

ती रात्रभर विचार करत राहिली. "मला काय वाटतं? मला काय हवं याचा विचार का नाही करत? मला डॉक्‍टर नाही व्हायचंय. फोटोग्राफी हे माझं आयुष्य आहे,' असं ती मनात म्हणत होती. माणसाच्या नुसत्या जिवंत असण्याच्या धडपडीपेक्षा जिवंत क्षणाचे साक्षीदार होण्यात तिला जास्त धन्यता वाटत होती. ती ते जगत होती, अनुभवत होती. तिनं काढलेला एखादा सुंदर फोटोग्राफ तिच्या आनंदाचं कारण ठरायला पुरेसा होता. दुसऱ्यांचे क्षण अनुभवावे, ते जगावे आणि कायमचे ते टिपावे आणि त्या क्षणांची सुंदर माळ आयुष्यभर पाहत राहावी हे इतकं अद्‌भुत तिला जगायचं होतं... पण आपल्याला जगण्यासाठी फक्त आपल्याच अपेक्षांची शिदोरीच थोडी पुरते? इतरांच्या स्वप्नांची आग तुम्हाला वास्तवाचे, सत्याचे चटके देतच असते. तारेवर चालण्यासारखी तिची कसरत होत होती; पण मनाच्या बाजूनं कलायचं स्वातंत्र्य तिला होतं का, तेच तिला माहीत नव्हतं. तिच्या निर्णयामुळं बाबांना एक जबर धक्का बसला असता आणि आई कोलमडून गेली असती. मात्र तिचा निर्णय झाला होता.

दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नव्हता; पण तिच्या निश्‍चयाला जागवणारा होता. ती आज हे सगळं सांगायला हॉस्पिटलला आली होती. बाबा त्यांच्या केबिनमध्ये रागातच बसले होते. बारावीचे प्रीलिम्सचे मार्क चांगले असले, तरी उत्तम मात्र नव्हते. ते रागातच बोलतच होते ः ""बस झालं आता! आमच्या चांगलेपणाची, प्रेमाची, विश्‍वासाची तुला किंमतच नाही. विरंगुळा, विरंगुळा म्हणून जो कॅमेरा सतत धरून ठेवतेस ना, तोच तुझ्या अपयशाला कारणीभूत ठरलाय समजलीस?'' बाबांचं ते अद्वातद्वा बोलणं ऐकल्यामुळं मनस्वीच्या भावनांचा बांध फुटला. तिनं त्या केबिनमधलं कपाट उघडलं. तिच्या कॅमेऱ्याला घट्ट धरलं; पण एक क्षणभरच. तिनं कॅमेरा कपाटात ठेवला. कपाट बंद केलं आणि किल्ली बाबांच्या हातात दिली. स्वप्नं बंदिस्त करून टाकली. तिचा मित्र, तिचा आनंद, तिचं जगणं हे सगळंच त्यानंतर कुलपात बंद झालं होतं. मोठ्या स्वप्नांचं मोलही मोठंच असतं- ते तसं फेडावंही लागतं.

.... आज इतक्‍या वर्षांनंतर हे सगळं आठवलं. आईच्या हाकेनं ती भानावर आली. ""मनू, चल. नाही तर सगळ्यांनाच उशीर होईल,'' आई म्हणाली. मनस्वी आलिशान गाडीत बसली. तिच्या गाडीवर डॉक्‍टरांचं चिन्ह बघून तिला गंमत वाटली. भव्य थाटामाटात उद्‌घाटन झालं. पार्टी झाली. अभिनंदनाचा वर्षाव झाला. फोटोग्राफी झाली. पांढरा ऍप्रन, गळ्यात स्टेथोस्कोप. आई-बाबांच्या व्हॉट्‌सऍप डीपीवर तिचेच फोटो- "डॉक्‍टर' मनस्वीचे फोटो. हळूहळू गर्दी पांगली.

बाबा केबिनमध्ये बसले. मनू तिथं आली. ""बोल बेटा, आज काय पाहिजे तुला? मी खूप खूष आहे आज,'' बाबा म्हणाले. ती बाबांकडं गेली. ""मला तुमच्या कपाटाची किल्ली हवी आहे,'' असं ती म्हणाली. बाबांनी आश्‍चर्यानं पाहिलं. तिनंच ड्रॉवरमधली किल्ली घेतली. कपाट उघडलं. त्यात तिचा कॅमेरा अनेक वर्षांपासून तिची वाट पाहत होता. तिनं तो बाहेर काढला. आपला पांढरा ऍप्रन व्यवस्थित घडी केला. त्यावर स्टेथोस्कोप ठेवला. कपाट बंद केलं. ""बाबा, आजपर्यंत तुमच्या स्वप्नांसाठी मी जगले. आता मला जगण्यासाठी माझी स्वप्नं पाहू देत. नाही तर मी घुसमटून जाईन,'' असं ती ठामपणे म्हणाली. एवढं बोलून किल्ली बाबांच्या हातात देऊन ती स्वतःची स्वप्नं धुंडाळायला बाहेर पडली. आई-बाबांचं स्वप्न पूर्ण करून तिनं स्वतःच्या स्वप्नांनाही मोकळं केलं होतं - कायमचंच. वैद्यकीय व्यवसाय करताकरता ती फोटोग्राफीमध्येही स्वतःचा आनंद शोधणार होती. तिच्याही स्वप्नांना पंख मिळाले होते. एक नवं आयुष्य हात पसरून समोर उभं राहिलं होतं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com