झिरो कार्बन उत्सर्जन... 14 हजार कि. मी. प्रवास

मनोज साळुंखे
सोमवार, 23 जानेवारी 2017

मानवी समाज व्यवस्था आणि त्याचं जगणं टिकविण्यासाठी सर्वाधिक गरज कोणती असेल तर ती ऊर्जेची. ती देखील स्वच्छ ऊर्जेची. ऊर्जेची गरज वाढत आहे. अलीकडच्या काळात. या गरजेचं वाढतं प्रमाण हे मोठं आव्हान आहे.

कार्बन उत्सर्जनाचं अंधाराचं साम्राज्य नष्ट करण्यासाठी जी गती हवी, ती अद्याप मिळत नाही. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये या मुद्द्यावरून आजही एकमेकांकडे अंगुलीनिर्देशाचा खेळ सुरू आहे. प्रदूषण आणि वातावरणीय बदलांमुळे पृथ्वी विनाशाच्या टोकाला आली तरी हा खेळ सुरूच आहे.

अंधाराचं साम्राज्य तसंच आहे. उलट ते वाढत चाललं आहे. आपल्या राज्यातला अंधार नष्ट करून प्रकाशाचे राज्य आणण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या गोष्टीतल्या राजाच्या साम्राज्यासारखी आपली परिस्थिती आहे. अंधार नष्ट करून प्रकाशाचं राज्य आणावं, असं एका राजाच्या मनात आलं. तसे आदेश निर्गत केले. प्रजा कामाला लागली. रात्री अंधार पडल्यानंतर मिळेल त्यात त्यांनी अंधाराला भरायला सुरवात केली. लोक टोपलीत अंधार भरून दरीत टाकू लागले. वर्षांनुवर्षे मूर्खासारखा हा प्रयत्न सुरू होता. एके दिवशी टोपलीत अंधार भरत असणाऱ्या खोलीत एका शहाण्या व्यक्‍तीने मेणबत्ती घेऊन प्रवेश केला. क्षणात अंधार नाहीसा झाला. सर्व जनतेनं अंधाऱ्या रात्री या व्यक्तीचं अनुकरण करीत मेणबत्त्या पेटवल्या. शहर प्रकाशानं उजळलं. 

अशीच एक साहसी आणि जिद्दी ध्येयवेड्याची बातमी वाचनात आली. अपारंपरिक ऊर्जेची म्हणजे सौरऊर्जेची मेणबत्ती घेऊन एका भारतीय युवा अभियंत्याने जगभर प्रवास केला. तो प्रवास अचंबित करणारा आहे. जिवाश्‍म इंधनाचा आग्रह धरणाऱ्यांना अंतर्मुख करायला लावणारा आहे. स्वच्छ ऊर्जेचा संदेश घेऊन जगभर फिरणाऱ्या या 35 वर्षीय युवा अभियंत्याचे नाव आहे नवीन राबेल्ली. हैदराबाद विद्यापीठाचा इलेक्‍ट्रॉनिक शाखेचा तो पदवीधर. व्यावसायाने तो मोटर वाहन इंजिनिअर, पण खरं पाहिलं तर दिल से तो एका सच्चा "प्रवासी' आहे. नवीनने 12 देशांतून तब्बल 14 हजार किलोमीटरचा प्रवास केला. तो देखील झिरो कार्बन उत्सर्जन करीत. एका नया पैशाचा इंधनासाठी खर्च नाही. उलट तब्बल 750 लिटर डिझेलची बचत. आहे की नाही कमाल! पण नवीनने हे करून दाखवलं ते सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ऑटो रिक्षातून बरं का! मागील वर्षी फेब्रुवारीत नवीनने प्रवासास प्रारंभ केला. भारत, इराण, तुर्की, ग्रीस, बल्गेरिया, सर्बिया, हंगेरी, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स व सप्टेंबरमध्ये इंग्लडला त्याने प्रवासाची सांगता केली. शक्‍य तिथं विमान आणि बोटीने ऑटो रिक्षा नेली. या काळात त्याने तब्बल 150 छोट्या-मोठ्या शहरांना भेटी दिल्या. 

अपारंपरिक ऊर्जेचा संदेश पोचवण्यासाठीची त्याची धडपड थक्‍क करणारी आहे. नवीनने डिझेलवर चालणारी एक ऑटो रिक्षा घेतली. एका स्थानिक गॅरेजमध्ये सहकाऱ्यांसह त्यावर तीन वर्षे झटून काम केले. रिक्षामध्ये काही तांत्रिक बदल करून त्याचे रूपांतर सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ऑटो रिक्षात करण्यात ते यशस्वी झाले आणि सुरू झाला नवीनचा नवीकरण ऊर्जेसाठीचा नाविन्यपूर्ण प्रवास. 

मानवी समाज व्यवस्था आणि त्याचं जगणं टिकविण्यासाठी सर्वाधिक गरज कोणती असेल तर ती ऊर्जेची. ती देखील स्वच्छ ऊर्जेची. ऊर्जेची गरज वाढत आहे. अलीकडच्या काळात. या गरजेचं वाढतं प्रमाण हे मोठं आव्हान आहे. अक्षय ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) मिळविण्यासाठी मानवाची लढाई सुरू आहे. त्यातूनच जिवाश्‍म इंधन युगाचं अंतिम पर्व सुरू झाले आहे हे मात्र निश्‍चित! नवीकरणीय ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलऊर्जा, सेंद्रिय पदार्थांपासून निर्माण होणारी ऊर्जा यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. यानिमित्ताने नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या अर्थकारणाला जगभरात ऐतिहासिक वळण मिळत आहे. 

स्वच्छ ऊर्जेचा संदेश घेऊन एक भारतीय युवक देशांच्या सीमा पादाक्रांत करतो ही निश्‍चितच अभिमानाची बाब आहे. हवा प्रदूषणाच्या जगभर पसरलेल्या विषावर व संपुष्टात येणाऱ्या जिवाश्‍म इंधनाच्या साठ्यावर अक्षय ऊर्जेचा खात्रीचा आणि सुलभ उपाय भारतीयांकडे आहे. हे त्याला जगाला दाखवून द्यायचंच होतं. तो म्हणतो, माझ्यासारखी एखादी सर्वसाधारण व्यक्‍ती एखाद्या गॅरेजमध्ये ऊर्जेवर तोडगा काढू शकते. स्वप्नपूर्ती करू शकते; मग अन्य का करू शकणार नाहीत? नवीनचा सवाल निश्‍चितच अंतर्मुख करणारा आहे. अंधारात त्यानं मेणबत्ती पेटविली आहे. बस्स, इतरांनी त्याचं अनुकरण करावं. 

Web Title: Manoj Salunkhe write abour air pollution