श्‍वासच गुदमरतोय...

मनोज साळुंखे
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पर्यावरण हे हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी, पशू-पक्षी या सर्वांमुळे बनतं. यात छेडछाड नको. याचं संतुलन राखलं पाहिजे. ते आपल्या हातात आहे. नाहीतर श्‍वासानं जीवन सुरू होतं खरं; पण श्‍वासामुळंच जीवन संपवण्याची वेळ आली तर...? 

एखाद्या देशाची, विशेषतः त्या देशाच्या राजधानीतील हवा दूषित होणं हे त्या देशाच्या प्रगतीचं लक्षण नव्हे; तर ते मागासलेपणाचं लक्षण म्हणावं लागेल.

आर्थिक विकासदर, जीडीपी, वेगानं झेपावणारी अर्थव्यवस्था ही विकासाच्या वाटेवरील आर्थिक भाषा आपण नेहमीच करतो; पण प्रदूषणामुळं अशुद्ध हवेनं निसरड्या होत चाललेल्या वाटेवर जोपर्यंत जागरुकता आणि सुधारणा होणार नाही; तोपर्यंत या गप्पांना काहीच अर्थ उरणार नाही. दिल्लीची हवा प्रदूषित आहेच. अलीकडं तिनं धोक्‍याची पातळी ओलांडली. अर्थपूर्ण वाक्‍यात वर्णन करायचं झाल्यास दिल्लीत काळ्याकुट्ट धुक्‍यानं पांढऱ्या शुभ्र धुक्‍याची जागा घेतली होती. परिणामी साडेपाच हजार शाळा काही दिवसांसाठी बंद ठेवाव्या लागल्या. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेबाबत एवढंच म्हणता येईल, की लहान बालकं आणि वयोवृद्ध दिल्लीकरांसाठी ती फाशीची शिक्षा ठरत आहे.

ज्या श्‍वासानं जीवन सुरू होतं, त्याच श्‍वासानं जीवन संपवण्याची वेळ आली आहे. मृत्यूचा विचारही ज्यांच्या मनाला शिवत नाही; तिथं दिल्लीतील तीन बालकांनी प्रदूषणाच्या धास्तीनं सर्वोच्च न्यायालयाची दारं ठोठावली. यापुढं लग्नाचा सिझन तोंडावर असल्यानं फटाक्‍यांच्या आतषबाजीची शक्‍यता व्यक्त करून त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. फटाक्‍याचा धूर, हे हवा प्रदूषणाच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे. ""आमची फुफ्फुसं अजून विकसित झालेली नाहीत आणि यापुढं फटाक्‍यांच्या धुरामुळं होणारं प्रदूषण आम्ही सहन करू शकणार नाही,'' अशी आर्त विनंती या बालकांनी न्यायालयाला केली. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीत फटाका विक्रीवर बंदी घातली. शिवाय सध्याच्या व्यापाऱ्यांचे परवाने स्थगित ठेवले. यापुढं फटाके विक्रीचे परवाने व्यापाऱ्यांना देऊ नयेत, असे आदेशही न्यायालयानं दिले. या मुलांची आर्त विनवणी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात येईल. 

दिल्लीतील महत्त्वाच्या राजकीय घडामोंडीचं विश्‍लेषण करताना सुरवातीला तेथील हवेचं वर्णन करण्याची पद्धत आहे. दिल्लीची राजकीय हवा आता गरम झालीय, तापलीय, थंड झालीय... वगैरे; पण आता जागतिक स्तरावर दिल्लीची हवा फारच बदनाम झाली आहे, असंच म्हणावं लागेल. कारण जगातल्या पाच बड्या प्रदूषित राजधान्यांमध्ये दिल्ली फारच वरच्या क्रमांकावर आहे. हवा प्रदूषणात तर तिनं चीनची राजधानी बीजिंगलाही मागं टाकलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जगातील सर्वाधिक 100 प्रदूषित शहरांत भारतातील 30 शहरांचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे जगभरातील 103 देशांमधील 3000 शहरांमध्ये दिल्ली 11 व्या क्रमांकावर आहे. पीएम 2.5 नुसार (पार्टीक्‍युलेट मॅटर, म्हणजे अतिसूक्ष्म प्रदूषण करणारे हवेतील कण) ही क्रमवारी केली आहे. याला पीएम 2.5 म्हणतात, कारण या सूक्ष्म कणांचा व्यास 2.5 मायक्रॉनपेक्षा लहान असतो. मानवी केसाच्या व्यासाच्या तीस पट लहान आकारमान असणारे हे कण असतात. श्‍वासाबरोबर हे सूक्ष्म कण थेट फुफ्फुसांत प्रवेश करतात. रक्तात मिसळतात. रक्तवाहिन्या कठीण करतात. दुर्दैवानं हवेचं प्रदूषण हे भारतात पाचव्या क्रमांकाचं मृत्यूचं कारण आहे. प्रदूषित हवेमुळं जगभरात दीड कोटी, तर भारतात सरासरी 7 लाख लोक मृत्युमुखी पडतात. श्‍वासानं मरण यावं हे संपूर्ण मानवजातीच्या दृष्टीनं नामुष्कीजनकच आहे. 

या जगात येताना आपण पहिलं काम काय करतो? तर ते श्‍वास घेण्याचं. जीवनाचा निरोप घेताना, अंतिम क्षणीही हेच काम करतो. त्यावेळीही "अखेरचा श्‍वास घेतला', असंच म्हटलं जातं. जीवनाच्या एन्ट्री आणि एक्‍झिटच्या या दोन टप्प्यांच्या मधल्या टापूत आपण श्‍वास आत घेत असतो, बाहेर सोडत असतो; अगदी नकळतपणे. आपला श्‍वास जोडला गेला आहे तो अदृश्‍य मनाशी; जसा दोरा पतंगाला. श्‍वास आणि मनाचं नातं अतूट; म्हणजे अगदी पहिल्या श्‍वासापासून ते अखेरच्या श्‍वासापर्यंत, कधीही न तुटणारं. श्‍वास जीवन देतं, तर मन जीवनाला अर्थपूर्ण करतं. श्‍वास आणि मन या दोघांत चांगलं संतुलन राखण्याचं काम पर्यावरण करतं. पर्यावरण हे हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी, पशू-पक्षी या सर्वांमुळे बनतं. यात छेडछाड नको. याचं संतुलन राखलं पाहिजे. ते आपल्या हातात आहे. नाहीतर श्‍वासानं जीवन सुरू होतं खरं; पण श्‍वासामुळंच जीवन संपवण्याची वेळ आली तर...? 

Web Title: Manoj Salunkhe write about air pollution