वेळीच निदान... कॅन्सरपासून जीवदान 

Manoj Salunkhe write about cancer disease
Manoj Salunkhe write about cancer disease

एखाद्या दुर्धर रोगाच्या कचाट्यात सापडण्यापूर्वी वेळीच जाग आली, त्यानंतर आवश्‍यक चाचण्या घेऊन योग्य दिशेनं पावलं उचलली तर त्या दुर्धर रोगामुळं होणाऱ्या अकाली मृत्यूला तुम्ही रोखू शकता. हा सरळ साधा दक्षतेचा मूलमंत्र पाळल्यामुळं अमेरिकेतील 25 टक्‍के कॅन्सरग्रस्त रुग्णांनी मृत्यूला आपल्यापासून रोखलं आहे.

जगभरातील तमाम लोकांसाठी अगदी धडधाकटांपासून ते कॅन्सरग्रस्त रुणांसाठी ही आशादायक बाब आहे. कॅन्सरचं निदान आणि उपचार हे योग्य वेळेत केले तर लाखो रुग्ण अक्षरश: मृत्यूच्या दारातूनही माघारी येऊ शकतात, याला बळकटी देणारा एक अहवाल अमेरिकन कॅन्सर सोसायटीनं नुकताच जाहीर केला आहे. हा अहवाल सांगतो, गेल्या दोन दशकांहून अधिक काळात अमेरिकेमध्ये कॅन्सरमुळं मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललं असून ते एकूण 25 टक्‍क्‍यांनी घटलं आहे. हे आटोक्‍यात आणण्याचं कारण काय; तर अमेरिकनांनी धूम्रपानाला हळूहळू केलेला "बाय बाय'. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरचं वेळेत केलेलं निदान आणि योग्य वेळी सुरू झालेले उपचार. परिणामी 1991 ते 2014 या काळात तब्बल 21 लाख कॅन्सरचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना कॅन्सरच्या पुढील टप्प्यातील चक्रव्यूहात अडकण्यापासून रोखलं आहे. गेल्या दहा वर्षांतील आकडेवारीनुसार कॅन्सरची लागण होण्याचं पुरुषांमधील प्रमाण 2 टक्‍के घटलं आहे; पण महिलांबाबत मात्र ते स्थिर आहे.

कॅन्सरमुळं मृत्युमुखी पडण्याचं स्त्री-पुरुषांचं प्रमाणही वार्षिक 1.5 टक्‍क्‍यानं कमी झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. कॅन्सरमुळं मृत्यूचं प्रमाण 1991 मध्ये 1 लाख लोकसंख्येमागे 215.1 होतं ते 2014 मध्ये 161.2 झालं आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटी गेली 50 वर्षं कॅन्सरविषयक आकडेवारी प्रसिद्ध करते. डॉक्‍टर, संशोधक व कॅन्सर रुग्णांच्या सहकार्यासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांना यानिमित्तानं माहिती व्हावी व मार्गदर्शन व्हावं, हा सोसायटीचा उद्देश आहे. 

कॅन्सर हा कावेबाज शत्रू आहे. तो कुणाच्या शरीराचा ताबा कधी घेईल, याची कोणीही शाश्‍वती देऊ शकत नाही. तो छुपा रुस्तम आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळं कॅन्सरग्रस्तांची फुगलेली संख्या पाहता हा छुपा रुस्तम आपलीही शिकार करेल का, हा भयगंड प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. तो रुग्णाला चकवतो, तसा डॉक्‍टरलाही. कॅन्सरची प्राथमिक लक्षणं ही अन्य किरकोळ आजारांसारखीच असतात. बहुतांश वेळा इथंच रुग्णाची फसगत होते. प्रारंभी दुर्लक्ष होतं. गुण येत नाही. मग रुग्ण डॉक्‍टर बदलतो. डॉक्‍टर बदलूनही तक्रार कायम राहते. बहुतेक वेळा सर्व उपाय थकल्यानंतर बायोप्सीचा सल्ला दिला जातो. मग लक्षात येतं, की शरीरात कॅन्सरनं ठाण मांडलं आहे. कॅन्सर या शब्दांतच इतकी दहशत आहे, की हा शब्द जरी रुग्णाच्या कानावर पडला तरी रुग्ण भीतीच्या चक्रव्यूहात अडकतो; धैर्य गळून पडतं. 

कॅन्सर म्हणजे निव्वळ मरण याला छेद देणारा हा अहवाल आहे. मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आजारांच्या यादीत कॅन्सरनं आता दुसरं स्थान पटकावलं आहे. दोनशेहून अधिक प्रकारच्या कॅन्सरने मानवजातीला विळखा घातला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळं आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी जगभरातील संशोधक कसून प्रयत्न करीत आहेत. अन्य आजारांच्या तुलनेत कॅन्सरवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. संशोधकांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जगभरात वाढत असली तरी कॅन्सरबाबत अधिक चांगल्या प्रकारचं निदान आणि आधुनिक उपचारांमुळं मृत्यूचं प्रमाण कमी होत असल्याचं चित्र पुढं येत आहे. हे जीवघेणं आक्रमण थोपवण्याची आपल्यात क्षमता आहे. याचेच हे संकेत आहेत.

कॅन्सरबाबत रुग्णांचं असणारं अज्ञान आणि उपचाराबाबत असणारे गैरसमज हे सर्व समस्यांच्या मुळाशी आहे. आपल्याबाबत चिंतेची बाब अशी आहे की, आजाराची काही लक्षणं दिसत असूनही अजूनही 75 टक्के भारतीय उशिरा डॉक्‍टरांशी संपर्क साधतात. अखेर कुठल्याही गंभीर आजारात मग तो कॅन्सर असो अथवा हृदयविकार-डायबेटिस, रुग्णांवर उपचार कोणत्या टप्प्यावर सुरू होतात, यावरच त्या रुग्णाचे दीर्घ आयुर्मान आणि आरोग्यदायी जीवननमान अवलंबून असते. सारांश, वेळीच जागे व्हा! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com