मराठा मोर्चा...एका शेतकरी तरूणाचे आत्मकथन

आकाश शिवदास चटके
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबईत निघालेला अफाट मराठा क्रांती मोर्चा आज (बुधवार) देशानं अनुभवला. आरक्षण, शिक्षण, शेती असे विविध प्रश्न घेऊन लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले. या पार्श्वभूमीवर मराठा शेतकरी तरूण आकाश चटके यांनी मांडलेले मनोगतः

सत्ताबदलानंतर महाराष्ट्रामधलं समाजकारण व राजकारण घुसळून काढणाऱ्या दोन मोठ्या घटना घडल्या त्यातली एक मराठा मोर्चा आणि दुसरी शेतकरी संप. दोन्हींचा राजकारणावर किंबहुना विद्यमान सरकारवर यःकिंचितही परिणाम झाला नाही. त्याची कारणं संसदीय राजकारणाचा घोटलेला गळा, मीडिया या लोकशाहीच्या खांबाला झालेलं गँगरिन आणि सोबत स्वतःची स्पेस हरवलेले विरोधक अशी असू शकतात.

मुंबईत निघालेला अफाट मराठा क्रांती मोर्चा आज (बुधवार) देशानं अनुभवला. आरक्षण, शिक्षण, शेती असे विविध प्रश्न घेऊन लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले. या पार्श्वभूमीवर मराठा शेतकरी तरूण आकाश चटके यांनी मांडलेले मनोगतः

सत्ताबदलानंतर महाराष्ट्रामधलं समाजकारण व राजकारण घुसळून काढणाऱ्या दोन मोठ्या घटना घडल्या त्यातली एक मराठा मोर्चा आणि दुसरी शेतकरी संप. दोन्हींचा राजकारणावर किंबहुना विद्यमान सरकारवर यःकिंचितही परिणाम झाला नाही. त्याची कारणं संसदीय राजकारणाचा घोटलेला गळा, मीडिया या लोकशाहीच्या खांबाला झालेलं गँगरिन आणि सोबत स्वतःची स्पेस हरवलेले विरोधक अशी असू शकतात.

जमवलेली गर्दी आजपर्यंत राज्याने पहिली पण मोर्चामध्ये जे दिसलं तो इव्हेंट नव्हता. 4-2% शहरी आर्थिक उच्चवर्णीय मराठा लोकवस्तीसाठी हा झालाही असेल इव्हेंट आणि त्याचा ढोल मीडियाकडून वाजवला गेला 100X पटीने मॅग्नीफाय करून. जिल्ह्या-जिल्ह्यातील जनतेने उत्स्फूर्त सहभाग घेतला, मराठा मोर्चासाठी न भूतो न भविष्यती जनता गोळा झाली. मराठा, कोळी, माळी, धनगर ते मुस्लिम जनतासुद्धा सहभागी झाली. तोही कसलाच राजकीय रंग रूप न चढवता. गावोगाव ते शहरं घराला कुलपं लावून रस्त्यावर आली. यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर होता, त्या चिमुरडीला न्याय देण्यापासून ते शेतकरी आत्महत्या, स्वामिनाथन आयोगापर्यंत सर्व गोष्टींसाठी समाज एकवटलेला. कोपर्डीची घटना ठिणगी झाली या उद्रेकाला बाहेर काढणारी आणि 2-3 वर्षातला बरबाद केलेला ग्रामीण भाग शेतकरी वर्ग यांच्या रागाची वाट झाला मराठा मोर्चा. अर्थातच त्यातून साध्य काहीही झालं नाही.
--------------
त्यातून गलका उठवला गेला मराठा हरला वगैरे.
मराठा काय कुठल्या एका पक्षाचा दावणीला बांधलेला आहे का? राष्ट्रवादी किंवा शरद पवार यांनी कधी स्टॅन्ड घेतलाय आम्ही मराठा पक्ष म्हणून? 
मराठ्यांनी भाजपला मतदान करावं की सेनेला की काँग्रेस-राष्ट्रवादीला हा समाजाचा प्रश्न आहे. रादर ते विखुरले जाणार निवडणुकीवेळेस हे उघड होतं. मोर्चा राजकीय नव्हता हे उघड होतं, मागण्या वेगवेगळ्या असल्या तरी कोपर्डी घटनेत झालेल्या जातीय ध्रुवीकरणातून चिडलेल्या समाजाचा आवाज होता तो ज्याचा वापर वेगवेगळ्या संघटना पक्ष ते कट्टरतावादी यांनी करून घेतला. आपल्या सोयीस्कर मार्केटिंग मीडीया मॅनेजमेंट करून, कित्येकांनी पुढारी व्हायच्या मनसुब्यावर मोर्चाचा वापर केला.

मोर्चामधला 60-70% समाज हा ग्रामीण आहे जो शेतीशी जोडलेला आहे. मालाच्या हमीभावाची वगैरे स्वप्नं पाहून मोर्चा मध्ये आलेला, तर शहरी भागासाठी हा इव्हेंट आहे. प्युअर इव्हेंट. मोर्चा अर्थातच सरकारकडून फाट्यावर मारला गेला कारण यकिंचितहि दबाव निर्माण करू शकलेला नाही मोर्चा, नैतृत्व लागतं क्रांती ला. नाहीतर तो फक्त एका ठिकाणी जमा झालेला मॉब होतो.

गांधींच्या मागं जनता शांततेत उभी असायची पण तिथं नैतृत्वाला तो माणूस होता जो बोलू शकत होता, बोलत होता , दबाव दाखवून देत होता. नैतृत्वहीन मुका मोर्चा हे जातीय वातावरण आणखीन ढवळून काढायला जातीय धार्मिक ध्रुवीकरणातून राजकारण करणार्यांना आयतं मिळालेलं कोलीत होतं.

मोर्चातील लाखो अन् कोटी लोकं ही सरकार विरोधात मतदान करतील असं जर दोन्ही काँग्रेसला वाटून ते फळ पडायची वाट बघत बसले होते तर हे आणखी 15 वर्ष सत्तेजवळपण जाणार नाहीत.

नोटबंदी, पिकमालाची नासाडी , पडलेले भाव, जातीयता उफाळलेली, धर्मान्ध ताकती वाढलेल्या, भ्रष्टाचार वगैरे या कशाचंच मार्केटिंग जमलं नाही एकाही काँग्रेस ला, तमाशा बघत बसले शेवटपर्यंत आणि शेवटी बघ्यांना थिएटर सोडावं लागतं शो संपल्यावर.
--------------
मोर्चे फुगत राहिले पण कसल्याही प्रकारची ठाम राजकीय भूमिका नसल्यानं सरकार वर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कसलाही दबाव निर्माण झाला नाही. उलट विरोधी पक्षाची संपूर्ण स्पेस हि मोर्चांनी घेतली आणि सरकार साठी विरोधकांना गुंतवून ठेवण्याचं माध्यम मोर्चे बनले.

राज्यात इतरत्र चाललेल्या सरकारी घडामोडींवर विरोधकांना ओरडायला कसलीही संधी राहिली नाही, विरोधक जातीय मोर्चा आपल्या माथी बसतो का काय या भीतीत धडपडत राहिले, धड मोर्चा पासून लांब जाता येईना आणि जवळहि. मोर्चाच्या मागण्यांना कसलाही थारा मिळणं अगदीच अशक्य होतं कारण दबाव निर्माण करायला पूर्णपणे अयशस्वी ठरलेल्या मोर्चालाही पुरेपूर बदनाम केलं गेलं आणि त्याचा प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात फायदा सरकार ला झाला. हे मोर्चे निषेध या एकमेव गोष्टीपुरते मर्यादित राहीले मग भलेली रोज 100 मागण्या त्यात समाविष्ट होत गेल्या असतील. खेडोपाड्यातील जनता एखाद्या जत्रेसाठी जमते त्या प्रमाणे एक दिवस शहरं चालत तुडवून गेली अप्रूप करत आणि तो कौतुक सोहळा सरकार विरोधी चालूय अशा एकंदर भ्रमात विरोधक राहून मोर्चा आणि सरकार च्या मदतीने त्यांनी स्वतःच नरडं दाबून घेतलं.

बाकी एकंदर जनतेसाठी जात किती महत्वाची आहे हा संशोधनाचा विषय आहे, शांततेत जगू पाहणाऱ्या माणसाला हे विषय 4-2 दिवस रुचकर लागतात त्या नंतर ओंगळवाणं होत जातं सामान्य माणसाला अगदी राजकारणावर व्यक्त होणं ही.

शेवटी बांधाबांधावर दुपारच्या वाऱ्यात बसून संसाराचा गाडा ओढायला समीकरणं जुळवणं हे जातीय समीकरणांपेक्षा किंवा राजकीय समीकरणांपेक्षा अवघड असतं. जाती पातीचं राजकारण भाकरी देत नाही बांधावर जगणाऱ्या समाजाला. काळानुसार जातींचं स्वरूप बदललं आहे. मानवी हक्क तुडवला गेलेला समाजगट  क्षुद्र या व्याख्येत बसवायचा तर आज समस्त शेतकरी वर्ग या व्याख्येत बसतो.
--------------
मराठा जात ही प्रामुख्याने शेतीशी जोडलेली कुणबी जमात आहे. 0.5% आर्थिक प्राबल्य असलेल्या मराठा समाजातील नेते पुढारी तत्सम घराण्यांना दाखवून एका शेतकरी म्हणून जगणाऱ्या एका संपूर्ण समाजाला वाळीत टाकायचं काम व्हाईट कॉलर समाजाकडून नोकरदार वर्गाकडून मीडिया ते सत्ताधारी विरोधक सर्वांकडून केलं गेलं आणि जातेय. त्या मेलेल्या समाजाने स्वतःचा बाप भाऊ बहीण आई मेल्या नंतर ची काढलेली अंत्ययात्रा म्हणजे मराठा मोर्चा होता. त्यात आवेग नव्हता ना उत्साह, काय असेल तर दबलेला आक्रोश होता.
--------------
मोर्चामुळं शेतकरी वर्गाचा तुंबलेला आक्रोश बाहेर पडला पण त्याला धुवून काढायचं जमलं नाही सत्ताधार्यांना आणि त्याला योग्य मार्ग देणं जमलं नाही विरोधकांना. याची पुढची ठिणगी पडली ती सर्वव्यापी शेतकरी संपातून. टनामध्ये विकणाऱ्याचं दुःख-व्यथा ग्रॅममध्ये खरेदी करणाऱ्याला समजत नसतात जाणवत नसतात. प्रत्येक शेतकऱ्यामागे सरासरी 2 कृषीतज्ञ राज्यात निर्माण झालेले आहेत. कॉफीटेबलपासून टपरीपर्यंत पिज्जा खाता खाता ते पार्टीपर्यंत. खळखळणाऱ्या ग्लास आणि सरकारी खर्चावर ईमानं उडवत उदंड जाहले तज्ञ वगैरे म्हणू शकतो. आकडेवारीच द्यायची झाली तर..

  • शेतीसासाठी लागणारं बियाणं खत-वीज-पाणी यांची बेरीज ही येणाऱ्या उत्पनाला मिळणाऱ्या किमतीच्या 70-80% जास्त आहे.
  • उत्पन्न कितीही वाढवलं तरी त्याचा मोबादला नाही वाढला तर माती खायची का?
  • प्रोडक्शन कॉस्ट 1000 रुपये आणि मोबादला 50 ते 500 रुपये.

यापेक्षा मोठा जोक काय?

'उत्पादक उद्योजक स्वतः संप करतो का? तर नाही. कामगार मजूर नोकरदार (म्हणजे मजूरच ) यांचं हत्यार आहे संपाचं, कारण मालकी त्यांची नसते, त्यांना त्यांच्या रोजगाराचं पडलेलं असतं, उत्पादित प्रॉडक्ट विकलं गेलं किंवा नाही त्यावर बांधील नसतो त्यांचा रोजगार त्यामुळं त्यांचं तसं संपामुळे नुकसान होत नाही, आणि म्हणून ते हत्यार मालकाशाही विरुद्ध सफल ठरतं.

आता मिल कामगारांचा संप आणि बरबादी हा विषयच पूर्णतः वेगळा आहे.
--------------
शेतकरी हा उत्पादक आहे, स्वतः मालक आहे, त्यामुळं तो संपावर गेल्याने नुकसान हे फक्त आणि फक्त शेतकऱ्याचे स्वतःचं होणार आहे कारण हा संप चिरकाळ व देशव्यापी नाहीये, तसा असता तरच दुष्काळी परीस्थिती निर्माण करता आली असती. त्यामुळं हा संप तसा कोणताच परिणाम मुर्दाड समाज किंवा सरकार वर करणार नाही, झालंच तर उत्पादन न घेतल्यामुळे होणारं संभाव्य नुकसान शेतकऱ्यांचं टळेल एवढीच थोडीफार जमेची बाजू.

मग हा संप कशासाठी होता? हा संप होता या देशात या राज्यात या समाजात शेतकरी नावाचा एक समाज तुमच्या आजूबाजूला जगतोय, शेती नावाची व्यवस्था तुमच्या देशात राज्यात अस्तित्वात आहे आणि त्या शेती व शेतकऱ्याच्या स्वतःच्या अशा काही मोठ्या अडचणी, काही गंभीर तक्रारी आहेत, त्या माणूस म्हणून ऐकून घेतल्या जाव्यात, त्याला मीडिया ते समाज सर्वांचाच वेळ मिळावा. ऐकून घेतलं जावं जगणं, माणूस म्हणून मान्यता मिळावी.

या बेसिक अपेक्षा ठेवून आजकाल ग्लॅमर विना कोणी विचारत नाही या एकमेव कारणामुळे स्वतःच पोट मारून शेतकरी समाजाने हे पाऊल उचललेलं. यातून साध्य काही होवो न होवो, या देशात खायला अन्नाचा कण महाग असताना शेतकऱ्याला हाक देणाऱ्या होऊन गेलेल्या कित्येक पंतप्रधानांचा विश्वास सार्थ ठरवत विक्रमी उत्पादनं घेऊन शेतकऱ्यांनी देश कृषीप्रधान बनवला, आज त्या देशात शेतकरी दिल्लीत मूत पितो आणि महाराष्ट्रात संपावर जातो याहून लाजिरवाणी गोष्ट या देशाच्या इतिहासात झाली नाही. समाज आणि आजपर्यंतच्या सर्व सरकारं या दोघांचं हे अपयश आहे. शेतकरी गबरगंड झाला नाही कारण त्याच्या प्रॉडक्टला कधीही मार्केट व्हॅल्यू मिळाली नाही, शेतीला कधीही उद्योगांचं खुलेपण आणि सिक्युरिटी मिळाली नाही. पिकलं की कर आयात, घाल निर्यातबंदी या धोरणांमुळे ते हमीभाव ठरवताना अजूनही मजुरी 20 रुपये पकडणार्या चुतीया प्रशासकिय नियम धोरणांमुळे शेतकरी नागवला गेला, शेती महाग महाग महाग होत गेली. ग्राहकाला स्वस्त मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याचा पावलोपावली गळा घोटाळा गेला. अन्नधान्य खरेदी वर 1% खर्च ग्राहक करतो उत्पन्नाच्या, तो 70% होऊद्या की? जाऊद्या शेतकऱ्याच्या खिशात पैसा. खाउद्या महाग? 

शेतकरी गुलाम म्हणून राबवला गेला आणि राबवला जातोय, जाईल का नाही सांगू शकत नाही. हे कोलमडून पडणार आहे. एवढा मनोरा वर गेलेला आहे, तो ढासळायला लागलाय.

भारताचा सीरिया व्हायच्या मार्गावर आहे. सततच्या दुष्काळानंतर सीरियामध्ये आधी शहरं मौताज झाली अन्नाला, रोजगार निर्मिती ते शिक्षण सगळंच बोंबललं , गावांतून कामासाठी येणारे लोंढे न थांबवता आल्यानं आतंक पसरायला लागलाच, आणि धार्मिक कट्टरतेने शेवटी देशाची माती केली. निसर्गनिर्मित दुष्काळातून त्यांचा प्रवास झाला, भारताचा मानवनिर्मित दुष्काळातून होईल. तिथल्या लोकसंख्येला विस्थापित होता आलं, इथला मानव मानवाला शिजवून खाण्यापर्यंत खाली उतरेल. सुरुवात शेतकऱ्याला कापून खाण्यापासून होणार आहे यात शंका नाही. हाडांशिवाय तसं फारसं शिल्लक राहीलं नाही.
--------------
100 रुपये मातीत इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याच्या बदल्यात 1000 तरी मिळावे लागतात संसार ओढायला. पण मिळतात 90 रुपये. हे चालत आलंय, कधी 90 कधी 110 कधी 10. शेतकऱ्याच्या करिअरच्या 30 वर्षाच्या सरासरीमध्ये हिशेबात फक्त नुकसान जास्त भरतं. बाकी शेती न करून नोकरी उद्योग करा म्हणतायत तर शहारातली बेरोजगरी मंगळावरून आलीय का? आहे त्यांना रोजगार नाही, शेतीतील लोंढा शहरात चुकून घुसलाच तर आतंक माजेल. MPSC, रेल्वे बँकिंग वगैरे सोडा तलाठी क्लार्कसाठी इंजिनीरिंग करून पोरं चालली परीक्षा द्यायला, सांगतायत नोकरी धंदा करा. आणि या परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणात आहे. रोजगार निर्मितीला हा देश कमी पडलाय, त्यात कृषिप्रधान म्हणवून घेताना शेतकऱ्याला मातीत घातला, कसातरी जगत होता तो आता पूर्ण विझायला लागला.

शेतकरी हा या काळाच्या रंगमंचावरचा जगणाच्या जगवण्याच्या शेतीच्या कष्टाच्या एका क्रूर नाटकातला त्याचाच घाम न रक्त त्याच्याच थोबाडावर लावून कलाकार ठरवला गेलाय. शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या या शेतकऱ्याच्या शोषणावर जगणाऱया प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरेत कलाकारीचं उत्तुंग शिखर आहेत आणि त्यांनी वाहिलेल्या श्रध्दांजली या स्टँडिंग ओवीएशन आहेत आमच्या अगणित भाऊ, बहिणी, आयबा, चुलत्या आज्यांच्या आत्महत्येच्या सादरीकरणाला.
--------------
हमीभाव देऊ शकत नाही या विधानापासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेली शेतकरी विरोधी भूमिका ही मंत्रालयात शेतकऱ्याला तुडवेपर्यंत ते कर्जमाफीच्या नावाखाली नागवलेल्या शेतकऱ्याना पुन्हा विम्याच्या लायनीत उभा करून बडवून अधू करून जीव जाईपर्यंत लावून धरली गेली आहे. हा आलेख वाढत गेलाय आणि आणखी वाढत जाईल. काळाच्या पडद्यावर हा ठिपका शेतकऱ्याच्या लाल रक्तात गोंदवला जाईल. मराठा समाज कसा क्रूर आहे याचं उदाहरण देताना मध्यंतरी लग्न जमलेल्या मुलीने शेतकरी वडिलांकडे पैसा नाही लग्नाला म्हणून आत्महत्या केली, हुंड्यासाठी घेतलेला बळी या अर्थाने हे उदाहरण देऊन या समाजाचे राज्याच्या पटलावरून अस्तित्व संपायचे मनसुबे रचले जातात सतत सतत.

या मुलीची आत्महत्या ही नक्कीच आर्थिक कारणांसाठी होती, ती हुंड्यामुळे होती म्हणून एकांगी ग्लोरिफाईड झालीय तर एस टि पास ला पैसे नाहीत म्हणून जीव दिलेली आमचीच बहीण होती. घसरलेला आर्थिक स्तर हे एकमेव कारण आहे या सर्व मुळाशी. मग शाळेच्या फी पासून बाळंतपणापर्यंत ते अगदी चिता रचायला पैसे हाता पाया पडून आणन्यापेक्षा जीव देणं सोपं वाटतं. मराठा समाज पुढं आहे यात कारण शेतीवर तोच अवलंबून आहे सर्वात जास्त. शेतमालाची हमीभावाची होणारी माती ही शेतीवर अवलंबून असलेल्या सर्व समाजाच्या बरबादीचं, खच्चीकरणाचं कारण आहे. जाणून बुजून केलंय म्हणू शकतो. कुणब्याची लेक होती ती, तिच्या सामाजिक अनुभव समजानुसार कुणबी मराठा लिहिलं तिनं, सोयीनुसार मराठा धरणार, सोयीनुसार हुंडा धरणार. घर चालवायला पैसा नाही, पिकाला भाव नाही ही उद्विग्नता दिसत नाही. या तीन वर्षांत आतंक माजलाय ग्रामीण अर्थकारणात. तुम्हाला अर्थातच मान्य होणार नाही. तिला खांदा द्यायला अठरा पगड जातीतले आले असतील, गावात ती कट्टरता नाही आचार व्यवहारात विचारात. असेल आंतरजातीय करताना पण तुम्ही शहरात समोरच्याची जात बघून पाणी देणारे, तुम्ही काय गप्पा मारता?  

जातीचं कीर्तन करायला वेळ नाही अवकाळी अन दुष्काळ या चक्रातून.
--------------
दुर्लक्षित केले गेलेले मोर्चे आणि संपवला गेलेला शेतकरी संप हे पुरावे आहेत जनतेला एका समाज गटाला समाजाचा भाग न मानणाऱ्या वृत्तीचा. काळानुसार जातींचं स्वरूप बदललं आहे. मानवी हक्क तुडवला गेलेला समाजगट क्षुद्र या व्याख्येत बसवायचा तर आज समस्त शेतकरी वर्ग या व्याख्येत बसतो. मराठा मोर्चा त्याचंच फलित आहे, शेतकरी संप त्याचाच उग्र अध्याय आहे. ही धुसमुस मोठ्या उलथापालथीला जन्म घालणार आहे.

"दुरवर पेटलेल्या गावांचा वणवा हॉरिझॉन वरून सुंदर दिसतो. गावं बेचिराख होतायत त्याचा धूर तुम्हाला अद्भुत वाटतोय दुरून. एन्जॉय करा जळणाऱ्या आमच्या संसारांची धग."

Web Title: Maratha Kranti Morcha Mumbai Akash Chatake writes farmers woes