स्पर्श (मंदाकिनी डावरे)

marathi article in sakal saptarang by Mandakini Daware
marathi article in sakal saptarang by Mandakini Daware

‘‘...म्हणे; एकाच्या बदल्यात दोन! पण अहो, सध्याच्या त्या वृक्षाबद्दल तुमच्या काही भावना आहेत की नाहीत?’’ सात्त्विक संतापानं गंधाली म्हणाली आणि खरोखरच आता तिला शिरिषाच्या सुगंधापेक्षा त्याचं अस्तित्व महत्त्वाचं वाटू लागलं! शिवाय, ते टिकवून ठेवण्यासाठी जिवाचं रान करण्याचा तिनं निश्‍चयच केला.

‘‘बिरजू, बेटा काय करून बसलास तू हे? अरे, तुझ्या रिक्षाची ठोस त्या बाईंना लागली. त्या बेशुद्ध झाल्या. असं कसं झालं तुझ्याकडून?’’ लॉकअपमध्ये असलेल्या आपल्या मुलाला रिक्षाचालक गोपीनाथ तळमळून विचारत होता.

कॉमर्स कॉलेजमध्ये शिकणारा बिरजू हा काही व्यावसायिक ड्रायव्हर नव्हताच. त्याच्या हौसेखातर गोपीनाथनं त्याला सहा महिन्यांपूर्वीच वाहनपरवाना काढून दिला होता. दिवसभर राबणाऱ्या आपल्या वडिलांना दुपारच्या वेळी थोडी विश्रांती मिळावी म्हणून बिरजू कॉलेजचे सकाळचे तास संपल्यानंतर मधून मधून दुपारी रिक्षा चालवत असे. सावधगिरीनं आणि काळजीपूर्वकच तो हे काम करत असे. गोपीनाथचीही त्याच्याबद्दल काही तक्रार नव्हती.

‘‘बाबा, अंग तापलंय तुमचं. आजच्या दिवस सकाळीच जातो मी रिक्षावर. कॉलेजच्या नोट्‌स घेईन मी अमीनकडून,’’ बिरजूनं वारंवार विनवणी केल्यानंतर गोपीनाथ कसाबसा राजी झाला.

‘‘जा बेटा...पण सकाळची वेळ गर्दीची असते. रिक्षा जपून चालव,’’ असं बजावत त्यानं बिरजूला परवानगी दिली.  

गोपीनाथ नेहमी ज्या ठिकाणी रिक्षा उभी करायचा तिथंच बिरजूनंही रिक्षा उभी केली आणि तो प्रवाशांची वाट पाहू लागला. बऱ्याच वेळानंतर एक प्रवासी मिळाला. बिरजूला बरं वाटलं. त्या प्रवाशाला दूरच्या ठिकाणी जायचं होतं. बिरजू त्याला घेऊन निघाला. मात्र, महात्मा चौकाच्या वळणावर त्याच्या रिक्षाची धडक स्कूटी चालवणाऱ्या बाईला कशी काय बसली हे त्याचं त्यालाही कळलं नाही. काय असेल ते असो...पण बिरजूच्या नशिबी काही दिवस तरी लॉकअपमध्ये राहणं आलं...

रुग्णालयात असणारी ती अपघातग्रस्त महिला अद्यापही शुद्धीवर आली नव्हती. अपघाताची बातमी कळताच चौकशी करण्यासाठी तिच्या बॅंकेतल्या लोकांनी तिथं गर्दी केली.

तिचं नाव गंधाली होतं. पतीच्या निधनानंतर सिंगल पालकत्व स्वीकारून छोट्या श्रीची देखभाल करताना आणि नोकरी सांभाळताना तिची ओढाताण होत होतीच. अशातच बॅंकेच्या एका शाखेतून काही दिवसांपूर्वीच तिची बदली मुख्यालयात झाली होती. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या

मुख्यालयात पोचताना रस्त्यातली रहदारी ही मात्र तिची डोकेदुखी ठरत होती; पण त्याला इलाज नव्हता. एके दिवशी अशीच गर्दीतून वाट काढत गंधाली महात्मा चौकापर्यंत आली आणि हवेच्या हलक्‍याशा झोताबरोबर आलेल्या मंद अशा परिमलानं तिला जणू लपेटूनच टाकलं. खूप प्रसन्न वाटलं तिला. तिच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या आणि त्याच नादात ती कधी बॅंकेत पोचली हे तिला कळलंही नाही.

‘‘काय बाईसाहेब? आज ट्रॅफिक जॅममधून लवकर सुटका झालेली दिसतेय!’’ गंधालीच्या प्रफुल्लित चेहऱ्याकडं पाहून मीरानं विचारलं. मीराचं निरीक्षण खरंच होतं. एरवी बॅंकेत येताक्षणीच कपाळावर आठ्या घालून ट्रॅफिकच्या नावानं रोज खडे फोडणाऱ्या गंधालीचा आजचा नूर काही वेगळाच होता. तो सर्वांना जाणवला.

‘‘मीरा...अगं, आज इकडं येताना, त्या महात्मा चौकातल्या एका मोहक सुगंधानं, परिमलानं मला वेढलं आहे, असा भास मला झाला. खूप छान वाटलं गं!’’ गंधाली सांगू लागली. 

‘‘वा मॅडम, वा! असल्या भासांवर कधीपासून विश्‍वास बसू लागला तुमचा? छे! तो भास वगैरे काही नसून त्या चौकातल्या शिरिषाच्या नाजूक फुलांचा तो दरवळ असतो. याच महिन्यात फुललेला शिरीषवृक्ष दीड महिना तरी हा दरवळ पसरवत राहतो,’’ मीरानं दिलेल्या या स्पष्टीकरणाचा अनुभव गंधाली आता रोज घेऊ लागली होती. साहजिकच तिची पूर्वीची भुणभुण बंद झाल्यानं तिचे सहकारीही सुखावले होते. परंतु...एके दिवशी वेगळीच बातमी गंधालीच्या कानावर आली.  -महात्मा चौकात राहणारी तिची मैत्रीण अनघा हिनं ती बातमी तिला सांगितली. त्या बातमीनुसार, गंधालीचा लाडका शिरीषवृक्ष भुईसपाट केला जाणार होता...

अनघा राहत असलेल्या सोसायटीच्या कमिटीनं ‘एका वृक्षाच्या बदल्यात दोन वृक्ष लावून त्यांचं जतन करू,’ असं हमीपत्र महानगरपालिकेकडं देऊन, रस्तारुंदीच्या कारणास्तव वृक्ष तोडण्याची लेखी परवानगी घेतली होती.

‘‘म्हणे; एकाच्या बदल्यात दोन! पण अहो, सध्याच्या त्या वृक्षाबद्दल तुमच्या काही भावना आहेत की नाहीत?’’ सात्त्विक संतापानं गंधाली म्हणाली आणि खरोखरच आता तिला शिरिषाच्या सुगंधापेक्षा त्याचं अस्तित्व महत्त्वाचं वाटू लागलं! शिवाय, ते टिकवून ठेवण्यासाठी जिवाचं रान करण्याचा तिनं निश्‍चयच केला. आपल्या दिवसभराच्या धावपळीतून कसाबसा वेळ काढत गंधाली बॅंकेतून येता-जाता त्या सोसायटीच्या सभासदांना भेटू लागली. ‘शिरीष वृक्ष तोडू नका’, असं म्हणून विनवत राहिली; परंतु प्रत्येक वेळी महानगरपालिकेचं संमतीपत्र पुढं करत ‘अहो मॅडम, ही सरकारी परवानगी आहे,’ असं सांगून ते तिला वाटेला लावू लागले. 

मात्र, गंधालीचाही निर्धार पक्का होता.

‘‘मला महापालिकेच्या पत्राची प्रत हवी आहे. ती तुम्ही मला उद्या द्यावी. ती मिळाल्याशिवाय मी उद्या इथून हलणार नाही,’’ असं बजावूनच ती त्या सोसायटीबाहेर पडली.

श्रीला लवकर शाळेत सोडून पुढं पत्राची प्रत आणण्यासाठी त्या सोसायटीत वेळ द्यावा लागणार म्हणून गंधाली आज घराबाहेर पडणार तेवढ्यात ‘आई, आत्ताच्या आत्ता मला मोहितसारखीच बॅकपॅक हवी’ असा हट्ट करत श्री मोठ्यानं रडायला लागला.

श्रीच्या हट्टापुढं गंधालीचा नाइलाजच झाला. त्यात तिचा जो वेळ गेला त्याची त्या लहान जिवाला काय कल्पना? बॅगमुळे स्वारी भलतीच खूश झाली हे मात्र खरं.

ठरवल्यानुसार गंधाली ही अनघा राहत असलेल्या त्या सोसायटीत आली. सोसायटीच्या ऑफिसमध्ये बराच वेळ थांबली. मात्र, सेक्रेटरी महाशयांनी तिथं पाऊलही टाकलं नाही. शेवटी, बॅंकेत पोचायला उशीर होत असल्यानं गंधाली तिथून घाईघाईनं निघाली. मुख्य रस्त्यावर येताना तिला बॅंकेतल्या लोकांचे नाराज चेहरेच दिसू लागले. रस्त्याकडं तिचं लक्षच नव्हतं. आणि तेवढ्यात धडाऽऽऽम्‌ असा मोठा आवाज होऊन गंधाली तिच्या स्कूटीसह लांबवर फेकली गेली आणि त्यातच तिची शुद्ध हरपली.

रुग्णालयात दोन दिवस बेशुद्ध असलेल्या गंधालीनं तिसऱ्या दिवशी डोळे उघडले तेव्हा सर्वांना हायसं वाटलं. मात्र, ताबडतोब तिला कुणी भेटू शकणार नसल्यानं इन्स्पेक्‍टर खोत यांना गंधालीची जबानी घेण्यासाठी अजून एका दिवसाचा अवधी द्यावा लागला.

खोत यांनी गंधालीकडं अपघाताबद्दल विचारणा केली. जबानी देताना गंधालीनं खरं काय ते सांगितलं. ती म्हणाली ः ‘‘ या अपघातात त्या बिचाऱ्या रिक्षावाल्याची काय चूक? माझंच लक्ष नव्हतं. विचारांच्या नादात मी राँग साईडला कशी काय गेले ते मलाच कळलं नाही. चूक माझीच होती.’’ गंधालीची प्रामाणिक जबानी अशा प्रकारे बिरजूच्या सुटकेसाठी महत्त्वाची ठरली. बिरजूची सुटका झाली आणि त्याच क्षणी त्याला एका वेगळ्याच विचारानं झपाटलं...

‘वृक्षतोड होऊ नये यासाठी एक स्त्री जिवाचं रान करते’ ही गोष्ट एव्हाना सगळ्यांना कळली होती. तरीसुद्धा अपघातग्रस्त गंधालीचं ते काम अपूर्णच राहिलं होतं. 

दरम्यानच्या काळात गंधालीच्या या कामाविषयी बिरजूला कळलं होतंच. बिरजूनं आता तेच काम पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आणि त्याच्या मित्रांसह एक चळवळ उभी केली ः ‘वृक्षतोड...नो अँड नेव्हर!’

चळवळ चांगलीच वाढली अन्‌ दहाचे पन्नास होण्यास मुळीच वेळ लागला नाही. या गटाचं पहिलं लक्ष्य होतं ते म्हणजे शिरिषाचा वृक्ष तोडू पाहणारी ती सोसायटी! तिथले चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्या घरासमोर आता रोज एकच नारा घुमू लागला ः

नाही चालू देणार तुमची मनमानी
सजग होऊन करू वृक्षांची रखवाली

बिरजूच्या दुसऱ्या गटानं ताबा घेतला होता तो महापालिकेसमोरच्या मोकळ्या जागेचा; तर तिसरा एक गट शिरीष वृक्षाभोवती पहारा ठेवण्याचं काम करू लागला...

तरुणाईतच ती! ‘आता माघार नव्हे’ या जिद्दीनं सुरू झालेली त्यांची ही चळवळ प्रसारमाध्यमांनीही उचलून धरली व सर्वसामान्यांपर्यंतही ती त्यामुळेच झपाट्यानं पोचली. चळवळीच्या रेट्यापुढं संबंधित यंत्रणेला अखेर नमतं घ्यावं लागलं आणि शिरीष वृक्ष वाचला! तरुणाईनं जिवापाड मेहनत घेऊन शंभर वर्षांपूर्वीच्या या वृक्षाला जीवदान मिळवून दिलं. 

‘वृक्षतोड...नो अँड नेव्हर’ या चळवळीचं बिरजूनं नंतर ‘स्पर्श’ असं नामांतर केलं.

‘स्पर्श’ या नामांतराबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्याबद्दल बिरजूला माध्यमांकडून विचारण्यात आलं तेव्हा बिरजू भावुक होत म्हणाला ः ‘‘जिवावर बेतलेल्या परिस्थितीतही गंधाली मॅडमनं मनाचा मोठेपणा दाखवला आणि लॉकअपमधून माझी सुटका झाली. त्याक्षणीच वृक्षांबद्दलच्या त्यांच्या हळुवार भावनांनी आम्हा कार्यकर्त्यांना त्या शिरिषाच्या वृक्षाजवळ पोचवलं. शिरिषाविषयीच्या गंधाली मॅडमच्या कोमल भावनांचा स्पर्श आमच्या मनाला झाला.’’ 

पुढं गंधालीकडं पाहत तो म्हणाला ः ‘‘मॅडम! तुम्ही आता लवकर बऱ्या व्हा. वृक्षरक्षण, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हा उपक्रम आपण आता व्यापक पातळीवर नेऊ या. हिरवाईसाठी आणि आपल्या श्‍वासासाठी तसं करणं अत्यावश्‍यक आहे. ‘स्पर्श’चं नेतृत्व तुमच्याकडं देण्यासाठी आम्ही सगळे आतूर आहोत...!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com