सिग्नलवरचे 'नटसम्राट' (संदीप काळे)

सिग्नलवरचे 'नटसम्राट' (संदीप काळे)

आजोबा खाली मान घालून शांत बसले होते. मात्र, आजींच्या मनात बोलणं दाटून आल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. दुपारी बाराची वेळ, त्यामुळे त्या चिटुकल्या हॉटेलमध्ये आमच्यात व्यत्यय आणणाऱ्यांची संख्या तशी कमीच होती. आजींनी आपली कैफियत थोडक्‍यात सांगायला सुरवात केली... 

यंदा मुंबईतला उन्हाळा कमालीचा तापदायक जाणवतोय. दुपारी बाराची वेळ असावी. फोर्ट इथल्या कार्यालयातून न्यायालयात जाण्यासाठी मी बाहेर पडलो. समोरच्या बाजूला असलेल्या सिग्नलवर एक म्हातारं जोडपं भीक मागताना दिसलं. मुंबईत असणाऱ्या ‘व्यावसायिक’ भिकाऱ्यांसारखं हे जोडपं अजिबात नव्हतं. दोघंही गोरे, नाकेले, हाता-पायांची बोटं लांबसडक आणि मोठमोठे डोळे... काळजीनं काळे पडलेले. या सगळ्या बाबी पाहणाऱ्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. मागं थकलेले आजोबा, पुढं आजी. आजींच्या हातात आजोबांचा हात. आजोबांच्या हातात एक छोटीशी पिशवी आणि आजींच्या हातात एक गाठोडं. अंगावर जीर्ण झालेले कपडे आणि चेहऱ्यावर कुणी ओळखीचं भेटेल याची चिंता असावी. मी त्यांच्याजवळ जाताच त्यांनी माझ्यापुढं हात पसरला. आजी म्हणाल्या ः ‘‘लेका, खाण्यासाठी काहीतरी दे, देव तुझं भलं करेल.’’ आजींनी हात पुढं करताच मी माझा हात आजींच्या हातावर ठेवला. आजींच्या डोळ्यात एकदम चमक आली. त्यांचा चेहरा थोडा उजळला. माझा हात त्यांनी घट्ट पकडला. मागून आजोबा माझ्याकडं आणि आजींकडं पाहत होते. ते पैशापेक्षा प्रेमाच्या स्पर्शाचे जास्त भुकेले असावेत हे त्यांच्या स्पर्शावरून जाणवत होतं. 

कदाचित आजींना त्यांचा मुलगा, नातू माझ्यात दिसत असावा. आजींच्या हातावर शंभराची नोट ठेवत मी विचारलं ः ‘‘कुठल्या तुम्ही?’’ 

आजी म्हणाल्या ः ‘‘आम्ही याच भागात फिरतो, आता वर्ष झालं.’’ 

‘‘या इकडं’’ म्हणत मी त्या दोघांना सिग्नलच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा हॉटेलात घेऊन गेलो. दोघंही घामाघूम झाले होते. 

वेटरनं पाण्याचा ग्लास पुढं ठेवत विचारलं ः ‘‘क्‍या लेना है?’’ 

‘‘थांब थोडं’’ असं म्हणत मी त्याच्या घाईला आवर घातला. 

म्हटलं, या दोघांना अगोदर खाऊ घालावं आणि मग पुन्हा यांच्याशी बोलावं. 

‘‘काय घेता?’’ असं मी त्या दोघांना विचारलं. त्यावर ‘‘काहीतरी खाऊ, भूक लागली आहे,’’ असं आजोबा म्हणाले. 

‘‘रात्री आम्ही तसेच उपाशी झोपलो,’’ आजी मध्येच म्हणाल्या. दोघांसाठीही जेवणाची थाळी मागवली. त्यांच्या पोटात खूप भूक होती. समोर ताट होतं. मात्र, ते खायचं सोडून ते चार म्हातारे डोळे ‘मी कोण असेन’ याचा अंदाज घेत होते.

आजींनी हात पुढं केला. मला वाटलं घास घेण्यासाठी हात पुढं केला असावा. मात्र, माझ्या गालावर हात फिरवत आजी म्हणाल्या ः ‘‘बाळा, कुठला रे तू? म्हाताऱ्या माणसाला जेवू घालतोस. पुण्याचं काम करतोस.’’ आजोबाही दोन्ही हात जोडून आजींच्या ‘हो’मध्ये ‘हो’ मिसळत होते. मी त्यांना म्हणालो ः  ‘‘अगोदर शांतपणे जेवण करा, मग आपण बोलू या.’’ त्या दोघांनी जेवायला सुरवात केली. त्या दोघांचं निम्मं लक्ष माझ्याकडं आणि निम्मं लक्ष जेवणाकडं. माझं मात्र सगळं लक्ष त्यांच्याविषयी सर्व काही जाणून घ्यावं याकडं लागलं होतं. त्यांचं जेवण निवांत चाललं होतं. माझ्या मनात घालमेल सुरू होती. त्यांना कसं बोलतं करावं? काय विचारावं? त्यांना ते आवडेल का? ते खरी माहिती देतील का? असे अनेक प्रश्‍न मला पडत होते. त्यांचं जेवण झालं. उरलेलं अन्न आजीबाईंनी जवळच्या पिशवीत बांधून घेतलं. जेवण झाल्यावर दोघंही माझ्या चेहऱ्याकडं टक लावून पाहत होते. मी त्यांना विचारलं ः

‘‘राहायला कुठं आहात तुम्ही?’’ 

ते म्हणाले ः ‘‘मीरा-भाईंदरला एका झोपडपट्टीत राहतो.’’ 

‘‘कोण कोण असतं सोबत?’’ 

‘‘आमच्यासारखी बरीचशी मंडळी आहेत.’’ 

‘‘कुठलं तुमचं गाव?’’ 

ते म्हणाले ः ‘‘वाशिम.’’ 

‘‘मग मुंबईत कसे आलात?’’ 

दोघंही एकमेकांकडं बघत म्हणाले ः ‘‘पोट भरायला, जिवंत राहायला. अजून काय?’’ 

‘‘कोण कोण आहे तुमच्या घरी? ते काय करतात? तुम्ही काय करत होतात आणि मुंबईपर्यंत आलात कसे?’’ असे काही सलग प्रश्‍न मी त्यांना विचारले. 

आजोबा खाली मान घालून शांत बसले होते. मात्र, आजींच्या मनात बोलणं दाटून आल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. दुपारी बाराची वेळ; त्यामुळे त्या चिटुकल्या हॉटेलमध्ये आमच्यात व्यत्यय आणणाऱ्यांची संख्या तशी कमीच होती. आजींनी आपली कैफियत थोडक्‍यात सांगायला सुरवात केली. 

दोघांनी सांगितलेली कहाणी शब्दांत उतरवतानाही मला खूप अवघडून गेल्यासारखं वाटतंय. कुणावरही अशी वेळ येऊ नये, असं म्हणण्यापलीकडं आपण काहीही विचार करणार नाही, हे तेवढंच खरं आहे. हे आजी-आजोबा वाशिम शहरातले. दोघंही शिक्षक. सेवानिवृत्त. चांगल्या कामासाठी शासनाचे पुरस्कारही त्यांना मिळालेले. मुलं उभी कशी राहतील, शिकतील कशी, यासाठी दोघांनी अवघं आयुष्य वेचलं. तीच मुलं आपल्या आई-वडिलांशी कशी वागली ते समोर प्रत्यक्ष दिसत होतं. कोणत्याही आई-वडिलांच्या वाट्याला हे असं येऊ नये, असं म्हणण्याजोगीच एकूण स्थिती होती.

आजोबांचं नाव काशिनाथ काळबांडे आणि आजींचं नाव सत्त्वशीला काळबांडे. या आजी-आजोबांना तीन मुलगे आणि एक मुलगी. संजय, विजय, अजय आणि सुजया अशी त्यांची नावं. चारही मुलं कमावती झाली, चौघांची लग्न झाली. या आजी-आजोबांची जवळची सर्व पुंजी मुलांच्या लग्नासाठी आणि घराच्या बांधकामासाठी खर्च झाली. येणारा पेन्शनचा पैसा मुलाच्या खात्यावर जाऊ लागला. आता यांच्याकडं आर्थिक मालमत्ता कुठलीच शिल्लक नव्हती. त्यांनी तीन मुलांसाठी तीनमजली घर बांधून दिलं आणि विश्‍वास एवढा की ते घर त्या मुलांच्या नावेही करून दिलं.

मुलीला एका खासगी संस्थेत नोकरी लावण्यासाठी राहिलेली शिल्लक रक्कम देऊन टाकली. सुरवातीची चार-पाच वर्षं सगळ्यांचं खूप छान चाललं. तिन्ही मुलांना मुलं-बाळं झाली. त्यांचे संसार फुलू लागले. तिन्ही मुलं आणि त्यांच्या बायका कामामध्ये व्यग्र होऊन गेल्या. आपल्या रुटिनमध्ये आणि प्रायव्हसीमध्ये आई-बाबांचं सतत वेगवेगळ्या विषयांवर मत घेणं आता त्यांना नकोसं झालं होतं. मग छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद वाढायला लागले. बायकाबायकांची भांडणं आजींसंदर्भात टोकाची भूमिका घेऊ लागली. अनेक वेळा मुलीनं येऊन तिन्ही सुनांची समजूत काढायचा प्रयत्न केला; पण त्याचा काही फायदा झाला नाही. कारण, तिन्ही मुलं आपल्या बायकोचा शब्द खाली पडू द्यायचे नाहीत. भांडण झालं तर ते आपल्या बायकोची बाजू घेऊन आई-बाबांशी भांडायचे. समजूत घालायला आलेल्या बहिणीचा अपमान करून तिलाही आल्यापावली या तिघांनी परत पाठवलं...अशी सगळी माहिती आजी-आजोबांच्या बोलण्यातून कळली.

हे सगळं ऐकून मला गलबलून आलं. घरात खूपच खालच्या स्वरूपाची वागणूक मिळू लागल्याचा निरोप आजी-आजोबांनी आपल्या मुलीला पाठवला. चार दिवसांनंतर मुलगी आली. तोपर्यंत आजी-आजोबांना घरातून अन्न देणं बंद करण्यात आलं होतं. आता आई-वडिलांना सोबत घेऊन जाण्याशिवाय मुलीकडं दुसरा पर्याय नव्हता. आपल्या घामातून बांधलेलं घर सोडतानाचा प्रसंग आणि त्या वेळचा नातवांचा आक्रोश हे सगळं आजींकडून ऐकत असताना माझे डोळे भरून येत होते. 

मुलं आपल्या बायकोचं ऐकून इतकी स्वार्थी कशी काय होऊ शकतात, असा प्रश्‍न मला पडला होता. या दोघांनी आपल्या मुलांच्या आणि नातवांच्या आठवणीत मुलीकडं दोन वर्षं कशीबशी काढली. शेवटी, ती आपलीच मुलं आहेत, चुकली तर काय झालं हीच त्या दोघांची भावना. आजी-आजोबांना आपल्या मुलांपेक्षा नातवांची अधिक माया, काळजी वाटत होती. त्यांचा जीव तुटत होता निरागस लेकरांसाठी. त्या नातवांना काठीगत हाताशी धरून उर्वरित आयुष्य काढायचं त्यांचं स्वप्न केव्हाच भंग पावलं होतं. आजोबांनी सांगितलेल्या अनेक प्रसंगांतून त्यांची नातवंडांविषयीची ओढ जाणवत होती. त्यांची मुलगी सुजया हिला पाच वर्षांपूर्वीच कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यातच तिचं निधन झालं. आपल्या बहिणीच्या अंत्यसंस्काराला आलेल्या भावांनी आई-वडिलांची थोडीही विचारपूस केली नाही. मुलीच्या पश्‍चात आजी-आजोबा दोघंही जावयाकडं राहू लागले. सात महिन्यांनंतर जावयांनी दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न होऊन आलेल्या मुलीला पाच महिन्यांतच आजी-आजोबा जड व्हायला लागले. भांडण-तंटे रोज वाढत आहेत, हे पाहून जावयांनी ‘तुम्ही तुमच्या मुलांकडं जा’, अशी विनंती सासू-सासऱ्यांना केली. आजी-आजोबांपुढं पेच उभा राहिला. आपल्या शहराच्या जवळच असलेल्या एका वृद्धाश्रमात दोघं राहायला गेले. चार-पाच दिवसांनंतर आजी-आजोबांचा थोरला मुलगा तिथं आला आणि त्यानं ‘इथं राहून आमचं नाक कापता का,’ असं विचारत वाद घालायला सुरवात केली. हा वाद आणखी वाढू नये, यासाठी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनी आजी-आजोबांना बाहेरचा रस्ता दाखवला. आता पुढं काय करायचं या विचारात आजी-आजोबा पडले.

आपला एक मित्र - त्यालाही त्याच्या मुलांनी असंच बाहेर काढलं होतं- आता मुंबईत राहतोय, हे आजोबांना माहीत होतं. त्याच्याशी संपर्क करून आजी-आजोबांनी मुंबई गाठली. आता मीरा-भाईंदरच्या झोपडपट्टीत छोट्याशा झोपडीत दहा-पंधरा जण एकत्र राहतात. इथल्या झोपडीत राहण्यासाठी एका माणसाला दिवसाकाठी शंभर रुपये मोजावे लागतात. हे आजी-आजोबा दिवसभर भीक मागतात. रात्री आणि सकाळी रेल्वेनं प्रवास करताना हे काम सुरूच असतं. चार पैसे मिळवायचे, त्यातून उदरनिर्वाह चालवायचा हे ते वर्षभरापासून करत आहेत. आपण कुठं राहत आहोत आणि काय करत आहोत, याची कल्पना त्यांनी आपल्या मुलांना दिली आहे. कारण, आपली मुलं आज ना उद्या येऊन आपल्याला घेऊन जातील आणि आपल्याला आपल्या नातवांसोबत राहता येईल, असं आजी-आजोबांना आजही वाटतं.

मीरा-भाईंदरमधल्या आणि मुंबईमधल्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये, फूटपाथवर असे अनेक म्हातारे ‘नटसम्राट’ आपल्या मुलांची वाट पाहताना आजही पाहायला मिळतात. 

हे सगळं पाहिलं आणि ‘कुणी घर देता का घर?’ हा ‘नटसम्राट’मधला प्रसंग मला आठवला.

या सगळ्या परिस्थितीत दोष कुणाचा हे न मिळणारं उत्तर आहे. भीक मागून जगणाऱ्या अनेक आई-बाबांना एक  चिंता सतावत असते व ती म्हणजे निधनानंतर आपली मुलं आपलं तोंड पाहायला तरी येतील की नाही?

मला आपली करुण कहाणी सांगून झाल्यावर आजी-आजोबा तिथून निघून गेले. मी सुन्न होऊन गेलो.

सगळं असं का घडत असेल हा प्रश्‍न मला सतावत राहिला. पूर्वी असे किस्से युरोपमध्ये गेलेल्या भारतीयांचे ऐकू यायचे...आता ते लोण आपल्या जवळ इतकं येऊन पोचलं आहे. ‘उसाच्या पोटी काऊस जन्मलं’ ही ग्रामीण म्हण अशा वेळी आठवते आणि हे असं घडणं-बिघडणं थांबवणं आपल्या हातात नाही, ही जाणीव खिन्न करून जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com