आशेचा किरण (श्रेया लघाटे)

आशेचा किरण (श्रेया लघाटे)

ओंकारनं पक्‍याला भेटता येईल का ते विचारलं. मजूर लोक त्याला इमारतीच्या मागं घेऊन गेले. तिथं एका तुटक्‍या खुर्चीत शून्यात नजर लावून बसलेला पक्‍या दिसला. त्याच्या मजूर मित्रांनी त्याला ओंकारची भेट करून दिली. पक्‍या आपल्या तंद्रीतून बाहेर आला; पण डोळ्यातली उदासी तशीच. ओंकारनं काही पैसे पक्‍याला देऊ केले. पक्‍यानं ते नम्रतेनं नाकारले. धन्यवाद दिले. पक्‍यानं प्रश्‍न केला : ‘‘साहेब, हे तुमचे पैसे मला किती दिवस पुरणार? मला या जगात कोणीच नाही; पण मी मेहनतीनं, स्वाभिमानाने रोजी-रोटी कमवत होतो- आता ते पण नाही. मला परत माझ्या नसलेल्या पायावर उभं राहता येईल?’’ 

ओंकार, एका सुस्थित घरातला, आयटी कंपनीत काम करणारा तरुण. वडील मिलिटरीमध्ये उच्चपदस्थ ऑफिसर, आई शिक्षिका. ओंकार म्हणजे संवेदनशील मनाचा एक जबाबदार मुलगा. लहानपणापासूनच मिलिटरीच्या शिस्तीतले संस्कार, लोकांमध्ये मिसळणं, इतर जवानांच्या मुलांना मदत करणं हे कायमचंच. ओंकारचे सर्व वाढदिवस त्याच्या मित्रांबरोबर साजरे होतच; पण त्याचबरोबर अनाथाश्रमात उपयोगी वस्तू देऊन साजरे केले जात, त्यामुळं दुसऱ्यांच्या डोळ्यांतून जग बघण्याची सवय. 

ओंकार रोज आपल्या ऑफिसला कार घेऊन जात असे. आयटी इंडस्ट्रीचा परिसर म्हणजे भरपूर बांधकाम सुरू असेलेली जागा. मोठ्या कॉर्पोरेट बिल्डिंग्जचं काम जोरात सुरू असे, त्यामुळं नेहमीच्या वाटेवरच्या बांधकामाच्या ठिकाणी ठराविक कामगार नेहमी दिसत. ओंकारला नेहमीच आश्‍चर्य वाटत असे, की इतकं कठीण आयुष्य असूनसुद्धा या मजुरांचे चेहरे नेहमी हसतमुख असत. बरेच चेहेरे आता ओळखीचे झाले होते. या चेहऱ्यांमध्ये एक चेहरा तर ओंकारच्या चांगलाच स्मरणात होता. या मजुराला ओंकारनं अतिशय सुंदर रितीनं बासरी वाजवताना बघितलं होतं. ते स्वर इतके सुंदर होते आणि तो मजूर इतक्‍या आनंदानं आणि तल्लीनतेनं बासरी वाजवत होता, की ओंकारनं थोडावेळ थांबून, बासरीच्या सुमधुर स्वरांचा आनंद घेऊनच मार्गक्रमण केलं होतं. त्यानंतर बऱ्याचदा ओंकारनं त्या मजुराला बासरी वाजवताना बघितलं होतं. असेच दिवस जात होते. एकदा ऑफिसला जाताना ओंकारला असं काही दिसलं, की ओंकारचं हृदय हेलावलं. नेहमी दिसणारा, हसतमुख, बासरी वाजवणारा तोच मजूर त्याला कुबड्या घेऊन उभा दिसला. नेहमीचं ते हास्य आता त्या चेहऱ्यावर नव्हतं. अतिशय उदास, उद्विग्न चेहरा. ऑफिसमधून परतल्यावरसुद्धा ओंकारच्या मनात तो चेहराच येत होता. काय झालं असेल? तो चेहरा खूप काही सांगून गेला होता. शेवटी आपण विचारपूस करायचीच असं ओंकारनं ठरवलं.

पुढच्या शनिवारी ओंकार त्या ठिकाणी गेला. कोणालाच तो ओळखत नव्हता. फक्त चेहरे थोडेफार ओळखीचे. कुबड्या घेतलेल्या माणसाविषयी चौकशी केली, तेव्हा बाकीचे कामगार गोळा झाले; त्यांच्याकडून ओंकारला माहिती मिळाली. कुबड्या वापरणारा तो माणूस म्हणजे पक्‍या. पक्‍या मेहनतीचं काम करणारा. रोजंदारीवरचा मजूर. एक दिवशी काम करताना लोखंडी पत्रे अपघातानं त्याच्या पायाला लागले. प्रायव्हेट डॉक्‍टर परवडणं शक्‍यच नव्हतं, म्हणून त्याचे मित्र लांबच्या सरकारी रुग्णालयात कसेबसे घेऊन गेले. तिथंही मोठी रांग. डॉक्‍टरांचं पुरेसं लक्ष मिळालं नाही. डॉक्‍टरांनी तपासलं, तेव्हा उशीर झाला होता. गॅंगरीन झाल्यानं एक पाय गुडघ्यापासून कापावा लागला.

ओंकारच्या मनात चर्रर्र झालं. ‘हे रोजंदारीवरचे लोक, धडधाकट शरीर हीच त्यांची शिदोरी. अंगमेहनत करून पैसे कमवायचे आणि रोजचं जेवण मिळवायचं; पण काही कारणानं ही शिदोरीच हरवली, तर उपाशी मरायची वेळ...’ एका क्षणात ओंकारच्या मनात हजार विचार आले.

ओंकारनं पक्‍याला भेटता येईल का ते विचारलं. मजूर लोक त्याला इमारतीच्या मागं घेऊन गेले. तिथं एका तुटक्‍या खुर्चीत शून्यात नजर लावून बसलेला पक्‍या दिसला. निस्तेज डोळे, निस्तब्ध, जणू काही तो या जगात नव्हताच. कुठल्या तरी अज्ञात विश्‍वात होता. कोणी आलंय याची चाहूलही नव्हती त्याला. त्याच्या मजूर मित्रांनी त्याला ओंकारची भेट करून दिली. पक्‍या आपल्या तंद्रीतून बाहेर आला; पण डोळ्यातली उदासी तशीच. ओंकारनं माहितीची देवाणघेवाण केली. आपल्यासारख्या अनोळखी माणसाला भेटायला आल्याबद्दल पक्‍यानं आश्‍चर्य आणि कृतज्ञता व्यक्त केली. शेवटी निघताना ओंकारनं काही पैसे पक्‍याला देऊ केले. पक्‍यानं ते नम्रतेनं नाकारले. धन्यवाद दिले. पक्‍यानं प्रश्‍न केला : ‘‘साहेब, हे तुमचे पैसे मला किती दिवस पुरणार? मला या जगात कोणीच नाही; पण मी मेहनतीनं, स्वाभिमानाने रोजी-रोटी कमवत होतो- आता ते पण नाही. लोकांनी दिलं ते खातो. हे मजूर मित्र मला त्यांच्यातली अर्धी सुकी भाकरी प्रेमानं देतात. पण किती दिवस? मला परत माझ्या नसलेल्या पायावर उभं राहता येईल?’’ या परिस्थितीतसुद्धा पक्‍यानं दाखवलेल्या स्वाभिमानानं ओंकारला चकित केलं. सर्वच गोष्टी जीवाला चटका लावणाऱ्या होत्या.

पुढं दोन दिवस पक्‍याचा चेहरा, त्याचे प्रश्‍न आणि नियती यांचेच विचार ओंकारच्या मनात घोळत होते. काहीही होवो. आपण काहीतरी केलंच पाहिजे असं ओंकारनं ठरवलं. पुढचा सोमवार आला, तो आशावाद घेऊनच! ओंकारच्या कंपनीमध्ये बऱ्याच सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) ॲक्‍टिविटीज होत. या सीएसआरमध्ये मोठ्या आयटी कंपन्या काही स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करतात आणि समाजाबद्दल असलेलं ऋण चुकतं करण्याचा प्रयत्न करतात. या ॲक्‍टिविटीजमध्ये गरजू लोकांना मदत करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम असतात. ओंकारनं आपल्या कंपनीतल्या लोकांशी आणि एनजीओंशी संपर्क साधून पक्‍याच्या बाबतीत काही मदत मिळेल का याची चौकशी केली. इतकंच नाही तर याचा पाठपुरावा केला. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलं. एका संस्थेनं पक्‍याला एक व्हीलचेअर देण्याचं कबूल केलं. यात थोडे पैसे ओंकारनंही टाकले. ही गुड न्यूज ओंकारनं पक्‍याला कळवली. 

इतकंच नाही, तर पक्‍याला स्वाभिमानानं आयुष्य जगता यावं यासाठी ओंकारच्या डोक्‍यात अजून एक प्लॅन होता. सुस्थित कुटुंबात असल्यानं ओंकारचा मित्रपरिवार होता, इतर ठिकाणी चांगल्या ओळखी होत्या. त्यातलेच एक म्हणजे परमप्रितसिंगकाका. ओंकारचे वडील आणि या काकांची मिलिटरीमधली ओळख आणि घनिष्ट मैत्री. एकमेकांकडं येणं-जाणं होतं. शहरामध्ये सिंगकाकांचं एक मोठं कपड्यांचं शोरूम होतं. कधीही कोणाची शिफारस न करणाऱ्या ओंकारनं पक्‍याची शिफारस मात्र सिंगकाकांकडं केली. त्याची गोष्ट काकांना सांगितली. पक्‍याला कुठं काही काम मिळू शकेल का, याची विचारणा केली. ‘तुम्ही त्याला 

काही मदत करू शकाल का,’ अशी विनंती केली. त्यावर सिंगकाका म्हणाले : ‘‘बेटे, आप चिंता ना करो, उस को मेरे शोरूम मे काम मिल जाएगा. मेहनत करनेवाले को तो वाहेगुरू भी मदत करते है!’’ 

सिंगकाकांनी फक्त एकच अट ठेवली, की पक्‍याबद्दल काही माहिती नसल्यानं एकदा त्याची माहिती आणि फोटो पोलिसांकडून व्हेरिफाय करून घेईन. ओंकारनं त्यांची अट आनंदानं मान्य केली आणि त्याचबरोबर काकांना जाणीव करून दिली, की अपंगत्वामुळं आणि अतिशय वेगळ्या कामाचा अनुभव असल्यानं पक्‍याला हे काम समजून करायला थोडा वेळ लागेल. सिंगकाकांनी संमती दिली आणि ‘‘माझ्याकडून निश्‍चिंत राहा,’’ असं सांगितलं.

इकडं ओंकारनं सगळी माहिती पक्‍याला दिली. पक्‍यासाठी तर हे सगळं स्वप्नवत होतं. एक अनोळखी माणूस येतो काय, आपली कळकळीनं चौकशी करतो काय आणि आपल्याला इतका खटाटोप करून काम मिळवून देतो काय? पक्‍याच्या डोळ्यांतले अश्रू ओंकारच्या हृदयावर अभिषेक करत होते. आता पक्‍याच्या डोळ्यांतल्या आशेला अंकुर फुटायला लागले होते. पक्‍यानं ओंकारला हात जोडून अभिवादन केलं : ‘‘साहेब, या जगात अजून चांगुलपणा बाकी आहे.’’

सिंगकाकांच्या शोरूममध्ये पक्‍याला काम शिकवलं गेलं. बसल्या जागेवर आलेल्या लोकांना कपडे दाखवणं हे ते काम. दोन वेळचं जेवण, राहायला शोरूम, शेजारचीच छोटी खोली आणि थोडा पगार. पक्‍यासाठी तर आकाश ठेंगणं झालं. काहीही झालं, तरी मिळालेलं काम नेटानं करायचं आणि संधीचं सोनं करायचं, असं त्यानं मनानं ठरवलं. तो प्रामाणिकपणानं सिंगकाकांकडून शिकून घेऊ लागला. हळूहळू त्याची मेहनत आणि जिद्द यांना रंग येऊ लागला. पक्‍या आता दुकानात आलेल्या महिलांच्या पेहेरावावरून त्यांना काय आवडेल याचे अचूक तडाखे बांधू लागला. कोणाला कोणता रंग आवडेल, कोणाला उंची कपडे लागतात, कोणाला साधेपणा आवडतो हे तो अचूक हेरतो. आता दुकानातला तो मुख्य सेल्समन आहे. इतकंच नाही, तर दुकानातल्या दुरुस्त्या, डागडुजीची कामं तो स्वत: करतो. त्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो लिहायला, वाचायला शिकत आहे. या सर्व गोष्टींसाठी त्याला सिंगकाका आणि ओंकार मदत करतात, प्रोत्साहित करतात. त्या दोघांना तो देवच मानतो; पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वीची त्याच्या डोळ्यातली उदासी कुठल्या कुठं पळून गेली आहे. त्या जागी आता नवीन स्वप्नं आणि आशावाद दिसतो. पक्‍याचा आता पंकज झालाय आणि तो सगळ्यांना अभिमानानं सांगतो : ‘‘मी माझ्या नसलेल्या पायावर उभा आहे, तो केवळ सिंगकाका आणि ओंकारमुळंच.’’

ओंकारसाठीही ही घटना खूप मोठी आहे. पक्‍याच्या डोळ्यांतला बदललेला भाव आजही नेहमी ओंकारला आनंद देऊन जातो. हाच खरा आनंद हे ओंकारला माहीत आहे. ओंकारचं आयुष्य या घटनेमुळं खूप बदललं. आता ओंकार नियमितपणे शनिवारी आणि रविवारी काही तास बांधकाम चाललेल्या ठिकाणी जाऊन मजुरांच्या मुलांना शिकवतो. नेहमी एनजीओंच्या संपर्कात असतो आणि जमेल त्या उपक्रमांत भाग घेतो. तो नेहमीच स्वत:ला म्हणतो : ‘इन्क्रीझ युवर ॲपेटाइट ऑफ गुडनेस.’ एक महत्त्वाचा धडा ओंकारला मिळाला आहे. आयुष्यात पैसे महत्त्वाचे असतात. त्यांची गरज पण असते; पण त्याहीपेक्षा कोणत्याही माणसाला जगायला गरज असते, ती एका आशेच्या किरणाची! माणूस आशेवरच तर जगतो. तीच नसेल तर मात्र आयुष्य कठीण आहे. आपण कोणाला पैशांनी मदत करू शकत असू तर उत्तमच; पण ते शक्‍य नसलं, तरी आपण कोणाला एक आशेचा किरण जरी देऊ शकलो, तरी त्याचा ‘नाही रे’पासून ‘आहे रे’पर्यंतचा प्रवास सहज शक्‍य आहे. त्यानं दाखवलेल्या आशेच्या किरणामुळं पंकजच्या आयुष्यात प्रकाश आला आहे... लवकरच पंकज आपल्या स्वकमाईतून कृत्रिम पाय म्हणजेच जयपूर फूट घेणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com