ऋणानुबंध (अंजली गोखले)

अंजली गोखले
रविवार, 17 जून 2018

आम्हा दोघींचे ऋणानुबंध जास्त घट्ट होते. बालपणात लावलेलं मैत्रीचं रोपटं अनेक वर्षांच्या, अनेक वादळांमध्येही तग धरून राहिलं होतं. प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगात ते खूप वाकलं; पण मोडून नाही पडलं. आमचे मैत्रीचे धागे घट्ट बांधले गेले होते. शेवटपर्यंत ती गाठ अतूट राहिली होती.

आज मी सरूच्या दहाव्याला आवर्जून आले...अगदी जिवाचा आटापिटा करून आले. खरंतर मुद्दाम येण्यासारखा हा प्रसंग नाही, स्थळ नाही, सरू माझ्या नात्याची नाही... हे सगळं मला माहीत आहे, तरीही मी आलेय. कारण, सरू माझी लहानपणापासूनची जिवाभावाची मैत्रीण. तिच्याबरोबर घालवलेले बालपणापासूनचे ते आनंदाचे, मजेचे, प्रेमाचे क्षण मला आत्ताही आठवत आहेत. आमची दोघींची घरंही बऱ्यापैकी जवळ होती. एकाच गल्लीत. त्यामुळं दिवसातला जास्तीत जास्त वेळ आम्ही एकमेकींच्या सहवासात असायचो. जेवायच्या वेळी गेलो एकमेकींच्या घरी तर हक्कानं जेवायचो. सणासुदीला आमच्या आयाही एकमेकींच्या घरी डबे अगदी भरून द्यायच्या. मग परत नवीन चमचमीत, खमंग पदार्थ भरून डबे परत यायचे. तसं म्हटलं तर फक्त आंघोळीला आणि झोपण्यापुरतं आम्ही आमच्या घरी यायचो. फरक म्हटला तर एवढाच की मी माझ्या घरी धाकटी, तर सरू तिच्या घरी थोरली. मला दोन थोरले भाऊ होते, तर सरूला एक भाऊ आणि एक बहीण. आम्हा दोघींनाही घरची थोडी थोडी कामं करायला लागायची; पण सरूला जरा जास्तच. लहान बहिणीची वेणी घालून दे, कपड्यांच्या घड्या कर, दळण आण, भाजी आण...अशी कितीतरी. त्यामानानं माझे घरी लाडच व्हायचे; पण तरीही आम्हा दोघींचं मेतकूट जमायचं.

दहावी-अकरावीपर्यंत घरचा अभ्यास आम्ही मिळूनच करायचो. हा अभ्यास खूप तास चालायचा. कारण, प्रत्यक्षात अभ्यासापेक्षा आमच्या गप्पाच जास्त रंगायच्या. आम्ही तेच तेच बोलायचो आणि फिदीफिदी हसायचो. माझे भाऊसुद्धा सरू घरी आली की ‘तुझी फिदीफिदी आली बघ’ असं म्हणायचे.

सरूचं नाव होतं सरला! नावाप्रमाणं ती अगदी सरळ, प्रांजळ, निष्पाप, आत-बाहेर काही नाही...लबाडी तर नाहीच नाही. तिचा हा निर्मळपणा अखेरपर्यंत टिकला. खरं सांगायचं तर त्याचमुळं तिची अखेरही लवकर झाली. माझे डोळे तिच्या आठवणीनं भरून आले. पोटात तुटल्यासारखं व्हायला लागलं. 

***
सरूचा थोरला मुलगा गुरुजी सांगतील तसे विधी करत होता. सरूला दोन मुलं आणि एक मुलगी. मुलांचे चेहरे सुकून गेले होते. नजर कावरीबावरी झाली होती. दहा दिवस पाहुण्यांनी घर तुडुंब भरलं होतं; पण त्यात आपली आईच नाही, हे त्यांना तीव्रतेनं जाणवत होतं. खूप प्रौढ नाहीत की एकदम लहानही नाहीत, अशा वयाची ही तिघं मुलं. आईचं नसणं स्वीकारणं त्यांना खूप जड जात होतं. 

मी सरूच्या नवऱ्याकडं पाहिलं. एरवी तोऱ्यात, ताठ्यात असणारा तो मला त्या वेळी एकदम म्हातारा वाटला मला. चेहरा भकास, नजर मेलेली, गालावर दाढीचे खुंट वाढलेले. सरू गेल्यामुळं वाघाची पार शेळी झाली होती. ती जिवंत असताना तिची कधी कदर केली गेली नव्हती. आता तिची किंमत कळेल, कदाचित... हो, कदाचितच.

***

सरूचं लग्न ठरल्याचा तो दिवस मला आठवला. आमची अकरावीची परीक्षा नुकतीच संपली होती. संध्याकाळ व्हायला लागली, पाच वाजायला आले, तरी मी अजून लोळतच होते. गोष्टीचं पुस्तक वाचायचा प्रयत्न चालला होता; पण खरं तर कुठंच लक्ष लागत नव्हतं. सरू आली की फिरायला जायचं, भेळ खायची अशी स्वप्नं मी रंगवत होते. चहा पिण्यासाठी आईनं दोनदा हाकही मारली होती; पण मला खूपच आळस आला होता. सरू येण्याच्या वाटेकडं मी डोळे लावून बसले होते. अन्‌ सरू आली... पण आज माझ्याकडं न येता ती सरळ स्वयंपाकघरात आईकडं गेली. मी ताडकन्‌ उठले आणि आत जाऊन पाहते तो काय! आईच्या गळ्यात पडून सरू स्फुंदून स्फुंदून रडत होती. तिचे हुंदके काही थांबत नव्हते. माझी प्रिय मैत्रीण माझ्या आईजवळ का बरं रडतीय? मला समजेना. आई तिची पाठ थोपटत, ‘उगी, उगी’ म्हणत काही समजावण्याचा प्रयत्न करत होती. माझा गोंधळलेला चेहरा पाहून आईनं मला, आम्हा दोघींसाठी चहा गरम करून आणायला सांगितला. मी मुकाट्यानं दोन कप-बशा घेऊन आले.

तोपर्यंत सरू बरीच सावरली होती. आईनं काय सांगितलं माहीत नाही; पण सरू आता बऱ्यापैकी शांत झाली होती. आमचा चहा घेऊन झाल्यावर आईनं सांगितलं ः ‘‘अगं, आपल्या सरूचं लग्न ठरलं बरं का. आपल्या गावातलंच सासर आहे. बडं स्थळ आहे.’’ लग्न? माझ्या प्रिय मैत्रिणीचं लग्न? म्हणजे ती माझ्याबरोबर कॉलेजला येणार नाही आता इथून पुढं? मी एकटी कशी जाऊ? कुणाशी बोलू? गप्पा कुणाबरोबर मारू? अभ्यास कसा करू? - माझ्या मनात विचारांनी गर्दी केली. सरूशिवाय कॉलेज? ही कल्पनाच मला सहन होईना.

आता सरू शांत झाली होती आणि रडू मला फुटलं होतं! मीच हमसाहमशी रडायला लागले. आई माझ्याजवळ आली. ती आता मला समजवायला लागली ः ‘‘अगं जयू, त्या लोकांनीच मागणी घातली सरूला. मग तिच्या आई-बाबांना नाही म्हणता येईना. रडू नकोस. सरू सुखात राहील बरं...’’

‘‘पण तिच्या कॉलेजचं काय? मी कशी सुखी राहीन गं सरूशिवाय? हा कसा कुणीच विचार करत नाही?’’

मी विचारलं. 

‘‘जयू अगं, दुसरी मैत्रीण भेटेल तुला आणि सरू आपल्या याच गावात असणार आहे... तुम्ही भेटालच की वरचे वर,’’ आई म्हणाली.

‘‘अगं, पण...’’ मी आईकडं पाहत काही बोलणार तोच आईनं खुणेनं मला गप्प केलं.

अन्‌ त्या दिवसापासून आमचं हसणं-खिदळणंच संपलं. सरू शांत आणि गंभीर झाली. पुढं महिनाभरातच तिचं दणक्‍यात लग्न झालं. लग्नाचा सगळा खर्च सासरच्यांनीच केला. सरूला त्यांनी खूप दागिने घातले होते. सोन्यानं नखशिखान्त झगमगली होती सरू! मात्र, ती आणि तिची आई हतबल अशाच वाटत होत्या. सरू सासरी जाताना आम्ही दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडलो. आमचं रडणं थांबतच नव्हतं. शेवटी, माझ्या आईनं मला आणि सरूच्या आईनं तिला बाजूला केलं अन्‌ माझी प्रिय मैत्रीण तिच्या नवऱ्याबरोबर सासरी निघून गेली.

***

सरू गेल्यानंतर मला अजिबात करमत नव्हतं. उगाचच मी आईशीही बोलेनाशी झाले. शेवटी सुटीचं निमित्त काढून आई मला मावशीकडं, आत्याकडं घेऊन गेली. थोडा बदल झाल्यावर मलाही बरं वाटलं. तरी सरूची आठवण आल्याशिवाय राहत नव्हती.

रिझल्टच्या थोडे दिवस आधी आम्ही परत घरी आलो. आल्या आल्या मी सरूच्या घरी जाऊन आले. तिच्या आईकडं सरूची चौकशी केली. तिच्याशी बोलताना मला समजलं की सरूमुळं त्यांच्या डोक्‍यावरचा कर्जाचा बोजा हलका झाला होता. ‘तुमची मुलगी आमच्या मुलाला दिलीत तर कर्ज माफ करू’ असं तिच्या सासऱ्यांनी सांगितल्यामुळं सरूच्या आई-वडिलांचा नाइलाज झाला होता. 

मात्र, माझ्या निरागस, निर्मळ सरूचा बळी दिला गेला आहे, असंच माझं मत झालं. मला खूप वाईट वाटलं. घरी आल्यावर आईनंही मला जवळ घेऊन सगळं सांगितलं. सरूनं आपल्या माहेराला कर्जाच्या विळख्यातून मुक्त केलं होतं अन्‌ स्वतःभोवती कायमस्वरूपी फासच लावून घेतला होता.

थोड्या दिवसांनी आमचा रिझल्ट लागला. आम्ही दोघीही चांगल्या मार्कांनी पास झालो. माझी आई मला मुद्दाम सरूच्या सासरी पेढे द्यायला म्हणून घेऊन गेली. बाप रे, मैत्रिणीचं सासर... मलाच तर खूप टेन्शन आलं. सरूचं घर छान होतं. खूप मोठ्ठं होतं. घराबाहेर मोकळी जागा होती. कितीतरी दिवसांनी आम्ही एकमेकींना भेटत होतो. आमचा आनंद गगनात मावत नव्हता. तिच्या सासूबाईंनीही आमचं स्वागत केलं.

सरू मला तिच्या खोलीत घेऊन गेली. ‘‘वा ऽ मस्तच आहे गं,’’ मी एकदम म्हटलं. आरशाची मोठी कपाटं, मोठाल्या कॉट, त्यावर छानसं बेडशिट, दाराला-खिडकीला पडदे... सरू पटकन लाजली. आम्ही तिचं लग्न झालंय, हे विसरून गप्पा मारायला लागलो. हसणं-खिदळणंही झालंच. ती पास झाली म्हणून तिच्या सासूबाईंनी आणखी एक दागिना केला होता. नवराही कौतुक करत होता, म्हणाली. लग्नानंतर दोघं दूर फिरूनही आले होते. सरूनं आठवणीनं माझ्यासाठी छानपैकी पर्स आणली होती. ती घेताना मात्र माझे डोळे भरून आले. इतके छान मार्क पडूनही सरू माझ्याबरोबर कॉलेजला येणार नव्हती. सरू माझा हात थोपटत होती. आता ती आणखीच समजूतदार झाली होती. एवढ्यात तिच्या सासूबाई आम्हाला बोलवायला आल्या. म्हणाल्या ः ‘चला गं, खाणं करून घ्या, मग गप्पा मारा.’ त्यांनी आमच्यासाठी म्हणजे सरूच्या मैत्रिणीसाठी आणि तिच्या आईसाठी शिरा केला होता. सांडगे-कुरडया तळल्या होत्या. म्हणजे खरंच सरू सुखात होती. निघताना माझ्या आईनं सरूची साडी-ब्लाऊजपीस देऊन ओटी भरली. तिच्या सासूबाईंनीपण आईची ओटी भरली, मला पाकीट दिलं. निघताना पुन्हा माझे डोळे भरून आले. ‘‘येत जा गं वरचे वर सरूला भेटायला,’’ सासूबाई मनापासून म्हणाल्या. येताना आई सरूच्या सासरचं अखंड कौतुक करत होती. सरूनं खरोखरच दोन घरांचा दुवा साधला होता. सासरी येताना माहेरच्या घराला लक्ष्मीची वाट करून दिली होती आणि आपण लक्ष्मी-सरस्वतीच्या पावलांनी सासरचा उंबरठा ओलांडला होता. 

***

माझं कॉलेज-लाईफ सुरू झालं आणि मला नवीन मैत्रिणी मिळाल्या. इकडं सरूनं सगळ्यांना गोड बातमी दिली. तिचं नवीन आयुष्य सुरू झालं. कौतुक होतच होतं. आता त्यात भर पडली. तिच्या डोहाळजेवणाला तिच्या सासरी-माहेरी दोन्हीकडं मी गेले होते. सरू छान दिसत होती. नऊ महिन्यांनी तिनं एका छान गुटगुटीत बाळाला जन्म दिला. आता तर आम्हा दोघींचे रस्तेच बदलले. आपल्या बाळाच्या देखभालीत ती बाहेरचं जग विसरली. अभ्यासात डोकं घालायला लागल्यामुळं मीही आतलं आणि बाहेरचं जग विसरले. माझ्या तीन डिग्र्या घेईपर्यंत सरू तीन मुलांची आई झाली होती. संसारात पूर्ण गुरफटली होती.

तरी आईकडं आले की मी मुद्दाम तिला भेटायची. मुलांचं करण्यात ती स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे विसरली होती. माझं लग्न झाल्यावर आमच्या भेटींमध्ये अंतर पडायला लागलं; पण माझ्या मुलाच्या बारशाला ती आपल्या तिन्ही लेकरांना घेऊन आली होती. मी माहेरी असेपर्यंत मला भेटायलाही ती दोन-तीनदा आली.

बोलता बोलता मैत्रिणींचा विषय निघतोच ना...आत्तापर्यंतच्या आयुष्यात काय करायचं राहिलंय किंवा राहून गेलंय इत्यादी...भाबड्या सरूच्या किती माफक आणि साध्यासुध्या इच्छा होत्या! म्हणाली ः ‘ मला ना, उसाच्या रसाच्या दुकानात जाऊन रस प्यायचाय, तिथला तो घुंगरांचा छुनक छुनक आवाज, आलं-लिंबाचा वास, बर्फ घालून रस प्यायचाय. आम्ही आमच्या घरच्या उसाचा घागरभर रस काढून आणतो आणि सगळ्यांना वाटतो; पण त्या बाकड्यावर बसून मला तिथला रस प्यायचाय.’ खरंच किती माफक इच्छा होती तिची; पण ती काही पूर्ण झाली नाही कधीच. 

***

आता इथं पिंडाला कावळा शिवत नाही म्हटल्यावर काय काय सांगितलं जात आहे! पणही तिची ही इच्छा माझ्याशिवाय कुणालाच माहीत नाही.

आणखीही तिची एक इच्छा फक्त मला माहीत आहे... तिला समुद्र पाहायचा होता. खरंच, उभ्या आयुष्यात प्रत्यक्ष समुद्रकिनाऱ्यावर काही तिला जायला मिळालंच नाही. संसारात इतकी गुरफटली की कधी बाहेर फिरायला म्हणून जायला मिळालं नाही तिला. समुद्राच्या लाटांचा तो स्पर्श तिला अनुभवायचा होता. पायावर येणाऱ्या लाटा तिला कुरवाळायच्या होत्या. समुद्रात 

 

बुडणारा सूर्य, ते प्रतिबिंब, तो लाल-तांबडा गोळा तिला डोळ्यांत साठवायचा होता. आता ही तिची इच्छा कोण आणि कशी पूर्ण करणार होतं?

तिच्या आठवणीनं माझं मन व्याकुळ होत होतं. सरळ स्वभावाची, निर्मळ मनाची, माझी सरू स्वतःसाठी काहीही न करता, न मागता अचानकच निघून गेली होती. मुलांना मोठं करण्यात, त्यांना वाढवण्यात आपल्या सगळ्या आवडी-निवडी तिला माराव्या लागल्या होत्या, नवऱ्याच्या प्रत्येक कृतीला ‘हो’ म्हणत आपल्या आशा-आकांक्षांना तिनं नकार दिला होता. सासू-सासऱ्यांची सेवा करताना आपल्या दुखण्याकडं दुर्लक्ष केलं होतं. आता इथं हळूहळू सगळ्यांची कुजबूज सुरू झालीय...‘काय असेल वहिनींची इच्छा? काय करायचं राहिलंय हिच्या आयुष्यात? काय म्हटलं म्हणजे कावळा शिवेल पिंडाला...आणि आपली इथून सुटका होईल?’ कुजबुजीचं रूपांतर आता गप्पांमध्ये व्हायला लागलं होतं. वातावरणातला गंभीरपणा कमी कमी होत चालला होता. तिथं कावळा फिरकत नसला तरी पोटामध्ये काव काव सुरू झाली होती.

जागेवरूनच मी मनापासून सरूला नमस्कार केला. म्हटलं ः ‘सरे, मी तुला नाही पाजू शकले उसाचा रस; पण तुझी आठवण काढत मी आज जाऊन रस पिते आणि या सुटीत तुझ्या मुलांना घेऊन समुद्रकिनाऱ्यावर फिरवून आणते...’ अन्‌ काय आश्‍चर्य, कुणाचं लक्ष जायच्या आत कावळा पिंडाला चोच मारून भुर्रकन्‌ आकाशात उडालासुद्धा! सरूचा नवरा आणि मुलं माझ्याकडं आली. मुलांनी अक्षरशः मला तिथंच नमस्कार केला. तिच्या नवऱ्याचेही डोळे भरून आले होते.

-मला मात्र, माझ्या सरूचं मन मी ओळखू शकले याचा, आनंद झाला. एक अतीव समाधान मला मिळालं. माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीला या मोहमयी जगातून मुक्ती द्यायला मी मदत केली, असंच मला मनापासून वाटलं! आपलं सगळं आयुष्य तिनं आपले आई-वडील, भावंडं, नवरा, मुलं, घर यांच्यासाठी पणाला लावलं होतं; पण आपलं मन मात्र फक्त माझ्यापाशीच मोकळं केलं होतं. आमचेच ऋणानुबंध जास्त घट्ट होते. बालपणात लावलेलं मैत्रीचं रोपटं अनेक वर्षांच्या, अनेक वादळांमध्येही तग धरून राहिलं होतं. प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगात ते खूप वाकलं; पण मोडून नाही पडलं. आमचे मैत्रीचे धागे घट्ट बांधले गेले होते. शेवटपर्यंत ती गाठ अतूट राहिली होती. आता या मुलांच्या रूपानं ते धागे पुन्हा विणले जाणार होते. मैत्रीचा दुवा तुटला नव्हता, तो तसाच पुढं राहणार होता. मैत्रीच्या समुद्राची लाट पुनःपुन्हा येत राहणारच होती अन्‌ उसाच्या रसाची अवीट गोडीसुद्धा किंचितही कमी होणार नव्हती.

'सप्तरंग'मधील लेख वापरण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi feature story by Anjali Gokhale