छप्पर (डॉ. व्यंकटेश जंबगी)

छप्पर (डॉ. व्यंकटेश जंबगी)

साईनाथ हाउसिंग सोसायटीच्या पार्किंगच्या जागेतली एक छोटीशी बाग...तीत एक झोपाळा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. मी संध्याकाळी शांतपणे बसून झोके घेतोय...मागं आणि पुढं...मनाचं आंदोलनही असंच...विचार मागं आणि पुढं...आज सोसायटीची मीटिंग आहे. मी सोसायटीच्या ‘सेक्रेटरी’च्या पदाचा राजीनामा देणार आहे...का? तुम्हाला सांगू?

आज गिरिजा आली होती, तिची मुलगी मंगला दहावी पास झाली म्हणून पेढे द्यायला. खूप आनंदात होती. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मंगला तिथंच राहून नर्सिंगचा कोर्स करणार होती. गिरिजाचीही तिथंच सोय झाली होती. ती सफाईकामगार म्हणून तिथंच काम करणार होती. आज पेढे देताना गिरिजा म्हणाली ः ‘‘साहेब, त्या वेळी तुम्ही शब्द टाकला, माझ्या बाजूनं सोसायटीच्या मीटिंगमध्ये बोलतात; पण कुणी तुम्हाला जुमानलं नाही. तुमचं ऐकलं नाही. पत्र्याच्या अर्ध्या शेडमध्ये पोरीनं दहावीचा अभ्यास केला. असू दे. तुम्ही त्या वेळी मदत करू शकला नाहीत; पण तुमचे आशीर्वाद तर होतेच ना आमच्यासोबत...’’ तिनं डोळ्यातलं पाणी पुसलं. मला ‘गिल्टी फीलिंग’ आलं. अशी अपराधभावना का आली माझ्या मनात?

***

आमच्या सोसायटीच्या आसपास लहान-मोठी बांधकामं सुरूच असतात. अजूनही आहेत. पलीकडच्या रस्त्याच्या आडबाजूला एक बैठी चाळ आहे. गिरिजा ही मंगलासह - तिच्या मुलीसह - तिथं राहायची. तिचा नवरा व्यसनाधीन होऊन मरण पावला. गिरिजा चार घरची धुणी-भांडी करायची. आमच्या सोसायटीत तीच बऱ्याच जणांच्या घरी कामाला होती. आमच्याकडंही तीच यायची. तिच्या मुलीला मी माझ्या मुलीचे जुने कपडे, पुस्तकं-वह्या देत असे. सणासुदीला तिला गोडधोड दिलं जायचं. ती जणू आमची फॅमिली मेंबर असल्यासारखीच होती. -मंगला मोठी झाली. दहावीत गेली. ती आईला मदत करायची. गुणी पोर. 

मात्र, या वर्षी गिरिजानं तिला प्रेमानं बजावलं ः ‘‘या वर्षी मला मदतबिदत काही नको तुझी. तू फक्त अभ्यास कर!’’

मंगलानं तसंच केलं. तिनं कसून अभ्यास सुरू केला. गणितं, संस्कृत या विषयांतल्या शंका घेऊन ती माझ्याकडं यायची...मी हायस्कूल टीचर असल्यानं, तिची शिकण्याची तीव्र इच्छा पाहून, मलाही खूप बरं वाटायचं. मात्र, सगळं बरं चाललेलं दैवाला कधी बघवतं का? त्याच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असतं.

गिरिजाला आणि मंगलाला चाळीच्या मालकानं जागा सोडायला सांगितलं...एकतर भाडं वेळेवर

मिळायचं नाही...त्यात चाळीच्या मालकाला तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्‍स काढायचं होतं. त्यासाठी त्याला चाळीतल्या भाडेकरूंकडून खोल्या रिकाम्या करून हव्या होत्या. तो दिवस त्या दोघींच्याही आयुष्यातला खूपच वाईट दिवस होता. दोघी जवळपास रडत रडतच माझ्याकडं आल्या.

‘‘साहेब, फार मोठी अडचण आलीय!’’

‘‘काय झालं गिरिजा? रडू नकोस.’’

‘‘सर, आम्हाला चाळीतली जागा सोडायला सांगितली आहे,’’ मंगलाही रडवेली होत सांगू लागली.

‘‘खोली सोडा, असं म्हणतोय मालक. कुठं जावं गरिबानं? त्यात हिचं दहावीचं वर्ष. छप्पर नाही तर कसं राहावं? कोण आसरा देईल गरिबाला?’’ 

‘‘थांब गिरिजा. काहीतरी मार्ग काढू या आपण. कधी सोडायला सांगितलंय घर?’’

‘‘या आठ दिवसांत. काहीतरी करा, साहेब’’

‘‘काय करता येईल तेच बघतोय!’’

‘‘मी सुचवू, साहेब?’’

‘‘बोल ना. नक्की सुचव. उद्या मीटिंग आहे. मी बोलेन...!’’

‘‘आपल्या सोसायटीतल्या पार्किंगमध्ये ती बागेसाठी राखून ठेवलेली जागा...सध्या तिथं शेड आहे. तिथं जर सोय झाली तर...पोरीची दहावी होईपर्यंत...तीन महिन्यांवर दहावीची परीक्षा आली, साहेब. नंतर मी जाईन.’’

‘‘बरं, बरं. उपाय मलाही योग्यच वाटतोय. काही हरकत नाही; पण कसं आहे गिरिजा, मी सोसायटीचा सेक्रेटरी जरी असलो तरी मला यासंदर्भात सगळ्यांची मतं घ्यावी लागतील, मगच काय तो निर्णय होईल. मात्र, मी जोर लावून प्रयत्न करीन, पटवून देईन. तसाही तीन-चार महिन्यांचाच तर प्रश्‍न आहे.’’

***

थोडासा दिलासा मिळाल्यावर दोघी निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी सोसायटीची आठवड्याची मीटिंग होती...कुणाचं प्लम्बिंग, कुणाचं पाणी, वॉचमन इत्यादी नेहमीचे विषय झाल्यावर मी गिरिजाची बाजू मांडली. सगळी परिस्थिती सविस्तर सांगितली आणि शेवटी म्हणालो ः ‘‘मित्रांनो, आपल्याकडंच काम करणारी, सगळ्यांना परिचित असलेली अगतिक गिरिजा तिच्या मुलीच्या दहावीच्या परीक्षेपर्यंत तीन-चार महिन्यांसाठी शेडखाली राहायला जागा द्या, असं म्हणत आहे. मला वाटतं, आपण सगळ्यांनी तिला या परिस्थितीत मदत केली पाहिजे...’’

सभेत काही मिनिटं स्तब्धता पसरली. मग चुळबूळ...मग कुजबूज...पण स्पष्ट कुणीच काही बोलेना.

शेवटी सोनटक्के म्हणाले  ः ‘‘मला वाटतं सर, तिचा विचार तिनं करावा. हा तिचा प्रश्‍न आहे. आपण त्यात पडू नये.’’ 

गिरमे म्हणाले ः ‘‘ती स्वच्छता ठेवणार काय? कुठंही कचरा टाकेल. इकडं-तिकडं वावरेल, मग?’’ 

पंडित म्हणाले ः ‘‘तिची मुलगी आमच्या मुलांमध्ये खेळेल...आमच्या घरी येईल...आपला टीव्ही बघत बसेल.’’ 

काशीकर म्हणाले ः ‘‘आपल्यात तिनं येऊन राहणं म्हणजे...फार विसंगत वाटतंय...दर्जा नावाची काही गोष्ट असते की नाही!’’ 

मग एकच गदारोळ सुरू झाला. सगळ्यांचाच विरोध! मी पुनःपुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. 

म्हणालो ः ‘‘तीन-चार महिने माणुसकी दाखवावी...नंतर शेड काढून तिथं बाग करायचीच आहे...’’

पण छे! कुणीही ऐकून घ्यायच्या मनःस्थितीतच नव्हतं... प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं कडाडून विरोध केला...मी हरलो...माणुसकी हरली...‘स्टेटस’चा विजय झाला...तथाकथित दर्जा जिंकला! इतके दिवस सगळ्यांकडं प्रामाणिकपणे काम करणारी गिरिजा हरली! आपण एवढे दिवस सोसायटीत इतक्‍या बिऱ्हाडांकडं काम करतोय, तर आपली सोय होईल, तिला विश्‍वास होता; पण...

जड अंतःकरणानं आणि जड शब्दांनी मी गिरिजाला सोसायटीच्या निर्णयाबद्दल सांगितलं. साहजिकच ती फार दुःखी झाली. तीच समस्या तिनं पुन्हा मांडली. तेही साहजिकच होतं. दहावी...तीन-चार महिन्यांचाच तर प्रश्‍न... छप्पर नाही...कुठं जाऊ?

नंतर तीन दिवस ती कुणाकडंच कामाला आली नाही...सगळ्यांनाच काळजी वाटू लागली. काय झालं असावं बरं? मात्र, चौथ्या दिवशी गिरिजा नेहमीसारखीच हसत हसत आली.

‘‘गिरिजा, तुझी सोय झालेली दिसतेय’’ मी न राहवून; पण अपराधभावनेनंच विचारलं.

‘‘होय साहेब... एक ‘हळवं छप्पर’ माझ्या मदतीला आलं.’’

‘‘हळवं छप्पर? म्हणजे...?’’ मी आश्‍चर्यानं विचारलं.

‘‘बाजूच्या प्लॉटमध्ये एक मोठं बांधकाम सुरू आहे...तिथल्या वॉचमनची पत्र्याची शेड आहे. तो अन्‌ त्याची बायको असे दोघंच आहेत...बारा बाय चौदाच्या दोन शेड आहेत...तिथं जाऊन विचारलं, तर वॉचमनच्या बायकोनं सांगितलं ः ‘‘कायबी अनुमान करू नुको... दहावी होईस्तवर इथंच ऱ्हायला ये...पोरीला मी बघीन...तू जा कामाला.’’

‘‘पण त्यांनाही अडचण होतच असेल...’’ मी हळूच म्हणालो.

‘‘साहेब...पाऊस जोराचा पडतो तेव्हा खूप माणसं एकत्र वळचणीला थांबतात...अडचण झाली तरी. कारण, कधीतरी पाऊस थांबणार हे सगळ्यांना माहीत असतं...तसंच आहे हे! तीन-चार महिन्यांत माझी सोय होईल तोपर्यंत छप्पर माझ्या डोक्‍यावर दिलं एका भल्या माणसानं...एका हळव्या माणसानं...माझी अडचण ऐकून लई वाईट वाटलं त्याला...आन्‌ मला एक ‘हळवं छप्पर’ मिळालं!’’

गिरिजा काम करून गेली; पण माझ्या डोक्‍याला जबरदस्त काम देऊन गेली.

आम्ही सोसायटीतले ‘सुखवस्तू’ लोक...पार्किंगच्या खांबाला छोटी भेग पडली तरी बिल्डरकडं तक्रार करतो... पाणी/मोटर/स्वच्छता/अस्ताव्यस्त गाड्या लावणं/ मुलांचे खेळ/ मेन्टेनन्स यासाठी मीटिंगमध्ये भांडतो. सुशिक्षित...सुसंस्कृत...पाचआकडी पगार घेणारे...आपल्या अद्याप आकारालाही न आलेल्या, न फुललेल्या बागेचं कारण पुढं करून त्या बिचारीला थोडा काळही आसरा देऊ शकलो नाही आपण? एवढे आत्मकेंद्रित झालोत? स्वार्थी झालोत?आपल्या मुलांची दहावीची परीक्षा असते तेव्हा आपण काय काय करतो? छे! मेंदूला झिणझिण्या आल्या...खूप अपराधी वाटू लागलं... आपल्याला जी माणुसकी कळली नाही, ती एका अडाणी वॉचमनला कळली...!

संध्याकाळी सोसायटीची साप्ताहिक मीटिंग सुरू झाली. मी गिरिजाचा वृत्तान्त सांगितला. सेक्रेटरीपदाचा माझा राजीनामा दिला...खरं म्हणजे, दोन्ही गोष्टींचा कोणत्याही नियमानुसार तसा काहीही संबंध नव्हता. गिरिजाची सोय ही सोसायटीची जबाबदारी नव्हती हे जरी खरं असलं तरीही माणुसकी समजावून सांगण्यात मी एक शिक्षक...खूप कमी पडलो. मुलांना आदर्शवाद सांगणारा मी,

एका प्रामाणिक, असहाय, अगतिक भगिनीला केवळ काहीच काळासाठी एक ‘छप्पर’ देऊ शकलो नाही, याचं वाईट वाटलं... गिरिजा आणि मंगल यांची आता हॉस्पिटलमध्ये चांगली सोय झाली आहे... 

आणि मी? 

राजीनामा दिल्यानं मला आता फक्त थोडासा हलकेपणा जाणवतोय...इतकंच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com