मळभ (मीना भिंगे)

मीना भिंगे
रविवार, 8 जुलै 2018

आईच्या पायावरची शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली. दोन दिवसांनी ती रुग्णालयातून घरी येणार होती. आईच्या अनुपस्थितीत अवनी मोकळेपणानं बाळाशी खेळली. ...आणि आई ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होती तो क्षण एके दिवशी आला...

आज अवनी खूप खूश होती. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. त्याला कारणही तसंच होतं. चित्रकलेच्या स्पर्धेत राज्यपातळीवर चमकली होती ती. आई-बाबांच्या उपस्थितीत, टाळ्यांच्या कडकडाटात तिनं बक्षीस स्वीकारलं. नाचत-बागडत अवनी घरी आली. हातातलं बक्षीस तिनं आजीला दाखवलं. आजीला अतिशय आनंद झाला. सगळं घरच आनंदून गेलं.

‘बाळाचा पायगुण बरं हा’ आजीचं हे वाक्‍य ऐकताच अवनीचा चेहरा एकदम उतरला. आनंदाचं मोरपीस लावून नाचणारं तिचं मन एकदम उदासवाणं झालं.

अवनीच्या पाठीवर जवळपास सातेक वर्षांनी घरात बाळाचं आगमन झालं होतं. इतकी वर्षं सगळं प्रेम, कौतुक अवनीचंच असायचं. आता मात्र त्यात वाटेकरी आल्याची भावना अवनीच्या मनात निर्माण झाली होती. तिच्या चित्रकलेच्या बक्षिसाचं श्रेयही आजीनं बाळाला देऊन टाकल्यानं अवनी मनातून खूपच नाराज झाली. ‘नकोच मला हे बक्षीस; देऊन टाका त्या बाळालाच’, असं म्हणत ती पाय आपटत आतल्या खोलीत निघून गेली.

आईला खूप वाईट वाटलं. कुणीच हे मुद्दाम करत नव्हतं; पण अवनी मात्र वेळोवेळी दुखावली जात होती. आईनं तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला; पण अवनीचा रुसवा काही गेला नाही. आजकाल हे रोजचंच झालं होतं. अशानं अवनीला बाळाबद्दल प्रेम कसं वाटणार? उलट, ती बाळाचा दुस्वास करायला लागेल...आईच्या मनात काळजीनं घर केलं.

‘‘अवनी, मी पोळ्या करेपर्यंत बाळाशी खेळतेस, राणी?’’ आईनं विचारलं.

‘‘मला माझा अभ्यास पूर्ण करायचाय,’’ असं म्हणून अवनीनं टाळाटाळ केली.

तिच्या मनातली अढी काही केल्या कमी होत नव्हती. खरंतर बाळाचं गोड गोड हसणं अवनीला खूप आवडायचं. त्याच्या पावडरचा मस्त वास जवळ जाऊन घ्यावासा वाटायचा.

अवनीकडं पाहून बाळ वेगवेगळे आवाज काढायचं. या सगळ्या गोष्टी तिला खूप हव्याशा वाटायच्या. बाळाला मांडीवर घेताना बाबांची होणारी कसरत पाहताना तिला खूप मजा वाटायची. मात्र, ‘आता आईचं माझ्याकडं लक्षच नसतं, ती सारखी बाळाचीच काळजी घेते,’ या जाणिवेनं अवनी बाळाचा नकळत रागराग करू लागली होती. त्याच्या बाळलीला ती डोळ्यांच्या कोपऱ्यातून हळूच पाहायची. मात्र, त्याच्या जवळ जाणं टाळायची.

आता बाळ रांगायला लागलं होतं. त्याच्या खोड्या वाढू लागल्या होत्या. दिसेल ती वस्तू ते तोंडात घालू लागलं होतं. अवनीच्या वह्या-पुस्तकांवरही ते हक्क दाखवू लागलं होतं! अवनीनं याविषयी आईकडं तक्रार केली की आई उलटं तिलाच म्हणायची : ‘‘अगं, त्याला काही कळत नाही अजून. तूच तुझ्या वस्तू नीट ठेवत जा बरं.’’

हे असं काही झाल्यावर अवनीच्या नाराजीत भरच पडायची. हळूहळू बाळ आता बसू लागलं होतं.

आजी म्हणायची : ‘‘अचपळ आहे बाळ आपलं. लवकरच स्वारी चालायला लागणार...’’

आई म्हणायची : ‘‘बाळानं पहिलं पाऊल टाकलं की तो क्षण आपण कॅमेऱ्यात बंदिस्त करायचा बरं का. हे फोटो नंतर किती आनंद देतात आपल्याला!’’

आई-बाबा आणि आजी यांच्या या अशा गप्पांमध्ये अवनीला अजिबात रस वाटत नसे. तिला समजावण्याचे सगळ्यांनी खूप प्रयत्न केले; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ‘आपल्या  प्रेमातला वाटेकरी’ ही बाळाविषयीची तिची भावना काही कमी होईना. सातेक वर्षांचंच तिचंही वय. तशी लहानच...त्यामुळं तिच्या अशा वागण्यामुळं तिलाही कुणीच रागावत नसे.

एके दिवशी बाळ झोपलंय हे पाहून आई आंघोळीला गेली. मात्र, काही वेळातच बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. काय झालंय, हे पाहण्यासाठी पटकन बाहेर येण्याच्या नादात आईचा ओल्यावरून पाय घसरला. खूपच जोरात पडली ती. तिला उठताच येईना. बाबांनी तिला कसंबसं उठवलं; पण पाऊल काही पुढं टाकता येईना. तिला लगेचच रुग्णालयात न्यावं लागणार होतं; पण बाळाच्या काळजीनं तिला काही सुचेना. मात्र, आजी तिला म्हणाली ः ‘‘ अगं, नको इतकी काळजी करूस तू. मी आहे, अवनी आहे. आम्ही दोघी बघू बाळाकडं. तू जा बरं लवकर रुग्णालयात.’’

आईनं अवनीला जवळ घेतलं व तिच्या डोक्‍यावरून मायेनं हात फिरवला. अवनीला खूप रडू येत होतं. आईला खूप त्रास होतोय, हे तिला कळत होतं. ती आणखीच आईच्या कुशीत शिरली.

* * *

आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. आजींना सगळं कसं निभावता येणार, या विचारानं आईचा जीव अर्धा झाला. त्यात अवनीला बाळाबद्दल वाटणारी भावना तिच्या काळजीत आणखीच भर घालत होती. ‘परमेश्वरा, सांभाळ माझ्या लेकरांना,’ अशी मनोमन प्रार्थना करतच ती शस्त्रक्रियेला सामोरी गेली.

आजीला आता घरातली कामं करायची होती. नेहमी हाकेला हमखास धावणारी सख्खी शेजारीणही काही कारणामुळं गावाला गेली होती. आजीनं अवनीला बजावलं : ‘‘हे बघ, आता आई-बाबा दोघंही घरात नाहीत. आपल्यालाच बाळाला सांभाळायचं आहे. त्याच्याकडं नीट लक्ष दे. मी स्वयंपाक करून घेते.’’ अवनीकडं आता दुसरा पर्यायच नव्हता.

आई घरात नसल्याची जाणीव बाळाला एव्हाना होऊ लागली होती. ते घरभर आईला शोधू लागलं. आई दिसेना तसं रडू लागलं.

आजीनं बाळाला खायला घातलं. थोडा वेळ ते शांत झालं. परत त्याची नजर आईला शोधू लागली. त्यानं रडायला सुरवात केली. अवनी त्याच्याजवळ बसली तेव्हा बाळानं अवनीकडं असं पाहिलं, की जणू ते अवनीला विचारत  होतं : ‘आई कुठंय आपली?’ ते पाहून अवनीनं बाळाला अचानकपणे जवळ घेतलं. मायेनं! बाळाबद्दलचं प्रेम तिच्या मनात दाटून आलं. बाळही खुदकन्‌ हसलं. दोघांचीही कळी खुलली. आता गट्टीच जमली दोघांची. आजीनं हे दृश्‍य मोठ्या नवलाईनं पाहिलं. तिची काळजी तर मिटलीच; पण तिला खूप आनंदही झाला.

आईच्या पायावरची शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली. आता दोन दिवसांनी ती घरी येणार होती. अवनी आता अगदी मोकळेपणानं बाळाशी खेळत-बागडत होती. ...आई ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होती तो क्षण आला. खेळता खेळता बाळ उठलं आणि त्यानं लटपटत पहिलं पाऊल टाकलं! अवनीला क्षणभर काही सुचेचना. नेमकं हे पाहायला आई आत्ता घरात नाही...अवनीच्या मनात विचार आला.

तिनं पटकन आजीचा मोबाईल घेतला. बाळाचे पटापट फोटो काढले. एवढंच नव्हे तर, बाळाच्या दुडक्‍या चालीचा छानसा व्हिडिओसुद्धा काढला.

हे सगळं आपल्याला करता आल्याबद्दल अवनी स्वतःवरच खूप खूश झाली. तिनं बाळाला पटकन उचललं आणि मिठीत घेतलं.

संध्याकाळी बाबा घरी आले व आईला भेटण्यासाठी तिघांना घेऊन रुग्णालयात घेऊन गेले. आईला पाहताच बाळानं तिच्याकडं झेप घेतली. आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

‘‘आज बाळानं पहिलं पाऊल टाकलं बरं का,’’ आजीनं सांगितलं.

आपण त्या क्षणी बाळाजवळ नसल्याची आईला खूप चुटपूट लागली.

अवनी आईजवळ आली आणि आईला म्हणाली : ‘‘आई, डोळे मीट बरं. तुला एक गंमत दाखवायचीय...’’

आईनं डोळे बंद केले व अवनीनं तिच्यासमोर बाळाच्या चालण्याचा व्हिडिओ सुरू केला. आईनं डोळे उघडताच तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. जो क्षण आपल्या हातून निसटून गेला होता, असं आईला वाटत होतं, तोच क्षण अवनीनं आईसमोर जिवंत केला होता!

आईच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले; पण हे आनंदाश्रू होते. आईनं अवनीला प्रेमानं कवटाळलं.

आईला एकाच वेळी दोन गोष्टी मिळाल्या होत्या. निसटून गेलेला क्षण आणि दुरावलेली अवनी...

सगळं मळभ नाहीसं झालं होतं.

आता आकाश अगदी स्वच्छ होतं!

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi feature story by Meena Bhinge