अभिजात मराठी एक पुरावा... दोन जाळावे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi language history

आम्ही गा मराठी । मोठे बोलभांड। करु हेळसांड। एकजुटी।।

अभिजात मराठी एक पुरावा... दोन जाळावे!

आम्ही गा मराठी । मोठे बोलभांड। करु हेळसांड। एकजुटी।।एका अतिशय पुरातन आणि गहन विषयाला आम्ही हात घालत आहो. वाचकांचा आशीर्वाद हीच आमची पुंजी आहे. त्या पूर्वसंचिताच्या जोरावरच आम्ही हे भाषिक संशोधनाचे शिवधनुष्य (आणि बाणही) पेलले आहे. विषय जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि क्लोज टु द हार्ट अशा प्रकारचा आहे.

आपली जी काहीएक मराठी नावाची भाषा आहे किंवा होती, तिच्या भूतकाळातील पुराव्यांचा धांडोळा घेऊन आपण वर्तमानातील तिचे स्थान आणि भविष्यातील होष्यमाण यांचे साक्षेपी विवेचन येथे करणार आहो. माय मराठीला अभिजात करुया, हे आवाहन करितो, आणि लेखन प्रपंच आटपिते. माय मराठी नमस्तुते.

विषय गहन आणि पुरातन आहे, हा डिस्क्लेमर आम्ही आधीच देऊन ठेविला आहे. याऊप्पर पुढील मजकूर वाचकांनी स्वत:च्या जबाबदारीवर वाचावा, असा सल्लादेखील आम्ही देऊन ठेवितो. कां की, या मजकुरामुळे कुणाच्या भावना दुखावू शकतात, कुणाचे हृदय दुखावू शकते किंवा अन्य कुठलाही अवयव दुखण्यास आमंत्रण मिळू शकते. तेव्हा होश्शियार!

आपण ज्याला महाराष्ट्र असे सर्वसाधारणपणे म्हणतो, तेथे एकेकाळी मराठी ही एकमेव भाषा बोलली जात होती, असे पुरावे इतिहासात आढळत नाहीत; तरीही सर्वसाधारणपणे ही भाषा पाचेक हजार वर्षे तरी जुनी असावी, असे मानण्यास (बरीच ऐसपैस) जागा आहे. महाराष्ट्रात पूर्वी दंडकारण्य होते.

म्हणजे जंगल. जंगलात वन्यजीव राहात. ते कुठलीच भाषा बोलत नसत, हे उघड आहे. काही आदिमानव गुहेतबिहेत राहात असतील. ते जी भाषा बोलत, तीस मराठी म्हणत, असे काही ठामपणे सांगता येणे शक्य नाही; तरीही काही जणांच्या मते मराठी ही भाषा पाचेक हजार वर्षे नसली तरी चार-साडेचार हजार वर्षे तरी जुनी असणारच.

काहींच्या मते ही भाषा अगदीच नवीन असून बऱ्याच मराठी लोकांनाही ती तोडकीमोडकीच येते. याचे पुरावे आपल्याला हल्ली पुण्यासारख्या शहरगावातही दिसू लागले आहेत. काहींच्या मते तर मराठी नावाची अशी कुठली भाषाच अस्तित्वात नसून शुद्ध मराठी भाषा ही एक शुद्ध अफवा आहे.

पुराव्यादाखल ही मंडळी मध्यमवर्गीय अंकल-आंटी यांची टावरमधली घरे, विविध टीव्ही च्यानले आणि सोशल मीडियात वापरल्या जाणाऱ्या मराठी भाषेकडे अंगुलीनिर्देश करतात. मराठीच्या न-अस्तित्वाचा हा पुरावा इतका तगडा आणि रग्गड आहे की कुणालाही मराठी भाषा ही अफवाच वाटावी.

असे असले तरी, मराठी ही भाषा नसून फक्त मायबोली आहे, हे अनुमानदेखील पटण्याजोगे आहे. (पहा, वाचा अथवा म्हणा : मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे!) मायबोलीचा ढोबळ अर्थ आई, मम्मा, ग्रॅनी आदींशी घरी बोलावयाची भाषा.

तिचा कार्यालयात अथवा सामाजिक वावरात उपयोग करणे अपमानास्पद मानले जाते. विशेषत: शहरगावातील मराठी लोकांमध्ये ही प्रवृत्ती दिसून येते. मराठी माणसाकडे जसजशी सुबत्ता येते, तसतशी ही मायबोली आक्रसत जाते, असे एक भाषिक व सामाजिक निरीक्षण आहे. म्हणजे मराठी माणूस जितका श्रीमंत, तितकी त्याची मराठी भाषा गरीब!

मराठीची पीछेहाट : थिअरीबिअरी!

इंग्रजी आणि हिंदीच्या अतिक्रमणामुळे मराठी भाषेची पीछेहाट झाली, अशी एक थिअरी मांडली जाते. आम्हांस ती मान्य नाही. किंबहुना मराठीच्या गनिमी काव्यामुळे आंग्लभाषेने दाती तृण धरिले, आणि हिंदी भाषा ऑलमोस्ट नौदो ग्यारह झाली, असेच आम्ही म्हणू.

पुराव्यादाखल आपण व्हाटसप किंवा तत्सम चॅटमाध्यमांतील इंगजी भाषेचा वापर पाहू शकता. ‘झालं का जेवण?’ असा सरळ प्रश्न न विचारता ‘झालं का जे-वन?’ असे इंग्रजीत विचारले जाते. मराठी माणसाचा येथे घास अडकला असता; परंतु तसे घडत नाही. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. पण सॉरी! देणार नाही...

‘‘क्या गाऽऽ... खर्रा होना क्या बे? मांड के रखना...’’ ही अस्सल नागपुरातील पानवाल्या बांधवास गेलेली ऑर्डर हिंदीमिश्रित मराठी म्हणावे की मराठीमिश्रित हिंदी? हा प्रश्न अज्ञ (पक्षी : मुंबईकर आणि पुणेकर) लोकांना पडेल.

परंतु, आमच्या मते वरील वाक्यात मराठीचा प्रयोग जेमतेम काथाइतकाच आहे, तरीही त्यामुळे लज्जत मात्र शतगुणित होते. या ऑर्डरवाक्यातील ‘क्या गाऽऽ...’मधील नागपुरी हेल (कावा) कानाला अतिगोड वाटतो तो त्यातील मराठीपणामुळेच. मुंबईतदेखील मराठीने हिंदीला आपल्या पद्धतीने जमवून घेतले आहे.

मुंबईत दोन मराठी माणसे रस्त्यात भेटली तर एकमेकांना हिंदीतच खुशाली विचारतात. खरे म्हणजे मुंबईत खुशालीबिशाली विचारायला साला टायम कोणाकडे हाय? खालीपिली मगजमारी करण्यापेक्षा पेटपूजा केलेली हमेशा चांगली! हां की नाय? पण मराठी माणूस सामाजिक झाला की तो हिंदीत बोलतो, हे मात्र शतप्रतिशत खरे आहे.

इतिहासात मागे जाऊन पाहिल्यास पानपतापर्यंतचे पुरावे शोधता येतात. पानपतावर दत्ताजी शिंदे यांनी पडता पडता अब्दालीस काय सांगितले? ‘बचेंगे तो और भी लडेंगे!’ घ्या, मराठीतला टग्या दमदेखील हिंदीत द्यावा लागतो, हे सिद्ध करण्यासाठी आणखी मोठा पुरावा कुठला हवा?पुण्यातल्या हिंदीबद्दल काय बोलावे? मन गदगदून येते... रुलाओगे क्या यार?

कसली पीछेहाट? - हाट!

सारांश इतकाच की मराठीची पीछेहाट वगैरे काहीही झालेली नसून या भाषेचा जन्मच मुळी हेळसांडीसाठी झालेला असल्याने तसे वाटते इतकेच. मराठी माणूस हा ‘अहिमाणे कलहसीले’ यानेकी अहंमन्य आणि भांडकुदळ असल्याची प्रतिक्रिया प्राचीनकाळी सातव्या-आठव्या शतकात नोंदवली गेली आहे, हे अनेकांना माहीत असेलच.

मराठी माणूस ‌कितीही भांडकुदळ असला तरी तो मराठीत भांडताना तितकासा कंफर्टेबल (अर्थ : कंफर्टेबलच!) नसतो हेही उघड आहे. कुठलाही मराठी माणूस रस्त्यात भांडू लागला की आपापत: हिंदी भाषेचा आधार घेतो. कां की, हिंदी भाषेतील शिव्या दणकट आणि सर्वमान्य असतात.

कुणालाही सहज समजतील अशा या शिव्या म्हणजे हिंदी भाषेच्या मांडवावरील टप्पोरी लालभडक फुलेच आहे, असे आमचे मत आहे. तसे पाहू गेल्यास मराठी भाषेतही झणझणीत शिव्या आहेत व त्या बऱ्याच प्रमाणात वापरातदेखील आहेत, हे आपल्याला राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावरून आणि समाजमाध्यमांतील क्रिया-प्रतिक्रियांवरून सहज कळून किंवा आकळून येते.

हा आणखी गहन विषय आहे, आणि त्याबद्दल च्यामारी आम्ही नंतर कधीतरी (सकाळी नऊ-दहा वाजता) बकवास करू. किंबहुना, ‘मायला मराठी ऊर्फ मराठी शिव्यांचे सौंदर्यशास्त्र’ हा महान शिव्याग्रंथ आम्ही पुरा करत आणला असून लौकरच तो वाचकांच्या भेटीसाठी येईल, आणि त्या सौंदर्यशास्त्रीय मीमांसेबद्दल दणकट प्रतिक्रिया देण्याची संधीही वाचकांना उपलब्ध होईल, हे आम्ही येथे नम्रपणे जाहीर करीत आहो. वाचकांच्या शिव्या हा एक प्रसादच असतो व तो आम्ही नेहमीच मनोभावे स्वीकारत आलो आहो.

मनोरंजनासाठी मराठी

टीव्ही च्यानलांवरील मराठी भाषा हे एक स्वतंत्र प्रकर्ण आहे. टीव्हीवरील मराठीचे ढोबळ मानाने दोन भाग ग्राह्य धरता येतील. एक, न्यूज च्यानलवरील मराठी आणि दोन, मनोरंजन वाहिन्यांवरील मराठी. या दोन्ही उपभाषा चहूअंगांनी फुलत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

न्यूज च्यानलांवरील मराठी बातम्यांमध्ये हल्ली विविध स्वरूपाचे ‘खुलासे’ उदंड होतात. ‘अमक्याने खुलासा केला’, ‘अमकी बाब समोर आली आहे’, ‘पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की...’, ‘ब्रेकवर जाण्यापूर्वी...’ असले शब्दप्रयोग सर्रास होतात.

‘...असे तो व्यक्ती म्हणाला!’ हे ऐकून तर काही जुने मराठीजन निपचित पडल्याची नोंद आहे. व्यक्ती पुल्लिंगी असो वा स्त्रीलिंगी ती ‘तीच’ असते, हा व्याकरणाचा जुना नियम झाला. आधुनिक काळात लिंगबदल शक्य आहे, तेथे व्याकरणाची काय पत्रास? असो. यातील सर्वात महत्त्वाचा शुद्ध मराठी शब्द म्हणजे ‘ब्रेकिंग न्यूज’ हा होय! या शब्दाला खरोखर पृथ्वीतलावरील कुठल्याही भाषेत पर्याय म्हणून नाही!

मनोरंजन वाहिन्यांवरील मराठी हा मुळात मनोरंजनाचा भागच असल्याने त्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला हवे. काही मराठीचे दुरभिमानी मनोरंजनपर मराठीला तुच्छ लेखतात. वाहिन्यांनी मराठीची हेळसांड चालवली आहे, असा गळा काढतात. आमच्या मते हा दांभिकपणा आहे. मनोरंजनासाठी धटिंगण पुरुषाने साडी नेसून विनोदनिर्मिती केलेली चालते.

मालवणी भाषेला विनोदी समजून हसणेदेखील चालत; पण मनोरंजनपर मराठी मात्र चालत नाही, हा दुटप्पीपणा झाला. उदाहरणार्थ, ‘तू माझी मदत कर ना प्लीज!’ हा संवाद आता शुद्ध मराठीच मानायला हवा. मराठीमध्ये ‘मला मदत कर, तिला मदत कर, त्याच्या मदतीला धाव...’

असे म्हणण्याची पद्धत फार्फार प्राचीन काळी होती. आता नाही. मनोरंजन वाहिन्यांनी मराठी समृद्ध करण्याचा विडाच उचलला असावा, असे आम्हाला प्रामाणिकपणाने वाटते. या प्रकारच्या मराठीला प्रोत्साहन (अर्थ : एनकरेजमेंट) द्यायला हवे. किंवा नाही दिले तरी चालेल. तुमच्या प्रोत्साहनाला विचारतो कोण?

द मराठी क्वेश्चन : अर्थात मराठी कोण?

मराठी म्हणजे काय? हे आत्तापर्यंत आपण पाहिले. आता मराठी म्हणजे कोण? ते पाहू. मराठी बोलतो तो मराठी अशी एक व्याख्या केली जाते. (बेळगाव, कारवार, निप्पाणी, भालकीसह संयुक्त) महाराष्ट्रात राहातो, तो मराठी अशीही एक व्याख्या आहे.

मराठी सोडून हिंदी वा इंग्रजीत बोलतो, तो मराठी असेही काही जणांचे म्हणणे आहे. सर्व व्याख्या आमच्या मते अंशत: सत्य आहेत. एवंच, स्वत:स मराठी म्हणवतो तो मराठी एवढ्या व्यापक अर्थाने मराठी माणसाची व्याख्या तूर्त करावी लागेल.

आपण जीस मराठी म्हणतो, त्या भाषेची जन्मापासूनच हेळसांड होत असल्याची तक्रार होती, असेही पुराव्यावरून दिसते. यावरून ही भाषा हेळसांड करण्याजोगीच असावी, असे अनुमान काढण्यास प्रत्यवाय नसावा.

एदतर्थ, मराठी भाषेची जितकी हेळसांड होईल, तितकी ती अभिजात ठरत जाईल. नव्हे, अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी हेळसांडीचीच नितांत आवश्यकता आहे, हे आमच्या या ऐतिहासिक, सामाजिक आणि मानववंशशास्त्रीय विवेचनाचे सार (अर्थ : अर्क) म्हणता येईल. हेळसांडीच्या कामी आपण सारेच बळ एकवटून संघर्ष करू

टॅग्स :marathisaptarang